हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात उत्पादित झालेल्या कांद्याला सध्या भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळय़ात पाणी आले आहे. मात्र त्याच वेळी अलिबागचा पांढरा कांदा भाव खाऊन जात आहे. कांद्याची माळ दोनशे ते अडीचशे रुपयाला विकली जात आहे. का मिळतोय अलिबागच्या शेतकऱ्यांना हा भाव त्याचा वेध.

सतरा गोण्या कांदा विकला  आणि हाती रुपया पडला..वर्षांतून चार वेळा अशा येतात की जेव्हा कांद्याचे भाव गगनाला भिडतात. पण बाजारात कांद्याची आवक वाढली की हेच दर कमालीचे पडतात. खर्च वजा जाऊन शेतकऱ्यांच्या हाती रुपया शिल्लक राहतो. सध्या याच परिस्थितीला राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सामोरे जात आहे. यास अलिबागचे कांदा उत्पादक शेतकरी मात्र अपवाद ठरत आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त झालेला हा कांदा आज २०० ते २५० रुपये माळ या दराने विकला जात आहे.

या कांद्याची चव कोणालाच ऐकणार नाही. रुचकर चव, औषधी गुणधर्मामुळे हा कांदा बाजारत उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या कांद्यावर मात करतो. हातोहात विकला जातो. दरही चांगला मिळतो. भाताची कापणी झाली. की अलिबाग तालुक्यातील नऊली, कार्ले, खंडाळे, रामराज पट्टय़ात शेतकऱ्यांची कांदा लागवडीची लगबग सुरू होते. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा टिकून असतो. याच ओलाव्याचा वापर येथील शेतकरी कांदा लागवडीसाठी करत असतात. पिढीजात पध्दतीने तयार केलेले अस्सल गावठी बी लागवडीसाठी वापरले जाते. हायब्रीड बियाण्याच्या पाठी येथील शेतकरी जात नाही. दरवर्षी कांदा लागवड करताना एखादा वाफा पुढील वर्षीच्या बियाण्यांसाठी राखून ठेवला जातो.

कापणीनंतर नांगरणीकरून कांद्याची लागवड केली जाते. कांद्याच्या कडेने कोबी, वांगी, टोमॅटो, मिरची, नवलकोल, झेंडू लागवड केली जाते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर व्हावा हा यामागचा उद्देश असतो. सेंद्रिय पध्दतीने कांद्याचे पीक जोपासले जाते. अलीकडे काही प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात असला तरी बहुतांश शेतकरी सेंद्रिय खतांना प्राधान्य देत असतात. सुरुवातीला आठवडय़ातून तीन वेळा नंतर दोन वेळा पाणी देऊन कांद्याची जोपसना केली जाते. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात कांद्याच्या काढणीला सुरुवात होते. कांदा काढून तो शेतात एक दोन दिवस सुकवला जातो. नंतर महिला वर्ग बसून त्याच्या वेण्या बांधतात. एक वेणी साधारणपणे दोन ते अडीच किलोची असते. नंतर वेण्या बांधलेला कांदा बांबूच्या खांबावर लटकवून ठेवला जातो.

पुर्वी वडखळ येथील व्यापारी येऊन हा कांदा विक्रीसाठी घेऊन जात असत. मात्र यात चांगला दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनीच कांद्याची थेट बाजारात विक्री करण्याचे कसब आत्मसात केले. होळीच्या सुमारास रस्त्याच्या दुतर्फा कांद्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाऊ लागली. सकाळच्या सुमारास शेतकरी महिला कांदा बाजारात विक्रीसाठी घेऊन येऊ लागल्या. आठवडी बाजारात कांद्याची मोठय़ा प्रमाणात विक्री सुरु झाली. याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लगाले. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील व्यापारी वर्गाचा हस्तक्षेप कमी होत गेला. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळू लागला. गेल्या वर्षी या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले. त्यामुळे कांद्याचे ब्रँडींग होण्यास मदत झाली. यामुळे दरही वाढण्यास मदत झाली. आज कांद्याची मोठी माळ २५० रुपयाला तर छोटी माळ २०० रुपयाला विकली जाते. म्हणजेच शेतकऱ्याला किलोमागे १०० ते १२५ रुपयांचा दर मिळतो. राज्यात इतर कुठेही कांद्याला इतका चांगला दर मिळत नाही.

अलिबाग तालुक्यात साधारणपणे दोनशे हेक्टरवर पांढरा कांद्याची लागवड केली जाते. मागणीच्या तुलनेत कांदा लागवडीचे हे प्रमाण खूपच कमी असते, म्हणूनच मागणी जास्त असूनही कमी प्रमाणात कांदा बाजारात दाखल होतो. त्यामुळेही कांद्याचे दर चढे राहत असल्याचे जाणकार सांगतात. सेंद्रिय पध्दतीने लागवड होत असल्याने कांद्याची चव आणि दर्जा टिकून राहतो. औषधी गुणधर्म आणि रुचकर चव यामुळे कांद्याची मागणी मोठी असते. व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप टाळून शेतकरी थेट मालाची विक्री करतात. त्यामुळेही या कांद्याला चढे दर मिळतात. 

राज्यातील इतर भागात पांढऱ्या कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जात असली तरी अलिबागच्या कांद्याची सर त्या कांद्यांना येत नाही. त्यामुळेही हा कांदा उजवा ठरतो. देशाला लागणाऱ्या एकूण कांद्याच्या ६६ टक्के कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रात केले जाते. नाशिक, नगर, जळगाव जिल्ह्यात कांद्याच्या मोठय़ा बाजारपेठा आहेत. पण या ठिकाणी कांद्याची आवक वाढली दर कोसळतात आणि शेतकऱ्यांच्या डोळय़ात कांदा पाणी आणतो. त्यामुळे अलिबागच्या पाढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा विक्री पॅटर्न राज्यातील इतर भागात राबविता येईल का याची चाचपणी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करता येऊ  शकेल.

भौगोलिक मानांकनामुळे मागणी

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने हे मानांकन बहाल केले आहे. त्यामुळे रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढली आहे. कांद्याचे ब्रँडींग होणार असल्याने शेतकरीही उत्साहीत असल्याचे पहायला मिळत आहे. मानांकनामुळे कांद्याला चांगला दरही मिळत आहे.

पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म

अभ्यासकांच्या माहितीनुसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जर सर्दी किंवा कफ आदीची समस्या असेल तर कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते.

harshad,kashalkar@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alibaug white onion brings cheer to farmers zws
First published on: 14-03-2023 at 05:52 IST