रणजी क्रिकेटमधील विक्रमवीर फलंदाज, मुंबई संघाचे यशस्वी कर्णधार, कल्पक प्रशिक्षक आणि भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिलेवहिले विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे धुरंधर मार्गदर्शक ही अमोल मुझुमदार यांची प्रचलित ओळख. पण हे शांत, संयत व्यक्तिमत्त्व गप्पा आणि संवादाच्या मैदानातही किती तयारीतले आहे याची प्रचीती ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने नुकतीच आली. अमोल मुझुमदार घडले कसे, जीवनातील चढ-उतारांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय, यशापयशाचा त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर काय परिणाम होतो यावर लख्ख प्रकाश टाकणारे हे समृद्ध संचित, त्यांच्याच शब्दांत.

बीपीएम ते शारदाश्रम

मी खारच्या बीपीएम शाळेत होतो. त्यावेळी आम्ही सांताक्रुझला राहायचो. बीपीएमकडून मी क्रिकेट खेळायचो. पाचवी, सहावी, सातवीतही. पण कधी प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधीच मिळाली नाही. नेहमी स्कोअरिंग (स्कोअर लिहिणे) करावे लागायचे. एकदा हॅरिस शील्डमध्ये आमचा सामना होता शारदाश्रमशी. त्याही दिवशी मी स्कोअरिंग करत होतो. शारदाश्रमच्या संघात एक खेळाडू होता, त्याचे नाव सचिन रमेश तेंडुलकर. त्याने त्या दिवशी दिवसभरात एकट्यानेच २७५ धावा केल्या. आणि मी २७५ वेळा त्याच्या नावासमोर रन्स लिहिल्या! स्कोअरकार्डवर. ती सुरुवात होती. त्या संध्याकाळी मी ठरवलं, स्कोअरिंग नाही करणार! घरी गेलो नि वडिलांना सांगितलं, माझी शाळा बदला. मला क्रिकेट खेळायचंय, मला स्कोअरिंग नाही करायचंय! त्या दिवाळीच्या सुट्टीत मी आचरेकर सरांकडे गेलो. त्यांनी मला बघितलं, सांगितलं, शाळा बदल. शारदाश्रममध्ये ये. तेव्हा नाही पण खूप वर्षांनी समजलं की तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला.

६६४ धावांची भागीदारी नि मी

त्यावेळी शारदाश्रमच नव्हे तर इतर शाळांमध्येही चांगले क्रिकेट व्हायचे. शारदाश्रमकडे सचिन, विनोद होते. त्या वर्षी सचिन ‘अनस्टॉपेबल’ होता. अर्थात तो तसा पुढील ३० वर्षंही होता म्हणा. त्या दिवशी ती भागीदारी झाली, त्यावेळी काय वाटलं हे आज मी अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो. मी ससानियन टेंटमध्ये बसून होतो. पॅड बांधून. सुरुवात झाली तेव्हा वाटलं की आपली बॅटिंग कधी येईल? पुढे सचिन-विनोदने २००, ३०० धावांचा टप्पा ओलांडला त्यावेळी थोडी निराशा निर्माण झाली. त्यांनी ४०० धावांचा टप्पा ओलांडला, त्यावेळी वाटलं की आता बॅटिंग मिळाली काय किंवा नाही काय, फरक पडत नाही. एन्जॉय करूया.

आचरेकर सर

सरांविषयी एकच वाक्य मनात येतं… न भूतो न भविष्यति! बरेचसे खेळाडू त्यांच्या हाताखालून गेले. काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून चमकले, काही स्थानिक क्रिकेटमध्ये चमकले. कित्येकांच्या आयुष्याला दिशा मिळाली. आधुनिक कोचिंगमध्ये आज गॅजेट्स वेगळी असतील, पण पद्धत तीच आहे. लेव्हल वन, लेव्हल टू अशा स्तरांवर मी कोचिंग आत्मसात करत गेलो. एक कोर्स ऑस्ट्रेलियातही केला. तिथं पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये जे काही ऐकलं, त्या प्रत्येक वेळी आचरेकर सरच बोलताहेत असा भास झाला. कारण सर तर ते सगळं १९८० मध्ये सांगायचे. आज लॅपटॉप आलेत, त्यावेळी त्यांच्याकडे बसचं तिकीट होतं लिहायला हाच काय तो फरक!

आणि त्यांची ती शिकवण!

आचरेकर सरांकडे नवीन मुलगा शिकण्यासाठी आला. सरांनी मला सांगितलं, की या मुलाला मैदानाला फेरी मारायला सांग. मी सांगायला सुरुवात केली, की इथून जा, मग ‘बेंगॉल क्लब’ येईल, तिथून डावीकडे वळ, ‘भारत’ येईल. खेळपट्टीच्या पुढे गेलं, की ‘माहीम ज्युव्हेनाइल’ येईल. तिकडून डावीकडे वळ… आणि असं करत करत मी त्याला शिवाजी पार्क जिमखान्यापर्यंत कसं यायचं, ते सांगितलं. तेवढ्यात मागून एक टपली बसली. मागे सर होते. ते म्हणाले, ‘अरे, त्याला सांग, सगळ्या खेळपट्ट्या आत ठेव आणि त्या भोवती एक प्रदक्षिणा घाल.’ तेव्हा लक्षात आलं, की खेळपट्टी ही मूर्ती आहे आणि मैदान देऊळ आहे, त्यामुळे त्याला रोज एक प्रदक्षिणा घालायला पाहिजे.

रणजी पदार्पण नि रवी शास्त्री

मी १९ वर्षांखालील गटासाठी स्पर्धा खेळत असताना, त्या वेळच्या प्रत्येक सामन्यात शंभर धावा काढल्या होत्या. माझी रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड झाली. त्या वेळी प्रत्येक सामन्याच्या वेळी मी माझ्या संघ सहकाऱ्यांना सांगायचो, की हा माझा शेवटचा सामना. मला आता पुढे रणजी खेळायला जायचं आहे, इथं थांबायचं नाही. पण, तरी व्हायचं असं, की पुढच्या सामन्याला मी परत १९ वर्षांखालील संघाकडूनच खेळायला परतायचो. असं करत करत हंगाम संपला. अंतिम सामना आला. विजयवाड्याला झालेल्या त्या सामन्यातही मी १०० धावा केल्या. एवढ्या धावा करूनही मला ‘रणजी’च्या संघात घेत का नाहीत, हा सल मनात होता. त्या दरम्यान एकदा आम्ही मित्र-मित्र बसलेलो असताना रवी शास्त्री यांचा निरोप माझ्यापर्यंत पोचला. ‘अमोलला सांगा, तो रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल’. प्रत्यक्षात हा सामना सात दिवसांनंतर होता. आता खरे तर हा निरोप रवी शास्त्री यांना आदल्या दिवशीही पाठवता आला असता, पण नेता कसा असतो बघा. त्यांनी मला सात दिवस तयारीसाठी दिले.

रणजी पदार्पणात २६०

मला १२ फेब्रुवारी रोजी मुंबई रणजी संघाची पहिली कॅप मिळाली. त्यावेळी त्या संघात सचिन, विनोद, संजय मांजरेकर नव्हते कारण ते न्यूझीलंड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीच विचार पक्का होता. एकदा ‘आत’ आलो, ३०-४० धावा केल्या नि टिकलो की पुन्हा ‘बाहेर’ पडायचं नाही. ते तिघे परत आले तरी माझी संघातली जागा तशीच राहिली पाहिजे. आणि नशिबाने ती तशी राहिलीही. ते सोनेरी दिवस होते. मुंबईचं प्रतिनिधित्व करणं हे त्या काळात खूप आव्हानात्मक असायचं. आजही तो दर्जा टिकून आहे.

इंग्लंडमधील क्लब क्रिकेट

त्या वेळी मे ते सप्टेंबरदरम्यान इथं फार क्रिकेट खेळलं जात नसे. त्यामुळे आम्ही क्लब क्रिकेट खेळायला इंग्लंडला जायचो. मी साधारण १९९५ मध्ये ब्रॅडफर्ड लीगमध्ये पहिल्यांदा गेलो. मी १९-२० वर्षांचा होतो. माझ्याबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मणही होता. पहिला हंगाम खास जात नव्हता. तिथलं हवामान, परिस्थिती वेगळी होती. तिच्याशी जुळवून घेता येत नव्हतं. त्या हंगामात आम्ही फार कमी धावा केल्या. त्यानंतर १९९६ च्या नव्या हंगामासाठी आम्ही इंग्लंडला सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानानं जात होतो. त्या वेळी, मी एक कोरा कागद देऊन व्हीव्हीएसला सांगितलं, ‘यावर तुझं लक्ष्य लिही, की या हंगामात किती धावा करशील.’ त्यानं त्याचं लिहिलं, मीही माझं लिहिलं. आम्ही दोघांनीही लिहिल्याप्रमाणे प्रत्येकी सहा शतकं बनवण्याचं लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर मी भारतात परतलो आणि १९९६-९७ चा रणजी करंडक स्पर्धेचा हंगाम माझ्यासाठी सर्वोत्तम ठरला. संजय मांजरेकर कर्णधार होते. त्या वेळी आम्ही स्पर्धा जिंकली. त्या हंगामात मी हैदराबादविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शतक केलं. त्यानंतर उपान्त्य सामन्यात मध्य प्रदेशविरुद्धही शतक केलं आणि अंतिम सामन्यातही मी दिल्लीविरुद्ध शतक ठोकल

भारताकडून न खेळल्याबद्दल

भारताकडून खेळायला न मिळाल्याची मला खंत वाटत नाही आणि खेळायला मिळालं नाही, म्हणून मी खचलोही नाही. मी क्रिकेट का खेळायला लागलो, तर मला आवडतं म्हणून. मग मी ते कुठंही, अगदी क्लबसाठी, ऑफिससाठी, मुंबईसाठी किंवा इंग्लंडमध्ये खेळेन. मला क्रिकेट खेळायला आवडतं, मला फलंदाजी करायला आवडते आणि मला धावा करायला आवडतात, बास्स! त्या वेळी जे भारतीय संघात खेळत होते, सचिन असेल, सौरभ, व्हीव्हीएस, राहुल द्रविड, सेहवाग असेल, ते महानच खेळाडू होते. ते १२० कसोटी सामने सलग खेळले आहेत. हा १२ वर्षांचा कालावधी आहे. पण, भारताकडून न खेळल्याची खंत कधीच वाटली नाही. मी जिकडे खेळलो, तिकडे माझी दुनिया बनवली!

तीन पराभव नि अजिंक्यपद

माझ्या दृष्टीने २००६-०७ चा रणजी हंगाम खूप अनोखा ठरला. तसा हंगाम, ते दिवस पुन्हा होणे नाही असं आता वाटतं. माझ्यासाठी ते वर्ष विशेष होतं, कारण त्या वर्षी माझ्या मुलीचा जन्म झाला. दोनच दिवसांनी मी मुंबईचा कर्णधार बनलो. त्या हंगामात पहिले तीन सामने आम्ही हरलो. तिसऱ्या सामन्यात हैदराबादशी हरलो, त्यावेळी तो पराभव खूप बोचला. हैदराबादवाल्यांनी मैदानावरच सेलिब्रेशन सुरू केलं. त्यांचा कर्णधार विवेक जयसिंहाशी हात मिळवताना मी त्याला ऐकवलं… सी यू इन द फायनल, जर तुम्ही तिथवर गेलात तर! मग आम्ही ड्रेसिंगरूममध्ये गेलो. मी जरा कठोर शब्दांत बोललो. मग एअरपोर्टला गेलो, लाउंजमध्ये वाट पाहात बसलो. कुणी तरी सहकाऱ्यानेच मला टेक्स्ट मेसेज केला. तो मेसेज मी दुसऱ्याला पाठवला. थोडा मूड आला सगळ्यांना. उद्या सराव करायचा का, असं विचारलं. एका सुरात उत्तर आलं – सकाळी सात वाजता! तो माझ्या दृष्टीने निर्णायक क्षण ठरला त्या हंगामातला. पहिल्या पराभवांनंतर पुढील चार सामने जिंकायचे होते. बोनस गुणांसह. चारही सामने जिंकलो, बोनस गुणांसह! बडोद्यात उपान्त्य सामना खेळायला गेलो. दुसऱ्या डावात ५ बाद ० धावा अशी गत. पाचवा आऊट झालो तो मीच. पहिल्या डावात ९८

खेळाडू घडवताना…

खेळाडू म्हणून मी तीन पिढ्या बघितल्या. आधीच्या पिढीतील रवी शास्त्री, संजय मांजरेकर या वरिष्ठ खेळाडूंकडून बरंच शिकलो. मग माझे समकालीन सचिन, विनोद, अजित आगरकर, वासिम जाफर यांच्याबरोबर खेळलो. त्यानंतर रोहित शर्मा, अभिषेक नायर, धवल कुलकर्णी, अजिंक्य राहणे ही पुढची पिढी आली. त्या सगळ्यांबरोबर खेळल्याचा अनुभव घेऊन मी महिला क्रिकेट संघाचा मार्गदर्शक म्हणून माझ्या करिअरला सुरुवात केली. एक गोष्ट माझ्या डोक्यात स्पष्ट होती, की जसं तुम्ही आजूबाजूचं वातावरण ठेवाल, तसंच ते खेळाडू घडतात. ड्रेसिंग रूम, संघ बैठकांचं जे वातावरण असतं, ते खेळाडूंना घडवतं. त्यामुळे तो माहोल चांगला ठेवणं ही माझी जबाबदारी होती. मी त्याला खूप महत्त्व दिलं. ते सांभाळणं सोपं नाही, पण मी प्रयत्न केले.

महिलांचे इन्स्टिंक्ट सहा पट…

पुरुष आणि महिला संघांमध्ये फरक असतोच. पण या वास्तवाला सामोरं जाणं गरजेचं आहे. तरी मी जे पृथ्वी शॉला सांगेन, तेच जेमिमा रॉड्रिग्जला सांगेन. यात फरक नसतो. लोक बांधणं गरजेचं आहे. मूड स्विंग्ज महिला खेळाडूंमध्ये असतात तसे ते पुरुष खेळाडूंमध्येही दिसून येतातच की. माझ्या मते प्रत्येक खेळाडूची पार्श्वभूमी काय हे ओळखणं गरजेचं आहे. माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं. महिला संघाची जबाबदारी निभावताना त्यांना सांभाळून घेणंही गरजेचं असतं. पण, मी नक्की सांगेन, की त्यांच्या इन्स्टिंक्ट या पुरुष संघापेक्षा सहा पटींनी अधिक चांगल्या असतात.

ताकद आणि वेगातला फरक

पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची ताकद आणि वेग यांत फरक असतोच. मला तो फरक जाणून घ्यायला जरा वेळ लागला, कारण मी तोवर पुरुष क्रिकेटपटूंनाच कोचिंग केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत असा फरक नसतो. जितकी ताकद त्यांच्या पुरुष क्रिकेटपटूंमध्ये आहे, तितकीच तेथील महिला क्रिकेटपटूंमध्ये असते. मग वाटलं की आपणही असंच का करू शकत नाही? आपल्या मुलींकडेही कौशल्य आहे, साधने आहेत. जगातील इतर देशांपेक्षा कदाचित जास्तच. मग काही कॅम्प घेतले. त्यांतील एक केवळ पॉवर हिटिंगवर होता. ताकद वाढवण्यावर लक्ष देण्यात आलं. बॅटिंग असो वा बोलिंग. फरक घडवायचा असेल तर त्यावर काम करणं गरजेचं आहे.

आयुष्यातील खराब टप्पा

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. माझ्याही आयुष्यात एक खराब टप्पा आला. मी निराश झालो, अशी वेळ आली. तुम्ही खचलेले असता, तेव्हा तुम्ही जरा कडवट होता. स्वत:ला सांभाळणं, उभारी देणं हे तुम्हाला करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या स्वभाव, पद्धतीनुसार ते बदलतं. माझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग होता, मी मैदानावर जाणं. माझी पत्नी, वडील, आई यांनी त्यासाठी मला उद्याुक्त केलं. परत मैदानाकडे ढकललं. आणि, एकदा मैदानावर गेल्यावर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. त्यानंतर मी मुंबईसाठी १२ वर्षं खेळलो.

यशाचं सूत्र ओळखणं…

तुमच्या यशाचं सूत्र काय आहे, हे ओळखणं फार गरजेचं आहे. माझं शतक करायचं सूत्र काय, तर मी सकाळी उठल्यापासून किंवा खरं तर आदल्या रात्रीपासून माझी तयारी काय आहे, याचा विचार करणं, यावर ते ठरतं. ते सातत्यानं करत राहिलं, तर मध्ये काही अपयशाच्या पायऱ्या येऊनही अंतिमत: तुम्ही यशाच्या दिशेनं जाल. हे फक्त क्रिकेट नाही, आयुष्यासाठीही लागू आहे. मात्र, त्यासाठी ते यशाचं सूत्र काय असू शकतं, हे लवकरात लवकर ओळखणं गरजेचं आहे.

मानसिकता बदलतेय

उपान्त्य सामन्याआधी मी देवळात गेलो होतो. गाभाऱ्यामध्ये एक तरुण त्याच्या चार-पाच महिन्यांच्या मुलीला घेऊन उभा होता. त्यानं मला ओळखलं, आणि तो मला म्हणाला, ‘मला हिला स्मृती किंवा हरमनप्रीत बनवायचंय.’ बाहेर आल्यावर माझ्या लक्षात आलं, की या महिला क्रिकेट संघातील मुलींनी त्या तरुण वडिलांच्या मनावर अशी छाप निर्माण केली आहे, की त्याला त्याच्या मुलीला क्रिकेटपटू बनवावंसं वाटतं. मानसिकतेत हा फरक झाला आहे.

फायनलपूर्वीचं खरं आव्हान!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण उपान्त्य सामना जिंकलो, त्यानंतर खूप दाटलेल्या भावना बाहेर आल्या. माझ्याकडून, हरमनकडून, जेमिमा किंवा स्मृती असेल… अशा प्रकारे भावना बाहेर येणं ही कधीकधी चांगली गोष्ट असते. पण दरवेळी नाही. कारण सगळं काही, म्हणजे इच्छाशक्ती वगैरे निघून जातं. तीन दिवसांनी फायनल होती. ३० ऑक्टोबरला जे घडलं ते विसरणं आणि २ नोव्हेंबरसाठी (फायनलसाठी) सिद्ध होणं हे फार गरजेचं होतं. तेच माझ्या दृष्टीनं सर्वांत आव्हानात्मक होतं. खेळाडूंना पुन्हा २ नोव्हेंबरकडे खेचून आणण्याचं. त्यांच्यासमोर एकच बोललो, ‘तुम्ही दोन वर्षं जी मेहनत घेतलीत, ती ३० ऑक्टोबरसाठी नाही. २ नोव्हेंबरसाठी आहे.

प्रवासाला आता कुठे सुरुवात

ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रशिक्षक म्हणून निवड झाली. आमची पहिली मीटिंग आठवते, महिला क्रिकेटपटूंबरोबरची. मी प्रश्न विचारला, आपले ध्येय काय? १५ च्या १५ जणींनी एकच उत्तर दिलं – वर्ल्डकप जिंकायचाय. २ नोव्हेंबर २०२५ रोजी आम्ही विश्वविजेते बनलो. परवाच हरमनप्रीतला भेटलो. तिला सांगितलं.. हो गया वो हो गया. अभी जर्नी आगे ले के जानी है. वर्ल्डकप मिळाला, पण प्रवास सुरूच राहणार. थांबू शकत नाही. अजून कित्येक पिढ्या अनुकरण करणार आहेत.

शब्दांकन : सिद्धार्थ खांडेकर, सिद्धार्थ केळकर