Premium

चावडी: कोंबडा आरवलाच

जिल्ह्याची अर्थसत्ता म्हणून ओळखल्या जात असलेल्या एका सहकारी संस्थेची वार्षिक सभा गेल्या आठवडय़ात पार पडली.

abdul sattar
अब्दुल सत्तार ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

जिल्ह्याची अर्थसत्ता म्हणून ओळखल्या जात असलेल्या एका सहकारी संस्थेची वार्षिक सभा गेल्या आठवडय़ात पार पडली. सभेची वेळ दुपारी असल्याने उपस्थित सभासदांच्या पोटपूजेची व्यवस्था आणि मुख्य सभेच्या ठिकाणी मनोरंजनासाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही नवीनच प्रथा यावेळी पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळाली. जिल्ह्याच्या उंबरठय़ावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले असताना ही चैन परवडणारी नसताना एवढा उपद्वय़ाप कशासाठी असा प्रश्न पडला नसता तरच नवल. मात्र, पक्षिय मतभेद खुंटीला टांगून सुखेनैव कारभार करत, नकारात्मक माहिती माध्यमातून येऊ नये यासाठी कोंबडे झाकून ठेवण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, झाकलेला कोंबडा टोपलीखाली निसर्गनियमाने आरवलाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मण ढोबळे, मुक्ताफळे अन् भाजप

यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांनी प्रभावित राजकारणात मोठे झालेले आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सांगून संघ परिवारावर तुटून पडण्याची एकही संधी न सोडलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे उत्तम वक्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. पण जोडीला वादग्रस्त विधाने करण्यातही ते चांगलेच पटाईत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार काका-पुतण्यापासून अगदी मोहोळच्या राजन पाटील-अनगरकरांचा घरगडी म्हणून स्वत:ला म्हणवून घेणारे प्रा. ढोबळे यांच्या शिक्षण संस्थेत बौद्धिक शिबिरात शीतल साठे यांचा शाहिरी-जलसा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी आलेल्या संघ परिवारातीलच अभाविपच्या कार्यकर्त्यांवर काठय़ा चालविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे प्रा. ढोबळे हे संघ परिवाराच्या नजरेतून नेहमीच शत्रू ठरले. परंतु याच प्रा. ढोबळे यांनी पलटूरामा ची भूमिका घेत थेट भाजपमध्ये दाखल झाले आणि अर्धी चड्डी घालून थेट संघाच्या दसरा संचलनात गेले. एका रात्रीत त्यांचे वैचारिक दैवत बदलले. आता तर भाजपने त्यांना प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. परंतु प्रवक्ते म्हणून प्रा. ढोबळे हे पुन्हा मुक्ताफळे उधळून भाजपला अडचणीत आणणार की काय, अशी शंका हितचिंतकांनीच उपस्थित केल्यामुळे त्याबद्दल आता कुतूहल निर्माण झाले आहे.

ठेके आणि नात्यांची वीण

सत्ता मिळवताना ती सामान्य सभासदांच्या हितासाठी हवी असे तावातावाने सांगितले जाते. प्रत्यक्षात त्याचे लाभार्थी मात्र नातलगच होतात असा अनुभव. राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने ही पाहुण्या मेव्हण्याची बाब प्रकर्षांने पुढे आली. पूर्वी गोकुळमध्ये सत्ता असताना पुण्यातील दुधाचा ठेका कोणाकडे आहे, असा मुद्दा विरोधक सतेज पाटील लावून धरत असतात. हा ठेका महाडिक यांचे जावई विजय ढेरे तर फलटण येथील ठेका खासदार धनंजय महाडिक यांचे सासरे निंबाळकर यांच्याकडे होता, हे उघड झाले. सत्ता बदलली. तिची सूत्रे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांच्याकडे आली. म्हणून काय सत्ता नि नाते याचे धोरण बदलावे , असे काही आहे का ? आता विरोधी महाडिक गटाने ठेके आणि नाते हा प्रश्न उचलून धरला आहे. हाच प्रश्न कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी वार्षिक सभेत वारंवार विचारला. एका उत्तरात गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बारामती, फलटण येथील ठेका निंबाळकर यांच्याकडे होता. तो अकार्यक्षम होता. आता तो संजय पाटील यांचे नातेवाईक रणजित धुमाळ यांना सांगितले. थोडक्यात काय तर सत्ता बदलते पण सत्तेचे नवनीत आणि नात्यांची वीण थोडीच बदलते? शेवटी काय तर ह्णमेव्हणे. मेव्हणे. मेव्हण्यांचे पाहुणेह्ण ही नात्यांची दुनियादारी अधिक महत्त्वाची.

फाइल कोणत्या विषयाची ?

भरघोस निधी मिळाल्यानंतर मराठवाडय़ाच्या विकासाचे स्वप्न दाखवत मंत्री आणि आमदार आता लघुसंदेशाची देवाण- घेवाण करू लागले आहेत. बैठकीपूर्वी मुख्य सचिवांना पोलिसांनी प्रवेशव्दारावर अडविल्यामुळे राजशिष्टाचारावरूनही प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांमध्ये चिडचिड सुरू होण्यापूर्वी मंत्री सत्तार आणि त्यांची फाइल यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. झाले असे की, मराठावाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असताना अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोणता तरी कागद त्यांच्यासमोर ठेवला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा असा त्यांचा आग्रह होता. पण अजित पवार यांनी त्यांना हातानेच थांबा असे सांगितले आणि कार्यक्रम संपेपर्यंत मंत्री सत्तार यांचा चेहरा उतरलेला होता. त्यानंतर अशी कोणती मंजुरी होती, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

(सहभाग : सुहास सरदेशमुख, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An annual meeting of a co operative society known as the economic power of the district amy

First published on: 20-09-2023 at 02:37 IST
Next Story
भूसूक्ष्मजीवशास्त्र आधारित संशोधन हवे!