scorecardresearch

पशुपालनाची नवी दिशा

सीमांत शेतजमीन असलेल्या या शेतकऱ्याने गो-पालनाचा प्रयत्न केला. त्यात पुरेसे आर्थिक यश न मिळाल्याने म्हैसपालनकडे लक्ष दिले.

दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com

पशुपालन शेतीचा एक मुख्य जोडधंदा मानला जातो. मात्र या व्यवसायातील अनिश्चितता आणि योग्य मार्गदर्शनाअभावी पारंपरिक पद्धतीने शेतकरी आजही केवळ जोड व्यवसाय म्हणून याकडे पाहात आहेत. परंतु कोल्हापुरातील एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीच्या छोटय़ाशा क्षेत्रात शेती करणे बाजूला करत केवळ पशुपालन सुरू केले आणि आज त्यांचा हा व्यवसाय अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे.

पशुपालन व्यवसायाचे आकर्षण सुरुवातीपासून राहिले आहे. जनावरांची निवड, खाद्य, उपचार, निगा या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. बऱ्यावाईट अनुभवाचे टक्केटोणपे खाल्ल्यानंतर माणसाला शहाणपण येते. त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर मग व्यवसायाची घडी नीट बसते. असाच अनुभव प्रभाकर पाटील यांना आला आहे. सीमांत शेतजमीन असलेल्या या शेतकऱ्याने गो-पालनाचा प्रयत्न केला. त्यात पुरेसे आर्थिक यश न मिळाल्याने म्हैसपालनकडे लक्ष दिले. मुक्त गोठा पद्धतीचे उत्तमरीत्या पशुपालन करून आर्थिक उन्नती साधली. जोडीलाच म्हैस खरेदी-विक्रीच्या व्यवसायाची जोड देऊन त्यातही प्रगती साधली. खेरीज, केंद्र व राज्य शासनाच्या नानाविध योजनांचा लाभ मिळवून बेरोजगारांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हैस, कामगार, यंत्रसामग्री असा संच देऊन त्यांनाही यशस्वी जगण्याचा मंत्र दिला आहे. दोन्ही मुलांसह पशुपालन करणाऱ्या प्रभाकर पाटील यांची यशोगाथा अनेकांना प्रेरक ठरली आहे.

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील विठ्ठलवाडी या भागात पाटील कुटुंबीय राहतात. सुरुवातीला त्यांच्याकडे वडिलोपार्जित २० गुंठे जमीन होती. त्यातून मर्यादित उत्पन्न निघत होते. त्यामुळे पाटील यांनी पशुपालन करण्यासाठी ७-८ वर्षांपूर्वी एचएफ गाई खरेदी केल्या. त्यांच्याकडे ४० गाई होत्या. उत्पन्न चांगले मिळायचे. पण एका हाताने पैसा मिळवायचा आणि दुसऱ्या बाजूने पशुखाद्य, उपचार, मजुरी यासाठी तो पाण्यासारखा पैसा खर्ची पडायचा. एकूण ताळेबंद पाहता नफा अत्यल्प उरत होता. त्यामुळे त्यांनी गोपालन व्यवसाय करण्याऐवजी म्हैसपालन करण्याकडे लक्ष पुरवले.

सुरुवातीचा हाही अनुभव काही समाधानकारक नव्हता. म्हैस खरेदी करताना गुणवत्तेची नीट खात्री असणे गरजेचे असते. जातिवंत जनावर उपलब्ध झाले नाही की पदरी निराशा येते. जोडीलाच पैसाही वाया जातो. असाच अनुभव प्रभाकर पाटील यांना पहिल्या टप्प्यात आला. अधिक दूध देणाऱ्या म्हैशी असे सांगून निम्न दर्जाची जनावरे त्यांच्या गळय़ात मारण्यात आली. यात बराचसा आर्थिक तोटा झाला. अखेर पाटील यांनी हरियाणातून मुऱ्हा जातीच्या पाच म्हशी आणल्या. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने निगा केली. या व्यवसायातील बारीकसारीक बाबींकडे व्यवस्थित लक्ष पुरवले. त्यातून आता त्यांनी या व्यवसायात चांगलेच बस्तान बसवले आहे. आज त्यांच्याकडे ७० म्हशी आहेत. दररोज ४०० लिटर दूध उत्पादन होते. त्याची ५४ रुपये प्रमाणे प्रति लिटर विक्री केल्याने २१ हजार ६०० रुपये दररोज मिळतात. जनावरांना सरकी, पेंड, हरभरा आदीसाठी ५ हजार रुपये, वैरण ४ हजार रुपये, मजुरांचा पगार १६०० रुपये, इतर खर्च १ हजार असा ११ हजार ५०० रुपये इतका खर्च येतो. महिन्याचा हा हिशोब पाहता काही लाख रुपयांचा नफा होतो, असे प्रभाकर पाटील आर्थिक गोळाबेरीज करून सांगतात.

म्हैस खरेदी विक्री

म्हैसपालन व्यवसायात पाटील यांनी यश मिळवल्याचे पाहून त्यांच्याकडे अनेक शेतकरी आणि म्हैसपालन व्यवसाय करणारे लोक सल्ला विचारण्यासाठी येऊ लागले. चांगली जनावरे मिळावीत असा त्यांच्याकडे आग्रह होऊ लागला. त्यातून त्यांनी हरियाणातून उत्तम प्रतीच्या मुऱ्हा म्हशी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आत्तापर्यंत त्यांनी राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश येथेही म्हशींची विक्री केली आहे. बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही आपला अनुभव कथन केला आहे. ते सांगतात ‘ प्रभाकर पाटील यांची म्हैसपालनाची महती ऐकून आपणही एखाद-दुसरी म्हैस खरेदी करावी या हेतूने त्यांच्या गोठय़ाला भेट दिली. तेथील एकूणच पशुपालनाची शिस्त, आर्थिक व्यवहार पाहिल्यानंतर आपणही हा व्यवसाय याच पद्धतीने केला पाहिजे असे ठरवून पाच म्हशी खरेदी केल्या. त्यांच्यापासून चांगल्या प्रकारे दूध मिळत असल्याने मिळकत होत आहे. करोना टाळेबंदी काळात अनेकांचे रोजगार बुडाले. काहींचे उद्योग बंद पडले. अशा याकाळात काही काम मिळणे; नवा उद्योग सुरू करणे हे अशक्यप्राय होते. याच काळात अन्य उद्योग बंद राहिले तरी कृषीविषयक व्यवहार मात्र सुरू होते. त्यामध्ये पशुपालनाचाही समावेश होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांनी पाटील यांच्या पद्धतीने पशुपालन सुरू करण्याचे ठरवले. त्यापैकी लष्करात सेवा बजावलेले सुनील जाधव यांचा अनुभवही बोलका आहे. राजपूत रेजिमेंट येथे २२ वर्षे सेवा केल्यानंतर कागल येथे घरी परतल्यावर पुढे करायचे काय? असा प्रश्न होता. करोना संसर्गामुळे नव्याने नोकरी मिळण्याची संधी नव्हती. प्रभाकर पाटील यांची भेट घेऊन म्हैस पालन करण्याचे ठरवले. त्यांच्या सल्ल्यानुसार १० म्हशी, कामगार, कूपनलिका, कुट्टी मशीन संचासह नव्याने शेड बांधून व्यवसाय सुरू केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले. काही रक्कम स्वत:ची गुंतवली. आता दरमहा २५ ते ३० हजार रुपये आर्थिक प्राप्ती होत आहे. शिवाय जोडीलाच दुग्धपदार्थ, बेकरी सुरू केल्याने स्थैर्य प्राप्त झाले असल्याचे जाधव सांगतात. त्यांचा अनुभव पाहता करोना काळात म्हैस पालन केल्याने अनेकांना आर्थिक आधार आणि मानसिक दिलासाही दिला असल्याचे दिसते.

तरुणांमध्ये आशा

हरियाणातून मुऱ्हा जातीच्या चांगल्या म्हशी आणून विक्री करण्याचा व्यवसाय पाटील यांनी सुरू केला. त्यातून दहावी- बारावी शिक्षण झालेल्यापसून ते पदवीधर तरुणही या व्यवसायाकडे आकर्षित होऊ लागले. त्यांच्यासाठी पशुपालनाचा संपूर्ण संच पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. म्हैस गुणवत्तेला उतरली नाही की ती परत घेतली जाते. त्यामुळे खरेदीदार नि:शंक असतो. त्यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार येथील अनेक बेरोजगार युवक संपर्क करतात. रोज कोणत्या ना कोणत्या तरुणाचा त्यांना फोन करून कुठे कामाची संधी आहे का, याची विचारणा करीत असतो. जिथे म्हैस पालनाचा संच पाठवायचे ठरते तिथे या तरुणांना कामासाठी पाठवले जाते. १० म्हशी सोबत एक कामगार असा त्याचा संच असतो. अनेकांनी १०-२० म्हशी सोबत एक – दोन कामगार घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत दरमहा पंधरा ते वीस हजार रुपये आर्थिक प्राप्ती करणारे बरेच तरुण या परिसरात दिसतात. केंद्रशासनाने भारतातील दुधाचा दर्जा सुधारावा, दूध पुरवठा अधिक वाढावा याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी नाबार्ड करवी अडीच लाख रुपयांचे अनुदान देणारी योजनाही राबवली जात आहे. गोकुळ दूध संघाने म्हशीचे दूध अधिक वाढवण्याकडे लक्ष दिले असून २५ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून म्हैस दूध उत्पादनासाठी ५०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दर्शवली असल्याने म्हैस पालन करण्याकडे तरुणांचा ओढा दिसत आहे.

म्हशीच्या आरोग्याची निगा

म्हशीचे चांगल्या प्रकारे संगोपन करण्याकडे प्रभाकर पाटील यांनी स्वत: लक्ष दिले आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमीच असते. तरीही त्यांच्या गोठय़ात पशुवैद्यक डॉ. संतोष कुंभार हे वेळोवेळी भेट देऊन जनावरांच्या आरोग्याची पाहणी करत असतात. या गोठय़ातील अनुभवाविषयी डॉ. कुंभार सांगतात, ‘ उत्तम प्रकारे पशुपालन व्यवसाय कसा असावा, त्याचे व्यवस्थापन कसे असावे याचा वस्तुपाठ येथे पाहायला मिळतो. स्वच्छता, टापटीप, सकस आहार यामुळे जास्त दूध देणाऱ्या म्हशी येथे आहेत. युवराज नस्लचे सिमेन्स दिल्याने अधिक दूध देणाऱ्या म्हशींची पैदास होत असते.

काळय़ा सोन्याची साथ

मुऱ्हा म्हैस सरासरी २० लिटर दूध देते. जातिवंत पैदास व्हावी यासाठी त्यांनी युवराज नस्लद्वारे पैदास केली. सुधारित पशुवैद्यकीय तंत्राद्वारे रेडकू जन्माला येते. मुऱ्हा जातीच्या म्हशी कोणत्याही प्रकारच्या वातावरणात तग धरू शकतात. हरियाणामध्ये मुऱ्हा जातीच्या म्हशींना ‘काळं सोनं’ म्हटले जाते. मुऱ्हा म्हशीची किंमत १ लाखांपासून ३ लाखांपर्यंत असते. सरकी पेंड, हरभरा, आठवडय़ातून दोनदा मोहरी तेल, हिरवा -सुका चारा, मका, गहू असा संतुलित आहार पाटील त्यांना देतात. पशुपालनासाठी शुभम व नीलेश ही दोन्ही मुले मदत करतात. त्यांनी मुक्त गोठा पद्धतीचा वापर केला आहे. हरियाणामध्ये प्रवास करीत असताना पाटील यांना असे आढळले, की जवळपास प्रत्येक गावामध्ये एक तळे विकसित केले आहे. त्यामध्ये म्हशी मनसोक्त डुंबत असतात. जनावरे निरोगी राहण्याबरोबरच दूध वाढीसाठी त्याचा फायदा होतो. हे पाहून पाटील यांनी आपल्या गोठय़ामध्ये ४० फूट बाय ४० फूट असा हौद बांधला आहे. या जलतरण तलावात जनावरांना तीन ते चार तास मनसोक्त डुंबण्यास दिले जाते. गोचीड वगैरे आजार होत नाहीत. वर्षांतून एकदा ३ हजार रुपये प्रमाणे ३०० ट्रॉली शेणखत विक्री करून ते अतिरिक्त उत्पन्न मिळवतात. म्हैस खरेदी विक्री व्यवसायही केला जातो. यातूनच त्यांनी स्वत:ची ११ एकर शेती फुलवली आहे.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Animal husbandry and cattle farming zws

ताज्या बातम्या