अपंग मुले अन्य मुलांबरोबर एकाच वर्गात शिकतात,’ हे अनेकांना पचणारे नाही. सातच वर्षांपूर्वी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आली. पण, पुण्यातील अंकुर विद्यालयात गेल्या ३८ वर्षांपासून कर्णबधिर, अंध, बहुविकलांग, मतिमंद, गरीब-श्रीमंत इत्यादी समाजाच्या सर्व स्तरांतील, सर्व प्रकारची मुले एकत्र शिकतात. दोन मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत आता शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रवेशासाठी कोणालाही नकार नाही की, प्रवेशपूर्व नियम-अटींचे सोपस्कार नाहीत. फीचे बंधन नाही. या शाळेला तर भिंतीही नाहीत. पण, इथल्या प्रत्येक विद्याथ्र्यामध्ये आव्हानांच्या भिंती पार करून जाण्याची क्षमता आहे. मग त्या बुद्धीच्या असोत की, जगण्यातील. आपण सारे एक आहोत आणि सारे काही सर्वांसाठी, या भावनेतून समाजात समतेचा अंकुर रुजवण्याचे काम शाळेच्या माध्यमातून होत आहे. पण, करोना काळातील संकटाने शाळेची घडी विस्कटली असून आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. मुलांच्या रोजच्या गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. देखभाल-दुरुस्तीची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे असून भविष्यातील विस्ताराच्या प्रयोगांसाठी आणि शाळेत आणखी सक्षम-अक्षम मुले एकत्र यावीत, म्हणून शाळेला मदतीची गरज आहे.

माधुरी देशपांडे यांनी १९८८ साली ही शाळा सुरू केली. त्यांनी रस्त्यावरून जाताना एका लहान मुलीला रडताना पाहिले. तिची आई तिला शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्या मुलीला डाऊन सिंड्रोम होता. तिला कोणतीही शाळा प्रवेश देण्यास तयार नव्हती. हे पाहून एसएनडीटीमधून बालमानसशास्त्र आणि बालविकास शिक्षणाचे धडे घेतलेल्या माधुरीताईंनी विशेष मुलांनाही शिकता येईल, अशा प्रकारची सर्वसमावेशक शाळा काढण्याचा निर्णय घेतला. घरातील एका छोट्या खोलीत त्यांच्या स्वत:च्या मुलांपासून शाळा सुरू झली. दोन मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत आता शंभरहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेची संकल्पना पालकांना आणि मुलांनाही आवडू लागली आहे. विशेष मुलेही प्रगती करत होते. अवघ्या सात-आठ महिन्यांतच शाळेत २०-२५ मुलांनी प्रवेश घेतला. दरवर्षी मुलांची संख्या वाढत होती. आहे ती खोली अपुरी पडू लागली. त्यानंतर औंधमधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये शाळा भरविण्यात येऊ लागली. पुढे दोन बेडरूमचा एक फ्लॅट आणि आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आवारातील एका बंगल्यात शाळा सुरू आहे. यावर्षी १२५ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला असून २९ प्रकारच्या अपंगत्वांशी झुंज देणारी विशेष मुले आणि सामान्य मुले कोणत्याही भेदभावाशिवाय या शाळेत एकत्र शिक्षण घेतात. ‘सेंटर फॉर अपॉच्र्युनिटीज इन एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन’ (कोअर) या संस्थेच्या अंतर्गत अंकुर विद्यामंदिर, निर्मिती व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि विशेष मुलांसाठी उत्कर्ष थेरपी सेंटर, फंक्शनल ॲकॅडेमिक्स युनिट विभाग कार्यरत आहेत.

सकाळी नऊ वाजता शाळा भरते. प्रार्थना होते. त्यानंतर सर्व शिक्षक-मुले एकत्र मैदानावर येतात. दहा वाजेपर्यंत व्यायाम, योग, मल्लखांब आणि कवायती. जिम्नास्टिक्ससारख्या खेळात शाळेतली विशेष मुलेही मागे राहत नाहीत. व्यायाम झाला की, साडेदहापर्यंत विश्रांती. या वेळेत मुलांना गणवेश बदलावा लागतो. अपंग, मतिमंद मुलांना स्वत:ची कपडे बदलता येत नाहीत किंवा एखादे बटण लावताना अडचणी येतात. पण, वर्गातील इतर मुले त्यांना मदत करतात. त्यामुळे त्यांच्याही बालमनावर संवेदनशीलतेचे संस्कार घडतात. शाळेत स्वयंपाकघरही आहे. साडेदहा ते अकरा या वेळेत मुले एकत्र बसून नाश्ता करतात. शाळेतल्या मावश्या त्यांच्यासाठी पौष्टिक नाश्ता तयार करून ठेवतात. ११ वाजता अभ्यासाचे वर्ग सुरू होतात. पारंपरिक पाठ्यपुस्तकातले सर्व धडे शिकवले जातातच, पण त्याशिवाय विद्यार्थ्यांना एका विषयाला दुसर्‍या विषयाशी जोडण्याचे कसबही शिकवले जाते. विशेष मुलांसाठी अभ्यासक्रमात काही बदल केले जातात. विशेष मुलांसाठी ‘फंक्शनल ॲकॅडेमिक्स युनिट’ स्थापन करण्यात आले आहे. त्यात या मुलांना जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकवली जातात. भाजी निवडण्यापासून ते डेक्कनच्या बस स्टॉपपासून एकट्याने शाळेपर्यंत कसे यायचे, इत्यादी. त्यांच्या क्षमतेनुसार सगळे विषय शिकवले जातात. त्यांच्या प्रगतीचे मूल्यमापनही त्याच पातळीवर केले जाते. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत नाही. तसेच स्पर्धेच्या युगात टिकण्याची क्षमताही विकसित होते. मोकळ्या मनांमध्ये दर्जेदार संस्कारांची बिजे पेरली जातात. त्यातून फुटलेले अंकूर समाजाला उत्कृष्ट फळे देतील, असा विश्वास शाळेच्या प्राचार्या अमृता जोशी यांना वाटतो.

मदत कशासाठी?

बहुतांश विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. हातावर पोट असलेल्या त्यांच्या पालकांकडे पैसे नसतात, पण अंकुर विद्यामंदिरात पैशांअभावी कोणाचेही शिक्षण थांबत नाही. कोविडकाळात शाळेची आर्थिक घडी विस्कटली. एका विद्याथ्र्यासाठी महिन्याला किमान आठ हजार रुपये खर्च येतो. मोजकेच पालक एवढे पैसे भरू शकतात. शिक्षकांनाही अगदी किमान मानधन दिले जाते. तुटपुंज्या पगारावर १२ शिक्षक, सात थेरपीस्ट आणि मावश्या असा ३२ जणांचा स्टाफ काम करतो. काही शिक्षक, थेरपीस्ट आपापल्या वेळेनुसार येतात. एका शिक्षिकेला दोन-दोन वर्गांत, चार-चार विषय शिकवावे लागतात. आणखी पाच शिक्षकांची गरज आहे. कामकाज चालविण्यासाठी दरमहा चार लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. आता हा खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यात शाळा जिथे भरते त्या इमारतीलाही शंभर वर्षे उलटली आहेत. देखभाल-दुरुस्तीचे काम, स्टेजची डागडुजी आणि पाच स्वच्छतागृहे नव्याने उभारावी लागणार आहेत. व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र शाळेत न येणार्‍या मुलांसाठीही खुले करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शाळेला आर्थिक मदतीची गरज आहे.

अंकुर विद्यामंदिरात आलेल्या प्रत्येक विद्याथ्र्याला एकाच छताखाली जीवनाचे धडे गिरवता येतात. प्रत्येक मुलाचे कसब निराळे. प्रत्येकात काही ना काही उणिवाही असतात. आपण सगळेच विशेष असतो. पण, सगळ्यांनाच समान संधी मिळते, असे नाही. त्यासाठी समाजात समतेचा अंकुर पेरण्याचे काम माधुरी देशपांडे यांनी अंकुर विद्यामंदिराच्या प्रयोगातून केले. आता तो टिकून राहवा, वाढावा नि त्यातून अनेक सक्षम विद्यार्थी घडावेत, म्हणून समाजाच्याही आधाराची गरज आहे.

शाळेत येणारी मुले घरून फक्त पुस्तके आणि पाण्याची बाटली आणतात. दुपारी दोननंतर गरम-गरम जेवण. चारपर्यंत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. पाचवीपासून पुढच्या वर्गांना व्यावसाय प्रशिक्षण देतात. आकाशकंदील, तोरण, राख्या बनवण्यापासून रंगकाम, शिवणकाम, लोणची-चटण्या बनवणे, बागकाम आदी कौशल्ये शिकवली जातात.

संस्थेपर्यंत कसे जाल?

नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेट नं. १ मधून आत गेल्यावर पहिल्याच बंगल्यात अंकुर विद्यामंदिर शाळा भरते. याच आवारात शाळेच्या वर्गखोल्या, मुलांसाठी खेळाचे मैदान, व्यावसाय प्रशिक्षण केंद्र आणि थेरपी सेंटर सुरू आहे.

सेंटर फॉर अपॉच्र्युनिटीज इन एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन Centre for opportunities in education and rehabilitation या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे. ऑनलाइन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक

चालू खाते क्रमांक : ०२७१००१०१८३६४

आयएफएससी : सीओएसबी ०००००२७

शाळेच्या कामाची पोचपावती

अमृता जोशी सांगतात, ‘‘अनेकदा मुलं त्रास देतात. वर्गात शिकवत असताना एखादा विशेष मुलगा हायपर झाला, तर त्याला सांभाळणे अवघड असते. संयमाची परीक्षा रोज असते. अनेकदा वर्गातील इतर सामान्य मुले मदतीला धावून येतात. ‘दीदी थांबा, तुम्हाला नाही जमणार, मी बघतो,’ असे सांगतात. एकदा सात दिवसांच्या निवासी शिबिराचे आयोजन केले होते. सर्वच मुलांचा आणि शिक्षकांचा सात दिवस शाळेत मुक्काम होता. आई-वडील मदतीला नव्हते. एका रात्री एक विशेष मुलगा रडू लागला. त्याच्याजवळ झोपलेला दुसरा मुलगा उठला. तोही विशेष होता. त्याला बोलता येत नसे. पण, त्याने आपल्या मित्राचे डोळे पुसले. शब्दांविना झालेला हा संवाद विशेष होता. हीच शाळेच्या कामाची पोचपावती.’’ मुलांना दैनंदिन आयुष्यात उपयुक्त ठरतील, स्वावलंबनास हातभार लावतील अशी विविध कौशल्ये शाळेत शिकवली जातात. बाहेरच्या जगात कसे वावरावे, एकट्याने प्रवास कसा करावा, हेदेखील शिकवले जाते.

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००