अभिषेक गिजरे

इंटरनेटच्या पटलावर अधिराज्य गाजविणाऱ्या कंपन्यांनी जगातील अब्जावधी लोकांना कसे अंकित केले आहे, याचे दर्शन घडवणारा ‘द सोशल डिलेमा’ हा माहिती-नाटय़पट सध्या चर्चेत आहे. त्याविषयी..

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

टाळेबंदी लागू झाल्यापासून बहुतेकांच्या आयुष्यात झालेला सर्वात महत्त्वाचा बदल काय असेल तर आपल्या रोजच्या कामांचे ऑनलाइन झालेले स्थलांतर. अनेकांसाठी जेवणाचे टेबल किंवा बैठकीची खोली हेच ‘ऑफिस’ झाले. भेटीगाठी करायच्या असतील तर ‘झूम’ की ‘गूगल मीट’ हा आधुनिक पेच निर्माण झाला आहे. ‘ऑनलाइन’ हा परवलीचा शब्द झाला आहे. करमणूक आणि खरेदी याआधीही ऑनलाइन असायची, पण त्यात लक्षणीय वाढ झाली. सरकारी सेवा, न्यायदान, शाळा व महाविद्यालयांचे वर्ग.. सारेच ऑनलाइन! मोकळा वेळ घालविण्यासाठी इंटरनेटवरील गेम्स, ओटीटी, यूटय़ुब, समाजमाध्यमे यांचा वापर करोनाकाळाच्या आधीही होताच. मात्र या काळात आपण घरबसल्या आपल्या सोयीने अनेक कार्ये करू शकण्याची अनुभूती आल्याने इंटरनेटवरील अवलंबित्व भविष्यात वाढणार हे निश्चित.

मी ‘जनरेशन झेड(Gen Z) चा प्रतिनिधी आहे. १९९६ नंतर जन्माला आलेल्यांचा या पिढीमध्ये समावेश केला जातो. लोकसंख्याशास्त्रानुसार आमची पिढी सर्वाधिक युवा आहे. आम्ही आणि इंटरनेट एकमेकांच्या सोबतीनेच वाढले आहोत, म्हणूनच या पिढीचे इंटरनेटबरोबरचे नाते आधीच्या पिढय़ांपेक्षा अधिक घट्ट असावे. ‘सारखं आपलं मोबाइल..’ किंवा ‘आधी बंद कर तो संगणक’ असा ओरडाही या पिढीनेच सर्वात जास्त खाल्ला आहे. मात्र हा नातेबंध नसून तो विळखाच असल्याची जाणीव ‘द सोशल डिलेमा’ हा माहिती-नाटय़पट (डॉक्यूड्रामा) पाहत असताना होत राहिली. गेल्या आठवडय़ातच हा डॉक्यूड्रामा ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाला. तो पाहिल्यानंतर आपल्या पिढीसाठी आखलेला मार्ग योग्य तर आहे ना, हा संभ्रम निर्माण होतो.

इंटरनेटच्या पटलावर अधिराज्य गाजविणाऱ्या गूगल, फेसबुक, ट्विटर या कंपन्यांनी जगातील अब्जावधी लोकांना कसे अंकित केले आहे, याचे दर्शन आणि विश्लेषण या माहिती-नाटय़पटात आहे. या कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या काळात रुजू झालेले आणि जबाबदारीची पदे भूषविलेले कर्मचारी ही मांडणी करीत असल्याने त्या विश्वाचेच अंतरंग आपल्यासमोर उलगडले जाते. या सर्वानीच काही वर्षांपूर्वी आपली पदे सोडली आहेत. अनेक जण अधिक मानवी चेहऱ्याचे पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न करीत आहेत. इंटरनेट कंपन्यांनी त्यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीत बदल केला नाही आणि आपण (त्यांच्या वापरकर्त्यांनी) हे विश्व नीट समजून घेऊन वेळेत काही पावले उचलली नाहीत तर काहीच वर्षांत संपूर्ण जग विनाशाकडे खेचले जाण्याची भीती अनेकांनी उघडपणे व्यक्त केली.

अतिशय कमी कालावधीत मानवी इतिहासातील सर्वात धनाढय़ कंपन्या बनणाऱ्या गूगल, फेसबुक यांचे गुणगान आपण अनेकदा ऐकतो. मात्र, या कंपन्यांच्या बहुतेक सेवा नि:शुल्क असूनही त्यांची उलाढाल अब्जावधी डॉलर्समध्ये कशी चालते, याबाबत होणाऱ्या चर्चा तशा तुरळकच. आपल्या हातात ‘क्लिक’चे सुकाणू आहे म्हणून आपणच नियंत्रक आहोत असा समज बाळगत अब्जावधी लोक इंटरनेटचा मनमुराद आस्वाद रोज घेतात. वास्तवात आपणच या कंपन्यांची अब्जावधी उत्पादने आहोत आणि संख्येने मोजके असलेले जाहिरातदार हे खरे ग्राहक आहेत. जाहिरातदार पैसे मोजतात सुयोग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ग्राहकांना सुयोग्य तऱ्हेने भुलविण्यासाठी, लोकांच्या अव्यक्त भावनांचा ताबा घेण्यासाठी.. आणि हे सर्व चाहूलही न लागू देता, असे ही मंडळी आणि काही तज्ज्ञ अभ्यासक आपल्याला सांगतात तेव्हा अचंबा, संताप, सुन्नपणा अशा साऱ्याच भावना एकत्र दाटून येतात.

‘द सोशल डिलेमा’मध्ये सहभागी झालेले संगणक शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ जेरॉन लॅनियर या देवाणघेवाणीचे वर्णन करताना म्हणतात, ‘‘केवळ काही लाख डॉलर्स मोजून जगातील ७० कोटी लोकांचे मत आपल्या बाजूने वळविता येऊ शकत असेल, तर कोणत्याही कंपनीसाठी (आणि राजकीय संघटनेसाठीदेखील) ती सुवर्णसंधीच.’’

प्रत्येक सर्च, क्लिक, वाचलेला मजकूर, पाहिलेला व्हिडीओ वापरकर्त्यांच्या स्वभावाची, त्याच्या/तिच्या आवडी-निवडीची, विचारसरणीची, मित्र-परिवाराची इत्थंभुत माहिती इंटरनेट कंपन्यांना पुरवतात. माहितीचे संकलन झाल्यावर कंपनीनियुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तिचा वापर करून प्रत्येक वापरकर्त्यांची प्रतिकात्मक कळसूत्री बाहुली बनविते. जुन्या माहितीच्या आधारे ही बाहुली पुढे काय करणार याचे अचूक निदान एआयला करता येते. आडाखे नाहीत अचूक निदान!

त्यांचे अर्थचक्र सुरळीत चालण्यासाठी वापरकर्त्यांनी इंटरनेटवर सक्रिय असणे, वापरकर्त्यांची संख्या वृद्धिंगत होणे अतिशय गरजेचे आहे. मानसिक, भावनिक मोहजाल बाहुलीभोवती म्हणजे तुमच्या- आमच्याभोवतीच विणून एआय ही उद्दिष्टे साध्य करते. स्वतंत्र निर्णय हे इंटरनेटवर मृगजळापुरते राहतात. भावनिक मोहापायी वापरकर्ते हा हा म्हणता एआयने टाकलेल्या या गळाकडे (क्लिकबेट्स) नुसते आकर्षित होत नाहीत, तर चक्क आहारी जातात. हे मोहही तसे साधेच- म्हणजे लाइक्स, कॉमेंट्स, टॅगिंग, मेसेजेस्चे आणि यातून साध्य फार काही होत नसले तरीही बेचैन करून सोडतात. ज्याची परिणती मानसिक आजारपणात आणि क्वचित आत्मविनाशात होते.

पडद्यावर हा उलगडा होत असताना दिवसातील माझेच कितीतरी स्वयंसंवाद आठवत होते. दर काही मिनिटांनी मोबाइल उघडून बघण्याची होणारी उत्कट इच्छा, एखाद्या दिवशी कमी लोकांबरोबर चॅटिंग झाले असेल तर कासावीस होणारा जीव, समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या नोंदींवर- विशेषत: प्रोफाइल चित्रावर आलेल्या लाइक्स, कॉमेंट्सवरून यशापयशाचे केलेले मूल्यमापन नवीन थोडेच आहे? प्रत्येक तासाला यातील किमान एक कृती तुम्ही-आम्ही करीतच होतो आणि वेळोवेळी याद्वारे होणारे भावनिक कंप, मनात उठलेले काहूर तथा पोकळीही झेलत होतो.

व्यक्ती म्हणून आपली वाढ ही एकमेकांशी नैसर्गिकपणे चालणाऱ्या संवादातून, त्यातून फुलणाऱ्या अनुभवांवर, नात्यांवर अवलंबून असते. ऑनलाइन प्रतिविश्वाने नात्यांच्या या नैसर्गिक वाढीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दोन व्यक्तींतील ऑनलाइन संवाद कशा तऱ्हेने चालावेत याकरिता तिसरी व्यक्ती सतत पाळत ठेवून बिनदिक्कतपणे संवादाचे संचालन करत असेल, तर संवाद फुलण्यावर कितीतरी मर्यादा येतात. शब्दांऐवजी ईमोजी, जिफद्वारे चालणारे संवाद अशा संचालनाचे सर्वात दृश्य स्वरूप. मानवाच्या आदिम संवादांची, सवयींची आणि भावनांची गळचेपी इंटरनेट अधिनतेतून होत आहे. ‘जनरेशन झेड’चे मानसिक आरोग्य बिघडण्याचे लहान वयातच हे मुख्य कारण असल्याचे मत या माहिती-नाटय़पटात सहभागी झालेल्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अ‍ॅना लॅम्बकी मांडतात

परस्परांमधील संवादांची दरी आणि दुरावा मनात ‘इतरांबाबत’ असुरक्षितता निर्माण करतो. अशा असुरक्षित भावनेतून सामाजिक पातळीवर झालेले स्फोट आता नवीन बाब राहिली नाही. भारतात अलीकडच्या काळात अफवांपायी घेतले जाणारे झुंडबळी असो वा जगभरात जहालमतवादी विचारसरणीच्या नेतृत्वास मिळणारी लोकमान्यता अथवा जागतिक आरोग्य संघटनेने करोना आपत्तीस ‘अपप्रचाराची महामारी’ म्हणून संबोधणे असो; परस्परांप्रती अविश्वास आणि त्यातून उद्भवणारी असुरक्षितता चिंताजनकच.

गूगलमध्ये डिझायन नीतिज्ञ म्हणून काम केलेल्या ट्रिस्टान हॅरिसने तर इंटरनेट हे कायद्याच्या चौकटीत राहून कमीत कमी श्रमांत संपूर्ण देशाला अस्थिर करण्याचे महाअस्त्र बनले असल्याचा आरोपही केला आहे. ‘‘इंटरनेटचे तंत्र मूलत: धोकादायक नाही. मात्र मानवांतील वाईट भावनांचे सशक्तीकरण कमी श्रमात व कमी कालावधीत करण्याची क्षमता इंटरनेटने कैक पटीने वाढवली आहे. देश अस्थिर करण्यासाठी योग्य किंमत मोजून या सेवांचा सर्रास वापर केला जातो आणि आजच्या जगासाठी हा सर्वात मोठा धोका आहे,’’ असे स्पष्ट मत ट्रिस्टान मांडतो.

‘द सोशल डिलेमा’त ज्या अस्थिर, अस्वस्थ, द्वेषाने भरलेल्या उद्याच्या जगाचा सातत्याने उल्लेख केला जात होता, ते जग ‘जनरेशन झेड’चे असणार आहे. इंटरनेटद्वारे या पिढीसाठी माहितीची कवाडे उघडली असली तरी त्याबदल्यात या पिढीच्या भोवतालचे विश्व अधिक स्फोटक आणि विखारी बनले हे खेदजनक सत्य आहे. या पिढीभोवतीचे या समस्यांचे धुके अधिक गडद होईल की विरळ होत जाईल, हे आपल्या सर्वाच्या आजच्या निर्णयांवर तसेच कृतींवर अवलंबून असणार आहे.

इंटरनेटपुरस्कृत समस्यांची दाहकता कमी करण्याचे अनेक मार्ग हा माहिती-नाटय़पट आपल्यासमोर मांडतो. यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे, यातील सर्वच स्तरांवर या समस्यांचा स्वीकार करून त्यावर खुलेपणाने चर्चा करणे आणि समस्यांचा विसर पडू न देणे. आपल्या आजच्या लोकशाही समाजाचे हे अदृश्य अश्रू आहेत. आपल्या सामायिक कृतीतूनच ते पूर्णपणे पुसले जाऊ शकतात.

(लेखक समाज व तंत्रज्ञान यांच्या संबंधांचे अभ्यासक आहेत.)

abhishek.gijare25@gmail.com