आज २८ मे.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती. त्यानिमित्ताने  त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानासह सामाजिक, राजकीय, वैचारिक संघर्षांचे, त्यामागील ठोस बैठकीचे सिंहावलोकन करणे अप्रस्तुत ठरणार नाही. तसेच अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून सावरकरांनी केलेल्या विनंतीचा विपर्यास करून त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांच्या आक्षेपांना सडेतोड उत्तर देणारा दोन वर्षांपूर्वी लोकरंग पुरवणीमध्ये प्राकाशित झालेला अविनाश धर्माधिकारी यांचा हा खास लेख पुन:प्रकाशित करत आहोत.

कार्ल मार्क्‍सच्या मृत्यूच्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले- १८८३ – हा इतिहासात आपोआपच जुळून आलेला, पण अर्थपूर्ण योगायोग आहे. दोघंही कट्टर ईहवादी, नास्तिक, तर्ककठोर विज्ञाननिष्ठ. पण मार्क्‍सनं संपूर्ण मानवी इतिहास वर्गयुद्धाच्या चौकटीत बसवून ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच ‘बूझ्र्वा’- शोषकांच्या हातातलं हत्यार- ठरवली. तर सावरकरांनी ‘राष्ट्र’- तेही ‘हिंदुराष्ट्र’ चिंतनाला आपलं सर्वस्व अर्पण केलं.

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल
sindhudurg district collector ordered deepak kesarkar s to deposit pistols
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा

असं म्हटलं जातं की सावरकरांना कुणीतरी कधीतरी विचारलं होतं, ‘तुम्ही मार्क्‍स वाचलाय का?’ त्यावर सावरकरांनी आपल्या खास शैलीत त्याला  प्रतिसाद दिला होता- ‘मार्क्‍सला विचारा- त्यानं सावरकर वाचला होता का?’ आता, मार्क्‍सच्या मृत्यूच्या वर्षी सावरकर जन्माला आल्यावर बिचारा मार्क्‍स कुठून आणि कधी वाचणार सावरकरांना? पण सावरकरांच्या विधानाचा असा अर्थ होऊ शकतो, की मार्क्‍सचं मानवविषयक चिंतन मूलगामी आणि सखोल असेलही; पण सावरकरांचं चिंतन आणि कार्यही तितकंच मूलगामी आणि सखोल आहे. फक्त सावरकरांच्या चिंतनाला ‘राष्ट्रीयत्वा’ची ‘फ्रेम ऑफ रेफरन्स’ आहे.

आधुनिक भारत यूनायटेड नेशन्समध्ये शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठी ‘महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे’ असं स्वप्न पडतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच! ते सत्यात आणण्यासाठी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा, आणि बंदुका हाती घ्या..’ असं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगतात त्या साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वतंत्र आणि समर्थ भारत हे स्वप्न होतं. १९६५ च्या लढाईत भारतानं पाकवर मात केली तेव्हा सावरकरांनी ठरवलं की आता हा देह ठेवावा. त्यांनी योगीपुरुषाच्या नि:संगतेनं प्रायोपवेशनास प्रारंभ केला आणि २६ फेब्रुवारी १९६६ ला देह ठेवला. १८९८ मध्ये चाफेकर बंधू फासावर जाणार होते त्या रात्रभर अस्वस्थ होऊन जागरण करणाऱ्या  ‘विनायक’नं भगूरमधल्या घरातल्या देवीसमोर १५ व्या वर्षी प्रतिज्ञा केली- ‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!’ या प्रतिज्ञेनं सुरू झालेला यज्ञ पुढे ६९ वर्षे जीवनाच्या सर्व अंगांत प्रतिभासंपन्न स्पर्श करत पेटता राहिला. बंडखोर विद्यार्थी, कुशल संघटक, इतिहासकार, क्रांतिकारक, काळ्या पाण्याला पुरून उरलेला मृत्युंजय, समाजसुधारक, लेखक, कवी, नाटककार, भाषाप्रभु, विज्ञाननिष्ठ-विवेकनिष्ठ-बुद्धिवादी विचारवंत, जात्युच्छेदनाची भाषा करून कृतीचा मार्ग दाखवणारा मूर्तिभंजक समाज- क्रांतिकारक अशा सर्व रूपांमधून सावरकर सतत समृद्धपणे समोर येत राहतात.

त्यांच्या सर्वागीण प्रतिभेच्या मध्यभागी असतो- भारत!

त्या भारताला सावरकरांनी ‘हिंदुराष्ट्र’ म्हटलं. त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या निशाणीला नाव दिलं- ‘हिंदुत्व’! स्वातंत्र्योत्तर भारताला कार्यक्रम दिला- ‘सन्याचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सनिकीकरण.’

त्यामुळे सावरकरांकडे पाहण्याचे दोन टोकाचे दोन दृष्टिकोन तयार झाले. ‘हिंदुत्वा’च्या विचारधारेवर निष्ठा ठेवणाऱ्या अनेकांना बुद्धिनिष्ठ-विवेकनिष्ठ-विज्ञाननिष्ठ आणि जातीउच्छेदाची भाषा करणारे सावरकर पचनी पडत नाहीत. तर सेक्युलर, समाजवादी वगैरे म्हणवणारे ‘डावे’ सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या संज्ञेकडे पाहून सावरकर निषिद्ध ठरवतात. नव्हे नव्हे, त्यांच्या विचारांचं विकृतीकरण करतात. ‘हे मातृभूमी, तुजला मन वाहियेले’ म्हणत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना पार ब्रिटिशांचे धार्जणिे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल जाते.

‘Annihilations of caste’ हे आंबेडकरांप्रमाणेच सावरकरांचंही ध्येय आहे. म्हणूनच सावरकरांनी चवदार तळं आणि काळाराम मंदिर सत्याग्रहांमध्ये आंबेडकरांना पाठिंबा दिला. रत्नागिरीत दलितांच्या हस्ते पतितपावन मंदिराची उभारणी करून ‘वेदोक्ता’चा अधिकार सर्वासाठी खुला करायची भूमिका घेतली. आणि त्यांना आज ‘मनुवादी’ ठरवायचे प्रयत्न केले जातात.

गांधीजींच्या हत्येच्या आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता झाली तरी सावरकरांवरचे आरोप अखंडपणे चालूच राहतात. त्यामुळे अंदमानमधल्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्याला विरोध, संसदेमध्ये सावरकरांची प्रतिमा लावायला विरोध.. तो अर्थात राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी जुमानला नाही, हे आपलं भाग्यच. सुभाषबाबू आणि सावरकरांची भेट झाली होती म्हटलं तर ‘डाव्यां’ना वाटतं, की सुभाषबाबूंचा अपमान केला. म्हणून मंत्रिपदावर असताना मणिशंकर अय्यर अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकून खरं तर सावरकरांच्या देशभक्तीचाच अपमान करतात. मतभेदांचा आदर करायचा असतो, मतभिन्नतेमुळं सावरकरांचं मोठेपण कमी होत नाही, हे समजण्याची शालीनता ते दाखवीत नाहीत.

अशी शालीनता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातले लोकनेते दाखवत होते. सावरकरांचे आणि गांधीजींचे टोकाचे मतभेद होते, पण दोघांचंही चारित्र्य, कर्तृत्व, त्यागाबद्दल (प्रसंगी सावरकरांनी गांधीजींवर तीव्र टीका केली असली, किंवा गांधीजींनी एकदा ‘कोण सावरकर?’ म्हटलं असलं, तरीही) परस्परांना आदर होता. सावरकरांना अंदमानमधून मुक्त केलं पाहिजे असं गांधीजींनी वेळोवेळी म्हटलं. तर गांधीवादाशी कट्टर मतभेद असले तरी  निझामाच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवताना सावरकरांच्या अध्यक्षतेखालच्या हिंदू महासभेनं ‘भागानगरचा सत्याग्रह’च केला. पुढे देशाची रक्तबंबाळ शोकांतिका झाली तरी फाळणीला दोघांचाही विरोध होता. त्यामुळं दोघांनी १५ ऑगस्टला ‘काळा दिवस’ मानलं. आता व्यवहार्य नाही- आणि बहुधा होऊ पण नये; पण दोघांनीही आपापल्या अलग कारणांसाठी- पण फाळणीची ऐतिहासिक चूक दुरूस्त करून पुन्हा अखंड भारत व्हावा असं स्वप्न पाहिलं.

स्वातंत्र्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या आपापल्या संघटना स्वातंत्र्यानंतर विसर्जति कराव्यात असं दोघंही म्हणाले. अर्थात काँग्रेसनं गांधीजींचं ऐकलं नाही. मात्र, सावरकरांनी ‘अभिनव भारत संघटना’ विसर्जति केली. ती विसर्जन करण्याच्या समारंभात तत्कालीन भारताच्या राजकीय चित्राचा आढावा घेत, ‘आपल्याला सगळ्यात जवळचं कोण?’, तर सावरकर सांगतात- ‘गांधीजी!’

आपल्या ‘कृष्णाकाठ’ या असामान्य आत्मचरित्रात यशवंतराव चव्हाण आपण सावरकरांच्या आकर्षणानं कसे कऱ्हाडहून रत्नागिरीला गेलो ते सांगतात. तर ‘संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश’ आणल्यावर सावरकर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण या ‘मर्द मराठय़ा’च्या पाठीशी उभं राहायला सांगतात.

सावरकरांच्या कल्पनेतला स्वतंत्र भारत ‘एक व्यक्ती, एक मत’ या सूत्रावर आधारित प्रजासत्ताक लोकशाही आहे. त्यामध्ये कोणाही विशिष्ट धर्माला ‘राजमान्यता’ (State Religion) नाही. मुस्लीमद्वेष नाही. पण हा देश १५ ऑगस्टला अस्तित्वात आलेला नाही, किंवा तो ब्रिटिशांनी एकराष्ट्रीयत्वाच्या सूत्रात गुंफलेला नाही; तर या देशाची एकात्मता पाच हजार वर्षे अखंड चालत आली आहे.. त्याला सावरकरांनी ‘हिंदुत्व’ ही संज्ञा वापरली. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं ती संवैधानिक ठरवली आहे.

प्रामाणिकपणे सखोल उतरून सावरकर समजावून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी शेषराव मोरे यांचे ग्रंथ वाचावेत आणि समग्र सावरकर साहित्याचे मुळातून आकलन करून घ्यावं.

समाजवादी जीवननिष्ठा जगलेले, खरे उदारमतवादी एस. एम. ‘आण्णा’ एकदा म्हणाले होते की, ‘आम्हाला १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत.’ (सावरकरांचा ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ १९२३ मध्ये प्रकाशित झाला.) त्यांना प्रतिसाद देताना सुधीर फडके म्हणाले होते, ‘तुम्हाला १९२३ पर्यंतचे सावरकर आज ५० वर्षांनंतर कळायला, पटायला लागले, तर १९२३ नंतरचे सावरकर आणखी ५० वर्षांनी कळतील!’

ती ५० वर्ष आता पूर्ण होत आलीत. समर्थक किंवा विरोधक- सर्वानाच सावरकर कितपत समजू लागलेत, हे ज्याचं त्यानं ठरवावं. चांगल्या इंग्लिशमध्ये जसं वर्णन असतं- you can love him or you can hate him, but you can not neglect him… असं आज सावरकरांचं स्थान आहे. एकेकाळी हृदयनाथ मंगेशकरांना सावरकरांच्या गाण्यांना चाल लावली म्हणून आकाशवाणीवरची नोकरी गमवावी लागली होती.. असं उदंड ‘सेक्युलर’ अभिव्यक्तिस्वातंत्र्य नांदत होतं! आता ‘जयोस्तुते’ आणि ‘सागरा प्राण तळमळला’ या सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ठरल्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासहित अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये पुजारी होण्यासाठी जातीचे निकष संपलेत. स्त्रिया आणि दलितांसहित सर्वासाठी सन्मानानं मंदिरं खुली होताहेत. अजूनही वाट खूप लांबची चालायची आहे. पण नवा समर्थ भारत साकारला जातोय, हे निश्चित.

आपण विवेकनिष्ठ-बुद्धिनिष्ठ-विज्ञाननिष्ठ असायला हवं. जातीपाती विसर्जति करून एकात्म, समतापूर्ण समाज उभा करण्याच्या कामाला लागायला हवं. मराठी भाषा प्रवाही, विकसनशील ठेवताना, तीत नवे नवे प्रवाह सामावून घेताना भाषेची ओळखच पुसून जाणार नाही ना, एवढी भाषाशुद्धीची चळवळ चालू ठेवायला हवी. मराठीची अभिजातता जपताना नवं ज्ञान, नव्या संज्ञा, संकल्पना, संशोधन मराठीत होईल, व्याकरण-मात्रा-वृत्त-छंद जपत जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रतिभेला नवे धुमारे फुटतील अशासाठी काम करायला हवं.

– अविनाश धर्माधिकारी

(मूळ लेख वाचवण्यासाठी येथे क्लिक करा. )