आंदोलनजीवी झिंदाबाद!

आंदोलनात गुंडांनी घुसून हिंसाचार करण्याची एक नवी पद्धती रूढ होऊ पाहात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आनंद करंदीकर

तो शब्द ऱ्हस्वदृष्टीने, भले शिवीसारखा वापरला गेला असेल; पण त्यानिमित्ताने पुन्हा विचार केल्यास काय दिसते?

लोकसभेतील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन शब्द आपणाला सांगितला. ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत आपण श्रमजीवी, बुद्धिजीवी असे शब्द वापरत होतो. आता एक नवा शब्द समोर आला आहे- आंदोलनजीवी. अनेक आंदोलनांत आता तेच ते चेहरे समोर दिसतात. आंदोलने ही त्यांच्या जीवनाची गरज बनली आहे.’’  हो, हे खरे आहे. पण मोदींना हे नव्याने का दिसले? अनेक आंदोलनांत तेच ते चेहरे दिसणे ही आपली महत्त्वाची आणि आदरणीय परंपरा आहे. मोदींनी थोडेसे इतिहासात अवलोकन केले तर त्यांना असे लक्षात येईल की, दक्षिण आफ्रिकेच्या वर्णव्यवस्थेविरुद्ध लढण्यात महात्मा गांधी आहेत, चंपारण्यातल्या शेतकऱ्यांच्या लढय़ातही महात्माजी आहेत, दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह करणाऱ्यांतही गांधीजीच पुढे आहेत आणि ‘चले जाव’च्या आंदोलनातही हे महात्मा गांधीच पुढे दिसतात. महात्मा गांधी आंदोलनजीवी होते काय? हवे तर तसे म्हणा; पण त्यामुळे ‘आंदोलनजीवी’ या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त होते हे लक्षात घ्या. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात डॉ. आंबेडकर होते आणि नंतर धर्मातराच्या चळवळीतही बाबासाहेब आंबेडकर आघाडीवर होते, हेही आदरणीय उदाहरण आहे. पण त्यापेक्षा जरा छोटय़ा नेत्यांकडे वळले तरीही तसेच दिसते. ‘एक गाव-एक पाणवठा’ चळवळीत बाबा आढाव दिसतात, मग ते हमालांचे नेते बनतात, पुण्याच्या रिक्षावाल्यांचे नेतृत्व करतानाही बाबा आढावच दिसतात, काचकचरा गोळा करून त्यातून उपजीविका करणाऱ्यांच्या काचकचरा कामगार संघटनेत आढाव दिसतात आणि अगदी गेल्याच वर्षी नागरिकत्व नोंदणी कायद्याला विरोध करणाऱ्या मोर्चातही मला आघाडीवर बाबा आढाव दिसले. बाबा आढाव तुम्ही आंदोलनजीवी आहात काय? नाही तर मेधा पाटकर. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर त्या पुढे, आदिवासी मुलांच्या शिक्षणाची चळवळ याच चालवतात आणि कोविडनंतर हजारो कामगार शहरांतून ग्रामीण भागांत चालत निघाले तेव्हा त्यांची विचारपूस करण्यातही याच पुढे असतात. काय आंदोलनजीवी कार्यपद्धती! आता जाता जाता, अण्णा हजारे हेही याच पंथातले, असे लक्षात येते. ग्रामस्वराज्य आणि ग्रामसुधारणा यासाठी हे पुढे होते, माहिती अधिकारासाठीही ते आंदोलन करतात आणि मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत झालेल्या सरकारी भ्रष्टाचाराविरुद्धही दिल्लीत जाऊन ते उपोषणाला बसतात. तेव्हा महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर ते मेधा पाटकर आणि अण्णा हजारे या सर्वाचे वर्णन करायला आपल्या पंतप्रधानांनी ‘आंदोलनजीवी’ हा शब्द वापरला का? नाही, त्यांचा दृष्टिकोन हा फारच ‘नजीकचा’ म्हणजे ‘शॉर्टसाइट’ होता हे खरे; पण भाषेतील शब्द अशा ऱ्हस्वदृष्टीच्या मर्यादांनी बांधले जाऊ शकत नाहीत.

आता अधिक थोडा खोलात जाऊन विचार केला तर असा प्रश्न विचारला पाहिजे की, एक नेता अनेक आंदोलनांचे नेतृत्व का करू लागतो? ही अनेक आंदोलने एकमेकांना जोडलेली असतात. अन्यायाचा प्रतिकार करायचा तर या सर्व आंदोलनांना एकत्र जोडून मोठे सम्यक आंदोलन उभे करण्याची गरज या द्रष्टय़ा नेत्यांना दिसत असते. म्हणून ते या सगळ्या वेगवेगळ्या आंदोलनांना एकत्र गुंफण्यासाठी प्रयत्नशील होतात. महात्माजींसाठी सर्व प्रकारच्या अन्यायाला विरोध हा प्रमुख उद्देश होता; मग तो आफ्रिकेतला वर्णभेद असो, की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय असो, की इंग्रजी राजवटीने भारतीयांची केलेली पिळवणूक असो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश जातीनिर्मूलन हा होता. त्यासाठी चवदार तळ्यातील पाणी सर्वाना खुले करणे, काळाराम मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार सर्वाना मिळवून देणे आणि मग जातिव्यवस्था नसलेला बौद्ध धर्म स्वीकारणे हे त्यांच्यासाठी एकाच चळवळीचे भाग होते.

हो- आता हेही मान्य केले पाहिजे की, काही वेळा लालकृष्ण अडवाणींसारखे नेते जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात पुढाकार घेतात आणि नंतर जयप्रकाश यांना अजिबात मान्य झाले नसते अशा ‘मंदिर वही बनायेंगे’च्या आंदोलनातही भाग घेतात. काही नेते जिथून कुठून प्रसिद्धी आणि सत्तेचा मार्ग मिळेल त्या ठिकाणी नेतृत्व करायला हजर होतात हेही खरेच. ज्यांना कुठल्याही सामाजिक विकासाच्या विचारसरणीची बांधिलकी नसते अशा नेत्यांबद्दल हे प्रामुख्याने घडते. हे लक्षात घेणे पंतप्रधान मोदींना गैरसोयीचे आहे, तेव्हा त्याबद्दल आत्ता जास्त ऊहापोह नको.

वर उल्लेखलेल्या सगळ्या मोठय़ा नेत्यांना थोडे बाजूला ठेवू. आपण असे गृहीत धरू की, त्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हणावे असा पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदींचा हेतू खचितच नसावा. त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ अपरिहार्यपणे होत असला तरीही ते त्यांच्या मनात नव्हते असे आपण गृहीत धरू. पण माझ्यासारख्या अगदी छोटय़ा, मुख्यत: बुद्धिजीवी, पण कधी कधी ‘आंदोलनजीवी’ असलेल्या सामान्याचे काय? लोकशाहीच्या रक्षणासाठी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी वेळोवेळी सत्याग्रही आंदोलने केली पाहिजेत अशी भूमिका असणाऱ्या युवक क्रांती दल (युक्रांद) या संघटनेचा मी तरुणपणी कार्यकर्ता झालो. डॉ. राममनोहर लोहिया यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी त्या वेळी एक महत्त्वाची त्रिसूत्री सांगितली होती : ‘फावडे, मतपेटी आणि तुरुंग’! देशाच्या उभारणीसाठी सर्जनशील श्रम करा = फावडे; लोकशाही राज्यव्यवस्थेत बदल करण्यासाठी मतपेटीचा मार्ग चोखाळा = मतपेटी; आणि सत्तेवर असलेल्या सरकारवर लोकांचा अंकुश ठेवण्यासाठी सत्याग्रह करा आणि तुरुंगवास सोसा = तुरुंग; अशी ही शिकवण होती. सत्याग्रह करणे हा या त्रिसूत्रीचा एक कळीचा भाग होता. मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून उदगीरला युक्रांदचे पूर्णवेळ काम करू लागलो. तिथे बेकार तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवण्यात आले म्हणून मी ११० तरुणांना घेऊन सत्याग्रह केला आणि १५ दिवस तुरुंगात गेलो. मग खादी ग्रामोद्योगात सूतकताई करणाऱ्या कामगार स्त्रियांना मजुरी वाढवून मिळाली पाहिजे म्हणूनही मी आंदोलन केले, सायकल रिक्षा चालवणाऱ्यांना स्वत:च्या मालकीच्या सायकल रिक्षा मिळाल्या पाहिजेत म्हणून त्यांची संघटना बांधून मोर्चा काढला, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले पाहिजे या मागणीसाठी युक्रांदच्या लाँग मार्चमध्ये मी सहभागी झालो, पुढे मुस्लीम बायकांना तलाक देताना मुस्लीम पुरुषांवर बंधने घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्द ठरवण्यासाठी राजीव गांधींनी कायद्यात ‘सुधारणा’ केली त्या वेळी पुण्यात निघालेल्या स्त्रियांच्या मोर्चात मी सहभागी झालो, मग आदिवासींची हक्काची जमीन वन खात्याने बळकावली होती ती आदिवासींना परत मिळावी म्हणून झालेल्या सत्याग्रहात मी सहभागी झालो आणि मला परत एकदा कारावासही झाला. ही जंत्री थोडीशी लांबवता येईल, पण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तशा प्रकारचा मी ‘आंदोलनजीवी’ आहे असे म्हणायला एवढा पुरावा पुरेसा आहे. अर्थात, ‘आंदोलनजीवी’ असताना माझ्या उपजीविकेसाठी माझी प्राध्यापकी आणि व्यवस्थापकीय सल्ला देणारी कंपनी मी चालवत होतो. माझी उपजीविका माझ्या आंदोलनात सहभागी होण्यावर अवलंबून नव्हती किंवा त्यामुळे मला माझी उपजीविका अधिक अर्थप्राप्तीची होण्यासाठी काही उपयोग झाला नाही. मी ‘आंदोलनजीवी’ होतो याच्याबद्दल मला अजिबात खंत नाही, मला त्याचा अभिमानच वाटतो. आंदोलनातील माझ्या सहभागामुळे सगळे प्रश्न सुटले नाहीत, पण काही प्रश्नांची स्थानिक पातळीवर सोडवणूक व्हायला नक्कीच उपयोग झाला.

पुढचा मुद्दा असा की, आंदोलने ही नेत्यांना हवी असतात म्हणून सुरू होत नाहीत. समाजात खरे प्रश्न असतात, लोकांना जगण्याचे प्रश्न भेडसावत असतात, त्यातून असंतोष निर्माण होतो, त्यातून आंदोलने निर्माण होतात. नेते लागतात ते आंदोलनाला दिशा देण्यासाठी, सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी, इतर आंदोलनांशी संबंध जोडण्यासाठी. शेतकऱ्यांचे आंदोलन नेत्यांना हवे म्हणून सुरू झाले नाही. केंद्र सरकारने ज्या घाईघाईने तीन विधेयके संमत केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कमालीच्या शंका व आपली शेती जाण्याचीच भीती निर्माण झाली. म्हणून शेतकरी आंदोलनात उतरले. शेतकरी स्त्रिया आंदोलनात उतरल्या.  हजारो नव्हे, लाखो शेतकरी रस्त्यावर राहिले. कोणी एका उपटसुंभ ‘आंदोलनजीवी’ नेत्यांनी भडकावले म्हणून शेतकरी आंदोलनात उतरले नाहीत. शेतकरी म्हणजे कोणीही भडकवा असे मूर्ख आहेत, असा पंतप्रधान वा सरकारचा समज आहे काय?

आंदोलनात गुंडांनी घुसून हिंसाचार करण्याची एक नवी पद्धती रूढ होऊ पाहात आहे. एकीकडे वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांना आपण काय करावे हे कळत नाही. दुसरीकडे, तरुणांना लाठीकाठी चालवण्याचे शिक्षण देऊन गुंडगिरी करायला प्रवृत्त करणाऱ्या संघटनांना अधिकाधिक प्रतिष्ठा मिळत आहे. मग हे संघटित गुंड जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करतात आणि पोलिसांच्या देखत, नव्हे त्यांच्या साह्य़ाने, सुखरूप बाहेर पडतात. मग अशाच गुंडांना लाल किल्ल्यावर जाऊन आपण शिकलेल्या दांडपट्टा कलेचे दर्शन घडवण्याचे धैर्य होते. या गुंडांचा बंदोबस्त करायच्याऐवजी आंदोलनातील नेत्यांना ‘आंदोलनजीवी’ अशी शिवी घालून बदनाम केले की सरकारची मोठी सोय होते. मग गुंड नामानिराळे राहतात आणि सत्याग्रही आंदोलक नेत्यांना सहजपणे तुरुंगात डांबणे शक्य होते.

सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याची आपली मोठी आणि अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. तिच्यावर शाब्दिक कोटय़ा करून हल्ले करणे म्हणजे आपल्या लोकशाही परंपरेची, सत्याग्रही चळवळींची थट्टा करणे आहे.

मी अभिमानाने म्हणतो : मी आंदोलनजीवी आहे आणि आंदोलनजीवी राहणार.. आंदोलनजीवी झिंदाबाद!

anandkarandikar49@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on andolanjivi zindabad abn

ताज्या बातम्या