आल्याची शेती!

स्वत:ची मेहनत, बाजारपेठेचे अचूक तंत्रज्ञान, बौध्दिक कौशल्य या बळावर गायकवाड यांनी शेती प्रयोगात स्वत:चा ठसा उमटवला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

एजाजहुसेन मुजावर

राज्यात आल्याची शेती औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात होते. सोलापूर हा जिल्हा काही आल्याच्या शेतीसाठी प्रसिद्ध नाही तरीही येथील प्रदीप गायकवाड  यांनी ही आल्याची शेती यशस्वी केली त्याचीच ही माहिती..

यापूर्वी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या गेलेल्या सोलापूर जिल्ह्यत अलीकडे जिद्दी, मेहनती शेतकऱ्यांनी आत्मविश्वास बाळगून शेतीचे विविध प्रयोग यशस्वी केले आहेत. यातून सांगोल्याचे डाळिंब, करमाळ्याची केळी आणि इतर फळांना जगाच्या बाजारपेठांमध्ये मागणी वाढली आहे. या प्रवासातच उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावचे तरुण शेतकरी प्रदीप गायकवाड यांनी केलेली आल्याची शेतीही अशीच नावारूपाला आली आहे. गायकवाड यांनी यापूर्वी स्वत:च्या गावात सुमारे दोनशे शेतकऱ्यांना एकत्र करून जवळपास पाचशे एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचा सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आता त्या बरोबरच त्यांनी स्वत:च्या सात एकर क्षेत्रात आले लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

स्वत:ची मेहनत, बाजारपेठेचे अचूक तंत्रज्ञान, बौध्दिक कौशल्य या बळावर गायकवाड यांनी शेती प्रयोगात स्वत:चा ठसा उमटवला आहे. सोलापूर जिल्ह्यत कोठेही आले उत्पादन होत नाही. स्वयंपाकात अविभाज्य घटक असलेल्या आल्याची शेती मराठवाडय़ात औरंगाबाद भागात कन्नड, सिल्लोड परिसरात मोठय़ा प्रमाणावर के ली जाते. तसेच लगतच्या सातारा जिल्ह्यत कोरेगाव परिसरातही काही शेतकरी आल्याची शेती करतात. गायकवाड यांना नवनवीन शेती प्रयोग करण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी उत्सुकतेपोटी कोरेगावसह कन्नड, सिल्लोड परिसरात जाऊ न आल्याची शेती पाहिली. संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. अशी शेती आपल्यालाही करता येते, याचा ध्यास घेत त्यांनी पाच-सहा वर्षांपासून आले लागवडीचा निश्चय केला. आले लागवडीसाठी सोलापूर भागातील भौगोलिक वातावरणही पोषक असल्यामुळे आपल्या भागात आले शेती करण्यात काहीच हरकत नाही, हे एकदा मनात पक्के केल्यावर गायकवाड यांनी गतवर्षी सात एकर क्षेत्रात आले लागवड केली. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार आले लागवडीसाठी तीन-चार मुद्दे महत्त्वाचे आहेत. यात पहिल्यांदा आले लागवडीचा कालावधी विचारात घ्यावा लागतो. १० एप्रिल ते १० जून या दोन महिन्यांच्या काळात आले लागवड केली जाते. कारण असे,की या कालावधीत आले लागवड करताना त्या वेळी उष्णतामान जास्त असते. तापमान वाढीत आल्याची उगवण उत्कृष्टरीत्या होऊ शकते. इतर सर्वसाधारण पिके वा भाजीपाल्याप्रमाणे वर्षभर केव्हाही आल्याची लागवड करता येत नाही. ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. लागवड ही ठरलेल्या एप्रिल ते जून या दोन महिन्यातच केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब ही जमिनीशी संबंधित आहे. मध्यम आणि हलक्या प्रतीची जमीन आले पिकासाठी अतिशय पोषक आहे. पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते. पाणी थांबणार नाही वा पाऊ स कितीही मोठा पडला तरीही पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. मागील वर्षांत ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यसह राज्यात अनेक भागात अतिवृष्टीने हाहाकार माजला होता. शेतीचे प्रचंड  नुकसान झाले होते. यात शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्टय़ा कंबरडेच मोडले गेले होते. परंतु त्या प्रचंड अतिवृष्टीने गायकवाड यांच्या आल्याच्या शेतीवर दुष्परिणाम होऊ  शकला नाही. कारण त्यांनी आले शेतीत पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेली उत्तम व्यवस्था. चांगल्या प्रकारच्या ‘ड्रेनेज लाईन’मुळे गायकवाड यांच्या शेतातील आले लागवड तावून सुलाखून निघाले. मात्र कितीही उत्तम नियोजन केले तरीही इतर अडचणी समोर येतात. गायकवाड यांच्या मते आले लागवडीला कीड व रोगाचा प्रादुर्भाव होतो. कंदमाशी, कंदकुज या नावाच्या रोगाचा व किडीचा उपसर्ग होतो. त्यासाठी मुळातच जमिनीची निवड ही चांगली करणे अपेक्षित आहे. गायकवाड यांनी ही दक्षता घेतल्याने रोग व किडीची तेवढी अडचण आली नाही. आले शेती करताना तिसरा मुद्दा असा आहे की, आले लागवड करताना आपण जे बेणे निवडतो, ते बेणे निवडताना करायची प्रक्रि या ही फार महत्त्वाची असते. त्यात चूक झाली आणि चांगल्या पध्दतीचे बेणे जर मिळाले नाही तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आल्याचे उत्पादन चांगल्या पध्दतीने येऊ  शकत नाही. ही त्यातील आणखी महत्त्वाची बाब आहे. बऱ्याच शेतक ऱ्यांना आल्याची शेती ही पूर्णत: नवीनच असते. लागवडीसाठी बेणे निवडाची पध्दत आणि बेणे घेतल्यानंतर त्याची प्रक्रि या कशी असते, याचीही फारशी माहिती शेतकऱ्यांना नसते. आले लागवडीसाठी बेणे घेतल्यानंतर त्यामध्ये आढी लावण्याचा प्रकार असतो. आढी लावण्याच्या पध्दतीमध्ये आवश्यक प्रक्रि या करताना सावलीत बेण्यांना अगोदर  वरून पोती झाकून आच्छादन लावले पाहिजे. आच्छादन लावून झाकून ठेवले आणि बेण्यांना ओलसरपणा देत राहणे गरजेचे असते. पुढे एका महिन्यात बेण्यांना डोळे बाहेर पडतात. नंतर त्यांची लागवड होते. लागवडीपूर्वीची ही प्रक्रिया कशी असते, हे बऱ्याच शेतकऱ्यांना ज्ञात नसते. त्यामुळे आले शेती यशस्वी होत नाही. हा मुद्दा प्रथम नजरेसमोर ठेवून लागवड करण्याची सुरुवात करायला हरकत नाही. आल्याची शेती करताना वाणाचा विचार करावा लागतो. चार-पाच प्रकारचे वाण असले तरी आपल्या भागात ‘महिमा’ नावाचे वाण लागवडीसाठी पोषक ठरते. गायकवाड यांनी ही बाब अनुभवाने उपस्थित केली. या वाणाच्या आल्याची लागवड केल्यास त्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते आणि बाजारपेठेतही त्याला चांगली मागणी असते, असे गायकवाड सांगतात. अशा प्रकारे आल्याची लागवड केल्यानंतर पुढे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात ‘कंदकुज’ नावाचा रोग आणि ‘कंदमाशी’ नावाच्या अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. ज्या शेतकरम्य़ांना आल्याची यशस्वी शेती करावयाची आहे, त्यांनी आले लागवड केलेल्या एखाद्या शेतकऱ्याकडे ऑक्टोबरअखेर जाऊ न त्याची शेती पाहावी. ३० ऑक्टोबरपर्यंत आले लागवडीचे क्षेत्र चांगले असेल, त्यात रोगाचा प्रादुर्भाव पूर्णत: नियंत्रणात असेल तर तेथील बेणे उत्तम आणि दर्जेदार असल्याची खात्री असते आणि असे बेणे लागवडीसाठी खरेदी करावे, असा सल्ला गायकवाड देतात. हे बेणे मार्च महिन्यात लागवडीसाठी घेतले पाहिजे. परंतु या गोष्टीदेखील अनेक शेतकरम्य़ांना माहीत नसतात. गायकवाड यांनी आपल्या सात एकर क्षेत्रात आले लागवड केली असता त्यांची ही शेती पाहण्यासाठी आसपासच्या भागातील बरेच शेतकरी त्यांच्याकडे येतात. गायकवाड यांनीही आल्याचे बेणे इतर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून ठेवले आहे.लागवडीची पध्दत आले लागवड करण्याची पध्दत गायकवाड यांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहे- साधारणपणे दोन सरींमध्ये साडेचार ते पाच फूट अंतरावर बेणे लागवड करायचे असते. तर दोन बेण्यांमधले अंतर साधारणत: सहा इंच ते नऊ  इंच असते. आले शेतीसाठी ठिबक सिंचन पध्दती ही अत्यावश्यक आणि बंधनकारक आहे. मोकळ्या पाण्याचे किंवा पाट पध्दतीने पाणी देऊ न ही शेती करू नये. ठिबक सिंचनाच्या दोन्ही बाजूला आले लागवड करू शकता. जेवढे ठिबक सिंचन अधिक तेवढे आले उत्पादन जास्त हे गणित लक्षात ठेवायला हवे. आले लागवडीमध्ये आंतर मशागतीचा विचार केला तर सुरुवातीला आले लागवड करण्यापूर्वी शेतात विशिष्ट प्रकारचे तणनाशक मारू शकतो. लागवडीनंतर पुढे जमिनीमध्ये पुन्हा तण उगवून आले तर त्यावर कोणत्याही प्रकारचे तणनाशक वापरले जाऊ  शकत नाही. तण काढण्यासाठी मजुरांकरवी काम करायला हवे. तिसरी बाब म्हणजे लागवडीनंतर पुढे तीन महिन्यांनी ‘माती लावण्याची’ प्रक्रि या तेवढीच महत्त्वाची असते. माती लावण्याची प्रक्रिया यांत्रिक पध्दतीने करता येऊ  शकते. पाच महिन्यात दोनव ेळा माती लावण्याचा सोपस्कार करावा लागतो. जेवढी माती लावाल, तेवढय़ा प्रमाणात कंद किंवा फुटवे वाढतात. जर कमी माती लावली गेली तर कमी प्रमाणात फुटवे येतात. आल्यावर पडणारे रोग आणि कीड नियंत्रण करताना चार-पाच प्रकारच्या किडीचा होणारा प्रादुर्भाव विचारात घ्यावा लागेल. यात कंदकुज आणि कंदमाशी यांचा प्रादुर्भाव प्रकर्षांने होतो. कंदमाशीची कीड साधारणत: जुलै ते सप्टेंबरपर्यंत दिसून येते. जमिनीत कंदामध्ये शिरकाव करून कंदमाशी अळ्या तयार करते. त्यावर वेळीच रासायनिक औषधांच्या फवारणी करणे अत्यावश्यक असते. एखादे कंदकुज पाण्याच्या किंवा मातीच्या संपर्कात येऊ न किंवा मनुष्याकडून खुरपणीच्यावेळी सुध्दा कंदाला इजा होऊ  शकते. कंदामध्ये पाणी जाऊ न तेथे कीड सुरू होते. जास्त पाऊ स झाला आणि पाण्याचा निचरा वेळीच झाला नाही तर किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. परिणामी, पिकाची वाढ खुंटते. पूर्ण वाढ थांबली तर आल्याचे क्षेत्र (प्लाट) बेण्याला सुध्दा देऊ  शकत नाही. आल्याचे संपूर्ण क्षेत्र आहे तशा परिस्थितीत बाजारात विकून टाकणे भाग पडते. गायकवाड अशी जोखीमही नमूद करीत होते. त्यासाठी प्रथम जमिनीची निवड चांगल्या पध्दतीने करावी लागते. पाण्याचा पूर्ण निचरा होणारी जमीन ही प्रथम प्राधान्याची ठरते.आल्याची शेती करताना इतर पिकांप्रमाणे आले लागवडीसाठीही बीज प्रक्रि या करणे अत्यावश्यक आहे. किंबहुना बीज प्रक्रि या ही केलीच पाहिजे, तरच संभाव्य रोगाचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे नियंत्रणात येऊ  शकतो आणि पिकाची उगवण चांगल्या प्रकारे होऊ  शकते. या पिकासाठी खत व्यवस्थापन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. पूर्व मशागत करताना गावखतांचा वापर गरजेचा आहे. यात निंबोळी पेंड वा करंदी पेंड यांचा वापर महत्त्वाचा आहे. गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. आल्याचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न विचारात घेता प्रति एकरी १० ते १२ टन आल्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. जाणकार, अनुभवी शेतकऱ्यांनी तर एकरी १५ ते १७ टन उत्पादन घेतल्याचे पाहायला मिळते. गायकवाड यांनी पहिल्या वर्षी एकरी १० ते १२ टन उत्पादन घेतले आहे. पुढच्या वर्षी १५ एकर क्षेत्रात आल्याची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्पन्नाची बाजू पाहिली असता एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. खर्च वजा जाता एकरी अडीच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.दैनंदिन मानवी जीवनात जेवणामध्ये आल्याचा वापर अत्यावश्यक घटक आहे. मागच्या वर्षी भारतातून मसाल्याची जेवढी निर्यात झाली, त्यात आल्याचा समावेश जास्त होता. सुमारे साडेसात लाख टन एवढय़ा आल्याची परदेशात निर्यात झाली. सध्याच्या करोना काळात दररोजच्या जीवनात आल्याचा वापर आणखी वाढला आहे. आल्यापासून तयार होणारी सुंठदेखील बाजारात रूबाब दाखवत आहे. देशातील जवळपास सर्व मोठय़ा शहरांतील बाजारपेठांमध्ये आल्याची मागणी कायम आहे. त्यामुळे ही शेती फायदेशीर आहे. त्यासाठी फक्त मेहनत आणि कौशल्य हवे.

aejajhusain.mujawar@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on ginger farming abn