अहमदिया- छळाची इशाराघंटा

पाकिस्तानात अल्पसंख्य असलेले अहमदिया समाजाचे लोक हे ‘ठार मारण्याच्याच लायकीचे’ समजले जातात

अहमदिया मशिदीची जाळपोळ- २०१६

जतीन देसाई

पाकिस्तानात अल्पसंख्य असलेले अहमदिया समाजाचे लोक हे ‘ठार मारण्याच्याच लायकीचे’ समजले जातात. या हत्या अलीकडे वाढणे, ही लोकशाहीसाठी इशाराघंटा आहेच; पण हा प्रश्न आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा ठरू शकतो..

पाकिस्तानचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अब्दुस सलाम हे अहमदिया समजात जन्मले होते. पाकिस्तानचे पहिले परराष्ट्रमंत्री सर जफरउल्ला खान हेही अहमदिया होते. मात्र, पाकिस्तानात आज सर्वात जास्त छळ या अहमदिया समाजातील लोकांचा होतो. अहमदिया समाजातल्या लोकांना त्यांच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद म्हणता येत नाही. अलीकडे पाकिस्तानच्या पेशावर शहरात अहमदिया समाजातील चार जणांची वेगवेगळ्या दिवशी हत्या करण्यात आली. त्यात ८२ वर्षांचे एक वयस्कर गृहस्थ होते. दुसऱ्या एका घटनेत एका प्राध्यापकाची त्यांच्या सहकाऱ्यानेच हत्या केली.

पाकिस्तानच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अहमदिया समाजाचा पाकिस्तानात छळ का होतो, हे समजून घेतले पाहिजे. भारतातल्या पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यतील कादियान नावाच्या गावातून या समाजाची सुरुवात झाली असल्यामुळे त्यांना कादियानीदेखील म्हटले जाते. जगातल्या जवळपास २०० देशांत अहमदिया आढळतात. भारतात कादियान व त्याच्या जवळपास मोठय़ा संख्येत अहमदिया राहतात. महाराष्ट्र व देशाच्या अनेक राज्यांत थोडय़ा संख्येने का होईना अहमदिया आपल्याला आढळतात. मुंबईत अहमदिया समाजाची मस्जिददेखील आहे. पाकिस्तान वगळता इतर देशांत त्यांना मुस्लीम म्हटले जाते.

मिर्झा गुलाम अहमद हे या पंथाचे संस्थापक. १८३५ मध्ये त्यांचा जन्म कादियान येथे झाला. त्यांचे अनुयायी त्यांना प्रेषित मानतात. मोहम्मद पैगंबर यांना इस्लाम शेवटचे प्रेषित मानतो. हा त्यांच्यातला मतभेदाचा मुद्दा. अहमदिया समाजातील लोक अत्यंत शांतताप्रिय असतात. शिक्षणाच्या क्षेत्रातही ते बऱ्यापैकी पुढे आहेत. संस्थापकांच्या नावाने ते अहमदिया म्हणून ओळखले जातात. अहमदिया असे मानतात की ईश्वराने मिर्झा गुलाम अहमद यांना पृथ्वीवर धार्मिक युद्ध आणि हिंसाचार संपविण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवले. मस्जिद आणि राष्ट्र हे दोन्ही वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्या भूमिकाही वेगवेगळ्या आहेत, असे हा समाज मानतो.

अहमदिया समाजातील लोक मोठय़ा प्रमाणात पाकिस्तानच्या बाजूने होते (प्रत्येकाला आपापला देश मिळाल्यास शांतता वाढेल, असा त्यांचा समज होता!). फाळणी झाल्यावर मोठय़ा संख्येने अहमदिया पाकिस्तानात गेले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रबवा येथे त्यांचे मुख्यालय हलविण्यात आले. नंतर पाकिस्तानात बऱ्याचदा अहमदियाविरोधी दंगली झाल्या आणि त्यांनी त्यांचे मुख्यालय लंडन येथे नेले. १९५३ मध्ये पाकिस्तानात पहिल्यांदा अहमदियांच्या विरोधात दंगली झाल्या आणि त्यांची कत्तल करण्यात आली. १९७३ लादेखील मोठय़ा दंगली झाल्या. झुल्फिकार अली भुत्तो पंतप्रधान असताना १९७४ मध्ये दुसऱ्या घटनादुरुस्तीद्वारे, अहमदिया हे मुस्लीम नसल्याचे जाहीर करण्यात आले. मुल्ला-मौलवींचा तेव्हा भुत्तोंवर प्रचंड दबाव होता आणि भुत्तो जेव्हा या दबावाखाली आले, तेव्हा अब्दुस सलाम हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी भुत्तोशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. भुत्तो यांनी तेव्हा आपल्यावर दबाव असल्यामुळे असा निर्णय घ्यावा लागला आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर आपण हा निर्णय रद्द करू, असे सलाम यांना सांगितले. पण असा निर्णय एकदा घेतल्यानंतर तो रद्द करणे जवळपास अशक्य असते, असे सलाम त्यांना म्हणाले. त्यानंतर सलाम यांनी पाकिस्तान सोडले. ‘नोबेल’पर्यंतची त्यांची वाटचाल झाली ती ब्रिटनमध्ये.

व्यक्तिगत स्तरावर भुत्तो यांना धर्माशी फारसे काही देणे-घेणे नसायचे. परंतु सत्तेत कायम राहण्यासाठी धर्माचा उपयोग मात्र ते करायचे. अहमदिया मुस्लीम नसल्याचे जाहीर करणे हेदेखील त्यांचे एक राजकीय पाऊल होते. एकदा अहमदिया मुस्लीम नसल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होत गेली.

१९७९ मध्ये सलाम यांना भौतिकशास्त्रात त्यांच्या कामाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. नंतर त्यांना इस्लामाबादच्या ‘कायदे आझम युनिव्हर्सिटी’ने सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आले. जमात- ए- इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेने या सत्कार समारंभाच्या विरोधात आंदोलन केले. सलाम यांना धमकी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी इस्लामाबादेत आलेल्या सलाम यांना सत्काराशिवाय परत जावे लागले. यातून अहमदियांच्या विरोधातील वातावरण लक्षात येते.

फाळणीपूर्वी सर सिरिल रॅडक्लिफ यांच्यासमोर मुस्लीम लीगची पाकिस्तानची संकल्पना आणि दृष्टिकोनाची मांडणी जफरउल्ला खान यांनी केली होती. २३ मार्च १९४० ला लाहोर येथे झालेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याची आखणी मुख्यत्वे जफरउल्ला खान यांनी केली होती. मात्र पुढे त्यावरही वाद सुरू झाला. १९५३ मध्ये अहमदियांविरुद्ध कट्टर इस्लामी लोकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे जफरउल्ला यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.

सलाम यांचे निधन १९९६ मध्ये झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पाकिस्तानात आणण्यात आला. खरे तर प्रत्येक पाकिस्तानीला सलामबद्दल अभिमान असायला हवा होता. पण तसे झाले नाही. त्यांचा मृतदेह रबवा येथे दफन करण्यात आला. कबरीवर ‘भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले मुस्लीम’ अशी अक्षरे कोरण्यात आली. परंतु त्याच रात्री पंजाब पोलिसांनी येऊन मुस्लीम शब्द पुसून टाकला. त्यामुळे ‘भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले’, असा विचित्र उल्लेख उरला. पाकिस्तानी समाजातील एक आक्रमक वर्ग अहमदिया समाजाच्या किती विरोधात आहे हे यातून लक्षात येतं.

पाकिस्तानात अहमदिया समाजाची लोकसंख्या जवळपास ४० लाख आहे. हा समाज प्रामुख्याने पंजाब प्रांतात राहतो. भीती आणि असुरक्षिततेमुळे लाहोर, रबवासारख्या शहरांत तो एकत्र राहताना आढळतो. एका ठिकाणी एकत्र राहात असल्यामुळे त्यांची स्वत:ची सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. काही कट्टर इस्लामी संघटना अहमदियांबद्दल ‘वाजिब- ए- कत्ल’ म्हणतात. ज्याचा सरळ अर्थ अहमदिया यांची हत्या समर्थनीय आहे असा होतो. अधूनमधून अहमदिया समाजाने उत्पादन केलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचादेखील प्रयत्न काही संघटना करताना आढळतात. २०१२ मध्ये लाहोरच्या वकिलांनी सर्वात प्रसिद्ध शेझान कंपनीचे फलरस पाकिस्तानातील कुठल्याही न्यायालयात विकले जाऊ नये, अशी मागणी केली. याला कारण म्हणजे शेझानची मालकी अहमदियांकडे आहे. अशा परिस्थितीत अहमदिया लोकांना पाकिस्तानात जगावे लागते आहे. याव्यतिरिक्त धर्मनिंदा (ब्लास्फेमी) कायद्याचा सर्वाधिक त्रास अहमदिया, ख्रिस्ती, हिंदू, शिया यांना सहन करावा लागतो.

भारतात दहा लाख अहमदिया असल्याचे सांगण्यात येते. आफ्रिकेतील घाना आणि सिएरा लिओन येथे पाच-पाच लाखांहून अधिक अहमदिया आहेत. अधूनमधून बांगलादेशातही, ‘अहमदिया हे मुस्लीम नसल्याचे सरकारने जाहीर करावे,’ अशी मागणी तेथील कट्टरवादी संघटना करत असतात.

ऑक्टोबर महिन्यात प्राध्यापक डॉ. नईम खटक यांची पेशावर येथे एका प्राध्यापकानेच हत्या केली. खटक अहमदिया होते. दोघांमध्ये एक-दोन दिवसांपूर्वी धार्मिक मुद्दय़ांवरून काही वाद झाला होता. वादामुळे कोणी कुणाची हत्या सहसा करत नाही. परंतु खटक अहमदिया असल्यामुळे त्यांची हत्या केली गेली. खुन्याला जेव्हा लोकांचा पाठिंबा मिळतो तेव्हा ती बाब अधिकच गंभीर होते. आपल्या येथेही काही खटल्यांत अनेक जण हत्या करणाऱ्यांचे समर्थन करताना आढळतात. समाजाचे जेव्हा ध्रुवीकरण होते तेव्हा असे घडते. लोकशाहीसाठी हा इशारा आहे.

या (नोव्हेंबर) महिन्याच्या सुरुवातीला मेहमूद खान नावाच्या ८२ वर्षांच्या गृहस्थाची पेशावर येथे हत्या करण्यात आली. मेहमूद अहमदिया होते. जुलै महिन्यात ताहीर मोहम्मद नावाच्या अहमदियाची पेशावरच्या न्यायालयाच्या कक्षातच हत्या करण्यात आली. ताहीर हा अमेरिकन नागरिक होता आणि धर्मनिंदेच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात प्रचंड सुरक्षाव्यवस्था असताना मारेकरी न्यायदान-कक्षापर्यंत पिस्तूल घेऊन पोहोचलाच कसा, हा प्रश्न सहज निर्माण होतो. त्याला नक्कीच काही मदत मिळाली असेल. मदतीशिवाय त्याला शस्त्र घेऊन आत जाणे शक्यच नव्हते.

एखाद्या देशात जेव्हा एका मोठय़ा समाजाच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होते, तेव्हा ती बाब त्या देशापुरती मर्यादित राहात नाही. अहमदिया असो किंवा म्यानमार येथे रोहिंग्यावर होणारे अत्याचार, आंतरराष्ट्रीय समुदायासाठी ही चिंतेची गोष्ट असली पाहिजे.

लेखक ज्येष्ठ पत्रकार व ‘पाकिस्तान—इंडिया पीपल्स फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी’चे सरचिटणीस आहेत.  jatindesai123@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on persecution of ahmadiyya community in pakistan abn

ताज्या बातम्या