|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर
कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) व्याख्या, महत्त्व, शाखा, सद्य ते भविष्यामधील शक्यता अशा विविध पैलूंची माहिती घेतल्यानंतर या क्षेत्रातील दिग्गजांबद्दल जाणून घेणे, तितकेच महत्त्वाचे आहे.
१९५० साली ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात इंटरनेट, ईमेल, मोबाइल असल्या काही सुविधा नसताना काही माणसे चक्क संगणकामध्ये एक दिवस ‘बुद्धिमत्ता’ आणता येईल असे भविष्य वर्तवितात, त्यावर सरकारदरबारी रीतसर प्रस्ताव ठेवून संशोधनही सुरू करतात आणि मुख्य म्हणजे स्वत:चा पूर्ण वेळ, परिश्रम, अख्खी कारकीर्द पणाला लावतात. किती आव्हाने, निराशा, टिंगल, अपयशाला सामोरे जावे लागले असेल या विभूतींना. जसे आजच्या काळात कोणी उडत्या गाडय़ांबद्दल आपले पूर्ण आयुष्य वेचावे असे. काळाच्या अनेक वर्षे पुढे विचार करणाऱ्या लोकांची गोष्टच जगावेगळी. त्यांचं ते थोडंसं निराळं, गूढ, पण अतिशय प्रतिभाशाली असं व्यक्तिमत्त्व आपल्याला नेहमीच भुरळ पाडत असतं. नाही का?
मागील आठ लेखांमध्ये आपण एआयची व्याख्या, महत्त्व, शाखा, सद्य ते भविष्यामधील शक्यता, वीक एआय ते सुपरइंटेलिजन्स अशी विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. पुढील जवळपास पंधरा-सोळा लेख एआयबद्दल असणार आहेत. त्यापुढे इतर डिजिटल विषय – इंटरनेट ऑफ थिंग्ज, अनॅलिटिक्स, सोशल मीडिया, क्लाऊड, व्हच्र्युअल रिअॅलिटी, सायबर सुरक्षा इत्यादी असतील. प्रत्येक विषयाच्या शेवटी शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या संधींबद्दल माहिती असेल.
पण त्याआधी इतिहास घडविणाऱ्या त्या दिग्गजांबद्दल माहिती घेऊ.
झेक लेखक कारेल कॅपेक यांनी १९२१ मध्ये ‘रोबोट’ हा शब्द जगात सर्वप्रथम वापरात आणला. तिथपासून आजपर्यंत – ‘एआयचा संक्षिप्त इतिहास’.
एआयचा उगम (१९४० ते १९७५)
१) अॅलन टुरिंग (द टुरिंग टेस्ट). तुम्ही ‘द इमिटेशन गेम’ सिनेमा पाहिलाय? तसेच ‘द कोड ब्रेकर’, ‘द टुरिंग एनिग्मा’ अशा अनेक हॉलीवूड सिनेमांचे प्रेरणास्थान. यांना आदराने ‘फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटिंग’ म्हटले जाते. यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यासाठी अमूल्य कामगिरी बजावली. जर्मन सरकार ‘एनिग्मा’ मशीन्स वापरून सांकेतिक संदेश त्यांच्या सैन्याला पाठवीत. १९४० मध्ये त्यांनी ‘द बोम्ब’ नावाची मशीन बनवून ते संदेश ‘डिकोड’ केले व कॉम्प्युटरचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा पहिला अध्याय नकळत लिहिला गेला. १९५० मध्ये त्यांनी ‘द टुरिंग टेस्ट’ नावाची एक संकल्पना विख्यात केली. यात माणसाने एका मशीन आणि एका मनुष्याबरोबर कमीत कमी पाच मिनिटे विविध प्रश्नोत्तरे असा संवाद साधायचा आहे. तिघांनी वेगवेगळ्या खोल्यांत बसून. जर ती मशीन त्या माणसाला चकवू शकली, म्हणजेच तो मशीन कोण व माणूस कोण हा फरक ओळखू नाही शकला तर समजावे मशीनमध्ये ‘मानवी बुद्धिमत्ता’ उपजली. अजून तरी कुठल्याही एआय मशीनला हे शक्य झाले नाही.
२) जॉन मॅकर्थी (फादर ऑफ एआय). ३१ ऑगस्ट १९५५. डार्टमाऊथ परिषद, अमेरिका. जॉन मॅकर्थी, मर्विन मिनस्की व इतर संशोधकांनी एआयवर संशोधन करण्यासाठी सरकारकडे अधिकृत प्रस्ताव ठेवला. त्यामध्ये मॅकर्थी यांनी जगात सर्वप्रथम ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ – कृत्रिम बुद्धिमत्ता असा शब्द वापरला आणि एआयचे जणू बाळसे झाले असे म्हणावे लागेल. या ऐतिहासिक परिषदेत मॅकर्थीनी जगातले अनेक नामवंत संशोधक जमवले आणि सर्वसंमतीने कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक परिकल्पना नसून शास्त्रीय शक्यता आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी पुढे जाऊन लिस्प नावाची एआयसाठी उपयुक्त सॉफ्टवेअरची भाषा शोधली.
३) १९५९ मध्ये ऑर्थर सॅम्युअल यांनी ‘मशीन लर्निग’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला कॉम्प्युटर गेम्स संदर्भात. १९६१ मध्ये जगातील पहिला फॅक्टरी रोबोट ‘उनिमेट’ जन्माला आला तो जनरल मोटर्समध्ये. १९६४ मध्ये बोब्रो यांनी मानवी भाषा समजणारी, नॅच्युरल लँग्वेजवर ‘स्टुडंट’ नावाची सॉफ्टवेअर भाषा बनविली. १९६५ मध्ये जगातला पहिला चॅटबोट ‘एलिसा’ जन्माला आला. १९६६ मध्ये जगातील पहिला चालणारा रोबोट ‘शेकी’ बनवला गेला. त्याच्या अडखळत चालण्यामुळे गमतीने त्याचे शेकी असे नाव पडले.
एआय हिवाळा (१९७५ ते १९९०)
एकंदरीत एआयची प्रगती बऱ्यापैकी होत होती. तरी हळूहळू त्यामधील गुंतवणूक कमी व्हायला लागली होती. सरकारी संस्था, खासगी गुंतवणूकदार व मोठय़ा कंपन्यांना ‘परतावा’ दिसत नसल्यामुळे त्यांनी पुढील प्रकल्पांमधून अंग काढून घ्यायला सुरुवात केली होती. १९९० पर्यंत हा अवघड कालावधी चालला.
त्या काळी एआयपासून जबरदस्त, ऐतिहासिक असे काही न घडायला खालील प्रमुख कारणे होती.
- कॉम्प्युटिंग पॉवरची एकंदर कमतरता व प्रचंड किंमत. त्या काळी डेटा-सेंटर्स वगैरे नव्हती. गुगलचे डेटा-सेंटर्स (https://www.youtube.com/watch?v=XZmGGAbHqa0)
- अत्यंत कमी टेलिकॉम नेटवर्क स्पीड. तेव्हा आजच्यासारखे थ्रीजी, फोरजी, फायबर असे काही नव्हते.
- महागडे डेटा स्टोरेज. आज एक जीबी डेटा क्लाऊडवर ठेवण्यासाठी दीड रुपये लागतात. म्हणजे जवळजवळ फुकटच म्हणू. तेच १९७०-८० मध्ये यासाठी जवळजवळ ३.५ कोटी रुपये लागत.
- डेटा उपलब्धता अत्यंत कमी. मायक्रोसॉफ्ट रिसर्चप्रमाणे फक्त गेल्या दोन वर्षांत सध्याचा जगातील ९०% डेटा तयार झालाय.
एआय टेक-ऑफ (१९९० पासून पुढे)
आयबीएम, गुगल, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांनी तरीही या विषयावर संशोधन सुरूच ठेवले. महत्त्वाचे म्हणजे कालांतराने अद्ययावत ‘डेटा-सेंटर्स’, टेलिकॉम नेटवर्क्स यांचे महाजाल बनत गेले. काही ऐतिहासिक घटना, ज्याची जगाने नोंद घेतली. त्या पुढीलप्रमाणे-
- आयबीएम डीप-ब्ल्यू (१९६६) – बुद्धिबळ जगज्जेत्या गॅरी कॅस्पारोव्हला आयबीएमच्या मशीनकडून मात. (https://www.youtube.com/watch?v=cwLgSEXRa2Q)
- गुगल सर्च (१९९७) – इंटरनेटच्या माहितीजालातून हवी असलेली माहिती शोधण्यासाठी गुगल सर्चचा जन्म. त्याआधी आपल्याला अचूक वेबसाइट अॅड्रेस टाइप करावा लागे व कुठे काय उपलब्ध आहे ते कष्टाने शोधावे लागे. (https://www.youtube.com/watch?v=Es2XJ37m_Qw)
- शेअर्स ट्रेडिंग अल्गोरिथम्स (२०००) – शेअर मार्केटमध्ये मानवी ट्रेडिंगला पर्याय म्हणून अल्गोरिथमिक ट्रेडिंग सुरू, जवळजवळ ७०%-८०% ट्रेडिंग अशा रोबोटिक मार्गाने होते. (https://www.youtube.com/watch?v=AaODVT5Sjk0)
- आयबीएम वॉटसन जिओपारडी (२०११) – हा एक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरांचा अमेरिकी खेळ आहे. २०११ मध्ये आयबीएमच्या वॉटसन मशीनने जगातील सर्वोत्तम खेळाडू केन जेनिंग्सवर मात करून इतिहास रचला. (https://www.youtube.com/watch?v=lI-M7O_bRNg)
- गुगल ब्रेन (२०१२) – इथपर्यंत संगणकाला नैसर्गिक दृश्ये, चित्र, फोटो अशांचे विश्लेषण करता येत नसे. गुगल ब्रेनच्या ‘कॅट’ प्रोजेक्टमध्ये १०० लाखांपेक्षा अधिक मांजरींच्या प्रतिमा, व्हिडीओ वापरून मशीन लर्निगद्वारा ‘इमेज रेकग्निशन’ प्रतिमा ओळखणे यावर सर्वप्रथम सुरुवात. या मशीनने पहिल्याच प्रयत्नात ७५% वेळा अचूक ओळख केली. (https://www.youtube.com/watch?v=p6l_Y_de7VI)
- सोफिया हुमनोइड रोबोट (२०१६) – जगातील पहिला रोबोट, जो चेहऱ्यावर हावभाव दाखवू शकतो, काही मानवी भावनांना ओळखून प्रतिक्रिया देऊ शकतो (https://www.youtube.com/watch?v=rjvQ10fy6JI)
- गुगल डीप-माइंड अल्फागो (२०१७) – ‘गो’ हा जगातील सर्वाधिक कठीण डावपेच प्रकारात मोडणारा खेळ. गुगलच्या अल्फागो नामक रोबोटिक मशीनने जगातील सर्वोत्तम खेळाडूवर पहिल्याच प्रयत्नात मात केली. (https://www.youtube.com/watch?v=8dMFJpEGNLQ)
- आयबीएम डिबेटर (२०१९) (https://www.youtube.com/watch?v=BXJn_aETY5Y) – मागील लेखात पाहिल्याप्रमाणे जगातील सर्वप्रथम ‘रोबोटिक भाषणपटू’
hrishikesh.sherlekar@gmail.com
(लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)