|| चंद्रकांत भोंजाळ

हिंदी नवकथेला वेगळे वळण देणाऱ्या चळवळीतील एक बिनीच्या लेखिका म्हणजे मन्नू भंडारी. काळाच्या एका मोठ्या तुकड्यावर त्यांनी आपले कर्तृत्व रेखाटले. लेखक राजेंद्र यादव यांच्यासोबतचे त्यांचे सहजीवन वादग्रस्त ठरले. परंतु आपल्या लेखक म्हणून असलेल्या बांधिलकीशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

मी माझ्या अनुवादकार्याची सुरुवात मन्नू भंडारी यांच्या कथेच्या अनुवादापासून केली. माझे पहिले पुस्तक हे त्यांच्या अनुवादित कथांचे होते. त्यामुळे या ज्येष्ठ लेखिकेचे निधन हे माझ्यासाठी एखाद्या आप्तस्वकीयाच्या निधनासारखेच आहे. मन्नू भंडारी यांचे निधन तसे अकाली म्हणता येणार नाही, कारण त्या आपले आयुष्य भरभरून जगल्या. लेखक असलेल्या स्त्रीच्या वाट्याला येणारे सगळे मानसन्मान आणि ‘स्त्री’ म्हणून येणारे सगळे भोग त्यांच्याही वाट्याला आले. पण त्यांनी कधी आपल्या भूमिकेपासून फारकत घेतली नाही. ज्या थोड्या प्रतिभावंतांनी हिंदी कथेला संवेदनात्मक पातळीवर नेले, त्या प्रतिभावंतांमध्ये मन्नू भंडारी यांचे नाव खूप अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्या मुख्यत्वेकरून ‘स्त्री’संवेदनांचे रेखाटन करीत. त्यांनी स्त्रीला आपल्या साहित्यातून वास्तववादी रूपात वाचकांसमोर पेश केले. त्यांना स्त्रीला भोगदासी अथवा आराध्यदैवतेच्या रूपात वा परंपरावादी वा आधुनिक रूपात साकार करून मनोरंजक  कथा लिहिता आल्या असत्या; पण त्यांनी तसे केले नाही. त्यांच्यासारखी कथा फक्त त्याच लिहू शकत होत्या. त्यांनी पुरुषांच्या (विकृत) आकांक्षेच्या भोवती भोवती  घुटमळणाऱ्या स्त्रीच्या प्रतिमेला छेद दिला. त्यांच्या कथेतील स्त्री एका पातळीवर उभी राहून स्वत:चे परीक्षण करू शकत होती. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर पुराणकाळातील अंध:कारही नसे की आधुनिकतेचा झगमगाटही नसे.

त्यांच्यासंबंधीची एक घटना मुद्दाम सांगण्यासारखी आहे. त्यावरून त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची ओळख पटल्याशिवाय राहत नाही. ही घटना आणीबाणीच्या काळातील आहे. त्यावेळी त्यांच्या ‘रजनीगंधा’, ‘स्वामी’ या चित्रपटांनी रसिकांची मने जिंकली होती. त्यावेळी त्या शक्तीनगरमध्ये राहत होत्या. एके दिवशी दुपारी त्यांच्या दारात एक सरकारी गाडी थांबली. त्यातून दोन शिपायांसोबत एक ऑफिसर उतरले. पत्ता विचारून ते वर आले. त्यावेळी मन्नू भंडारी घरी नव्हत्या. त्यांचे पती राजेंद्र यादव घरी होते. त्या आलेल्या साहेबांनी आपला परिचय करून दिला. ‘माझे नाव दिवाकर आहे. मी या भागातला मॅजिस्ट्रेट आहे. मला मन्नूजींना भेटायचे आहे.’ राजेंद्रजी पहिल्यांदा घाबरले. कारण आणीबाणीच्या काळात वातावरणच तसे होते. मन्नूजी कॉलेजमधून यायच्या होत्या. ते अधिकारी म्हणाले, ‘यावेळी पद्माश्री पुरस्कारासाठी मन्नूजींचे नाव सुचविण्यात आले आहे. आजकाल आम्ही त्या, त्या व्यक्तीची संमती विचारून मगच नाव जाहीर करतो. नाहीतर काही लोक सन्मान जाहीर झाल्यावर तो नाकारतात. त्यामुळे सरकारची खूप पंचाईत होते.’ मन्नूजी आल्यानंतर राजेन्द्रजींनी त्यांना त्या अधिकाऱ्यांविषयी सांगितले. आणि ते कशासाठी आले आहेत, हेही सांगितले. मन्नूजी एकदम उठून उभ्याच राहिल्या. म्हणाल्या, ‘मी पद्माश्री पुरस्कार स्वीकारणार नाही.’ दिवाकरजी म्हणाले, ‘मन्नूजी, तुम्हाला माहितीच आहे की सध्याचे दिवस कसे आहेत ते! तुमचा हा नकार सरकारविषयी नाराजी दर्शवतो. कदाचित तुम्हाला अटक होऊ शकते.’ मन्नूजी भडकल्या. म्हणाल्या, ‘चांगला न्याय आहे. पद्माश्री घ्या, नाहीतर अटकेला सामोरे जा.’ पण मग दिवाकरजींनी आश्वासन दिले की, ‘मी रिपोर्टमध्ये तुम्हाला त्रास होईल असे काही लिहिणार नाही. पण आश्चर्यच आहे. लोक ज्यासाठी जोडे झिजवतात, पंचवीस- पंचवीस लाख रुपये खर्च करायला तयार असतात, तो सन्मान तुम्ही नाकारता आहात?’

पण मन्नूजी अशाच होत्या. त्यांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल वाचकांना नेहमीच कुतूहल वाटत आलेले होते. कथाकार राजेंद्र यादव आणि मन्नू भंडारी यांच्यातील वादग्रस्त संबंधांमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. मन्नूजी या लहानपणापासून साहसी होत्या. तीच अद्भुत शक्ती त्यांच्या कथालेखनातून आणि पुढे त्यांच्या संसारी जीवनात सहनशील आणि साहसी पत्नीच्या रूपाने प्रकट झालेली होती. त्यांच्या आत्मकथेतून त्यांनी आपली अनेक रूपे प्रकट केली आहेत. स्त्री म्हणून मन्नूजी कशा होत्या, आई म्हणून, पत्नी म्हणून कशा होत्या हे त्यांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून सांगितले आहे. आपल्या ‘एक कहानी यह भी’ या आत्मकथेतून त्यांनी आपल्या जीवनातील सुखद आणि दु:खद अनुभव कथन केले आहेत. पण त्यात एक प्रामाणिकपणा आहे.

त्यांनी लक्ष्मीचंद्र जैन यांच्या म्हणण्यावरून राजेन्द्रजींबरोबर ‘एक इंच मुस्कान’ ही कादंबरी लिहिली. त्यातदेखील त्या राजेंद्रजींपेक्षा चांगल्या लेखिका आहेत हेच जाणवते. मन्नूजी व्यक्ती म्हणून किती बहुमुखी होत्या, त्या किती प्रतिभासंपन्न होत्या याचा शोध आपल्याला त्यांच्या कथांमधून लागतो. एकदा ओमप्रकाशजी यांच्या सांगण्यावरून त्यांनी ‘नई कहानी’ या नियतकालिकाचे संपादन केले होते. यादरम्यान त्यांना लेखकांमध्ये असलेली ईष्र्या आणि द्वेषभावनेचे प्रखर दर्शन घडले होते. त्या अनुभवाने त्या खूपच खिन्न झाल्या होत्या… आणि सावधदेखील!

मन्नूजी कधीही कोणत्या साहित्यिक वादात पडल्या नाहीत. त्या म्हणत, ‘माझा संबंध माझ्या भोवताली पसरलेल्या जीवनाशी होता. मी कोणत्याही वादाचा चष्मा न घालता त्या, त्या प्रश्नाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले. माझे लेखन त्याचे साक्षी आहे.’

मन्नूजींनी नेहमीच लेखनाचे विविध फॉम्र्स हाताळले. त्यांच्या ‘ यही सच है?’ या कथेवर बासू चटर्जी यांनी ‘रजनीगंधा’ हा चित्रपट केला होता. त्याचे लेखन मन्नूजी यांनी केले होते. नंतर त्यांना बासूजींनी शरद्चंद्रांच्या ‘स्वामी’ या कथेवर चित्रपटलेखनाचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी प्रथम ‘स्वामी’ या कथेचे आपल्या पद्धतीने पुनर्लेखन केले. काळाच्या अनुरूप तीत बदल केले. आणि म्हणूनच तो चित्रपट यशस्वी ठरला.

‘मुनादी’सारखी लोकांच्या संतापाला वाट करून देणारी कविता लिहिणाऱ्या धर्मवीर भारती यांनी आणीबाणीच्या काळात ‘सूर्य के अंश’ ही इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रशंसा करणारी कविता लिहिलेली बघून त्या खूप निराश झाल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांनी लिहिले होते की, ‘लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याने लिहिलेल्या शब्दांच्या मागे त्याचे विचार असतात… विश्वास असतो… आस्था असते. मग ‘मुनादी’सारखी कविता लिहिणाऱ्या कवीने ‘सूर्य के अंश’ ही कविता कशी लिहिली?’ लेखिकेचे हे विचार त्यांचा मूल्यांवर असलेला विश्वास प्रगट करतात.

मन्नूजींनी त्यांच्या कथांमधून त्यांच्या जीवनातले अनुभवच कलात्मक पातळीवर जाऊन मांडले आहेत. त्यांच्या आत्मकथनातून हे सगळे प्रसंग, राजेंद्रजी आणि मन्नूजी यांच्यातील दुरावा  आपल्यासमोर येतो. त्या राजेंद्रजींचे अवघे व्यक्तिमत्त्वच वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करतात. त्यांची वर्चस्व गाजवण्याची वृत्ती, बोलण्यात आणि वागण्यात असलेले अंतर, त्यांचे चुकीचे वागणे जेव्हा मन्नूजींना सहन होत नाही, तेव्हा आपलेच कसे बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा त्यांचा अट्टहास, लग्नसंबंधांना नकली आणि  कंटाळवाणे मानणे, घरामध्ये आपला श्वास कोंडतो म्हणून घराच्या बाहेरच राहणे, हे सारे त्यांनी त्यांच्या आत्मकथेतून मांडले आहे. तर दुसरीकडे मन्नूजींचे शालीन व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभे राहते. कौटुंबिक संबंधांमुळे त्यांच्या वाट्याला दु:ख आले. राजेंद्रजींमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटांशीदेखील त्यांना सामना करावा लागला. पण राजेंद्रजींनी त्यांना लिहिण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केले, हेही त्या कबूल करतात.

…तर अशा या मन्नू भंडारी. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असे म्हणता येईल.

bhonjalck@gmail.com