मी असा का वागतो?

हा प्रश्न अनेकांना पडतो. माझ्याविषयी अनेकांना हा प्रश्न उगाचच सतावत राहतो. अनेकांच्या चेहऱ्यावर मला हा प्रश्न दिसलेलासुद्धा आहे. म्हणूनच मलाही हा प्रश्न स्वत:ला विचारावासा वाटतो आणि त्याचे उत्तर द्यावेसे वाटते.माझ्याकडे गाऱ्हाणी, तक्रारी, अडचणी घेऊन अक्षरश: हजारो लोक येत असतात. शंभर भेटणारे असले तरी त्यांना भेटणारा मी एकच असतो.

हा  प्रश्न अनेकांना पडतो. माझ्याविषयी अनेकांना हा प्रश्न उगाचच सतावत राहतो. अनेकांच्या चेहऱ्यावर मला हा प्रश्न दिसलेलासुद्धा आहे. म्हणूनच मलाही हा प्रश्न स्वत:ला विचारावासा वाटतो आणि त्याचे उत्तर द्यावेसे वाटते.माझ्याकडे गाऱ्हाणी, तक्रारी, अडचणी घेऊन अक्षरश: हजारो लोक येत असतात. शंभर भेटणारे असले तरी त्यांना भेटणारा मी एकच असतो. त्यांचे गाऱ्हाणे प्रत्येकी एकच असते, पण त्यांची एकत्र गाऱ्हाणी माझ्यासमोर शंभर होतात. फार थोडय़ा लोकांना या वास्तवाचे भान असते की मीसुद्धा माणूस आहे. माणूस म्हणून माझी शारीरिक क्षमता, मानसिक ताकद यांना कुठे तरी मर्यादा असतेच. दिवसाचे किती तास त्याच प्रकारचे शब्द ऐकत राहावे आणि ऐकत वा बोलत बसून राहावे याची मर्यादा असतेच, पण किती जण माझ्याकडे ‘हासुद्धा माणूसच आहे’ अशा माणुसकीच्या नजरेतून पाहतात?
अर्थात, गाऱ्हाणी तक्रारी घेऊन येण्याबद्दल माझी तक्रार नाही, पण अतिरेक झाला मग असह्य़ होते. मी अगदी उद्विग्न होऊन जातो. कधीच कुणाला भेटू नये असेच वाटू लागते. पण पुन्हा सूर्योदयाबरोबर लोकांना सामोरा जातो. कालची उद्विग्नता कुठल्या कुठे गायब झालेली असते.
ही असली मंडळी कामापुरती मामा बनून आलेली असतात. त्यांची कामे करू नयेत असेही नव्हे, कारण ते जनतेचे एक घटक असतात. पण सगळाच वेळ अशा लोकांनी खायचा प्रयत्न केला की मनाचा संताप होतो, कारण त्यामुळे आपोआप शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होते. खऱ्या कामाला वेळ पुरत नाही. आपल्या आवडत्या कामाला मराठी माणसाने प्रेमाने सोपविलेले कर्तव्य पार पाडायला वेळ पुरत नाही याची बोच लागते. म्हणूनच अशा गाऱ्हाणे- गर्दीचा राग येऊ लागतो.
हल्ली तर सकाळी अकरा वाजता बैठकीच्या खोलीत येऊन बसलो की दुपारी दोन वाजेपर्यंत लोक हलतच नाहीत. सर्वाना दुखवता येत नाही, कारण त्यातल्या अनेकांच्या समस्या, तक्रारी खऱ्या आणि तातडीच्या असतात. अशातून काही मार्ग काढायलाच हवा. म्हणून हल्ली दरबार बंद केलाय. भेटायला येणाऱ्यांचा वेळ दवडला जाण्यापेक्षा प्रत्येकाने तक्रार लिहून द्यावी असा दंडक घातलाय.
रात्री कितीही उशिरा झोपलो तरीही सकाळी लवकर उठण्याची माझी सवय आहे. मग सकाळी उठल्यापासून आलेल्या टपालांचा फडशा पाडतो. अलीकडे पत्रांचा पूर वाढला आहे. रोजची तीन-चारशे पत्रं किमान येतातच. त्यावर मी काही बंधने घालू शकत नाही आणि त्यांना नजरेआड करू शकत नाही. काही पत्रं म्हणजे तक्रारीवर पुस्तकेच लिहिलेली असतात. प्रदीर्घ असतात, पण त्यातल्या एकाची तक्रार खरी असून अनुत्तरित राहील ही बोच असते. म्हणून सर्वाची दखल घ्यावी लागते. पण आता ते वितरणाचे काम सुभाष देसाई यांच्याकडे सोपविले आहे. पालिकेसंबंधातल्या तक्रारी थेट महापौरांकडे पाठविण्याचा आदेश देसाईंना दिलाय. शक्य तेवढय़ा अन्य तक्रारींची दखल मी घेतो. जमेल तेवढय़ा तक्रारी-पत्रं वाचतो.
पण हल्ली ताण वाढलाय. असह्य़ झालाय. ताण लपविण्यात काय हंशील? खासगी आयुष्य म्हणून काही उरले नाही. सार्वजनिक जीवनात उडी विचारपूर्वक घेतली होती. म्हणून खासगी आयुष्य कमी झाल्याबद्दल तक्रार करीत नाही. पहिला नातू झाला, पण त्याला मांडीवर खेळवता आले नाही. त्याचे दुरूनच दर्शन घेत राहिलो. आता नात आलीय, तिला घेऊन रातपावली करण्याचेही जमू नये याचा विषाद आजोबाला वाटणार नाही? माझेच नव्हे तर हिचेही तसेच होते. नातीला साधे खेळवताही येऊ नये इतके आम्ही दमून जातो. माझी वैयक्तिक भेट होत नाही अशी अनेकांची तक्रार कदाचित असेल, पण ती तक्रार चाहते व प्रेमीमंडळींचीच आहे असे नव्हे. माझ्या मुलाबाळांचीही आहेच ना?
पण शेवटी एक विचार करायला हवा की वैयक्तिक तक्रारीत मी किती वेळ लक्ष घालू. शिवसेनाप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर पसरत चाललेल्या शिवसेनेला आकार देणे, शिस्त लावणे, बांधीव-ठाशीव बनविणे ही माझी जबाबदारी आहे याचा विसर पडून कसे चालेल? प्रादेशिक पक्ष म्हणून नव्या उमेदीने महाराष्ट्रात पाय रोवून उभी राहत असलेल्या शिवसेनेचा पसारा वाढवत ठेवून तिची संघटनात्मक बांधणी करणे, भरपूर प्रमाणात पुढील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निवडून आणणे ही कामे मग कुणी करायची? मी त्या कामात वेळ द्यावा की वैयक्तिक तक्रारींच्या निवारणात श्रम खर्ची घालावेत याचा आता लोकांनी गंभीर विचार करायला हवाय.
काही लोकांची प्रवृत्तीच बनवेगिरीची असते. लफंगेपणा भयानक असतो. विश्वासाला तडा देणारा असतो. एखादी बाई येऊन सांगते, ‘नवरा नाही, एकुलता एक मुलगा जागा बळकावून बसलाय. मी फुटपाथवर पडली आहे.’ मग आम्ही अन्याय-अत्याचाराने कळवळतो आणि प्रकरणात हात घालतो तर कुणाकडून कळते की, या ‘बाई रोज सी. सी. आय.च्या क्लबवर पत्ते खेळायला असतात. आता बोला!
बऱ्याच भानगडीत आणाभाका- शपथांचा घोळ चालतो. बाजूला शिवप्रतिमा असते. तिच्या पायाला, गणपतीच्या पायाला हात लावून शपथा घेतल्या जातात. अगदी माझ्या पायाला हात लावून ‘खोट असेल तर जोडय़ाने मारा’ असले प्रकार होतात. मग निर्णय घेणेही कठीण होऊन बसते. भावनेच्या आहारी नेण्याचा प्रयत्न होतो, पण असल्या बनेल लोकांना आमच्या मनावर येणारे दडपण, तणाव याची अजिबात कल्पना नसते.
सुदैवाने अन्य पक्षांपेक्षा शिवसेना बरीच सुसंघटित व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बनलेली आहे. तरी पण इथेही मूठभर झगडे असतातच आणि असे तंटे मला बेचैन करतात. उदाहरणार्थ शाखाप्रमुखाविषयीच्या तक्रारी, कोण हवा कोण नको असे वैयक्तिक झगडे, नगरसेवकांचे शाखाप्रमुखांबद्दलचे हट्ट. अशा संघटनात्मक बाबी समोर आल्या म्हणजे कष्टी होतो. यांना शिवसेना समजली तरी आहे काय, हा विचार मला बेचैन करतो. मग माझ्या पद्धतीने त्यांना हुकूमशाहीचे वळसे हाती द्यावे लागतात. असली भूतबाधा दूर करावी लागते, पण काही ठिकाणची गळवे ठुसठुसत राहतात. तरीही मला अभिमान एकाच गोष्टीचा वाटत राहतो की, एका पवित्र विचाराने ही पिढी उभी राहिली आहे. इतर पक्षांना, राजकीय नेत्यांना ही गोष्ट जमलेली नाही.
सौजन्य-  बाळासाहेब: योगेद्र ठाकूर, आमोद प्रकाशन, मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Balasaheb thackeray why behave like that

ताज्या बातम्या