‘किलरेस्कर संगीत मंडळी’त १९१३ मध्ये फूट पडून जशी गंधर्व नाटक मंडळी उदयास आली, तशीच १९१७च्या शेवटी पुन्हा एकदा काही प्रमुख नटमंडळी किलरेस्करमधूनच बाहेर पडली आणि ग. ना. तथा तात्यासाहेब परांजपे यांच्या साहाय्याने त्यांनी मुंबई येथील बोरिवली येथे नव्या नाटक कंपनीची १८ जानेवारी १९१८ रोजी स्थापना केली. राम गणेश गडकरी यांनी सुचविल्यावरून कंपनीचे नाव बलवंत संगीत मंडळी असे ठेवण्यात आले.   त्या घटनेला आता शंभर वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने..

महाराष्ट्रातील नाटय़परंपरेने संगीत नाटक या नव्या कलाप्रकारास दिलेला जन्म केवळ रंगभूमीसाठीच नव्हे, तर संगीतासाठीही अतिशय महत्त्वाचा ठरला. उत्तम संगीत समाजापर्यंत पोहोचवणे अवघड असण्याच्या काळात अण्णासाहेब किलरेस्करांनी ते घडवून आणले आणि अतिशय अल्पावधीत संगीत नाटक हा प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. व्यवसाय म्हणून तो जसा वाढत होता, तसाच त्यातील गुणात्मक स्पर्धेमुळेही त्याकडे रसिकांचे लक्ष लागून होते. किलरेस्करी संगीत नाटकाच्या परंपरेतून गंधर्व नाटक मंडळी स्थापन झाली आणि त्यापाठोपाठ बलवंत संगीत मंडळी, ललित कलादर्श, कोल्हापूरकर नाटक मंडळी यांसारख्या अनेक संस्थांनी संगीत नाटकाच्या क्षेत्रात आपापली रोपटी लावली. त्यांचे वटवृक्षात रूपांतर झाले, याचे कारण बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांनी त्यासाठी केलेले सर्जन हे होते. संगीत नाटकाच्या इतिहासात मा. दीनानाथ यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागते, याचे कारण त्यांनी त्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या संगीत परंपरेला छेद देत स्वत:चे नवे स्वरविश्व उभे केले. तडफदार आणि विजेची चमक असलेली त्यांची गायकी त्या काळी रसिकांनी डोक्यावर घेतली. बलवंत नाटक मंडळीची शताब्दी येत्या १८ जानेवारी रोजी साजरी होत असताना, या नाटय़ संस्थेचा इतिहास पुन्हा एकदा नजरेखालून घालताना आजही मानाचा मुजरा केल्याशिवाय राहवत नाही. ‘किलरेस्कर संगीत मंडळी’त १९१३ मध्ये फूट पडून जशी गंधर्व नाटक मंडळी उदयास आली, तशीच १९१७च्या शेवटी पुन्हा एकदा काही प्रमुख नटमंडळी किलरेस्करमधूनच बाहेर पडली आणि ग. ना. तथा तात्यासाहेब परांजपे यांच्या साहाय्याने त्यांनी मुंबई येथील बोरिवली येथे नव्या नाटक कंपनीची १८ जानेवारी १९१८ रोजी स्थापना केली. राम गणेश गडकरी यांनी सुचविल्यावरून कंपनीचे नाव बलवंत संगीत मंडळी असे ठेवण्यात आले. बलवंत हे नाव अण्णासाहेब किलरेस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आदर व्यक्त करणारे होते. कंपनीच्या पहिल्याच ‘संगीत शाकुंतल’च्या प्रयोगात मा. दीनानाथ यांनी केलेली शकुंतलेची भूमिका अतिशय गाजली आणि त्यानंतरची पंधरा वर्षे ही नाटक कंपनी रसिकांच्या पसंतीस उतरली.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
अग्रलेख : आपले ‘आप’शी कसले नाते?
ramdas athawale meets with car accident
सातारा:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; पत्नी किरकोळ जखमी

सुरुवातीला विसुभाऊ भडकमकर, सदाशिवराव नेवरकर, मा. कृष्णराव कोल्हापुरे, मा. दीनानाथ व चिंतामणराव कोल्हटकर असे कंपनीचे पाच भागीदार होते. परंतु लवकरच पहिले दोन्ही भागीदार बाजूला झाले. बाकीचे दोघे १९३३ पर्यंत बरोबर होते (कोल्हापुरे १९३०ला बाहेर पडले.). कंपनीत प्रमुख स्त्री पात्रे म्हणून मा. दीनानाथ व मा. कृष्णराव कोल्हापुरे, तर प्रमुख गद्य नट म्हणून चिंतामणराव कोल्हटकर हे कामे करीत असत. सर्व नाटके बसविण्याची दिग्दर्शनाची जबाबदारी चिंतामणराव घेत तर पदांच्या चाली काढणे, गाणी बसविणे या गोष्टी मा. दीनानाथ व कोल्हापुरे करीत. नाटक मंडळी चालविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती म्हणजे नवीन नाटककाराला भेटणे, कथेसंबंधी चर्चा करणे, लिहिलेल्या नाटकावर चर्चा करणे, नाटक बसविणे, गावोगावी नाटकांचे प्रयोग ठरविणे, त्या गावात मंडळ्यांची व्यवस्था लावणे आणि जवळजवळ साठ-सत्तर लोकांना एकत्र सांभाळणे या सर्व गोष्टी बहुतांशी चिंतामणरावच सांभाळत असत. इतर दोन्ही मालक त्यात ढवळाढवळ करीत नसत. अर्थात, ही गोष्ट तितकीच महत्त्वाची होती की एक मालक आपल्या पूर्णक्षमतेने कंपनी चालवत असताना त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला उरलेले दोघेही मालक पूर्ण सहकार्य देत असत. त्यामुळे तिघे एकत्रही राहिले व कंपनीने लौकिक आणि पैसा हे दोन्ही अमाप मिळविले. कंपनीजवळ दहा वर्षांच्या आत रेल्वेच्या चार वॅगन्स इतके सामान, ऐंशी-नव्वद लोक आणि कर्जमुक्त व्यवहार एवढा संचय गाठीला लागला होता.

चित्रपटाचे माध्यम अवतरल्यामुळे १९३३ मध्ये ही कंपनी बंद झाली, त्यामुळे बलवंत पिक्चर्स ही नवी संस्था स्थापन करण्यात आली. उत्तम अभिनेते, उत्तम संहिता आणि अभिजात संगीत यामुळे बलवंतची लोकप्रियता पहिल्यापासूनच वाढत गेली. चिंतामणराव कोल्हटकर यांच्यासारखी चतुरस्र व्यक्ती ही कंपनी चालवीत होती आणि त्यांच्या दूरदृष्टीबरोबरच कलेविषयीच्या आस्थेमुळे ही संस्था अनेक नवे प्रयोग करीत राहिली. दिनकर ढेरे यांची ‘संगीत भावबंधन’ या नाटकातील महेश्वर म्हणजेच कामण्णा ही भूमिका तर इतकी लोकप्रिय ठरली, की नंतरच्या काळात दिनकर कामण्णा हेच नाव रूढ झाले. ज्येष्ठ नाटककार आणि संगीत समीक्षक वसंत शांताराम देसाई यांनी असे लिहून ठेवले आहे, की ‘गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेनंतर किलरेस्कर मंडळी जगवण्याकरता हिंदी नाटके करण्याची आणि उत्तरेकडील हिंदी मुलखात मुक्काम ठोकण्याची क्लृप्ती शंकरराव मुजुमदारांनी काढली, तिच्या मुळाशी चिंतामणरावांचा कानमंत्र होताच. कोल्हापुऱ्यांचा संथ स्वभाव आणि दीनानाथांची बेफाट वृत्ती यातून मंडळीची सर्व जबाबदारी चिंतामणराव सांभाळीत. बोडसांनी गंधर्व मंडळीत जे कार्य काही काळ केले, ते सतत पंधरा वर्षे यशस्वीपणे चिंतामणरावांनी ‘बलवंत’मध्ये केले. भोवती गंधर्व, ललितकलादर्श, महाराष्ट्र या प्रभावी नाटक मंडळींच्या स्पर्धेत दीनानाथ व दिनकर ढेरे या दोनच हुकमी व्यक्ती असताना बलवंत मंडळीचा संसार यशस्वीपणे चालवणे, ही बिकट कामगिरी त्यांनी पार पाडली.’ संगीत शाकुंतल, सौभद्र, विद्याहरण, मूकनायक, एकच प्याला, राजसंन्यास, या नाटकांबरोबरच रामराज्यवियोग, वेडय़ांचा बाजार, रणदुंदुभी, संन्यस्त खड्ग, यांसारख्या नाटकांनीही बलवंतची लोकप्रियता शिगेला पोहोचवली. मा. दीनानाथ यांच्यासारखा चतुरस्र गायक कलावंत या सगळ्यात अग्रभागी होता आणि त्यांना सगळ्याच सहकलाकारांची मनापासून साथ मिळत गेली.

बलवंत संगीत मंडळी बंद करण्यात आली आणि चिंतामणराव आणि मा. दीनानाथ या दोघांच्या भागीदारीत बलवंत पिक्चर्सची निर्मिती झाली. पण हा अपरिचित व्यवसाय ज्याची फारशी माहिती न घेता सुरू केल्याने सुरुवातीचे भरपूर भांडवल असून आणि सांगलीत स्वत:चा स्टुडिओ उभा करून पिक्चर काढलेले असून पूर्णपणे अपयश पदरी आले. ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा एकच चित्रपट बलवंत पिक्चर्स या बॅनरखाली निघाला आणि १९३३ ते १९३५ या केवळ अडीच वर्षांत पूर्ण वाताहत झाली. दोघांवर वॉरंट निघाले. कशीबशी अब्रू वाचवून जामिनावर सुटका झाली. सिनेमा कंपनी नाव बदलून भट बेडेकर प्रॉडक्शन म्हणून उभी करण्याचा किंबहुना जप्ती टाळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी धुगधुगी आली तरी मुळातच यातील जीव संपला होता.

मा. दीनानाथांनी बलवंत नाटक मंडळी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला, पण चिंतामणरावांची परिस्थिती एव्हाना फारच हलाखीची झालेली होती. पत्नी क्षयाने आजारी, पदरी चार मुले, स्वत:चे घरदार, इस्टेट वगैरे काही नाही. अशा परिस्थितीत वयाच्या ४५ वर्षांनंतर नव्याने धोका पत्करून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस त्यांना झाले नाही. त्यामुळे जवळ काही नसताना सर्व सामानसुमानावरील मालकी त्यातील सुतळीचा तोडाही न घेता सोडून देऊन बलवंतमध्ये महिना पगारावर राहण्याचे त्यांनी मान्य केले.

प्रयोग सुरू झाले, पण फार काळ कंपनी चालू शकली नाही. पैसे मिळेनात, पत्नीची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे चिंतामणरावही निघून गेले. कंपनीतील लोकांवर वचक तर कुणाचा राहिलेलाच नव्हता. त्यातच कंपनीच्या बिऱ्हाडी राहिलेल्या काही बाहेरच्या लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी गैर उद्योग चालू केले आणि अखेरीस प्रत्येक मुक्कामाच्या गावात सामान विकत विकत अखेरीस पंधरा वर्षे रंगभूमीवर दिमाखात वावरलेली बलवंत संगीत मंडळी इतर अनेक नाटक मंडळ्यांप्रमाणेच कायमची बंद झाली.

(‘बलवंत चिंतामणी’ या लेखिकेच्याच पुस्तकाचा या लेखासाठी आधार घेण्यात आला आहे.)