अभिजीत बेल्हेकर

जागतिक समस्यांच्या मुळाशी पोहोचणारे संशोधन फार मौल्यवान ठरते. तापमानवाढीस कारणीभूत ठरणारा मिथेन वायू कमी करण्यासाठीचे संशोधन त्यातलेच एक. पुण्याच्या डॉ. मोनाली रहाळकर यांनी जर्मनी व अमेरिकेत संशोधन करून भारतात परतल्यावर मिथेन खाणाऱ्या ७० हून अधिक जीवाणूंचा आपल्या चमूसह शोध घेतला. मोठय़ा प्रमाणावर मिथेन तयार करणाऱ्या भातशेतीत त्यांचा वापर करत मिथेन आटोक्यात आणण्याबरोबर जमिनीचा कस वाढवण्यातही यश मिळवले. तसेच करोना विषाणूचा प्रसार प्रयोगशाळेमधूनच झाला असावा, ही शक्यता शास्त्रीय मुद्दे मांडत अधोरेखित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या वेगळय़ा आणि धीराच्या प्रयत्नांमुळेच त्या आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Indian youths abroad
नोकरीच्या नावाखाली भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवले, लाओस देशात बेकायदा कॉल सेंटरमध्ये काम करून घेतले

तापमानवाढ आणि करोना हे शब्द आता अवघ्या मानवजातीच्या परिचयाचे झाले आहेत. जगाला वेठीस धरणाऱ्या या समस्यांच्या मुळाशी जाऊन संशोधन करणारे अपवादानेच आढळतात. याच ध्यासाने झपाटलेल्या एक डॉ. मोनाली रहाळकर. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतून शिक्षण झालेल्या मोनाली यांच्यातील अंगभूत कुतूहल माध्यमिक शिक्षणानंतर त्यांना विज्ञानवाटेवर घेऊन आले. सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एन.सी.एल.) संशोधनाचे धडे गिरवल्यावर उच्च संशोधनासाठी त्या थेट जर्मनीतील कोनस्तांज विद्यापीठात दाखल झाल्या. प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. बन्र्हार्ड शींक हे मिथेन वायू खाणाऱ्या जिवाणूंवर संशोधन करत होते, ज्याचा संबंध मानवजातीवर ओढवलेल्या संकटाशी होता. याच संशोधनाचा भाग बनून मोनाली इथे रूजू झाल्या.

मिथेन वातावरणातील एक प्रमुख सेंद्रिय वायू. कार्बन डाय ऑक्साइडच्या जोडीने जागतिक तापमानवाढ घडवणारा. किंबहुना कार्बन डाय ऑक्साइडहून २६ पट घातक. त्यामुळे जगभर हा मिथेन नियंत्रित करण्याचे काम सुरू आहे. हेच काम ‘कोनस्तांज’मध्ये सुरू होते. हा मिथेन खाणारे जीवाणू शोधून काढायचे, त्यांचा अभ्यास-संशोधन करायचे आणि त्यांचाच वापर मिथेनविरुद्ध करायचा. येथील संशोधनाने मोनाली यांना या विद्याापीठाची ‘पीएच.डी.’ तर मिळालीच, पण बरोबरच संशोधनाची नवी दिशादेखील.

पुढे काही काळ अमेरिकेत संशोधन केल्यावर त्यांना या विषयाबाबत भारत खुणावू लागला. भातशेती हा मिथेन तयार करणारा मुख्य कारखाना. या समस्येबाबतची भारतातली गरज ओळखून मोनाली भारतात परतल्या आणि पुण्याच्या आघारकर संस्थेत संशोधिका म्हणून रूजू झाल्या. गेल्या दहा वर्षांत इथे त्यांच्या गटाने मिथेन खाणाऱ्या ७० हून अधिक जीवाणूंचा शोध घेतला आहे. केवळ या शोधावर न थांबता त्यांनी प्रयोगशाळेत त्यासाठी आवश्यक अधिवास तयार करत या जीवाणूंचे संगोपन केले. पुढे प्रायोगिक पातळीवर या जीवाणूंचा भात शेतीत वापर केला गेला. यातून हा मिथेन तर रोखला गेलाच, पण या जीवाणूंच्या अंतर्भावामुळे शेतजमिनीचा कसदेखील सुधारल्याचे लक्षात आले. संशोधनाचे हे यश सजीव सृष्टीसाठी आशावाद जागवणारे होते. हे संशोधन एवढय़ावरच न थांबवता या जीवाणूंच्या मदतीने रंगांची निर्मिती करता येईल का, या दिशेनेही काम सुरू झाले आहे. 

दरम्यान जीवाणूंबरोबर सुरू झालेला प्रवास पुढे मोनाली यांना विषाणूंपर्यंत घेऊन आला. २०२० च्या प्रारंभी अवतरलेल्या ‘कोविड १९’ने सगळे जगच धोक्यात आले होते. या विषाणूपासूनचा बचाव, त्याच्या संसर्गावरील उपचारात सगळेच अडकलेले. याच वेळी जगातील काही संशोधक मात्र या करोनाच्या उत्पत्तीच्या शोधाला लागले होते. करोना विषाणू कसा पसरला असावा, याबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी नोंदवण्यात मोनाली यांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला काही शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांकडून हा विषाणू नैसर्गिक अवस्थेतूनच मानवजातीत आल्याचे सांगितले गेले. परंतु अगदी कमी कालावधीत या विषाणूने केलेला प्रवास, प्रसार आणि त्याची घातक क्षमता पाहून या ‘नैसर्गिक’ मांडणीबद्दल शंका येत होती. अनेक संशोधकांनी आपापल्या परीने याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला स्वतंत्ररीत्या यासंबंधी काम करणारे संशोधक पुढे ‘ड्रास्टिक’ नावाच्या ट्विटर गटावर एकत्र आले. ‘कोविड १९’च्या मागे असलेला ‘सार्स-कोव्ह-२’ आणि ‘आरएटीजी १३’ नावाचा अन्य करोना विषाणू यांच्यातील जवळीकता मोनाली यांच्या लक्षात आली. हा ‘आरएटीजी १३’ विषाणू चीनमधील मोजियांग भागात काही खाण कामगारांना २०१२ मध्ये झालेल्या आजारात मिळाला होता. त्याचे नमुने चीनमधील वुहान प्रयोगशाळेने गोळा आणि जतन केले होते. या प्रयोगशाळेत विषाणूंवर संशोधन चालते, तसेच जैवअभियांत्रिकीद्वारे त्याच्यात बदल करण्याचीदेखील त्यांची क्षमता आहे. या उलगडलेल्या साखळीचा आणि वुहान प्रयोगशाळेशी त्याच्या असलेल्या संबंधाचा विचार करतच संशोधकांच्या या गटाने ‘सार्स-२’ हा विषाणू नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला असण्याविषयी शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली. या शोधकार्यात, तसेच पाठपुराव्यात मोनाली आघाडीवर होत्या. त्यांच्याबरोबर संशोधक असलेले त्यांचे पती डॉ. राहुल बहुलीकर हेही सहभागी होते.

त्यांनी यावर शोधनिबंध प्रसिद्ध करत जगाचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. मात्र या सबंध व्यवहारात जगातील अनेक महाशक्ती गुंतलेल्या असल्याने त्यांच्या या व्यक्त होण्यावरही अडथळे येऊ लागले. तरीही ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’, ‘करंट सायन्स’सारख्या जागतिक कीर्तीच्या विज्ञानविषयक प्रकाशनामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. विज्ञानविषयक संकेतस्थळे आणि माध्यमांद्वारेही त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. पुढे या संशोधकांनी ‘पॅरिस’ नावाने निव्वळ संशोधकांचा गट तयार करत या आवाजाला जागतिक स्तरावर एकत्र केले. या गटात केवळ तीनच स्त्री संशोधक आहेत आणि मोनाली या भारतातून एकमेव. आता या गटाकडूनच जागतिक आरोग्य संघटनेला पाच खुली पत्रे लिहिली गेली आहेत. ‘कोविड १९’च्या उत्पत्तीची पारदर्शक चौकशी करण्याबरोबरच असे विषाणू हाताळणाऱ्या प्रयोगशाळांसाठी नियमावली तयार करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. या लढय़ाची दखल भारत सरकारनेदेखील घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘लॅन्सेंट कमिशन’ने देखील हा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर आला असण्याची शक्यता आता आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. हे या संशोधनाचे आणि लढय़ाचे यश!

जागतिक समस्यांच्या मुळाशी जाण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. मोनाली रहाळकर यांना त्यांच्या भविष्यातील संशोधनासाठी शुभेच्छा.