बीडच्या जरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत अप्रगत विद्यार्थी शोधून सापडणार नाही. मजेशीर परिपाठ, बचत बँक, लोकसहभाग आणि वेगळ्या नजरेतला ज्ञानरचनावाद यामुळे शाळा तर बदललीच, पण कधी काळी अडगळीला असलेले आणि व्यसनाच्या आहारी गेलेले गावही सुसंस्कृत झाले.

बीड जिल्ह्यातील जरेवाडी (ता.पाटोदा) मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावरील ४०० उंबऱ्याचे गाव. डोंगराच्या पायथ्याला लागून एका वर्गात भरणारी चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा. विद्यार्थी संख्या अवघी २४. गावातील बहुतांशी लोक ऊसतोडणी मजूर. सरकारी-खासगी नोकरीत कोणीच नसल्याने अज्ञान आणि अंधश्रद्धेने लोक झपाटलेले. व्यसनामुळे गावची रया गेलेली. मुलींना तर सातवीच्या पलीकडची शाळाच माहीत नाही. अशा परिस्थितीत १९९५ मध्ये संदीप पवार यांची शाळेवर नियुक्ती झाली. शाळेची आणि गावाची अवस्था बघून शिक्षक पवार यांनी कायापालट करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कामाला सुरुवात केली. शाळा नीटनेटकी करत मुलांमध्ये शिक्षणाची गोडी आणि लोकांचे मनपरिवर्तन करण्याचा लढा सुरू केला.

२० वषार्ंत पवार यांच्यासह शाळेच्या शिक्षकांनी काय केले असेल, हे नुसते आकडेवारीवरूनही कळेल. आज या शाळेच्या एकूण २० वर्गखोल्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतची ५१५ मुले शिकतात. एकूण १३ शाळेकडे आहेत. या शिवाय विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्वच्छतागृह, शुद्ध पाण्याची सुविधा, इन्व्हर्टरसह वीज सुविधा, खेळाचे मदान, ई-लìनगच्या सुविधा अशा आवश्यक त्या भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण झाली आहे. पण, अभ्यासातही इथली मुले इतकी पुढे की शाळेत अप्रगत विद्यार्थी शोधूनही सापडत नाही.

वेगळ्या नजरेतून ज्ञानरचनावाद

या शाळेत भाषेचा धडा गिरवताना पहिले नाव लिहिले जाते ते ‘अहमदनगर’. या नावाची शब्द पाटी विद्यार्थ्यांच्या गटाला दिली जाते. या शब्दातील एका एका अक्षरापासून विद्यार्थी स्वतंत्र शब्द तयार करतात. नगर, मग, अहमद, नर असे शब्द तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होतो. पुढे या शब्दांपासून स्वतंत्र वाक्य तयार करून घेतले जाते.

‘मी नगरला गेलो’, ‘इकडे मग घेऊन ये’, अशी वाक्यनिर्मिती तयार होते. गणिताच्या विषयातही एखादी संख्या दिली जाते. उदा. २१२८५ या आकडय़ांच्या चकत्या विद्यार्थ्यांसमोर ठेवल्या जातात. मग संख्येतील आकडय़ांचे स्थान बदलायचे आणि बदलणारी संख्या लिहायची. असे जास्तीत जास्त वेळा केल्यानंतर आकडय़ांची कमी किंवा जास्त होणारी किंमत लक्षात येते. अशा सोप्या आणि मोकळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली जाते. इतकेच नव्हे तर गावातील सार्वजनिक, खासगी िभती, पाण्याची टाकी, शाळेची इमारत आणि जिथे जिथे विद्यार्थी खेळतात तिथे गणिताची सूत्रे, इंग्रजीचे शब्द, व्याकरण, आकडेमोड, कविता, चित्रे रंगाने रेखाटल्याने मुले अप्रगत राहण्याची शक्यता कमी झाली. ज्ञानरचनावादामुळे शिक्षण आवडीचे झाले तसे नव्या कल्पनेतून ते अधिक सोपे केले आहे. शिक्षक नवीन शैक्षणिक प्रयोग करण्यास अग्रेसर असल्याने हे साध्य झाले. ई लìनगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाच्या आणि क्रमिक अभ्यासाचेही ज्ञान दिले जाते.

मजेशीर परिपाठ

शाळेतला विद्यार्थी कुठल्याच बाबतीत मागे राहू नये यासाठी शिक्षकांनी मजेशीर परिपाठ तयार केला. सोमवार ते शनिवार रोज वेगवेगळ्या प्रार्थना, समूहगीत. विशेष संगीताच्या ठेक्यावर प्रार्थना आणि गीत गायल्याने वेगळाच आनंद मिळतो. परिपाठात पाच ते दहा मिनिटांची नाटुकली तीही पोशाखासह. कधी विषय ऐतिहासिक तर कधी सांस्कृतिक. त्याचे संवादही विद्यार्थीच लिहितात. मुलाखत हा एक उपक्रम राबवला जातो. एक विद्यार्थी प्रकाश आमटे, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, नरेंद्र मोदी बनण्याचा अभिनय करतो तर दुसरा विद्यार्थी सराईत मुलाखतकारासारखी मुलाखत घेतो. दोघांची उत्तम तयारी शिक्षक करवून घेतात. तसेच पत्रकार परिषदेचाही परिपाठ घेतला जातो. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, बडे अधिकारी यांच्या भूमिकेत एखादा विद्यार्थी तयारी करतो. मग बाकीचे विद्यार्थी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करून उत्तरे मिळवतात.

चालता बोलता प्रश्न-उत्तरांचा उपक्रम, खाद्यपदार्थाचा कार्यक्रम असे अनेक उपक्रम परिपाठात राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला चालना दिली जाते. स्पर्धा परीक्षांची सवय लहानपणापासून लावण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. या उपक्रमात १०० टक्के विद्यार्थी सहभागी करून घेतले जातात. यात साप्ताहिक प्रश्नमंजूषा, मासिक प्रज्ञावंत शोध परीक्षा शाळेअंतर्गत घेऊन निकाल दिला जातो. दैनिक परीक्षा उपक्रमाद्वारे दररोज दहा मार्काची भाषा, गणित आणि व्याकरणावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे शिष्यवृत्ती आणि नवोदयच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी गुणवंत ठरतात.

शाळेकडे २० लाख रुपयांचा निधी

शाळेने अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले. चांगल्या नोकरीवरही गेले. शाळेच्या लौकिकाने अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि गावाला रस्ता मिळाला. पाणीपुरवठय़ाची योजना आली. वनराई बंधाऱ्याचे काम झाले. शिवाय आपसातील तंटेबखेडेही कमी झाले. गावकऱ्यांनाही शाळेची गोडी लागली आणि लोकसहभागातून विकासकामातील मजुरीतून तब्बल २० लाख रुपयांचा निधी शाळेसाठी जमा झाला. जरेवाडी शाळेला अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले. जानेवारी, २०१५मध्ये आयएसओ नामांकन मिळवणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात पहिला पुरस्कार मिळाला. मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. ‘संत गाडगेबाबा अभियाना’तला आणि ‘सानेगुरुजी स्वच्छ शाळे’चा पुरस्कारही पटकावला.

संदीप पवार यांना जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरही आदर्श शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले. सध्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी संदीप पवार यांच्याकडे असून उद्धव पवार, अतुल पवार, श्रीनिवास कोकणे, ज्योती कर्डिले, मनीषा पोटभरे, वंदना िशदे, प्रवीण िशदे, अण्णासाहेब घोडके, मुख्तार शेख, अमोल बेदरे, सुभाष जाधव, आत्माराम बारवकर, आजिनाथ सुळे या शिक्षकांची टीम शाळा आणि गाव सुधारण्यासाठी झगडत आहे. जरेवाडीच्या शाळेचा अभ्यास करून आता अनेक शाळा प्रगतीच्या वाटेने जाऊ लागल्या आहेत.

स्वच्छ कलात्मक शाळा

स्वच्छता हेच जरेवाडीच्या शाळेचे वैशिष्टय़ आहे. वृक्षारोपण, बाग संवर्धन, आकर्षक रंगरंगोटी यामुळे शाळा नेटकी आणि देखणी झाली. कलादालन या उपक्रमातून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. फळांच्या बिया, रद्दी कागदे, वेस्टर्न यापासून अनेक कलाकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत, तर स्काऊट गाईड आणि क्रीडा प्रकारातही मुले निपुण आहेत.

विद्यार्थ्यांची बचत बँक

विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच बचतीची सवय लागावी म्हणून यासाठी शाळेने विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वतंत्र बचत बँक सुरू केली असून सार्वजनिक बँकेप्रमाणेच तिचा व्यवहार ठेवला आहे. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राचे ज्ञान मिळावे यासाठी कॅशिअर, व्यवस्थापक, कर्मचारी यांची कामे विद्यार्थीच करतात. या बँकेत आतापर्यंत १ लाख ९ हजार रुपयांची पुंजी जमा असून गरजेनुसार विद्यार्थ्यांना पसे पुरवले जातात.

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.Com