प्रताप रघुनाथ चिपळूणकर
शेतीची मशागत म्हणजे, शेत जमिनीची यांत्रिक नांगरटीपासून ते तण काढण्यापर्यंत असा एक मोठा गैरसमज आपल्याकडे रूढ झाला आहे. खरेतर जमीन नांगरणीची अजिबात गरज नसते. उलट चालू पिकांचा कुजणारा पदार्थ हा त्याच जमिनीत सोडायला हवा. हे सेंद्रिय पदार्थ कुजतात. जमिनीचा कर्बही वाढवतात. त्यावर जगणारे जिवाणू जमिनीची नांगरणी, मशागतही करतात.
पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीची पूर्वमशागत ही सुरुवातीला बैलांकडून व त्यानंतर ट्रॅक्टरकडून केली जाऊ लागली. आज बैल ठेवणे शेतकऱ्यांना परवडत नाही. डिझेल तसेच यंत्राच्या किमती वाढत चालल्याने या कामावरील खर्च शेतकऱ्यांसाठी डोईजड झालेला आहे. परंतु पर्याय माहीत नसल्याने उधारी-उसनवारी करून हे काम केले जात आहे. या प्रश्नांची जाणीव मला स्वत:चे यंत्र असूनही ३० वर्षांपूर्वी भेडसावू लागली.
वेगवेगळ्या प्रयोगांतून असे लक्षात आले, की सेंद्रिय पदार्थ कुजत असता कुजण्याच्या क्रियेत भाग घेणारे जिवाणू जमिनीची नांगरणी, मशागतही करतात. आता या ठिकाणी कुजणारा पदार्थ पाहिजे व तो दीर्घ काळ कुजत राहणारा पाहिजे. यासाठी अनेक पदार्थांची चाचपणी केली. नांगरणीचे काम पूर्णच बंद करून टाकले. गेली २० वर्षे मी विना नांगरणीची शेती करतो आहे. उत्पादन उत्तम आहे. यामुळे मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष पुढील पिकाच्या कालावधीत जागेला कुजत राहिले. या कामातून कुजविणाऱ्या सूक्ष्मजीवांनी जमिनीची मशागत करून दिली. अनुभवातून असे लक्षात आले की, जगातील कोणत्याही सुधारित औजारापेक्षा ही मशागत कित्येक पटीने भारी आहे. आज शेतकऱ्यांना या कामासाठी एकरी १० हजार रुपये खर्च येतो. इथे माझे काम फुकटात होते.
● सेंद्रिय खत व्यवस्थापन
उत्पादन पातळी मोठ्या प्रमाणात घसरत चाललेली आहे. या मागील कारणांचा शोध घेतला असता जमिनीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी धोक्याच्या पातळीखाली गेलेली आहे. वार्षिक एक पावसाळी पीक घेण्याऐवजी बहुवार्षिक जास्त उत्पादन देणारी पिके घेतली जात आहेत. एका शास्त्र शाखेने असे शिकविले की पिकाच्या गरजा जमिनीत केवळ सूक्ष्मजीवांकडूनच भागविल्या जातात. या कामासाठी ते जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा वापर करतात. जितके जास्त उत्पादन तितका सेंद्रिय कर्बाचा वापर जास्त केला जातो. हे निसर्गचक्र आहे. एखाद्या पिकाच्या अखेरीस जितका कर्ब वापरून संपला, तितका कर्ब परत पिकाला देणे गरजेचे असते. सेंद्रिय कर्ब नेमका कसा संपतो, हेच आज शेतकऱ्यांना फारसे माहिती नाही. जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रिय कर्ब टाकणे इतकेच ज्ञान.
शास्त्रात थोडे डोकावल्यानंतर त्याने असे शिकविले, की तुम्ही कितीही खत टाका, ते तीन-चार महिन्याच्या पिकाअखेर त्यातील बहुतांशी भाग संपून जातो. ज्या ठिकाणी वर्षांतून पिकाला सेंद्रिय खत टाकणे शक्य नाही, अवघड होते, तिथं दर तीन-चार महिन्याला खत टाकणे कसे शक्य होणार? सेंद्रिय खत वापर याला कोणताही पर्याय नाही. सेंद्रिय कर्बाचा वापर कमी झाल्यास त्याचा पीक उत्पादनावर थेट परिणाम होतो. मग यावर चिंतन आणि शोधयात्रा सुरू झाली.
शेणखत, कंपोस्ट वापराबाबत शास्त्राने सांगितले आहे की, जमिनीबाहेर कुजलेले खत नको. कुजण्याची प्रत्यक्ष क्रिया ही जमिनीतच होणे गरजेची असते. ही क्रिया दीर्घकाळ चालणेही गरजेचे आहे. या सर्व शास्त्रीय तत्त्वांचे पालन करण्यासाठी सुलभ मार्ग म्हणजे नांगरणी बंद करून मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत बनतात. यामुळे या बाहेरून आणाव्या लागणाऱ्या खताची वाहतूक, ते जमिनीत कालविणे ही सर्व कामे आपोआप बंद झाली. नुसत्या इतक्या फरकाने, बदलाने प्रत्येक पिकाला सेंद्रिय खत मिळण्याची तरतूद झाली. पहिल्याच वर्षी पिकाच्या उत्पादनात ५० टक्के वाढ मिळाली.
● रासायनिक खतांचा वापर
हरित क्रांतीनंतर आपण सुधारित जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातीचा वापर सुरू केला. हा सुवर्णकाळ होता. परंतु, हा आनंद फार काळ टिकला नाही. उत्पादन पातळी घसरू लागली. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी खतांचा वापर वाढवित नेला आहे. यातूनही फार काही साध्य होऊ शकलेले नाही.
रासायनिक खते टाकल्यानंतर ती पिकांपर्यंत कशी पोहोचतात, हे शिकविले नाही. बहुतांशी शेतकरी याबाबत अंधानुकरण करतो. रासायनिक खते पिकापर्यंत पाच पायऱ्या अशा- टाकणे, स्थिरीकरण, उपलब्धीकरण, शोषण, अभिसरण. पहिली पायरी शेतकऱ्यांच्या हातात असते. दुसरी व तिसरी पायरी सूक्ष्मजीवांच्या हातात तर चौथी आणि पाचवी पायरी या वाढणाऱ्या पिकाच्या हातात आहेत. पिकाला खत टाकल्यानंतर प्रथम त्याचे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर होते. याला स्थिरीकरण असे म्हणतात. कुजणारा पदार्थ व सेंद्रिय कर्ब दोन्हीही नसल्याने खतांच्या वापराची कार्यक्षमता अत्यंत कमी आहे. यासाठी विना नांगरणीची शेती करा. सर्व कामे आपोआप होतील. प्रथम स्थिरीकरण चांगले झाले, तरच पुढील पायऱ्यांच्या वाटचालीला वाव राहतो.
● खतांचे पिकाला उपलब्धीकरण
उपलब्धीकरण म्हणजे खताचे पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर. वनस्पतीच्या केशमुळ्यांभोवती सूक्ष्मजीवांचे अनेक गट कार्यरत असतात. कार्यक्षम रासायनिक खतांचा वापरासाठी सूक्ष्मजीवाकडून सेंद्रिय कर्बाचा वापर केला जातो. रासायनिक खत गरजेप्रमाणे पिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य सेंद्रिय कर्ब असणे याला पर्याय नाही.
● पाणी व्यवस्थापन
पाण्याच्या गैर वापरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. पाट तणाने भरलेले असतील तर ५० टक्के पाणी पाटातच मुरते. साखळी पद्धतीने पाणी दिल्यास गरजेपेक्षा खूप जास्त पाणी दिले जाते. लांब सरी पद्धतीने पाणी देणे जास्त चांगले असते. एका वेळी किती सऱ्यांना पाणी लावले जाते, यावर त्याची कार्यक्षमता अवलंबून असते. रात्रपाळीत पाण्याचा सर्वात जास्त गैरवापर होतो.
ऊस हे आपले मुख्य पीक. उसाची पहिल्या महिन्यातील पाण्याची गरज अत्यंत कमी असते. परंतु गरजेपेक्षा खूप जास्त पाणी दिले जाते. उसाच्या वाढीवर परिणाम होतो. विना नांगरणीची शेती करा. उसाच्या जुन्या सऱ्याचाच पुढील पिकासाठी वापर करा. पाणी बाजूला न मुरल्याने कमीत कमी पाण्यात भागते. उगवण, फुटीची व वाढीची अवस्था लवकर येते. उत्पादन वाढते. कार्यक्षम पाणी वापराचे सूत्र कमीत कमी पाण्यात फेर आला पाहिजे व हंगामानुसार पुढील फेर योग्य वेळेत आला तरच उत्पादन चांगले मिळते.
● उत्पादन आणि पिकाचा दर्जा
ऊस साखर कारखान्याला जातो. इथे दर्जाचा प्रश्न येत नाही. ऊस आपण साखर उत्पादन करण्यासाठी लावतो, परंतु शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे किती टन ऊस झाला, यावर मिळते. म्हणून शेतकरी जास्तीत जास्त टन कसे मिळतील, याकडे वळतो. संसाधनांचा भरमसाठ वापर केला जातो. कारखान्यामध्ये साखर किती उत्पादन झाली व कशी विकली गेली, यावरच दर निघतो. शेतकरी म्हणतो मला साखरेचा विचार करून काय करावयाचे? तो कारखानदारांचा प्रश्न आहे. ते कारखाना पाहून घेईल.
अंतिमत: सर्वांनी असाच विचार केल्यामुळे ऊस तोडणी, ओढणी व प्रक्रिया खर्च सर्वच वाढत जातात. सर्वांनाच कमी दरावर समाधान मानावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण उभे राहू शकत नाही. निर्यात होऊ न शकल्याने अंतिम साठवणूक खर्च वाढत जाऊन कारखानदारी अडचणीत येते. यासाठी कमी खर्चात ऊस उत्पादन, जास्त साखर उतारा, कमी खर्चात साखर उत्पादन होणे गरजेचे असते. यासाठी शेतकऱ्यांना साखर उतारा वाढवा म्हणून सांगून कोणीही ऐकणार नाही. मात्र उसाचा दर साखर उताऱ्यावर देण्याचे तंत्र विकसित झाल्यास आपोआप सर्व प्रश्न सुटतील. उत्पादनाच्या दर्जापेक्षा जास्त उत्पादन घेण्याकडेच शेतकऱ्यांचा नेहमी कल असतो.
उत्पादन वाढवत नेले की दर्जा घसरतो. कोणतेही पीक घेत असता जमिनीचे काही प्रमाणात प्रदूषण होते. त्याचे शुद्धीकरण करून जमिनीची प्रत उत्तम राखणे गरजेचे आहे. शून्य मशागतीत जागेवरच मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष कुजत असता तयार होणाऱ्या काही रसायनांमुळे जमिनीचे शुद्धीकरण होते. अशा जमिनीतील कोणतेही उत्पादन अत्युच्च दर्जाचे असते. तुम्ही सातत्याने उत्तम दर्जाचे उत्पादन निर्माण केले की बाजारात आपले एक नाव तयार होते. अशा मालाला दरही चांगला मिळतो.
मंदीतही बऱ्यापैकी फायदा होतो. असे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. आपण ज्या मानाने उत्पादनाचा विचार करतो, त्या तुलनेत जमिनीकडे लक्ष देत नाही. शंभर टक्के जमिनीचा वापर तुमचा खिसा व पोटासाठी करू नका. जमिनीच्या पोटाचा सर्वात प्रथम विचार करणे गरजेचे असते. यासाठी २५ – ३० टक्के जमिनीचा वापर जमिनीचे पोट भरण्यासाठी केला पाहिजे. एकदा जमिनीचे पोट भरले की ती तुमचे पोट व खिसा आपोआप भरेल. यासाठी शेती पद्धतीत आमूलाग्र बदल करणे काळाची गरज आहे. मरमर राबून शेती भावी काळात फायदेशीर होणार नाही. यासाठी प्रथम मेंदूची मशागत करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचा वापर करून उत्तम शेती करा.
