scorecardresearch

Premium

चावडी : बातमी फुटली कशी याची चौकशी ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या महाविजय-२०२४ अंतर्गत घर घर चलो अभियानासाठी नगरमध्ये आले होते.

chandrashekhar bawankule chavadi
चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या महाविजय-२०२४ अंतर्गत घर घर चलो अभियानासाठी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी बंदिस्त सभागृहात लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय सुपर वॉरियस ची बैठक घेतली. बैठक बंदिस्त सभागृहात होती. पत्रकारांना तेथे मज्जाव करण्यात आला होता. या बैठकीतच त्यांनी उपस्थित सुपर वॉरियर्सना पत्रकारांना कसे मॅनेजह्ण करावे याचा सल्ला दिला. म्हणूनच कदाचित त्यांनी पत्रकारांना बैठकीत मज्जाव केला असावा. तरीही बातमी बाहेर फुटलीच. यामुळे बावनकुळे यांना संताप अनावर झाला. खुलासे करण्याची नामुष्की आली. बातमी फुटली कशी, चित्रफीत कोणी व्हायरल केली याची म्हणे आता भाजपच्या अंतर्गत गोटातून चौकशी करण्याचा आदेश दिल्याची कुजबूज आहे.

आपण आणि आपले ४०

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठवाडय़ात‘आपण आणि आपले ४०’ या सूत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळ दिले. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना सोयाबीन संशोधन संस्था मंजूर झाली. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघातील मंदिर विकासासाठी निधी मिळवला. आमदार बालाजी कल्याणकर यांनी तर निधी मंजूर करुन घेण्यासाठी पत्रकार बैठकीतही पाठपुरावा केला. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ‘अहो, तुमचे जाहीर केले ना’. गट सांभाळण्यासाठी मुख्यमंत्रीच आग्रही दिसत असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वैजापूर औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी तालुकास्तरावर बैठक घेतली. एकरी १५ लाख रुपये भूसंपादनाचा दर ठरविण्याचे आश्वासन दिले. हे सारे खास घडवून आणण्यात आले ते आमदार रमेश बोरनारे यांच्यासाठी. कोणी काही म्हणो, गट सांभाळा, आपण आणि आपले ४० हे सूत्र जसे मुख्यमंत्र्यानी जपले.

chandrashekhar-bavankule
उमेदवारीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या प्रस्तावाने नाशिकमधील इच्छुकांमध्ये धाकधूक
maharashtra bjp, bjp president chandrashekhar bavankule, chandrashekhar bavankule in nashik dindori lok sabha constituency
भाजपचे नाशिक लोकसभेच्या जागेवर लक्ष, दिंडोरी मतदार संघापासून प्रदेशाध्यक्ष दूर
PM narendra modi rajasthan meeting
काँग्रेसवर शहरी नक्षल्यांचा ताबा!; पंतप्रधानांची घणाघाती टीका; मध्य प्रदेश, राजस्थानात प्रचाराला धार
NAVEEN PATNAIK
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी बीजेडी पक्षाने कसली कंबर; भाजपाला थोपवण्यासाठी खास रणनीती!

 कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ..

निवडणुका आल्या की, इच्छुकांकडून  मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. नुकतेच संसदेने  महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. आता महिलांनाही ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, मतदारांमध्ये महिला वर्ग पन्नास टक्के असल्याने या महिलांना आपलेसे करण्यासाठी कोण देवदर्शनाची सहल आयोजित करते, कोणी बाईपण देगा देवा सिनेमाची तिकिटे वाटली. तर कोणी पैठणीचा खेळ रंगवला. श्रावणातील सणवाराची नामी संधीही साधली. मात्र, आजची तरुण पिढीच नव्हे तर प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग असलेल्या भ्रमणध्वनीच्या प्रेमात पडलेला आहे. कोणाला रेसिपी हवी, असते तर कोणाला मायाजालमधील विविध चित्रफितींची भुरळ पडलेली असते. आता टेक्नोसेव्ही जगात हीच गरज ओळखून एका होऊ घातलेल्या नगरसेवकाने खास रिचार्जची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, फुकटच्या रिचार्जमध्ये मतदार मात्र विरोधकांच्या संपर्कात जात असल्याने ही योजना म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरण्याच्या भीतीने योजनाच एक महिन्यात गुंडाळली.

शिंदे विरुद्ध शिंदे 

राजकारणात सध्या सगळं काही ओके चालू आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री सर्व काही ओके आहे. आमच्या महायुतीतील तिन्ही  नेते सक्षम आहेत असे आमदार महेश शिंदें यांनी कोरेगाव येथे नगरपंचायतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात  जाहीर करून टाकले. आमदार शिंदे यांनी दिलेल्या ३५ कोटींच्या निधीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी  नगरपंचायतीने व नागरिकांनी त्यांचे भले मोठे स्वागत केले. शहरात आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढून जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसेनेचे आमदार  अपात्र ठरणार, असे वारंवार सांगणारेच अपात्र ठरणार आहेत, असा टोला महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला. कारण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शशिकांत शिंदे यांना अपात्र ठरविण्याची याचिका दाखल केली आहे. काही असो, सध्या तरी दोन्ही आमदार शिंदेवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

भावी खासदार ते भावी महापौर.

आगामी लोकसभा आणि विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेही वेध प्रमुख राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या अनुषंगाने विविध पक्षांची लहानथोर नेते मंडळींनी भावी खासदार  ते  भावी नगरसेवक  आणि  भावी महापौर  म्हणून स्वत:ची नावे पुढे दामटण्यास सुरुवात केली आहे. त्याचे साक्षित्व सार्वजनिक रस्त्यांवर झळकणाऱ्या डिजिटल फलकांतून पाहायला मिळू लागले आहे. भावी आमदार, खासदार, नगरसेवक ते महापौर म्हणवून घेण्यासाठी त्या त्या इच्छुक नेत्यांच्या वाढदिवसाचे निमित्त लागते. सोलापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ एका महत्त्वाच्या चौकात भावी खासदार म्हणून एका नेत्याचे लांबलचक फ्लेक्स लागले होते. या भावी खासदाराने त्याचे उघडपणे समर्थनही केले. खरे तर मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतच आपला खासदारकीवर दावा होता.

 (सहभाग : एजाज हुसेन मुजावर, सुहास सरदेशमुख, विश्वास पवार, मोहनीराज लहाडे, दिगंबर शिंदे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp state president chandrasekhar bawankule an inquiry into how the news broke ysh

First published on: 26-09-2023 at 03:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×