भारतीय चित्रपट शताब्दी साजरी करतो आहे आणि त्याच वेळी त्याच्या इतिहासातली सोनेरी पानं एकामागून एक फाडून नेण्याचा दुष्ट खेळ काळ अलीकडे खेळतो आहे. गेल्या दोन वर्षांत चार नायकांना (देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, जॉय मुखर्जी) उचलल्यानंतर त्यानं आता रुपेरी इतिहासातला सर्वात मोठा खलनायक उचलून नेला आहे. नियतीचं ‘स्क्रिप्ट’ सलीम-जावेदच्या स्क्रिप्टपेक्षाही नाटय़पूर्ण असतं हेच खरं! पहिल्या तिघांनाच काय, पिढय़ान् पिढय़ांच्या नायकांना प्राण पुरून उरला! अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर यांच्या प्रेमात बिब्बा घालण्याचं काम त्यानं ज्या निष्ठेनं केलं, तितक्याच चोखपणे धर्मेद्र, राजेंद्रकुमार, राजकुमार यांची कार्य सिद्धीस जाऊ नयेत म्हणून विघ्नं आणली. ज्या मनोभावे त्यानं नर्गिस, नलिनी जयवंत, मीनाकुमारी या नायिकांना पिडलं, तशाच इमाने इतबारे त्यानं सायरा, साधना, शर्मिलांना सतावलं.
नायकांमध्ये देव आनंद जसा सदाबहार होता, तसा खलनायकांमध्ये प्राण होता. या विघ्नकर्त्यांच्या लीला बघताना प्रेक्षकांच्या पिढय़ा वयस्क झाल्या; पण प्राण थकला नाही आणि प्रेक्षक कंटाळला नाही. तसा गेली बारा वर्षे प्राण पडद्यापासून दूर होता. तरी त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी महानायक – लघुनायकांपासून सक्तीनं निवृत्ती पत्करावी लागलेले त्याच्या नंतरच्या खलनायकांपर्यंतचे सगळे नटबोल्टस हजर होते. बिचारे ए. के. हंगल! गुणांनी तेही कमी नव्हते. पण त्यांना शेवटचा निरोप द्यायला यांच्यापैकी कुणालाही वेळ नव्हता!! बाकी कलेचा प्रांत आहेच मोठा चमत्कारिक. तिथे नाव मिळवणं कठीण आणि ते टिकवणं अधिकच कठीण. टिकून राहण्यासाठी गुणांबरोबरच जिद्द लागते. चिकाटी आणि धमक लागते. धोरण लागतं. प्राणपाशी हे सगळं होतं. म्हणूनच त्याला यश मिळालं आणि ते टिकलं. इतकंच नाही तर त्याचा दरारा निर्माण झाला.
पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या जीवनात प्राणचे हे गुण दिसले. सतराव्या वर्षांपर्यंत तो  ‘पाप्याचं पितर’ म्हणावं इतका बारीक होता. (यालाच अलीकडे झीरो फिगर म्हणतात का?) या फिगरमुळे सिमल्यात असताना त्याला एका नाटकात स्त्री भूमिका करावी लागली होती. अंध नायिकेच्या त्या भूमिकेत प्राणचा नायक होता, पुढे खलनायक म्हणून प्रसिद्धी पावलेला मदन पुरी, हा बऱ्यापैकी नाटय़पूर्ण योग!
प्राण अपघातानं सिनेमात आले. त्यांना हीरो बनण्याची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. सुरुवातीला अर्थार्जनाचं साधन म्हणून तो अभिनयाकडे बघत होता. पण मुंबईत येऊन अशोककुमार, दिलीपकुमार यांच्याबरोबर काम करू लागल्यावर तोही अभिनयाकडे गंभीरपणे बघू लागला. लागोपाठ यश मिळू लागल्यावर त्याला जबाबदारीची जाणीव झाली. अनुभवानं त्याला कळून चुकलं की, चित्रपटागणिक आपलं नाव आणि कपडे तेवढे बदलणार आहेत, पण भूमिकेचा साचा तोच राहणार आहे. मग नावीन्य आणि वेगळेपण निर्माण करण्यासाठी त्यानं भूमिकेगणिक नवा गेटअप, नव्या लकबी हे धोरण स्वीकारलं. त्याच्याशी झालेल्या मुलाखतीत मी म्हटलं, ‘‘कधी कधी या दोन्ही गोष्टी भूमिकेपेक्षा जास्त मोठय़ा होतात, असं नाही वाटत?’’
‘‘नक्कीच!’’ प्राणनं आश्चर्यकारक कबुली देत म्हटलं,‘‘पण मी व्यक्तिरेखेशी सुसंगत वाटतील अशाच लकबी घेतो. निर्थक हावभाव, भडक गेटअप यांच्यामुळे भूमिका बिघडते. व्यक्तिरेखेला शोभणार नसेल, तर मी एक बोटसुद्धा वर उचलणार नाही. ‘संन्यासी’मधली माझी भूमिका पहा. त्यात मला ‘अ‍ॅक्शन’ होती; संवाद नव्हते. विशिष्ट दृश्यं येईपर्यंत माझं अस्तित्व जाणवणारच नव्हतं. पण तो धोका मी पत्करला. ’’
खलनायक कसा असावा. याबद्दल प्राणनं म्हटलं होतं, ‘‘व्हिलन म्हणजे थयथयाट करणारा माथेफिरू नसतो. आपल्याकडे आधीच खलनायकाच्या भूमिका ‘लाउड’ लिहिल्या जातात. खलनायक एन्ट्रीपासून लाउड झाला, तर खरोखर ‘लाउड’ होण्याची गरज असेल, त्या दृश्यात करण्यासाठी त्याच्यापाशी काही शिल्लकच राहणार नाही. त्याची सगळी इमोशनल एनर्जी संपून गेलेली असेल. खलनायकी भूमिका करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी : कोणताही माणूस खलनायक किंवा गुन्हेगार म्हणून जन्मत नसतो. परिस्थितीमुळे त्याला दोन्हींपैकी एक बनावं लागलं, असं प्रेक्षकाला वाटलं पाहिजे. ती परिस्थिती समोर येईपर्यंत व्हिलन हा व्हिलन न वाटता सर्वसामान्य माणून वाटला पाहिजे. राग येण्यासारखी घटना घडली तरच आवाज चढवला जावा. डोळे वटारले जावेत. तुम्ही ‘जिस देश में गंगा बहती है’मधला माझा राका बघा. सुरुवातीला तो अगदी संथपणे बोलतो. धीमेपणानं चालतो. मात्र कडेलोट होतो तेव्हा त्याचा भडका उडतो. मग त्याच्या चालीत तडफ येते, आवाज चढतो. खलनायकाचा अभिनयदेखील स्वाभाविक वाटला पाहिजे.’’
टिकून राहण्यासाठी नटानं कशा प्रकारे भूमिकांची निवड करावी याबद्दलही प्राणचे विचार मार्मिक होते. ‘‘फक्त स्वत:ची भूमिका बघून कोणताही चित्रपट घेऊ नये. ज्या चित्रपटाची कथा दमदार असेल, त्यात तुम्हाला दोन-चारच दृश्यं असली तरी चालतील, सिनेमा तुमच्या अभिनयावर चालत नाही. कथेवर चालतो. सिनेमा चालला नाही, तर तुमच्या उत्तमातल्या उत्तम अभिनयालाही कुणी विचारत नाही. भारताची लोकसंख्या अफाट आहे म्हणून तुमचा चित्रपट सहजपणे चालेल, असं गृहीत धरता येत नाही. तमाम देशानं इथे तयार होणारा प्रत्येक चित्रपट कर्तव्य म्हणून एकदा तरी पाहावा, असा राष्ट्रपतींनी वटहुकूम काढला तरी असं घडणार नाही. सिनेमा चालवतो प्रेक्षक! त्याला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतील असे पाच-सहा प्रसंग सिनेमात असले तरी पुरे! आता या प्रसंगांमधले दोन जरी माझ्या वाटय़ाला आले, तर माझ्याही भूमिकेचा गाजावजा होतो. पण आधी सिनेमा; मग नट! आपले बरेचसे हीरो फक्त स्वत:ची भूमिका नजरेपुढे ठेवून चित्रपट घेतात आणि तोंडघशी पडतात.’’
टिकाऊपणाचा हा मंत्र प्राणला सापडला, त्यामागे अनुभवाच्या थपडाही आहेत. त्यानंतर ‘तीसरी कसम’च्या नायकाप्रमाणे प्राणनं तीन शपथा घेतल्या : एक – एकाच संस्थेच्या किंवा ग्रुपच्या किंवा दिग्दर्शकाच्या बंधनात अडकून पडायचं नाही. नाहीतर भूमिकांत वैविध्य राहणार नाही. दोन – दोस्ती खातर फुकटात काम करायचं नाही. तुमच्या नावाचा फायदा घेऊन तुम्हाला आणि प्रेक्षकाला फसवलं जातं. प्रेक्षकाच्या शिव्या मात्र नटालाच खाव्या लागतात. तीन – लेखकाकडून कथा ऐकायची नाही. लेखक मारे रंगवून सांगतो, ते प्रसंग कथेत शिल्लक राहतातच असं नाही. किंवा दिग्दर्शकाला ते त्याच ताकदीनं रंगवता येतीलच असं नाही. कॅमेऱ्यासमोर जाण्याआधी ऐकलेली कथा कॅमेऱ्यापुढे उभं राहताना त्याच स्वरूपात भेटण्याची खात्री नाही.
भारतीय चित्रपटात आलेल्या सर्व खलनायकांमध्ये फक्त प्राण सुपरस्टार ठरला. त्याचं जन्मजात दरारेबाज व्यक्तिमत्त्व हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे नशिबानं दिलेली साथ. दिलीप – राज – देव या रुपेरी ब्रह्मा-विष्णू – महेश त्रिमूर्तीच्या बरोबर वाढल्यामुळे त्याच्या गुणांचं चीज झालं. त्यांच्याबरोबर त्यालाही सुपरस्टार स्टेटस मिळाला. राजेश  – अमिताभ – शाहरुख हेदेखील सुपरस्टार! पण त्यांच्या जमान्यात, का कोण जाणे, त्यांच्या बरोबरीनं खलनायकांना स्टारचा दर्जा मिळाला नाही.
अमिताभ आणि शाहरुख यांनी अँटी हीरो रंगवल्यामुळे त्यांच्या चित्रपटांतले व्हिलन तेवढे गाजले नसावेत. थोडेसे अपवाद म्हणजे ‘शोले’सारखे चित्रपट, आणि अमरीश पुरीसारखे नट. अमिताभबरोबर मतभेद झाल्यानंतर खलनायक म्हणून अमजद खानची कारकीर्द संपल्यात जमा झाली. प्रेम चोप्रा बराच काळ टिकला; पण शक्ती कपूर, रणजित, गुलशन ग्रोव्हर, कुलभूषण खरबंदा, किरणकुमार हे प्राणनंतरच्या पिढय़ांमधले खलनायक प्राणचं सातत्य दाखवू शकले नाहीत आणि स्टारचा दर्जाही मिळवू शकले नाहीत.
प्राणला मात्र काळ आणि वेळ, दोघांनी साथ दिली. म्हणूनच तरुण खलनायक आले म्हणून त्याला निवृत्ती पत्करावी लागली नाही की बाप – काका – मामा अशा फालतू भूमिका कराव्या लागल्या नाहीत. उलट अलगदपणे बेमालूमपणे तो चरित्र भूमिकांमध्ये शिरला. मनोजकुमारच्या ‘उपकार’नं त्याचा ‘मेक ओव्हर’ केला आणि त्याच्या कारकिर्दीला नवं आणि मानाचं वळण दिलं. साठीच्या वयात प्राण ‘शंकर दादा’ आणि ‘धर्मा’  यांसारख्या चित्रपटांत शीर्षक भूमिका करत होता. त्या चित्रपटांत विनोद मेहरा आणि मिथुन चक्रवर्ती हे तरुण स्टार असले तरी त्यांचा नायक प्राणच होता.
अमिताभचा झंझावातदेखील प्राणला घरी बसवू शकला नाही. उलट अमिताभच्या ‘जंजीर’ आणि ‘मजबूर’मध्ये प्राणला त्याच्या बरोबरीच्या भूमिका मिळाल्या. अमिताभ आणि विनोद खन्ना ही जोडी पडदा गाजवत होती, तेव्हाच साठी पार केलेल्या अशोककुमार आणि प्राण या जोडगोळीचा ‘व्हिक्टोरिया नम्बर २०३’ धमाल करत होता. त्यानंतर आणखीही दोन-तीन चित्रपटांत त्यांची जोडी दिसली. त्या चित्रपटांना ‘व्हिक्टोरिया’ सारखं घोडं दामटता आलं नाही. पण त्या वयाच्या नटांना प्रमुख भूमिकांत घ्यावं, असं निर्मात्यांना वाटलं हेच प्राण व अशोककुमार यांचं यश होतं.
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायक खूप झाले. बापही बरेच झाले. चित्रपटांमागून चित्रपटात ते दिसत राहिले तरी प्रेक्षकांनी त्यांची दखल घेतली नाही. पण ‘शराबी’मध्ये प्राण अमिताभचा बाप म्हणून दिसायचा तेव्हा प्रेक्षकांचं अमिताभइतकंच प्राणकडे लक्ष असायचं. ते तसं राहील याची काळजी त्या चित्रपटाच्या लेखकाला आणि दिग्दर्शकांना घ्यावी लागली होती.
 प्राणचा दरारा होताच तसा. त्याची पुण्याई आणि त्याची कामगिरीही तशीच मोठी होती. प्राणनं यश आणि प्रेक्षक यांना कधी गृहीत धरलं नाही. म्हणूनच तो खलनायकीकडून चरित्र अभिनयाकडे वळला, आणि काही काळानं तो खलनायकीकडे परत आला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला दोन्ही रूपांत स्वीकारलं.
प्राणला सर्वात चांगली आदरांजली हृषिकेश मुखर्जीनी ‘गुड्डी’मध्ये वाहिली आहे. चित्रपटाच्या जगाचं बेगडी अंतरंग उघडून दाखवणाऱ्या त्या चित्रपटात मायावी दुनियेतला अस्सल माणूस म्हणून हृषिदांनी त्याची प्रेक्षकांना ओळख करून दिली. त्यातल्या शूटिंगमध्ये एक कामगार अपघातात सापडतो, तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी प्राण आपली मोटार देताना दिसतो. कुणीतरी त्याच्या हातातल्या घडय़ाळाची तारीफ करतो, तेव्हा काही न बोलता आपलं घडय़ाळ काढतो आणि त्याच्या मनगटावर बांधतो. प्राणला बघून गुड्डी घाबरते, तेव्हा तिला धीर देताना धर्मेद्र म्हणतो, ‘‘हा फिल्म इंडस्ट्रीतला सर्वात भला माणूस आहे!’’
मृत्यूनंतर काय, सगळेच जण दिवंगताबद्दल बरं बोलतात. कुणी ओठातून, कुणी पोटातून, कुणी स्वत:वर प्रकाशझोत पाडून घेण्यासाठी.
माणसाच्या हयातीत त्याच्याबद्दल बरं बोललं जाणं आणि त्याची रुपेरी पडद्यावर कायमची नोंद होणं याहून मोठा सन्मान, मोठा पुरस्कार नसेल. बॉलिवूडमध्ये एकटय़ा प्राणला- एका व्हिलनला त्याचं खरं नाव घेऊन हा गौरव त्याच्या हयातीत झाला. म्हणूनच तो खरा   सुपरस्टार होता – पडद्यावरचा आणि खऱ्या जीवनातलासुद्धा!

बॉलीवूडमध्ये दिलीपकुमार-राज कपूर-देवआनंद या त्रिमूर्तींच्या काळात काम केल्यानंतर धर्मेद्र -अमिताभ-राजेश खन्ना यांच्या युगातही विविधरंगी भूमिका साकारणारे प्राण.. खर्जातला आवाज, भेदक नजर आणि धडकी भरवणाऱ्या संवादाने खलनायक साकारणारे ते सिनेजगतातील पहिले सुपरस्टार व्हिलन ठरले. ‘शेरखान अपनी मर्जी से आता है, और अपनी मर्जी से जाता है’ म्हणणाऱ्या प्राणसाहेबांचे शुक्रवारी निधन झाले. ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या मनस्वी कलाकाराच्या कारकिर्दीचा हा आढावा..