देशाने विज्ञानक्षेत्रात खूप प्रगती केली आहे, यात वादच नाही. पण ती पुरेशी नाही. देशातील आव्हाने लक्षात घेऊन आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणे गरजेचे आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी आपण सक्षम आहोत की नाही, याचा आढावा घेणारा लेख लिहिला आहे रसायनशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी.
वैज्ञानिकांना भारतरत्न मिळाला की विज्ञानावर चर्चा होण्यास सुरुवात होते. या निमित्ताने का होईना सामान्य माणूस विज्ञानाबद्दल वाचतो, बोलतो. विज्ञान दिन आला की दर वर्षी निरनिराळे विषय घेऊन त्यांवर चर्चासत्रे किंवा कार्यक्रम राबविले जातात. भारत सरकारने डॉ. सी. व्ही. रामन यांना १९५४ साली भारतरत्न दिले. त्यानंतर विश्वेसरैय्या यांना १९५५ साली, डॉ. अब्दुल कलाम यांना १९९७ साली तर प्रा. सी. एन. आर. राव यांना २०१३ साली भारतरत्न म्हणून सन्मानित केले. भारतीय शास्त्रज्ञांत अर्थातच या घटनेचा आनंद तर नक्कीच आहे. पण याचबरोबर सुरू होतो तो भारतीय विज्ञान आणि देशापुढील आव्हाने यांचा ताळमेळ बसविणे.
विज्ञान हे सत्यावर आधारित असल्याने कुठलाही चुकीचा सिद्धांत किंवा प्रयोग विज्ञानात टिकू शकत नाही. भारत हा अजूनही गरीब देश आहे आणि आपल्या समोरील आव्हाने ही अनेक आहेत. विज्ञानातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या त्रिकुटाप्रमाणे देशात बदल, आव्हाने आणि संधी हे त्रिकूट आहे. अनेक तांत्रिक प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे. जगाची लोकसंख्या सात अब्ज २१ कोटींहून अधिक असून भारताची लोकसंख्या एक अब्ज २६ कोटींहून जास्त आहे. लोकसंख्या नुसतीच वाढत नसून लोकांचे वयोमान वाढले आहे. ही विज्ञानाचीच किमया आहे. विज्ञानाच्या जोरावर माणसाला जीवन सुसह्य झाले आहे. पूर्वी अल्झायमर, पार्किन्सन आणि नराश्य यांसारखे आजार नव्हते. ते आज खूप मोठय़ा प्रमाणावर आहेत. अजूनही कॅन्सरला उपाय नाहीत. परंतु लवकर ज्ञात झालेल्या कॅन्सरवर मात करता येते. जनुकावली ही जन्मकुंडलीपेक्षा मोठी कुंडली असून विज्ञानाच्या नव्या दिशा रोगावर मात करून देतील. इसवी सन २१०० मधील माणूस हा १५० वष्रे वयाचा असेल कारण आपल्या शरीरातील सर्वच अवयव हळूहळू बदलता येतील. जणू काही आत्मा एका शरीरातून दुसऱ्या कृत्रिम शरीरात गेला असेल.

माणसाच्या बदलत्या जीवनशैलीनुसार संशोधनात बदल होत गेले पाहीजे. तसे झाले तरच माणसाचे जीवन आणि संशोधन याचा ताळमेळ बांधता येऊ शकतो. यासाठी आरोग्य क्षेत्रात मोठय़ाप्रमाणावर संशोधन होणे गरजेचे आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

आरोग्याबरोबरच देशात ऊर्जेचा मोठा प्रश्न आहे. येत्या काळात आपली ऊर्जेची गरज ही वाढतच जाणार आहे. अशा वेळी बायोगॅसचा उपयोग पदार्थ आणि ऊर्जेसाठी करणे क्रमप्राप्त आहे. भारताचा विचार करता सध्या आपल्याकडे सर्वच गोष्टींचा तुटवडा आहे. लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करतात. तर काही लोकांच्या घरी तीन-चार वाहने असतात. भाजीवाली बाई फोनवर गप्पा मारताना दिसते तर कॉलेजचे विद्यार्थी इंटरनेटद्वारे दुसऱ्याच जगात वावरत असतात. एकीकडे पाण्याचा तुटवडा तर दुसरीकडे अतिवृष्टीने जीवहानी, वित्तहानी. भारताच्या दृष्टीने ऊर्जा, पर्यावरण, पाणी, अन्न, परवडणारी आरोग्यसेवा, कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, पायाभूत सुविधा या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. देशासाठी स्वच्छ ऊर्जानिर्मिती करणे आवश्यक आहे. आजमितीस देशातील ऊर्जास्रोतांचे प्रति किलोवॉट अवर युनिट पाहिल्यास सौरऊर्जेचा खर्च हा जास्त आहे. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
पाण्याचा तर खरा मोठा प्रश्न आहे. ‘२०३० जलस्रोत समूहा’च्या अभ्यासानुसार मागणी आणि पुरवठा यामध्ये ४० टक्के तफावत असेल तर आंतरराष्ट्रीय हवामानबदल परीक्षकांच्या अहवालानुसार २०५० साली जगातील ६० टक्के लोक पाण्यासाठी व्याकूळ झालेले असतील. सध्या आपला पाणी वापरण्याचा दर २५१ घन किलोमीटर असून तो चीनच्या दुप्पट आहे. यामुळे पाण्यावर, त्याच्या वापरावर आणि पुनर्वापरावर आपण विशेष संशोधन करणे गरजेचे आहे. अन्नपदार्थाच्या बाबतीत तर खूपच मोठे संशोधन करावे लागेल. १९५० साली दोन अब्ज लोकसंख्या होती ती २०२५ साली आठ अब्ज असेल. १९६०मध्ये एका हेक्टरवर दोन लोक पोसले जात होते. पण ही परिस्थिती २०२५मध्ये एका हेक्टरवर पाच लोक पोसावी लागणार आहे. यामुळे जमीन अधिक पिकाऊ होण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे.
यासाठी आपल्याला जैव अन्नधान्यांचा पर्याय स्वीकारणे अनिवार्य ठरणार आहे. मका, कापूस, टोमॅटो, किलगड, वाटाणा, स्ट्रॉबेरी, बटाटा आणि केळी हे यापूर्वीच जैव धान्य म्हणून यशस्वी झाली आहेत. भविष्यात आपल्याला जैवाधारित अन्नपदार्थावर संशोधन करून प्रतिहेक्टरी मोठे उत्पादन करणे जरुरीचे आहे. या आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दिशेने देशाचे विज्ञान काम करत आहे. हे काम जलदगतीने होऊन विज्ञानाचा वापर देशाच्या आणि मानवजातीच्या विकासासाठी अधिकाधिक कसा होईल याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.