जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीमाराचे तीव्र पडसद संपूर्ण राज्यात उमटल्याने महायुती शासन अडचणीत आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर माफी मागावी लागली. तरीही मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढत असतानाच दुसरीकडे धनगर आरक्षण आंदोलनाने उचल खाल्ली आहे. याच प्रश्नावर निवेदन देताना एका धनगर कार्यकर्त्यांने सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळल्यामुळे गोंधळ उडाला. संबंधित कार्यकर्त्यांला विखे-पाटील यांच्या समक्ष भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह पोलिसांनी बुकलून काढले. नंतर विखे-पाटील यांनी हे प्रकरण चिघळून धनगर समाजाची नाराजी नको म्हणून अंगावर टाकलेल्या भंडा-याला पवित्र मानले. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही भंडारा उधळणा-याला कार्यकर्त्यांला मारहाण केल्याबद्दल जाहीर माफी मागितली खरी; यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची अडचण झाली. संबंधित कार्यकर्त्यांने यापूर्वी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही भंडारा उधळला होता. त्याची ही पूर्वपीठिका पाहता संबंधित कार्यकर्त्यांची पालकमंत्री विखे-पाटील यांची भेट घडवून आणण्यापूर्वी योग्य दक्षता घेणे अपेक्षित होते. संबंधित कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना देतानाच, सदोष सुरक्षा व्यवस्थेबद्दल वरिष्ठ पोलीस अधिका-यांना विखे-पाटील यांनी खडेबोल सुनावले. मग वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मधल्या फळीतील पोलीस अधिका-यांची कानउघाडणी केली. वडय़ाचे तेल वांग्यावर काढत प्रसार माध्यमांवरही राग काढण्यात आला.
चला चला घाई झाली, रंगरंगोटीची वेळ आली
मराठवाडय़ाचा मुक्ती संग्राम या वर्षी जंगी करायचा, असे सरकारने ठरविले. ते कशासाठी असे विचारू नका, तुमच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह लागेल. आता या कालावधीमध्ये सात वर्ष ११ महिन्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय झाला. सारे जण खुश झाले. पण खरी आनंदी झाली महापालिका. आनंदाच्या भरात मग ‘ नवरस’ युक्त कार्यक्रम ठरविण्यात आले. देशभक्तीच्या वातावरणात मग कुणीतरी हास्यजत्राही घुसडली. विरोधी झाला आणि ‘मंत्रिमंडळाची हास्यजत्रा’ नको म्हणून तो कार्यक्रम रद्द झाला. आता उठा, उठा घाई झाली आणि रंगरंगोटीची वेळ आली असे चित्र आहे. प्रत्येक चौकात माणूस काही तरी रंगवतो. शहर चांगले असावे पण ते नेहमीसाठी. पण आता रोषणाई आणि रंगरंगोटीचे दिवस आले आहेत. मोठे साहेब येणार आहेत. मंत्र्यासमोर शहर वाईट दिसू नये एरवी ते घाण असेल तर काय बिघडतं. आता चौक सुशोभिकरणापासून ते मंडपापर्यंत सारे खर्च करण्यासाठी ४० कोटीची तरतूद झाली आहे. सारे खुश आहेत. निविदा निघाताहेत. मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक आणि इतिहास अभ्यासक सारी रंगरंगोटी आवाक होऊन बघत आहेत.




बुंदसे गई…
राजकारणात मी केलं हे सांगण्यासाठी मिळेल ती संधी साधण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसापुर्वी सांगली जिल्ह्यासाठी एसटी महामंडळाला १०० नव्या बसेस मिळाल्या. बस नवीन असली तरी यात आमदार, खासदार यांचे फार मोठे योगदान आहे अशातला भाग नाही. मात्र, याचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न परवा कवठेमहांकाळ आगारात झाला. राष्ट्रवादीने नवीन बस पूजनाचा मुहुर्त समाज माध्यमावर जाहीर करताच खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी बस पूजनासाठी आमदार गटाच्या वेळेपुर्वी अर्धा तास अगोदरचा मुहुर्त शोधला. तशी समाज माध्यमावर जाहिरातबाजीही करण्यात आली. मात्र खासदार-आमदार गटाच्या श्रेयवादाला वैतागलेल्या सामान्य नागरिकांनीच पूजा विधी आटोपला. मग वरातीमागून राष्ट्रवादीने मुहुर्त साधला, तर प्रशासकीय पातळीवरून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करून या श्रेयवादापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला.
मंगळागौर पावणार का?
खरं तर मंगळागौर हा स्त्रियांचा कौटुंबिक, सांस्कृतिक सण. पण रत्नागिरी जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी तो सार्वजनिक पध्दतीने धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. त्यात होणाऱ्या पारंपरिक नाचांच्या चक्क स्पर्धा भरवल्या जात आहेत आणि या स्पर्धेतील विजेत्यांबरोबरच इतरही उपस्थित महिलांना सप्रेम भेट म्हणून साडय़ा दिल्या जातक आहेत. आता एवढा खर्च कोणाला परवडत आहे आणि कशासाठी? अर्थात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजपाचे माजी आमदार बाळ माने आणि चिपळूणचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी आपापल्या शक्तीनुसार हे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यापैकी सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी तर रत्नागिरी शहरासह तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये हा कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांना साडय़ाही वाटल्या जात आहेत. मात्र महिलांची शेवटपर्यंत उपस्थिती राहावी म्हणून हे साडी वाटप कार्यक्रमाच्या अखेरीस वाटण्याचा धोरणीपणाही संयोजक दाखवत आहेत. येणाऱ्या प्रत्येक महिलेला साडी दिली जाणार आहे, असं अचानक कळल्यावर आपल्या नातेवाईक किंवा मैत्रिणीला फोन करुन बोलावून घेण्याची चपळाई महिलांनी दाखवण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडले आहेत . आता हा सारा खटाटोप कशासाठी? अहो, निवडणुका आल्या आहेत ना?!
गर्दीची सुरस कथा!
कोणाची ताकत किती? कोणाला अधिक प्रतिसाद मिळतो? अशा आव्हानात्मक प्रश्नांचे काहूर असलेल्या एकाच पण दुभंगलेल्या पक्षाच्या दोन सभातील गर्दीची ही कथा. पंचगंगा काठच्या पहिल्या सभेसाठी लोकांच्या उपस्थितीच्या नियोजनाची विधानसभा संघनिहाय आढावा बैठक झाली. एकाच तालुक्यात दोन मतदारसंघ असलेल्या भागातून तर तब्बल एक हजार गाडय़ांचा आकडा पुढे आला. प्रत्यक्ष सभा स्थळाची गर्दी पाहता सांगितलेली, ऐकवलेली माणसे गेली कुठे असे म्हणण्याची वेळ मुख्य संयोजकांवर आली. यातून बोध घेतला तो दुसऱ्या सभेच्या संयोजकांनी. त्यांनी व्यवहारिक चाणाक्षपणा दाखवला. त्यांच्या आढावा बैठकीवेळी असेच गाडय़ांचे भलते सलते आकडे ऐकवले गेले. पण तयारीच्या संयोजकांनी आम्ही गाडय़ा पाठवतो; तुम्ही माणसे गोळा करा असे म्हणत स्थानिक नेतृत्वाच्या संघटन कौशल्याची प्रचिती पाहिली. ही मात्रा कामी आली.
सहभाग : सुहास सरदेशमुख,
एजाज हुसेन मुजावर, सतीश कामत, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे