scorecardresearch

चावडी : दोन्ही गटांकडे ..

आपल्याकडे कोणी कोणापासून वेगळं व्हायचं काही नाव घेत नाही असे काही हातवारे करत बोलताच सभेत हास्याची एकच  लकेर उमटली.

chavadi latest news about maharashtra politics news about maharashtra political crisis
(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर कार्यकर्त्यांची झालेली कोंडी भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमात समोर आली. मतदारसंघ जवळजवळ असल्याने व पूर्वीपासून एकत्र काम केलेलं असल्याने नेते वेगळे झाले तरी कार्यकर्ते काही वेगवेगळं व्हायचं काही नाव घेत नाहीत. आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले की, आम्ही शरद पवारांशी निष्ठा ठेवून आहोतच. मी घेतलेली भूमिका माझ्या मतदारसंघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही; परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निर्णय घेतला. त्याचाच धागा पकडत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे म्हणाले, तुमचं ठीक आहे हो, पण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे दिवसा अजितदादांना व रात्री शरद पवारसाहेबांना भेटतात, अशी मिश्कील टिपणी केली. त्यावर मल्लिनाथी करताना आमदार रामराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर नेत्यांचीही तीच अवस्था झाली आहे. आम्ही कोणत्या गटात जावे, हा प्रश्न आम्हालाही पडला होता. शरद पवार यांचे अनंत उपकार आम्हां सर्वांवर आहेत. मात्र  दहशतीच्या राजकारणाला शह देण्यासाठी आम्ही सत्तेसोबत, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यात आजही अनेक जण आहेत, दिवसा धाकटय़ांना आणि रात्री मोठय़ांना भेटतात. आपल्याकडे कोणी कोणापासून वेगळं व्हायचं काही नाव घेत नाही असे काही हातवारे करत बोलताच सभेत हास्याची एकच  लकेर उमटली.

हेही वाचा >>> चावडी : एका खुर्चीचे अंतर ..

BJP 4
समोरच्या बाकावरून : भाजपसाठी इकडे आड, तिकडे विहीर!
three tips help you to make habit of getting up early
सकाळी लवकर उठायची सवय कशी लावायची? ‘या’ तीन टिप्स ठरतील फायदेशीर
Consumer, products, consumer court, shopkeeper, complaints
ग्राहकराणी : तक्रारीत तथ्य असेल तरच करा तक्रार
How to Grow Curry Leaves at home know tips
कढीपत्त्याशिवाय तुमचा स्वयंपाक पूर्ण होत नाही; मग घरातच करा कढीपत्त्याची लागवड, जाणून घ्या सोप्या टिप्स

पारकट्टय़ावरील चर्चा..

जिल्ह्यातील भाजपचे एक मातब्बर आणि पालनकर्ता नेता आणि सावलीसारखे सोबत असणारे स्वीय सहायक यांच्यामध्ये गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मतभेदाची दरी निर्माण झाली होती. या दरीमुळे कार्यकर्त्यांचीही विभागणी अटळ ठरली. कोणत्याही फलकावर दिसणारे दोघांचे हसरे चेहरे वेगवेगळय़ा फलकांवर झळकू लागले होते. अगदी दहीहंडीचा सवतासुभाही मांडला गेला. यानिमित्ताने उभयतांनी शक्तिप्रदर्शनही केले. पालनकर्त्यांच्या खुर्चीजवळ सहायकासाठी एक खुर्ची हमखास असायची. हे चित्र पाहून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. ‘आता काय भाऊंचं खरं न्हाय गडय़ा’ अशा चर्चा पारकट्टय़ावर रंगू लागल्या होत्या. मात्र अचानक पडद्याआड समेट झाला. पुन्हा एकदा दोघांचे हसरे चेहरे समाजमाध्यमातून झळकले. दुहीच्या आगीत तेल ओतणाऱ्याचेच हात भाजले. आता पक्षांतर्गत आणि बाह्य विरोधकांची अवस्था मात्र ‘तेल गेलं तूप गेलं, हाती उरलं धुपाटणं’ अशी झाली.

औषधाच्या वेळेप्रमाणे पाठपुरावा

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना कोल्हापुरातील जनता आणि लोकप्रतिनिधींना वेध लागले आहेत ते पाण्याचे. गेले पाच दिवस निम्म्या भागाला पाणीपुरवठा झालेला नाही. काळम्मावाडी योजनेचे पाणी आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशा एकंदरीत भावना आहेत. हे पाणी येण्याचा मुहूर्त अनेकदा देऊनही तो सफल झालेला नाही. काळम्मावाडीचे पाणी कोल्हापुरात लवकरच येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारांसह पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. तेव्हा त्यांनी सोमवापर्यंत पाणी येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. पाणी काही अजून आलेले नाही. त्यावर भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी टीकेचा सूर लावला. आता मुहूर्त देण्यापेक्षा थेट पाणी कधी येणार यासाठीच लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत आहेत. हाच मुद्दा सतेज पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. तेव्हा त्यांनी काळम्मावाडी योजनेत तांत्रिक अडचणी आहेत; त्या दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे बारकाईने लक्ष आहे. म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तिन्ही वेळा पाठपुरावा करत आहे, या त्यांच्या मिश्कील उत्तराने सारेच हैराण झाले.

हेही वाचा >>> चावडी: वाघनखे आणि उदयनराजेंचे मौन

खासदार कुठे गायब झाले?

समाजात गुन्हेगारी वाढत असताना त्यात अल्पवयीन मुलींसह महिलांच्या अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. कर्जवसुलीसाठी सावकाराकडून कर्जदाराला वेठीस धरून पळवून नेण्याचे प्रकारही घडतात. उत्तरेत लोकप्रतिनिधींचे अपहरण होणे नवीन नाही; पण सोलापुरात चक्क खासदाराचेच अपहरण झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार करताना काही प्रश्नार्थक मुद्दे उपस्थित केल्याने त्याची रंगतदार चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.  मागील सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून निवडून आलेले भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे तसे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. निवडणुकीत प्रचार करताना ‘मीच देव’ म्हणणारे आणि जात प्रमाणपत्र, डॉक्टरेट पदवीबाबत गूढ असलेले, नेहमीच मौन धारण करणारे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हेच आता बेपत्ता झाले असून त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. स्वत:च्या मठातही ते भेटत नाहीत. संपर्क होत नाही. त्यामुळे त्यांचा तात्काळ शोध घेण्याची मागणी करताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपकडेच संशयाची सुई नेली आहे. यापूर्वी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य नागरिकांना कोठेही भेटत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार थेट सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे खासदाराची शोधमोहीम कोणी आणि कशी घ्यायची, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. (संकलन : एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे,विश्वास पवार)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chavadi latest news about maharashtra politics news about maharashtra political crisis zws

First published on: 07-11-2023 at 04:44 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×