scorecardresearch

Premium

चावडी : राणेंचा ‘सोमय्या’ तर होणार नाही ना ?

उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे सरकारमध्ये शिवसेना सहभागी असताना किरीट सोमय्या यांना सोडण्यात आले.

Maharashtra political crisis
नितेश राणे (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

ठाकरे आणि राणे यांच्यातील विळय़ाभोपळय़ाचे नाते साऱ्यांनाच सर्वश्रूत. शिवसेना सोडल्यापासून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याची एकही संधी राणे यांनी सोडलेली नाही. ठाकरे गटाला अंगावर घेण्याची जबाबदारी आता राणे यांच्या दुसऱ्या पिढीकडे सोपविण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भल्या सकाळी भाजपला लक्ष्य करतात. त्याला आक्रमक भाषेतच प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे भाजपचे धोरण ठरले. मग कोण ही कामगिरी पार पडेल यावर विचारमंथन झाले. भाजपने राणे पुत्र नितेश राणे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली. धाकटे राणेही तयार गडी. त्यांनी सकाळी सकाळीच त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. दोन्ही बाजू ऐकावयास मिळाल्याने वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही खूश झाले. उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे सरकारमध्ये शिवसेना सहभागी असताना किरीट सोमय्या यांना सोडण्यात आले. सोमय्या यांनी इमानेइतबारे ही कामगिरी पार पाडली. पण लोकसभेची उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा सोमय्या यांचा पत्ता कापण्यात आला. राणे पुत्राचा ‘सोमय्या’  तर होणार नाही ना, अशी कुजबुज भाजपच्या कार्यालयात सुरू झाली.

जन्मोजन्मी हीच..!

वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करून या जन्मी लाभलेलेच पतीदेव सात जन्म लाभावेत, अशी प्रार्थना करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळदेव इथे मात्र उमेश गाळवणकर व डॉ. संजय निगुडकर मित्र मंडळातर्फे स्त्रीचा सन्मान आणि स्त्री प्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने वटपौर्णिमेच्या दिवशी पुरुषांनी हा कार्यक्रम साजरा केला. प्रथेनुसार त्यांनी  वडाच्या झाडाची पूजा करून आणि त्याभोवती सात फेरे मारून, जन्मोजन्मी हीच पत्नी आपल्याला सहचारिणी म्हणून मिळावी, तसेच तिला निरोगी, आनंदी-समाधानी ठेवावं, अशी परमेश्वराकडे प्रार्थनाही केली.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

राष्ट्रवादीची वाटचाल..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला  ९ जूनला नगर शहरात पक्षाची सभा शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. पक्ष २५ व्या वर्षांत पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. सभेच्या आयोजनासाठी गेली काही दिवस नगर शहरात मैदानाचा शोध सुरू होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मैदानाच्या पाहणीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील रविवारी रात्री नगरमध्ये आले तत्पूर्वी दुपारी नगर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मैदानाची जागा शेतजमिनीची असल्याने तेथे चिखल जमा झाला होता. सायंकाळी नगरमध्ये पोहचणारे प्रदेशाध्यक्ष पाटील पोहोचेपर्यंत अंधार पडला. या अंधारातच आमदार पाटील यांनी मोटारींच्या प्रकाशझोतात, चिखल तुडवत मैदानाची पाहणी केली. प्रदेशाध्यक्ष पाहणी करत आहेत म्हटल्यावर उपस्थित आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप व इतर पदाधिकाऱ्यांनाही चिखल तुडवणे भाग पडले. आता या चिखलातून राष्ट्रवादी जिल्ह्यात कशी झेप घेते हे बघायचे.

संगीत मेजवानीतही आमदारांचे पाल्हाळ 

महाराष्ट्र शासन संगीत महोत्सवातील उद्घाटनास सत्राचा प्रसंग. पंडित राहुल देशपांडे यांचे गायन ऐकायला रसिक आतुर झालेले. सांस्कृतिक खात्याचे सचिव विकास खारगे यांनी औपचारिक मनोगत व्यक्त केले. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मनोगत सुरू केले. त्यांच्या नेहमीच्या पाल्हाळीक, तपशीलवार विवेचनाची सवय असल्याने रसिकांनी दोन मिनिटानंतर  टाळय़ा वाजवण्यास सुरुवात केली. रोख  लक्षात आला आहे पण आजची संधी दवडणार नाही असे सांगत आमदारांचे इचलकरंजीची सांगीतिक परंपरा कशी थोर राहिली याचे साग्रसंगीत वर्णन सुरूच राहिले. इकडे टाळय़ा वाजतात नि तिकडे भाषण सुरू. असा बाका प्रसंग उद्भवल्याने संयोजकही कोंडीत सापडलेले. सरतेशेवटी पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळाच्या नूतनीकरण कामासाठी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची मदत करण्याचे आवाडे यांनी जाहीर  करून समारोप केला. तेव्हा कोठे अस्वस्थ झालेल्या संयोजकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (संकलन : दयानंद लिपारे, सतीश कामत, मोहनीराज लहाडे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chavadi maharashtra interesting political issues maharashtra political crisis zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×