उन्हाळय़ातही नदीतून गुडघाभर पाण्यातून जावे लागते, पावसाळय़ात तर कल्पनाच न केलेली बरी.. तीन-चार महिने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. रुग्णांचे तर प्रचंड हाल. गणोजादेवीच्या महिला आपल्या व्यथा खासदार नवनीत राणा यांना सांगत असतात. पूल उभारणे किंवा पुनवर्सन करणे, हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगतात. नाला-नदीने वेढलेल्या गणोजादेवीच्या या ७० घरांच्या वस्तीतील गावकरी आशाळभूत नजरेने नवनीत राणा यांच्याकडे पाहात असतात. हा प्रश्न तडकाफडकी सोडवणे शक्य नसले, तरी समस्या निश्चितपणे सोडवू असे आश्वासन त्या देतात. आता इतकी वर्षे त्रास सहन केला, अजून वाट पाहू, असे ग्रामस्थांचे म्हणणे असते. हास्यविनेादात गावातील बैठक संपते. पण, त्याआधी एक नाटय़मय घटना घडून गेलेली असते. नवनीत राणा यांच्या वाहनांचा ताफा पेढी नदीच्या काठावर पोहचतो. वस्तीत या वाहनांमधून जाणे शक्य असते, पण नवनीत राणा गाडीतून खाली उतरतात. हातात चप्पल घेऊन त्या पायीच नदीचे पात्र ओलांडण्यास सुरुवात करतात. सोबत असलेले अधिकारी आधी संकोच करतात. गावकऱ्यांना काय त्रास आहे, हे पायी चालल्याशिवाय माहीत कसे पडेल, असे म्हणत नवनीत राणा अधिकाऱ्यांना सोबत चालण्याचा आग्रह धरतात. अधिकाऱ्यांचाही नाईलाज होतो. लवाजमा वस्तीत पोहचतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न व औषध प्रशासनाला जाग येते तेव्हा..

प्रत्येक जिल्ह्यात यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यरत असतो. मात्र, या विभागाचे नेमके काय चालले आहे हेच बहुतांशी वेळा कळतच नाही. दर दिवाळीला दुकानात जाणे पदार्थाचे नमुने गोळा करणे आणि ‘खुशाली घेणे’ हेच काम बऱ्याच वेळा चालू असते. लोकही आरोग्याबाबत  अधिकच जागृत झाल्याने पिण्यासाठी यंत्रावर शुध्द केलेल्या पाण्यालाच पहिली पसंती देतात. त्यात शेरीनाल्यामुळे सांगलीचे पाणी गेली तीन दशके  बदनाम तर झालेच, पण यावर उपाय शोधण्याऐवजी राजकारणच अधिक झाले. यामुळे  गल्लीबोळातही शुध्द पाणीनिर्मितीचे कारखाने सुरू झाले असून पाण्यावरच लोणी काढण्याचा उद्योग अन्न व औषध प्रशासनाच्या नजरेत कधी येतच नाही. मात्र, याला गेल्या आठवडय़ात तडा गेला. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जेवणावेळी न मागता बाटलीबंद पाणी दिले. त्याचे शुल्क आकारले म्हणून तक्रार करताच अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ हॉटेलचालकांना नोटीस पाठवून बाटलीबंद पाणी विक्री करीत असताना पिण्यायोग्य पाणी देण्याची जबाबदारी हॉटेलचालकाची असल्याचा फतवा काढला. आता पाण्यावरील लोणी गोड मानून घेणाऱ्यांना काहीशा मिरच्याही झोंबल्या असतील, पण सामान्य माणसाच्या हक्काचे काय?

कोकणातील वाघोबाची डरकाळी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर सध्या वाघाच्या डरकाळय़ा ऐकायला येत आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये तो एक चर्चेचा विषय आहे. मात्र घाबरून जाऊ नका. कोल्हे धावपट्टीवर येऊ नयेत म्हणून ही विमानतळ प्राधिकरणाने शक्कल लढवली आहे. हा विमानतळ गेल्या ऑक्टोबरमध्ये खुला झाला. या परिसरात पूर्वीपासून कोल्हयांचा अधिवास आहे. येथे भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असताना विमानाच्या आवाजाने ते गोंधळून जातात आणि पळण्याच्या नादात धावपट्टीवर येतात, असे वन विभागाचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत विमानाचे उड्डाण करताना अडथळा निर्माण होतो. निरनिराळे प्रयत्न करूनही या समस्येवर मात करता आलेली नाही. म्हणून आता हुबेहूब वाघाच्या डरकाळीसारखा आवाज काढणारे यंत्र या विमानतळाच्या परिसरात लावण्यात आले आहे. विमान उतरताना किंवा उड्डाण करताना हे यंत्र सुरू केले जाते. त्यावरून वाघाची डरकाळी ऐकून कोल्हे इकडे येणे बंद होईल, अशी प्रशासनाला आशा आहे. पण हळूहळू कोल्हे त्याही आवाजाला सरावले तर ही समस्या पुन्हा तशीच राहण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्यामागील आकाशवाणी

एका दिवसाच्या अंतराने केंद्र सरकारच्या योजनांचा स्थानिक पातळीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे दुसरे मंत्री करवीर नगरीत आले होते. इतक्या साऱ्या खात्यांचा पदभार असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी तसा वेळ लागणार होता. मंत्री कार्यक्षम असावेत. त्यांनी आटोपशीर वेळेत सारे काही आवरले. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रालाही त्यांनी भेट दिली. उण्यापुऱ्या वीस मिनिटांत बैठक, पाहणी आदी सोपस्कार निभावलेसुद्धा. आकाशवाणीचे कमी झालेले स्थानिक कार्यक्रम, नव्या काही उपाययोजना या संदर्भात काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. मंत्री महोदय इतक्या घाईघाईने का गेले, याची चर्चा सुरू झाली. तेव्हा त्यातील खोच कळाली. मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या घरी एक विधी होता. त्यात सहभागी होणे हा खरे तर त्यांचा मूळ हेतू होता. दौऱ्याला मुलामा मात्र शासकीय कामांचा आढावा असा दिला गेला.

नैराश्य कसले घेता ?

करोनाकाळात अवलंबलेली आभासी परीक्षा पध्दती काही विद्यार्थ्यांना आपलीशी वाटू लागली. त्यामुळे स्वउपस्थितीत परीक्षेची वेळ आली, तेव्हा त्यांच्याकडून विरोध होऊन आभासी प्रणालीचा आग्रह धरला गेला. स्वउपस्थितीतील परीक्षा पध्दतीने काही विद्यार्थ्यांना नैराश्य येते. यावर बोट ठेवत आभासी परीक्षेच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा सल्ला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळय़ात दिला. हा धागा पकडत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:चे उदाहरण दिले. आभासी परीक्षेमुळे मुले कशी नैराश्यात जातात ?  मी तर दोन वर्ष आतमध्ये (कारागृहात) होतो, तरीही बाहेर आल्यानंतर कधी नैराश्यात गेलो नाही. त्यामुळे अभ्यास करून मजबुतीने लढा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांच्या विधानात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईचा संदर्भ असल्याने उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

(सहभाग : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, अनिकेत साठे, मोहन अटाळकर, अभिमन्यू लोंढे)

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political conflict political drama in maharashtra political crisis in maharashtra zws
First published on: 21-06-2022 at 00:10 IST