हिंगोलीचे आमदार संतोष बांगर बंडाळीच्या काळात खास मतदारसंघात आले. एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचा सत्कार झाला. भगवा ध्वज हाती घेतलेला कडवा शिवसैनिक अशी बिरुदावली त्यांना लावण्यात आली. मोठे सत्कार झाले. हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहू, असे त्यांनी आश्वासन दिले. बांगर मतदारसंघात नायक झाले. मग बहुमताचा ठराव आला आणि बांगरांनी चाल बदलली. तेही शिंदे गटात सत्तेत सहभागी झाले. गटातील आमदारांची संख्या ४० झाली तेव्हा हिंगोलीत प्रश्न होता, निष्ठा म्हणजे काय रे भाऊ ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१०-२०-३०

१० जून, २० जून आणि ३० जून या दहा दिवसांमध्ये असे काही घडले, की त्यातून राज्याच्या राजकारणाची सारी समीकरणेच बदलली. १० जूनला राज्यसभेची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून येतील, असा दावा आघाडीचे नेते करीत होते; पण या निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडला. भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. हा पराभव शिवसेनेला फारच झोंबला. मग फुटलेल्या अपक्ष आमदारांची नावे शिवसेनेने जाहीर केली. २० जूनला विधान परिषदेची निवडणूक. राज्यसभेच्या पराभवामुळे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सारेच सावध झालेले. तरीही शिवसेना व काँग्रेसची मते फुटली. शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले तरीही मते फुटली होती. २० तारखेलाच रात्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकविले. आमदारांना बरोबर घेऊन ते सुरतला गेले. पुढे नऊ दिवस राज्याच्या राजकारणात अस्थिरता होती. ३० तारखेला काही तरी होणार, अशी अटकळ बांधली जात होती. झालेही तसेच. २८ तारखेला विरोधकांनी राज्यपालांकडे धाव घेतली आणि राज्यपालांनी लगेचच उद्धव ठाकरे यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचा निर्देश दिला. ३० तारखेला दोन धक्कादायक घटना घडल्या. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची निवड झाली आणि शपथविधी पार पडला. दहा दिवसांच्या अंतरात राज्याच्या राजकारणाचा पोत बदलत गेला.

आनंदीआनंद, पण मनातल्या मनात

झालं असं की, सरकार येईल याची खात्री भाजप कार्यकर्त्यांना वाटू लागली. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होतील हेही जवळपास ठरले. अगदी पहाटे फिरायला येणाऱ्या भक्त मंडळींचाही आवाज वाढत गेला. आता आमचं सरकार येणार, असं ते सांगू लागले; पण अचानक केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असे कळविले आणि भाजपच्या नेत्यांचे अवसानच गळाले. एरवी लहानसहान घटनेसाठी पेढे वाटणारे भाजप कार्यकर्ते ना चौकात आले ना त्यांनी मिठाई, पेढे वाढले. विधान परिषद निवडणुकीनंतर जल्लोष करणारे कार्यकर्ते चिडीचूप झाले. अहो, आनंद झाला नाही का, नवे सरकार आल्याचा, असा प्रश्न विचारला आणि केंद्रीय मंत्रीही चपापले. म्हणाले, आम्ही मुंबईत जल्लोष केला; पण इथे काय झाले ते तपासतो. कोणी तरी म्हणाले, त्यांनी आनंद साजरा केला; पण मनातल्या मनात.

सोलापूरमध्ये धक्कातंत्राचा फटका कोणाला?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार बनविताना भाजपमध्ये धक्कातंत्राचे राजकारण झाले. एका दगडात अनेक पक्षी मारले गेले. सोलापूर जिल्ह्यातील भाजपवर्तुळात वादळ घोंघावत आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विजय देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोन (एकमेकांना न पाहणारे) चेहरे होते. आता संभाव्य मंत्रिमंडळात या दोन देशमुखांपैकी कोणत्या देशमुखाला घरी बसावे लागणार, याचे कुतूहल आहे. वीरशैव लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून विजय देशमुख यांना पुन्हा मंत्रिपद हमखास मिळणार असा त्यांच्या समर्थकांना विश्वास वाटत असतानाच ऐन वेळी दोन्ही देशमुखांचा पत्ता कापला जाऊन दुसऱ्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. नव्या मंत्रिमंडळासाठी अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचेही नाव पुढे येत असले तरीही त्यांच्याऐवजी माळशिरस राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या राम सातपुते यांना मंत्रिपद मिळाल्यास रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही धक्कातंत्राचा फटका बसू शकतो.

सावंतवाडीचे डबल इंजिन

केंद्र आणि राज्य, या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असेल तर या ‘डबल इंजिन’च्या माध्यमातून वेगाने विकास होऊ शकतो, असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी करत असतात. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दुहेरी इंजिन धावू लागेल, अशी चर्चा सुरू झाली.  आमदार दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जातो. विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेही या शहराशी जुने कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने या  वजनदार ‘डबल इंजिना’च्या माध्यमातून तालुक्याचा झपाटय़ाने विकास होईल, अशी आशा येथील नागरिकांना वाटायला लागली आहे.

(सहभाग : सुहास सरदेशमुख, एजाज हुसेन मुजावर, अभिमन्यू लोंढे)

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political crisis political drama in maharashtra zws
First published on: 05-07-2022 at 05:59 IST