मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने भाजपच्या गोटात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या तीन राज्यांच्या विजयाने लोकसभेची निवडणूक जिंकल्यातच जमा असल्याचा विश्वास भाजपच्या गोटात पसरला आहे. लोकसभा जिंकल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालही अनुकूल लागेल, अशी भाजप नेत्यांना अटकळ आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणे, शिवसेना व राष्ट्रवादीत फूट, आगामी निवडणुकीकरिता अनुकूल वातावरण हे सारखे मनासारखे होत असले तरी भाजपमधील अस्वस्थता वेगळीच आहे. राज्यात महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली तर मुख्यमंत्रीपद कोण ? या प्रश्न भेडसावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा जोडीचा विश्वास संपादन केला आहे. भाजप नेत्यांच्या इशाऱ्याबाहेर शिंदे नाहीत. यामुळेच शिंदे यांनाच कायम ठेवले जाणार नाही ना? अशी भाजप नेत्यांच्या मनात पूसटशी भीती आहे. अर्थात, सारे जर-तरवर अवलंबून असले तरी मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे सोपविल्यापासून भाजपच्या नेत्यांच्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषेत ‘मनावरील दगड’ अद्याप दूर झालेला नाही. कमळ असावे बरोबर मोदीजींचा फोटो असावा भाजपसाठी निवडणुका म्हणजे युद्धच. समोरच्या शत्रुवर तुटून पडायचे, याचे शिक्षण मिळते इथं. वॉरिअर, सुपर वॉरिअर अशी कार्यकर्त्यांची रचना करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आता राज्यभर फिरत आहे. पाच राज्यांचे निकाल येई पर्यंत सारे भाजपच्या प्रत्येकाच्या मनात धाकधूक सुरू होती. मराठवाडय़ात तर ‘कसं होईल , काय होईल’ हे वाक्य अगदी वऱ्हाडकार लक्ष्मणराव देशपांडेच्या यांच्या लयीत उच्चारावे एवढी धाकधूक . म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड अगदी घोडय़ावर बसलेले. मंत्री अतुल सावे हेही त्या शर्यतीत उतरलेले. आरक्षण आंदोलनामुळे चिंतेत असणारा कमळाचा कार्यकर्ता तीन राज्यातील विजयोत्सवानंतर सकाळी उत्साहात बाहेर पडला. मंत्र्याला फोन लावला आणि म्हणाला, ‘उभा राहावा साहेब, फार काही लागत नाही. कमळ असावे आणि मोदींचा फोटो असावा. मग बास ! हेही वाचा >>> चावडी : अहो, मीच उमेदवार आहे! लोणीकर को गुस्सा क्यों आता है? जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी परतूर किंवा मंठा तालुक्यातील संचालकाची निवड झाली नाही म्हणून आमदार बबनराव लोणीकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. परतूर तालुक्यातून संचालक म्हणून लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर निवडून आलेले आहेत. कदाचित त्यामुळे लोणीकर नाराज झाले असावेत. जिल्ह्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि या पक्षाच्या तीनपैकी दोन आमदारांचा स्वतंत्र गट असल्याचा अनुभव अनेकदा आलेला आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांचा जिल्हा भाजपमध्ये सवतासुभा आहे. बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे (शरद पवार) सतीश टोपे यांच्याकडे गेले आणि उपाध्यक्ष खासदार दानवे समर्थक असलेल्या भाजपच्या संचालकाकडे गेले. त्यामुळे लोणीकर संतप्त झाले आणि यामागे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार राजेश टोपे यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. या वादातून टोपेंच्या गाडीची तोडफोड झाली आणि त्यानंतर लोणीकरांच्या जालना येथील निवासस्थानावर दगडफेक झाली. भाजपच्या अंतर्गत वादातील या प्रकाराच्या रोषास मात्र टोपे बळी ठरले! बारामती आणि चंद्रकांतदादांची कसरत ! राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी भाजप आणि बारामतीकरांमध्ये सापमुंगुसाची लढाई सुरू असायची. अजित पवार यांच्यावर जलसंपदा विभागातील तब्बल ७० हजार कोटींच्या कथित घोटाळय़ाप्रकरणी तर अलिकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तोंडसुख घेतले होते. परंतु अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपचा तो पूर्वीचा आक्रमकपणा, त्या आरोपांच्या फैरी क्षणार्धात गळून पडल्या आहेत. आता तर भाजपची भाषाच बदलली आहे. त्याचे प्रत्यंतर सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातून अनुभवास आले. विषय होता सोलापूरला मंजूर झालेल्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्राशी संबंधित प्रशिक्षण केंद्र बारामतीला हलविणे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्याचे समर्थन करण्याची पाळी आली. उजनी धरणातील पाणी बारामतीला पळविणे असो वा अन्य कोणतीही गोष्ट बारामतीला नेण्यासाठी बारामतीकरांचा विशेष हातखंडा आहे. त्यावर चंद्रकांत पाटील सावधपणे भाष्य करीत होते. बारामतीचा विकास करण्याचे काम बारामतीकरांनी अनेक वर्षांपासून चालविले आहे. आपण पवार काका-पुतण्यांचे कौतुक करीत नाही आणि त्यांच्या भूतकाळाविषयीही बोलू शकत नाही, असे सांगताना चंद्रकांत पाटील यांना बरीच शाब्दिक कसरत करावी लागली. (संकलन : संतोष प्रधान, सुहास सरदेशमुख, लक्ष्मण राऊत, एजाज हुसेन मुजावर)