scorecardresearch

चावडी : गॅसबत्ती हवी की विकास ?

गॅसबत्ती हवी की गावचा विकास हवा असा रास्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

चावडी : गॅसबत्ती हवी की विकास ?
(संग्रहित छायाचित्र) photo source : डेस्क टीम

गावकारभारी निवडण्यासाठी निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू  झाली. निम्मा जिल्हा या टप्प्यातील निवडणुकीला सामोरा  जात असल्याने गावातील चावडीवर, पारकट्टय़ावर केवळ राजकीय चर्चेचे फड रंगू लागले आहेत. गावची इलेयशन त्यात  गावचा सरपंच थेट लोकनियुक्त असल्याने तर या निवडणुकीत गावात सत्ता कोणाची आणि कोण बाजी मारणार याचा फैसला १८ डिसेंबरच्या मतदानातून होईलच. निवडणूक होत  असलेल्या गावापैकी निम्म्या गावचा कारभार महिलांच्या हाती जाणार असल्याने गृहलक्ष्मीला मानाचे स्थान निदान खुर्चीसाठी तरी मिळणार आहेच. मात्र घरातील महिलेच्या नावाने कारभार करणाऱ्या  पडद्याआडच्या सूत्रधाराला आता मात्र लोकच गॅसबत्ती म्हणू लागले असून गॅसबत्ती हवी की गावचा विकास हवा असा रास्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पतितपावन मंदिर नक्की बांधले तरी कोणी ?

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ  यांनी गेल्या आठवडय़ात  रत्नागिरीतील पतितपावन मंदिराला भेट दिली. पण तेथील छायाचित्रं ट्विटरवर टाकताना त्यांनी ही वास्तू स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचं म्हटल्याचा आरोप काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करून त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे हिंदूस्थानातील पहिले मंदिर’, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले. त्यामुळे त्यांचा इतिहास कच्चा असल्याचे दिसून आले आहे, असा टोमणा या पदाधिकाऱ्यांनी मारला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, सावरकर यांच्या सांगण्यानुसार रत्नागिरीतील प्रसिद्ध दानशूर समाजसेवक कै. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी त्या काळात वीस गुंठे जागेवर दीड लाख रुपये खर्च करून पतितपावन मंदिर बांधले. या वास्तूच्या दारात एका फलकावरही ही माहिती दिलेली आहे.

ताकाचे गुणरत्नभांडे

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनात प्रकाशात आलेले अ‍ॅड. गुणरत्न  सदावर्ते हे आता राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रश्न विसरले आहेत असे वाटते. त्यापेक्षा आता स्वतंत्र मराठवाडा आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला त्यांचा प्राधान्यक्रम दिसतो. स्वतंत्र विदर्भाची भाजपची तशी जुनी मागणी आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचा विचार करता अ‍ॅड. सदावर्ते यांनी स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा निर्मितीसाठी सत्ताधारी भाजपला जाब विचारणे अपेक्षित होते. परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. सोलापुरात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याची प्रचीती आली. अ‍ॅड. सदावर्ते यांची विधाने विचारात घेतली तर ते जणू भाजपचीच भाषा बोलत असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते. आपण कोणाचे वैचारिक वारसदार आहोत, हे सांगताना त्यांच्या मुखातून प्रथम नाव येते ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल बोलण्याचे का बरे टाळतात, यातूनच त्यांचा ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा खेळ समोर येतो. ताकाचे हे ‘गुणरत्न’ भांडे लपविण्याचा प्रयत्न होत असला, तरी आखीर यह पब्लिक सब जानती है.!

(सहभाग : सतीश कामत, एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे)

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 01:17 IST

संबंधित बातम्या