scorecardresearch

चावडी : मंत्री आणि अंडाकरी..!

रात्री उशीर झालेला असला तरी साहेबांनी हा फोन उचलला. तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, साहेब आम्ही एकच अंडाकरी घेतली होती. पण

चावडी : मंत्री आणि अंडाकरी..!
(संग्रहित छायाचित्र)

एखादा आमदार किंवा मंत्री मतदारांच्या मनात आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? औरंगाबाद जिल्ह्यात आता त्याला नवे उत्तर आहे आणि ते म्हणजे अंडाकरी. झाले असे, की पालकमंत्री झाले म्हणून हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात मंत्री संदीपान भुमरे यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा मंत्रिमहोदय कसे कार्यकर्त्यांना जपतात हे सांगण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले, ‘‘एकदा रात्री साहेबांना कार्यकर्त्यांचा फोन आला. रात्री उशीर झालेला असला तरी साहेबांनी हा फोन उचलला. तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, साहेब आम्ही एकच अंडाकरी घेतली होती. पण ह्यो (बारमालक) दोनचे पैसे घ्यायला आहे. तेव्हा तुम्हीच सांगा. त्यावर भुमरेसाहेब म्हणाले, ‘दी त्याच्याकडं फोन. एका अंडाकरीचे पैसे त्याच्याकडून घे अन् दुसरीचे पैसे मी देतो तुला. पण त्याला दुसरी अंडाकरी दे.’ तर असा कार्यकर्ते जपणारा आहे आपला नेता.’’ आता हा किस्सा राजकीय पटलावर चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर पैठणच्या धरणामुळे मासे खाणारी मंडळी आवर्जून जातात, पण आता कोणी पैठणला निघाला की विचारतात, ‘काय निघाला का अंडाकरी खायला?’

वाघ दोन पाऊल मागे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मागील आठवडय़ात नाशिक दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनी महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार आणि गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार अशी वदंता असल्याबद्दल विचारण्यात आले असता गोऱ्हे यांनी हे तर चांगलंच आहे, असे मत व्यक्त केले. गुजरातचा सिंह येऊ द्या, महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाऊ द्या. वाघ कधी भीत नसतो. मोठी झेप घेण्यासाठी वाघ दोन पाऊल मागे सरकला असून तो कधी झेप घेईल हे तुम्हाला कळणारही नाही. ती झेप तुम्ही बघालच, असे नमूद केले. अर्थात त्यांचा रोख शिंदे गटाकडे होता, हे वेगळे सांगायला नको.

पालकमंत्र्याचे सत्कार तरी किती?

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा गेल्या आठवडय़ात करण्यात आली. याच दिवशी रात्री मंत्री दीपक केसरकर कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत होते. पत्रकारांनी त्यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी निवडीची घोषणा केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी शाहूंच्या भूमीत पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लगेचच केसरकर यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन नवरात्र उत्सवाचा आढावा घेऊन काही सूचना केल्या. खासदार धनंजय महाडिक यांनी तसेच इचलकरंजी येथे शिंदे गटाच्या मेळाव्यात पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. पालकमंत्री निवड, सत्कार, आढावा बैठका असे सारे काही सोपस्कार पार पडले होते. त्यामुळे पुन्हा स्वागत, सत्कार याला तसा फारसा काही अर्थ उरला नव्हता.

टेंभूच्या पाण्यात वाहून गेले..

राजकीय जीवनात गटबाजी, पक्षभेद असतातच, किंबहुना या गटबाजीला खतपाणी नेतेमंडळींकडून वेळोवेळी घातले जाते. याविना नेत्यांचे महत्त्व अबाधित राहात नाही. गटबाजी हे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण म्हटले जाते. मात्र, कधी कधी ही गटबाजी मूळ पक्ष नावाच्या झाडावर घाव घालण्यास प्रवृत्त होते. मात्र, ज्या वेळी निवडणुकीचा हंगाम यायची वेळ येते त्या वेळी या गटबाजीला आवरही वरिष्ठ नेत्यांकडून घातला जातो. असाच प्रकार खासदार संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील गटबाजीबाबत घडला. दोघेही एकमेकाविरुद्ध लोकसभेच्या मैदानात उतरले होते. निवडणुकीच्या रणांगणावर जागा खरेदीपासून ते नागजच्या फाटय़ावर गावठी कोण विकत होते इथपर्यंत  एकमेकांची उणीदुणी काढली गेली. शाळकरी मुलाप्रमाणे आमच्या घरावरन जा तुला दाखवतो, असे म्हणण्यापर्यंत मजल पोहोचली. हट्टाने तासगावच्या गाडय़ावर चहा पिऊन त्याची बातमी माध्यमापर्यंत पोहोचवून ??मुययापुढे ?? नाक खांजळण्याचा प्रकारही घडला. कार्यकर्ते नेत्यांसाठी हमरीतुमरीवरही आले होते. आता मात्र, खासदार, आमदार यांनी टेंभूच्या पाण्यात वाहून गेलं, असे म्हणत गळय़ात गळे घातले. आता हा याराना वरिष्ठांच्या इशाऱ्याने की वैयक्तिक गरजेपेक्षा पक्षाची गरज म्हणून, असा सवाल सामान्यांना पडला आहे.

तीअसेल तरच..

लम्पी चर्मरोगाचा संसर्ग राज्यभर पसरला असल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासन यंत्रणा, मंत्री, लोकप्रतिनिधी, पशुसंवर्धन विभाग, स्वयंसेवी संस्था अशा सर्वाकडून लम्पी रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवरात्री उत्सवाचे निमित्त एका सेवाभावी संस्थेने यासाठी जागरण, दिव्य ज्योत वगैरे उपक्रमाचे आयोजन केले होते. केवळ गाईसाठी हा उपक्रम राबवला होता. लम्पी त्वचारोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होत असल्याने बैल, महिष जनावरांचा या उपक्रमात समावेश करावा, अशी विनंती पशुपालकांनी केली. त्यास नकार मिळाल्याने पशूंबाबतही भेदभाव होत असल्याने पशुपालकांना डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. असाच आणखी एक मासलेवाईक किस्सा. गोकुळ दूध संघ दूध फरकापोटी १०२ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा अध्यक्ष विश्वास पाटील यांनी  केली. तेव्हा साहजिकच विषय पशुपालनाचा निघाला. प्रजनन दरात कोल्हापूर मुलींच्या बाबतीत तसा काहीसा मागेच. लोकांना मुलगा हवा तर पशुपालनात मादी. गाभण गाई-म्हैस यांनी मादीच अधिक प्रमाणात जन्माला घालणारे आयव्हीएफ हे नवे तंत्रज्ञान गोकुळने आणले आहे, असा उल्लेख मुश्रीफ यांनी केला. त्यासरशी मानवजाती आणि पशुपालन याबाबत भिन्न मागणीचा आग्रह पाहून हशा पसरला. पशुपालनातील ‘ती’चे महत्त्व अधोरेखित करणारे हे दोन नमुनेदार प्रसंग.

(सहभाग : चारुशीला कुलकर्णी, सुहास सरदेशमुख, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या