सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लांबलेल्या नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अद्याप या निवडणुकीचा मुहुर्त ठरला नसला तरी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणामुळे नव्याने आरक्षण निश्चिती  होणार असल्याने अनेकांचे डोळे  प्रभाग कसा मिळतो याकडे लागले आहेत. जर संधी मिळाली तर यंदाच्या निवडणुकीत राजकीय जुगार खेळायचाच यासाठी वावराला गिऱ्हाईक लागते का याची चाचपणीही काहींनी सुरू केली आहे. इस्लामपुरात बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे  यावेळची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित दिसत आहे. याच विरोधकांची एकी होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बालेकिल्ला हातात राखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. अजून बाजारात तुरी.. पण, सत्ता लई भारी. अशीच राष्ट्रवादीची अवस्था.

ईडीची लीला अगाध न्यारी!

दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्यात अर्जून खोतकर तसे भाषण करायला उत्सुक नव्हते. पण शिवसेना उपनेते म्हणून त्यांनी ते करावे असा आग्रह केला गेला. खोतकर भाषणाला उभे राहिले आणि ते म्हणाले, ‘आदित्य साहेब घरात जशी माणसं राहतात तशी उंदरंही राहतात.’ तोपर्यंत खालून शिवसैनिक म्हणाले, ‘अहो आता मांजर पाळवं लागेल.’ उंदरं जरा जास्तच झाले आहेत. त्यावर खोतकर म्हणाले, मी बोलू का ?’  बंडखोरांना उंदीर असे संबोधून खोतकर यांनी शिंदे गटात सहभागी होणार नाही असे संकेत दिले आणि आज ते दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत छायाचित्रात दिसले. आता सेनेची मांजर हरवली आहे काय, असेही विचारले जात आहे. याच मेळाव्यात खोतकरांवर खूप दबाव होता तरीही ते आपल्यात आहेत असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनीही केला होता. अर्जुन सहकारी साखर कारखान्यातील व्यवहारामुळे अडचणीत सापडलेल्या अर्जुन खोतकर यांच्या कृतीकडे पाहत जालन्यात नवे घोषवाक्य तयार होत आहे ‘ ईडी’ची लीला अगाध  न्यारी’!

बक्षीस काय मिळणार ?  

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवले. उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. हनुमान चालिसा प्रकरणानंतर त्या अधिकच चर्चेत आल्या. राज्यातही सत्तांतर झाले. त्याचे फळ नवनीत राणांना मिळणार का, हा प्रश्न जिल्ह्यात चर्चेला आला. त्यातच, खुद्द आमदार रवी राणा यांनी केंद्रात नवनीत राणांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा दावा केला आहे. आता ही जबाबदारी कोणती यावर कुणीही अजूनपर्यंत भाष्य केलेले नाही. पण, केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचे वजन वाढल्याचा दावा राणा समर्थक करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या राणा दाम्पत्याने सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांना त्यांनी विशेषत्वाने लक्ष्य केले होते. आता त्याचे बक्षीस काय मिळणार, याची उत्सुकता राणा समर्थकांना आहे.

संशयकल्लोळ

शिवसेनेत २० जूनपर्यंत सारे काही आलबेल होते. मुख्यमंत्रीपद पक्षाकडे होते. पण महिनाभरातच असे काही चित्र बदलले की शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. आतातर धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचे नेतृत्व कायम राहावे म्हणून शिवसेना नेत्यांना धावाधाव करावी लागत आहे. कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण कधी शिंदे गटात जाईल याची खात्री देता येत नाही. सारेच अस्थिर आणि परस्परांविषयी संशयाची भावना.  खासदार, आमदार फुटले. ठाणे जिल्ह्यातील माजी नगरसेवक शिंदे गटात गेले. आता सारे लक्ष हे मुंबईतील माजी नगरसवेक आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे लागलेले. यातूनच मुंबईतील माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढलेली. काही जणांना दोन्ही बाजूने दूरध्वनी येत आहेत. शिंदे गटाबरोबर गेल्यास फायदा की आगीतून फुफाटय़ात असा प्रश्न भेडसावतोय. सारेच अस्थिर आणि संशय निर्माण करणारे अशी शिवसेनेची सध्याची परिस्थिती आहे.

(सहभाग : सुहास सरदेशमुख, दिगंबर शिंदे, मोहन अटाळकर )