scorecardresearch

चावडी : अजितदादांचा ‘अंदाज’

हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

हवामान विभागाच्या अंदाजावर लवकर कुणी विश्वास ठेवत नाही. कारण, आजवरचा अनुभव. राजकीय अंदाजाचे काहीसे तसेच असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत तो निकष बराचसा लागू पडतो. पण, दादांचे अंदाज बांधण्याचे हवामान विभागासारखेच तंत्र आहे. गर्दीत ते प्रत्येकाला जोखत असतात. अगदी कुणी हस्तांदोलन केले तरी तो प्रत्यक्ष शेतात काबाटकष्ट करणारा शेतकरी आहे की, मजुरांकडून काम करवून घेणारा शेतकरी याचा ते अचूक अंदाज बांधतात. वैद्य नाडी परीक्षण करतात. ज्योतिषी हस्तरेषांवरून भविष्य कथन करतात हे आपणास माहिती असते. पण, दादांचा कारभारच वेगळा. त्यांच्या अंदाज बांधणीचे रहस्य खुद्द त्यांनी नाशिकमध्ये कृषी विभागातर्फे आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळय़ात उलगडले. पुरस्कार स्वीकारण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांशी हस्तांदोलन करताना शेतात राबणारे हात आणि मजुरांच्या भरोशावर शेती करणारे हात लक्षात आल्याचे अजितदादांनी भाषणात सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुखांची अशी ही अवस्था 

गोकुळ दूध संघाच्या राजकारणाने कोल्हापूर जिल्ह्यात कोण राजकीय उलथापालथी घडल्या. सत्तांतर झाल्यावर तरी सत्ताधाऱ्यांमध्ये एकजिनसीपणा येईल अशी अपेक्षा होती. मात्र दिसते ते भलतेच. शासन नियुक्त आणि दोन स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया ही नव्या सत्ताधीशांच्या राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती. जुलै महिन्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शासन नियुक्त सदस्य निवडीचे पत्र मिळवले. संचालक पदाची हंडी फोडायला मिळणार याचा आनंद जाधवांना  झाला. पण हाय रे दुर्दैव! त्यांना गोकुळमधून बोलावणेच आले नाही.  संतप्त जाधव यांनी शिवसैनिकांची कुमक घेऊन गोकुळवर मोर्चा काढला तरी  कसलाच प्रतिसाद नाही. आता दोन मंत्र्यांच्या दोघां समर्थकांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. याचा अर्थ तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचे नवनीत मिळणार आहे. पण जाधवांची प्रतीक्षा काही संपलेली नाही. इथून पुढे तरी त्यांची सत्तेची भागीदारी लाभह्णदायक ठरणार का याचीही चर्चा आहे.

मंत्री, लोकप्रतिनिधींचे अज्ञान

कार्यक्रमाचे स्वरूप पाहून शब्दांचा समर्पक वापर करणे अपेक्षित असते. याचा अनेकदा जबाबदार लोकांनाही विसर पडतो. आणि मग जाणत्या नेतृत्वाकडून त्यावर जाहीरपणे कोरडे ओढले जातात. अशाच एका परखडपणाचा अनुभव राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कृतज्ञता पर्व कार्यक्रमात आला. खरे तर हे स्मृती वर्षे पण काही मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आपल्या भाषणात ‘स्मृतिदिन साजरा’ केला जात आहे, अशा विधानांची पुन:पुन्हा पेरणी केली. त्यात कोणालाच काही वावगे वाटले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही बाब खटकली. ‘जयंती साजरी केली जात’ आणि ‘स्मृतिदिनानिमित्त अभिवादन’ करायचे असते याचे तरी भान किमान मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांनी ठेवले पाहिजे, असे म्हणत त्यांनी भर सभेतच या सर्वाची शिकवणी घेतली.

शिक्षणाधिकारी की वसुली अधिकारी?

सांगली  जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले विष्णु कांबळे यांना अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांच्यासह १ लाख ७० हजारांची लाच घेत असताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. या महाशयांच्या घराची झडती घेतली असता १३ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड  सापडली. कांबळे यांच्या जबाबानुसार, मंत्र्याचे खासगी सचिव जर जिल्ह्यात आले तर त्यांची ऊठबस करण्यासाठी लागणारा पैका याच मार्गाने जमावावा लागतो. त्यांच्या वाहनाच्या इंधनाची तर सोय करायचीच वर निरोप देत असताना जड पाकीट द्यावे लागते. असा खुलासा या महाशयांनी केला आहे. असे जर असेल तर ते सचिव कोण, कशासाठी पाकिटे दिली जातात, याची चौकशी लाचलुचपत विभाग करणार का? हा खरा सवाल आहे. कांबळे हे शिक्षणाधिकारी होते की वसुली अधिकारी हा प्रश्न त्यातून उपस्थित होतो.

अशोकरावांचे दिल्लीत वजन वाढले

पक्षाने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. तरुण वय असल्याने महाराष्ट्राचे भावी नेतृत्व म्हणून दिल्लीचे केंद्रीय नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडे बघत होते. पण ‘आदर्श’ घोटाळय़ात घात झाला. तत्कालीन संरक्षणमंत्री ए, के. अ‍ॅन्टोनी यांनी १०, जनपथचे कान भरले आणि अशोकरावांना खुर्ची सोडावी लागली. स्वपक्षाचे केंद्रात सरकार असताना सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागला. सारेच उलटेपालटे झाले. राज्यात शिवसेनेबरोबर हातमिळवणी करावी म्हणून दिल्लीत आग्रह धरणाऱ्यांमध्ये अशोकराव होते. महाविकास आघाड़ी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळाली. काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांची जागा वेणुगोपाळ यांनी घेतली. अशोकरावांनी मग वेणुगोपाळांशी ‘जमवून’ घेतले. . आसाम व केरळमधील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद अशोकरावांकडे होते. पक्षाच्या या आठवडय़ात होणाऱ्या शिबिरात राजकीय विषयावरील नेतेमंडळींच्या यादीत अशोकरावांचा समावेश झाला. अशोकरावांचे उजवे हात मानले जाणारे अमर राजूरकर यांची विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून निवड झाली. एकूणच अशोकरावांचे दिल्लीतील वजन वाढले आहे. 

(सहभाग : अनिकेत साठे, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे )

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chavadi maharashtra politics maharashtra political crisis zws

ताज्या बातम्या