राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला असतानाच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी गोंदियात एकत्र ‘हितगुज’ केले.  निमित्त होते भूमिपूजन कार्यक्रमाचे.  याप्रसंगी . पटेलांनी गडकरींसोबतची मैत्री तीन दशके जुनी असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाषणांचा सूर ‘अलवार’ होतोय हे बघून गडकरींनी पटेलांसमोरच माजी आमदार राजेंद्र जैन यांची  फिरकी घेतली. काहींनी तर चक्क पुढची  लोकसभा भाईजी म्हणजे पटेल हे भाजपकडून तर लढतील अशा वावडय़ाही उठवायला सुरवात केली.  तसेही या भूमिपूजन कार्यक्रमात प्रफु्ल्ल पटेलांच्या उपस्थितीने सर्वाच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसची युती  आहेच .

शिवसेना बदलली..

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने दोन उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्यावर दुसरा उमेदवार कोण असेल, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कोणतरी बडा किंवा आर्थिकदृष्टय़ा तगडा उमेदवार रिंगणात असेल, अशी अटकळ बांधली जाऊ लागली. कारणही तसेच होते. चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, प्रीतिश नंदी, राजकुमार धूत, संजय निरुपम, भारतकुमार राऊत या शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्यांना शिवसेनेने राज्यसभेवर संधी दिली होती. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या मुदतीत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्यास नकार देताच शिवसेनेच्या दृष्टीने त्यांच्या उमेदवारीचा विषय संपला होता. शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काँग्रेसच्या एका मंत्र्याने तर शिवसेनेने ‘लिक’ केलेले नाव आहे. उमेदवार भलताच असेल असे भाकीत व्यक्त केले. संजय राऊत व संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तेव्हा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेने राज्यसभेवर जुन्याजाणत्या व निष्ठावान अशा दोन्ही नेत्यांना राज्यसभेवर संधी दिली. खरेच शिवसेना आता बदलली आहे.

खैरेंसाठी दिल्ली अजूनही दूरच..

‘कोणी अंगावर आले तर शिंगावर घेणार’  हे  औरंगाबादमध्ये शिवसेना माजी  खासदार चंद्रकांत खैरे यांचे लोकप्रिय वाक्य  व त्याचा ते कुठेही वापर करतात. यावरूनच भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी खैरे यांची खिल्ली उडविली. ‘ अहो, खैरे आता तुम्हाला शिंगे राहिली कुठे आहेत. एक शिंग राष्ट्रवादीने नेले तर दुसरे कॉग्रेसने. त्यामुळे आता दोन्ही शिंगे मोडलेल्या अवस्थेत कसे शिंगावर घेणार’. राज्यसभा निवडणूक जवळ आल्यावर खैरे यांची आक्रमकता वाढली होती. काँग्रेसमधून आलेल्या  प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली पण आपला विचार झाला नाही म्हणून दोन वर्षांपूर्वी खैरे यांनी संताप व्यक्त केला होता. तेव्हापासून म्हणे ‘मातोश्री’ने त्यांच्यावर फुल्ली मारल्याची चर्चा ऐकू येते. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेने दुसराच उमेदवार निवडल्याने खैरे यांना दिल्लीत जाण्याकरिता अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.   

राणांचा उतावीळपणा

शिवसेना सरकारने अटक केल्यामुळे दिल्लीतील भाजप नेते आपले कौतुक करतील व ताकद देतील या आशेवर राणा दाम्पत्याने तुरुंगातून सुटल्यावर दिल्ली गाठली. राज्य सरकारकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल दिल्लीत तक्रार करणार,असे जाहीर केले होते. दिल्लीत गेल्यावर राणा दाम्पत्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट मिळाली. नंतर नेत्यांच्या भेटीसाठी राणा दाम्पत्य दिल्लीत ठाण मांडून बसले, पण रामदास आठवले वगळता कोणा मंत्र्यांची भेट मिळाली नाही. अमरावतीला परतल्यावर जंगी शक्तिप्रदर्शनाची तयारी झाली. पण त्यांनी केलेला उतावीळपणा त्यांच्या अंगलट आला. नियम मोडून केलेल्या शक्तिप्रदर्शनाबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणा दाम्पत्य आता काय काय उद्योग करतात याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे. 

संजय राऊतांचा गृहपाठ कच्चा?

राजकीय सभेचा फड जिंकायचा म्हटला की आवेशपूर्ण विधाने करावी लागतात. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात हेच केले. पण तसे करताना त्यांच्याच अंगलट आले. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याच वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आमचं ठरलंयह्ण या विधानाचा संदर्भ घेऊन शिवसेनेला गृहीत धरल्याशिवाय कोल्हापूरचा महापौर होऊ देणार नाही, असा इशाराही दिला. खरे तर गेली दशकभराहून अधिक काळ कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीचा महापौर होत असून त्याला शिवसेनेची साथ मिळाली आहे. तीही मातोश्रीच्या आशीर्वादाने! याचा राऊत यांना विसर पडला असावा. राऊतांचा गृहपाठ कच्चा असल्याचे दिसून आले. खेरीज ‘आमचं ठरलयं’ या विधानाचा समाचार घेताना त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष्य केले. पण याच काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलयं’ या घोषवाक्या मुळे शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा बाण विजयी लक्ष्यावर लागला होता. याचेही राऊत यांना विस्मरण झाले. 

(सहभाग : दयानंद लिपारे, संजय राऊत, सुहास सरदेशमुख, मोहन अटाळकर )