scorecardresearch

चावडी : राज्यपालांचे ‘सबका साथ’

राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्यापुढे कोणाला जाऊ देत नाही. दुसरे सोबत असणाऱ्याला दोन पावले पुढे नेतात.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध सर्वश्रृत आहेत. संधी मिळेल, तेव्हा उभयतांकडून परस्परांना शह-काटशह दिला जातो. कोश्यारी यांच्या नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यात पुन्हा एकदा त्याचे प्रत्यंतर आले. अर्थात, यावेळी सामना पालकमंत्री छगन भुजबळांशी असल्याने राज्यपालही तयारीने आले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक शाखेच्या कार्यक्रमात राज्यपाल-भुजबळ यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याने उद्योजक, व्यावसायिकांची करमणूक झाली. आजवर राज्यपाल अनेकदा नाशिकला आले आहेत. हा धागा पकडून त्यांचे नाशिकसह आपल्यावर प्रेम आहे. आमंत्रण दिले की, ते लगेच येतात. परंतु राजकारणातलं काही सांगितलं तर ते ऐकत नाहीत, असा टोला भुजबळांनी लगावला. राज्यपालांनी भुजबळांचे संदर्भ घेऊन टोलेबाजी केली. सर्व काही आपल्याच भागात हवे, असा हट्ट धरणाऱ्या लोकप्रतिनिधीची कथा कथन करीत भुजबळांचे तसे असल्याचे नमूद केले. राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्यापुढे कोणाला जाऊ देत नाही. दुसरे सोबत असणाऱ्याला दोन पावले पुढे नेतात. उद्योजकांनी दुसऱ्या लोकांप्रमाणे आपल्यासोबत इतरांना देखील पुढे घेऊन जाण्याचा विचार करावा. तेव्हाच ‘सबका साथ, सबका विकास ’ दृष्टीपथास येईल,  हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

चांगभलं कोणाचे ?

सांगलीच्या उशाला संथ वाहती कृष्णामाई असतानाही पर्यटक फारसे सांगलीला येत नाहीत. सांगली शहरात पाहण्यासारखे फारसे  काही नाही हे मुख्य कारण असले तरी जे आहे ते प्रदर्शनीय करण्याची मानसिकता धोरणकर्त्यांना असू नये याचे आश्चर्य वाटते. सांगलीला लाभलेला  संथ वाहत्या कृष्णामाईचा परिसर, गणेश मंदिर, गणेश दुर्ग या असतानाही यावर धोरणकर्ते फारसे समाधानी नाहीत. तरीही सांगलीकरांना विरंगुळय़ाचे आश्वासक ठिकाण म्हणून ऐतिहासिक आयर्विन पुलाला प्रदर्शनीय करण्याचे प्रयत्न पाच-सात वर्षांपूर्वी झाले. यासाठी महापालिकेने लेसर शोचा प्रयोग केला. शतकाची पंरपरा सांगणारा आयर्विन पूल आजही दिमाखात सेवा देत असताना पाच-सात वर्षांत लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला लेसर शो गेला कुठे याचा शोध घेण्यासाठी जर समिती नियुक्त केली गेली तर या समितीचा शोध घेण्यासाठी पुन्हा दुसरी एखादी त्रयस्थ समिती नियुक्ती करण्याची वेळ येईल. असे असताना सांगलीकरांना आपलेसे वाटावे असे ठिकाण करण्याचा चंग काळी खण विकसित करण्यासाठी आता बांधला आहे. काळय़ा खणीचा विकास करण्यासाठी राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने आठ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला असून यापैकी चार कोटी महापालिकेकडे वर्गही  करण्यात आले आहे. यातून काळी खण परिसरात खाऊ गल्ली, नौका विहार रंगबिरंगी विद्युत रोषणाई उभारण्यात येणार आहे. हे काम काही दिवसांत सुरू होईलच, मात्र, आज नेत्रदीपक काही तरी उभे राहात असले तरी शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत, धड रस्ते नाहीत, मग काळय़ा खणीचे सुशोभीकरण करून आरोग्य सुधारणा होणार असेल तर चांगभलं, सांगलीकरांचे आणि धोरणकर्त्यांचेही.

पवारांचे गुणगान आणि खुलासा

आधीच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा आणि त्यातच थेट शरद पवार यांच्या समक्ष महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार जर मुख्यमंत्री असते तर, महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते, असे वक्तव्य केल्याने चर्चा तर होणारच.  लहान तोंडी मोठा घासह्ण असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले असले, तरी त्यातून त्यांना काय संकेत द्यायचे होते, यावर आता काथ्याकूट केला जातोय. शरद पवार आपल्यासोबत आहेत, कोणी कितीही तीर मारले, तरी महाराष्ट्र हा स्थिर राहणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबतच्या त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या खऱ्या. पूर्वी काँग्रेस मंत्र्याने शरद पवार यांचे नुसते  गुणगान गायले तरी दिल्लीची खप्पामर्जी व्हायची.  आता दिवस बदलले असले तरी यशोमतीताईंना लगेचच दुसऱ्या दिवशी खुलासा करावा लागला आणि पवारांच्या मार्गदर्शनाची राज्याला आवश्यकता असल्याचे स्पष्टीकरण केले. 

महाराष्ट्र केसरी की राजकीय मल्लांची कुस्ती ?

साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरली होती. अंतिम लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा. सारे प्रेक्षकगृह भरले होते आणि आता प्रतीक्षा अंतिम लढतीची असताना राजकीय मल्लांचे आगमन होऊ लागले. मूळ सातारकर पण ठाण्याचे राजकारण करणारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे स्थानपन्न झाले. मग श्रीनिवास पाटील,  पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, महेश शिंदे ,राजघराण्याचे सदस्य आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आगमन झाले. लगोलग काही वेळात खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाल्याची घोषणा होताच एकच जल्लोष झाला. उदयनराजे आणि शिवेंद्रनराजे यांच्यात जणू काही दररोजची नुराकुस्ती ठरलेली. हाच धागा पकडत या आखाडय़ात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यात कुस्ती लावायची का, असा सवाल निवेदनकाने ध्वनिक्षेपकावरून करताच पुन्हा जल्लोष.  हसत-हसत उदयनराजेही उठले काहीतरी हातवारे केले तर शिवेंद्रसिंहराजेंनी  त्याकडे दुर्लक्ष केले. (सहभाग : अनिकेत साठे, दिगंबर शिंदे, मोहन अटाळकर, विश्वास पवार)

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chavadi political developments in maharashtra political drama in maharashtra zws

ताज्या बातम्या