भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असली (तसे त्यांनी स्वत:च जाहीर केले होते) तरी या पक्षात त्यांची सुरू असलेली तगमग अजूनही संपायला तयार नाही. त्याचे प्रत्यंतर अलीकडेच नीरा नरसिंहपूर आणि जवळच्या टेंभुर्णीत अनुभवास आले. भाजपचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या जागर शेतकऱ्यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा समारोप करण्यासाठी टेंभुर्णीत आले होते. तत्पूर्वी, आपले कुलदैवत नीरा नरसिंहपूरच्या लक्ष्मी नरसिंह मंदिरात दर्शनासाठी फडणवीस आले असता हर्षवर्धन पाटील यांनी त्याचे औचित्य साधून मोठे शक्तिप्रदर्शन घडवून जंगी सभेचे आयोजन केले होते. परंतु फडणवीस यांनी आपण टेंभुर्णीतच सविस्तर बोलणार असल्याचे सांगत अवघ्या पाच मिनिटांतच पाटलांची बोळवण केली. नंतर फडणवीस टेंभुर्णीत आले आणि हर्षवर्धन पाटलांची अडचण आणखी वाढली. कारण उजनी धरणाचे पाणी इंदापूर व बारामतीला पळवून नेण्याच्या मुद्यावर फडणवीस यांनी बारामतीकरांवर टीकेची तोफ डागली होती. इथे इंदापूरमध्ये पाटील यांची फडणवीस यांच्या भूमिकेमुळे कोंडी झाली. पाणी देण्यास भाजपच विरोध करीत असल्याचा राष्ट्रवादीचा प्रचार पाटलांकरिता इंदापूरमध्ये आणखीनच अडचणीचा ठरणारा.

व्हीव्हीआयपी’  श्वानांची बडदास्त

‘मिनी महाबळेश्वर’असे वर्णन केले जाणाऱ्या दापोली शहरात अनेक उच्चपदस्थ वेळोवेळी भेटीला येत असतात. असेच एक अधिकारी आपल्या कुटुंबासह आले  आणि विश्रामगृहाच्या  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षात आपले बस्तान मांडले. दापोली तहसीलदारांच्या नावाने नोंदणी झाली असल्याने या दाम्पत्याची ‘तुम्ही कोण, कुठले’ हे तेथील कर्मचाऱ्यांनी काही चौकशी केली नाही.  हे दाम्पत्य सकाळी उठून  फिरायला जायचे, पण कुत्र्यांना मात्र पंखे, एसी चालू ठेवून कक्षातच बंद करून ठेवायचे. कुत्रे दिवसभर भुंकत राहायचे. या  कुत्र्यांच्या गळय़ात पट्टा कोणी बांधायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. याची ओरड सुरू होताच चौकशी सुरू झाली तेव्हा दुसऱ्या दिवशी हे व्हीव्हीआयपी दाम्पत्य लाडक्या कुत्र्यांसह गायब झाले. हा कक्ष बुक करणारे ते अधिकारी कोण होते, याची चौकशी अजून चालूच आहे.

किती हे पुतळे, अजितदादांना पडलेला प्रश्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला. जळगाव जामोद येथील पक्षाच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी ते जिल्ह्यात दाखल झाले होते. त्याच दौऱ्यात त्यांनी सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासह विकास कामांचा आढावा घेतला. राजवाडय़ाच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने अजित पवार यांना पुतळय़ाला हारार्पण करण्याची विनंती केली. त्यावरून अजित पवार चांगलेच संतापले. ‘किती हे पुतळे? झालं नं आता. आत हार घातला, तिथे तीन पुतळय़ांना हार घातला’, असे म्हणत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्याला फटकारले. 

पुन्हा नामांतर

सध्या औरंगाबादची  काळजी राज्याला लागली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर संभाजीनगर अशा नामांतराची साद थेट पंतप्रधानांपर्यंत घातली गेली. आठ दिवसाला पाणी येणाऱ्या शहराचे नाव बदलण्याचा भोंगा आता दिल्लीपर्यंत वाजत जात असल्याने औरंगाबादकरांच्या घशाची कोरड मात्र वाढली आहे. आता नामांतराचा चेंडू  मनसेने केंद्राच्या कोर्टात ढकलला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा मुद्दा असाच वर्षांनुवर्षे गाजला. आता पुन्हा शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे.  

शहर की स्वविकास ?

जिल्ह्यातील नगरपालिकेवर सध्या प्रशासक राज सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर निवडणूक लांबणीवर पडल्याने या नगरपालिकेचा कारभार त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या हाती सत्ता येताच राजकीय विरोधात सत्ता असलेल्या नगरपालिकेची सूत्रे सोयीच्या, आज्ञाधारक अधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्याची जणू पध्दत असावी, त्याप्रमाणे जिल्ह्यातील एका नगरपालिकेवर विरोधकांची कोंडी करण्यात आली. मात्र  हेच  सत्तेवर असलेल्या पक्षाला कुऱ्हाडीचा दांडा  ठरू लागला आहे.  ‘साहेबांना सांगितले तर,घ्या थोडे दिवस सांभाळून’ असा सबुरीचा सल्ला  दिला जातो. या महाशयांनीसुध्दा मिळाल्या संधीचा उपयोग शहर विकासाऐवजी  ‘स्वविकासा’साठी सुरू केला आहे. 

समर्थक प्रतीक्षेत.

हनुमान चालिसा प्रकरणात तुरुंगवारी घडल्यानंतरही राणा दाम्पत्याने आक्रमकपणे शिवसेनेवर शरसंधान सुरू ठेवले आहे. या निमित्ताने त्यांनी देशभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले खरे, पण अमरावतीत त्यांचे समर्थक मात्र चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांना प्रतीक्षा आहे, राणा दाम्पत्याच्या परतण्याची. तब्बल एक महिन्यापासून राणा दाम्पत्य अमरावतीत नाही. त्यांची मुंबई, दिल्ली, लद्दाख वारी घडलीय. त्यांच्या अनुपस्थितीमुळे दररोज भरणारा कार्यकर्त्यांचा दरबार नाही. राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर जल्लोषात युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात धुडगूस घातला होता, त्यांनाही गजाआड व्हावे लागले. राणा दाम्पत्याची छबी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर भलेही झळकत असली तरी शहरात ते परतणार कधी याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

(सहभाग : सतीश कामत, मोहन अटाळकर, सुहास सरदेशमुख, एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे, प्रबोध देशपांडे. )