‘कोल्हापुरात आमदारांनी राजीनामा द्यावा. तेथे निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन’ हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भलतेच गाजले. या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्यापासून साऱ्यांनीच त्यांना त्यांच्या विधानाची आठवण करून देत हिमालयात जाण्याविषयी चिमटे काढण्यास सुरुवात केली. त्यावर चंद्रकांतदादांनी ‘मी हरलो तर हिमालयात जाईन’ असे म्हणत सारवासारव केली. चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनाही हिमालयाचे अतिप्रेम. कोणीही कार्यकर्ता, ग्रामस्थ, संस्था यांना मदत करण्याबाबत मुश्रीफ तसे तत्पर असतात. मदतीचा शब्द देताना अमुक-तमुक यांच्या ‘पाठीशी हिमालयाप्रमाणे राहीन’ असे वक्तव्य केल्याशिवाय त्यांचे भाषण काही पूर्ण होत नाही. हे पाहता सह्याद्रीच्या कुशीतील कोल्हापुरात राहणारे चंद्रकांतदादा असोत किंवा हसन मुश्रीफ हे दोन्ही आजी-माजी मंत्री हिमालयाच्या सावलीत राजकीय थंडावा शोधताना दिसत आहेत हे मात्र खरे.

राजेश टोपे यांचा उदारपणा

सहकारी साखर कारखाना चालवायचा असेल तर तो निगुतीने आणि काटकसरीने चालवावा लागतो. अंकुशराव टोपे यांच्या मागे कर्मयोगी अशी बिरुदावली त्यामुळेच लागली. ते भलते काटकसरी. त्यांच्या काटकसरीची चर्चा नुकतीच शरद पवार यांच्यासमोर निघाली. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या (व्हीएसआय)  जालना शाखेच्या विस्ताराच्या बैठकीत नियोजन सांगताना या संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख म्हणाले, प्रशिक्षण घेण्यासाठी जालन्यातील समर्थ साखर कारखान्याची जागा वापरू. त्यावर अध्यक्ष राजेश टोपे यांनीही होकारार्थी मान हलवली. ती जागा वापरल्याबद्दल त्याचे भाडे देऊ असे ते म्हणाले. त्यावर यांना भाडे का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला तातडीने उत्तर देताना शिवाजीराव म्हणाले, मला राजेशचा नाही तर अंकुशरावांचा अनुभव होता. त्यांनी पैसे घेतले असते.’ असे ते म्हणताच शरद पवारांसह उपस्थितांमध्ये हशा पिकला. अंकुशरावांच्या सहकारातील काटकसरीचा किस्सा मात्र साखर कारखानदारीतील गोडव्याचा होता, हे नक्की!

कारभाऱ्यांची टक्केवारी

केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी वित्त आयोगातून मोठय़ा प्रमाणात निधी मिळत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी थेट मिळत असल्याने गावचे कारभारी खूश आहेत. कामाचा ठेकेदार ठरवण्यासाठी सरपंचाची भूमिका साहजिकच महत्त्वाची. ठेका देताना देवघेव होत असल्याची चर्चा सुरू असते.   एवढे करूनही देयक अदा करताना कामात खोट निघतेच. ठेकेदारी करणारे यावर मात कशी करायची हे ओळखून असल्याने अडचण येण्यापूर्वीच सरपंच साहेबांची भेट घेतात. असाच प्रकार मिरज तालुक्यातील एका भल्या मोठय़ा गावात घडला. मार्च संपला तरी बिल काही मिळेना. सरपंचांची भेट घेतली तरी आज- उद्या करीत आठवडा गेला. ठेकेदाराने काम घेताना दहा टक्के मोजले होते, मग आता काम झाल्यावर अडवणूक कशासाठी, असा त्याचा भाबडा प्रश्न होता. सरपंच आणखी बिलंदर. जीएसटीची भानगड आहे तेव्हा तेवढे बघा. जमत असेल तर आजच बिल घ्या. बहुधा कारभाऱ्यांना हवे तसे जमले नाही. आणि हा ठेकेदार दहा लाखांच्या बिलासाठी आता फेऱ्या मारत आहे.

गोकुळ आणि रामनवमी 

नेत्यांवर प्रेम व्यक्त करताना कार्यकर्त्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते. वाढदिवस असेल तर प्रतिभेला आणखीन बहर येतो. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस रामनवमीच्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी गोकुळ दूध संघाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत त्यांच्या नावाचा वापर करून ‘राम’ असा उल्लेख केला होता. यावर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आक्षेप घेतला. इतक्यावरच न थांबता त्यांनी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि दिवसभर तणावनाटय़ सुरू राहिले. वाढदिवसाच्या जाहिरातीचे निमित्त होऊन हे रामायण घडले. यात जाहिरात प्रसिद्धीस देणारी गोकुळ संस्था मात्र नामानिराळी राहिली.

शिवसेना अकबर

महाविकास आघाडीतील तीन पक्षांना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘अमर, अकबर, अ‍ॅन्थोनी’ या चित्रपटाच्या नावाची उपमा दिली. अलीकडे भाजपचे हिंदूत्व अधिकच कडवे झालेले दिसते. रावसाहेब कसे मागे राहणार? त्यांनी शिवसेनेला अकबराची उपमा दिली. मशिदींवरील भोंगे हटविण्याचा मुद्दा असो वा अन्य मुद्दे, शिवसेनेचे हिंदूत्व नरमले आहे. खरे हिंदूत्व आता शिवसेनेकडे राहिलेले नाही वगैरे ते बोलले. अमर कोण वा अ‍ॅन्थोनी कोण, हे मात्र रावसाहेबांनी सांगितले नाही.

(सहभाग : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, सुहास सरदेशमुख, प्रबोध देशपांडे)