गावोगावच्या रंजक किश्शांचे साप्ताहिक सदर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेचे पुन्हा अध्यक्ष व्हायचेच या निश्चयाने ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले होते. २१ जागांवर आपल्या गटाचे संचालक निवडून आले पाहिजेत म्हणून व्यूहरचना केली. दरेकर हे भाजपचे व त्यांच्या म्हणण्यानुसार ते महाविकास आघाडीवर तुटून पडतात. तरीही दरेकर यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमधील सहकाराशी संबंधित कार्यकर्त्यांची मोट बांधली. ‘विना सहकार नाही उद्धार’ या घोषवाक्याप्रमाणे सर्वाना बरोबर घेतले. १७ जागा बिनविरोध निवडून आल्या. चार जागांसाठी मतदान झाले तेव्हाही त्यांनी चारही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्व काही दरेकर यांच्या मनाप्रमाणे घडत गेले. मजूर सोसायटीचे संचालकपद रद्द होऊ शकते याचा अंदाज आल्याने त्यांनी अन्य गटाचा आधार घेतला. तेथील शिवसेनेच्या उमेदवाराला ‘बसविले’. सर्व जागा आपल्या गटाच्या यामुळे अध्यक्ष आपणच या थाटात दरेकर वावरत होते; पण महाविकास नेत्यांनी अशी काही व्यवस्था केली, की दरेकर यांचा पार स्वप्नभंग झाला. सारे प्रयत्न करूनही अध्यक्षपदावर हुलकावणी मिळाली.

एका प्रभागासाठी दोन मंत्री, प्रदेशाध्यक्ष प्रचारात

सांगली महापालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान आहे. महापालिका निवडणुकीला दीड वर्षांचा अवधी उरला असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरून ताकद अजमावत आहेत. आघाडी व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पालकमंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अखेरच्या टप्प्यात दोन्ही मंत्र्यांनी बैठकाही प्रभागात घेतल्या. बैठकीचे ठिकाण मात्र, दप्तरी गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरात. निवडक बिनीच्या शिलेदारांना कानमंत्र दिले गेले. याचा राजकीय लाभ भाजपने का उठविला नाही याचीच चर्चा आता रंगलीय.

जावे तर कुठे? करावे तर काय?

जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला होता तेव्हा सत्तेत असलेल्या शिवसेनेला ‘शिवजलक्रांती’ या योजनेतून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी खासे प्रयत्न करणारे भूम- परंडय़ाचे आमदार तानाजी सावंत सेनेवर नाराज आहेत. ते अलीकडेच भाजपच्या नेत्यांना भेटले आणि पुन्हा त्यांच्या नाराजीच्या बातम्या सुरू झाल्या; पण आता पक्ष बदलावा तर उपयोग काय? कारण पक्षांतर्गत बदलाचा कायदा आडवा येतो ना..!  म्हणून त्यांना भाजप नेत्यांशी जवळीक ठेवून राहावे लागते; पण उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात जर टिकायचे असेल तर ‘तेरणा’ कारखाना ताब्यात हवा, हे त्यांना सांगण्यात आले. ते त्यांना पटलेही. त्यांनी सारे जुळवून आणले. जिल्हा बॅंकेच्या निविदा प्रक्रियेत लातूरच्या देशमुखांनी आक्षेप घेतला. न्यायालयानेही तो मान्य केला. त्यामुळे साखरपेरणीतून राजकारणावर नवी पकड मिळविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आता फोल ठरले आहेत. त्यामुळे जावे कुठे आणि करावे काय, असे तानाजी सावंतांचे कार्यकर्तेही म्हणू लागले आहेत, जावे तर कुठे आणि करावे तरी काय?

आमदाराने केली खासदाराचीच गोची

शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील एका कार्यक्रमात मी सुनील तटकरे यांच्यामुळे आमदार झाल्याचे वक्तव्य केले. शिवसेना आमदाराने जाहीर कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, कारण दळवी हे शेकापचा पराभव करून निवडून आलेले. दळवी यांच्या वक्तव्याने शेकापच्या पाटील मंडळींमध्ये संशय निर्माण होणे तटकरेंना भविष्यातील राजकीय फायद्याचे नाही. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी लगेच दळवी यांच्या वक्तव्यावर खुलासा करत आपली बाजू सावरून घेतली. दळवी यांना आमदार करण्यात माझा नखभरही हिस्सा नाही. कारण दळवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतांना त्यांना मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले नाही. त्यामुळे ते शिवसेनेत गेले व आमदार झाले. यात माझा काय संबंध, असा सवाल तटकरे यांनी करीत स्वत:ची सुटका करून घेतली.

पराभूताची खदखद आणि सेनेतील दुफळी

अकोला, वाशीम व बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निवडणूक निकालाच्या महिनाभरानंतर अकोला शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पराभवासाठी पक्षातून प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांचीच री ओढत काही ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी तथा ‘प्रमुख’ पदाधिकाऱ्यावर निशाणा साधला. ‘शिवसेनेच्या पराभवासाठी भाजप नेत्यांच्या बैठकी त्या लोकप्रतिनिधीच्या बंगल्यावर झाल्या आहेत’, असा गौप्यस्फोट केला. त्या लोकप्रतिनिधीने संबंधित पदाधिकाऱ्यांच्या नशेवरच बोट ठेवले. ‘ते नशेत काहीही बडबड करतात,’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. अकोला शिवसेनेत अगोदरच गटबाजीचे राजकारण टोकाला गेले असताना पराभवानंतर पक्षात मोठी दुफळी निर्माण झाली.

मुश्रीफांची इच्छा फलद्रूप कधी होणार?

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना नगरचे पालकमंत्री पद नकोसे झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते आपली इच्छा व्यक्त करत आहेत. नकोशा झालेल्या पदामुळे क्वचित कधी तरी नगरमध्ये ते येतात. ते नगरमध्ये येण्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाच्या बदलाचे कुठपर्यंत आले, याची चर्चा सुरू होते. पत्रकारही मुश्रीफांना हमखास हाच प्रश्न विचारतात. पक्षश्रेष्ठींकडे विषय मांडला आहे, असे साचेबद्ध उत्तर देत ते वेळ मारून नेतात. मुश्रीफ नुकतेच नगरमध्ये आले होते. त्या वेळीही पुन्हा ही चर्चा सुरू झाली. या वेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल, असा आशावाद व्यक्त केला. मुश्रीफांची इच्छा फलद्रूप होणार का हे लवकरच कळेल. या साऱ्या घडामोडी घडत असताना राज्यमंत्री व राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत.

वैदर्भीय नेत्याला पश्चिम महाराष्ट्राचे अप्रूप

वैदर्भीय काँग्रेस नेत्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांविषयीचे ‘प्रेम’ कधी लपून राहिले नाही. विशेषत: नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे तर कायमच पश्चिम महाराष्ट्रातील स्वपक्षीय नेते तसेच मित्रपक्षातील विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत असतात. मुद्दा अर्थातच विदर्भावरील अन्यायाचा, कथित निधी पळवण्याचा किंवा तत्सम स्वरूपाचा असतो; पण संपलेल्या आठवडय़ात नागपुरात करोना रुग्ण वाढल्याने निर्बंध लावण्याची वैळ आली तेव्हा राऊत यांनी अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याचा ‘पॅटर्न’ लागू केला. यावर सर्वाना आश्चर्य वाटले. र्निबधाच्या पातळीवर का असेना राऊत यांना अखेर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे महत्त्व कळले, अशी कोपरखळी मारली जात आहे.

तो एक वल्ली

आजकाल तरुणाईमध्ये यूटय़ूब चॅनेल आणि त्यावरील व्हिडीओ कायम चर्चेत असतात. मनोरंजनाच्या विश्वात तर स्वत:मधील कौशल्य जगासमोर मांडण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ बनलेय. याच माध्यमातून अमरावती जिल्ह्यातल्या एका आडवळणाच्या गावातील तरुण आणि त्याची पत्नी एकदम प्रकाशझोतात आले आहेत. विजय खंडारे आणि त्याची पत्नी तृप्ती यांचे विनोदी लघुपट चर्चेत आले होते, पण ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्याचे मराठी रूपांतर स्वत:च्या मोबाइलमध्ये चित्रित करून यूटय़ूबवर प्रदर्शित करणाऱ्या या दाम्पत्याला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. विजयने स्वत: गाणे लिहिले, अभिनय, दिग्दर्शन केले. त्याच्या बहिणीने गाणे चित्रित केले. त्याच्या या व्हिडीओला वीस लाखांहून अधिक दर्शकसंख्या लाभली आहे.

( संकलन – दिगंबर शिंदे, सुहास सरदेशमुख, चंद्रशेखर बोबडे, हर्षद कशाळकर, मोहन अटाळकर, मोहनीराज लहाडे, प्रबोध देशपांडे)

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi weekly sadar leader opposition legislative council ysh
First published on: 18-01-2022 at 00:29 IST