|| स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ
मुख्यमंत्रिपदाचे सिंहासन अनेक कारणांमुळे सोडावे लागले, तरी ‘येडियुरप्पांची सावली’ अशी ओळख असलेले बसवराज बोम्मई यांच्या रूपात आपल्याला हवा असलेला लिंगायत नेताच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी निवडला जाईल याची व्यवस्था बी. एस. येडियुरप्पा यांनी केली…

भाजपला एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात पहिला दक्षिण विजय मिळवून देणारे व दोन वर्षांपूूर्वी विरोधकांची सत्ता समीकरणे बिघडवून पुन्हा कमळ फुलवत मुख्यमंत्री म्हणून काम पाहणारे बी. एस. येडियुरप्पा यांना पदावरून सन्मानजनक निरोप दिल्याचे चित्र भाजपने तयार केले. पण येडियुरप्पांची सावली अशी ओळख असलेले लिंगायत समाजाचे बसवराज बोम्मई यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवावे लागल्याने कर्नाटक भाजपवरील येडियुरप्पांची व जातीय समीकरणांची सावली कायम राहिली आहे.

येडियुरप्पा यांची गच्छन्ती होणार असे स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्रिपदासाठी साहजिकच रस्सीखेच सुरू झाली. कर्नाटकच्या राजकारणावर लिंगायत व वोक्कलिग या दोन समाजांचा मोठा प्रभाव आहे. लिंगायत येडियुरप्पांनंतर आता वोक्कलिग समाजाला संधी मिळावी या दृष्टीने प्रयत्न झाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले सी. टी. रवी यांचे नाव त्यात प्रामुख्याने चर्चेत होते. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष व गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची नावे चर्चेत आली. या तीन प्रमुुख नावांशिवाय केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नावाची ब्राह्मण चेहरा म्हणून चर्चा झाली. तर येडियुरप्पांचा गट सोडून, पण लिंगायत चेहरा म्हणून मुरुगेश निरानी यांचेही नाव पुढे आणले गेले. पण सिंहासन सोडत असलो तरी सूत्रे सोडणार नाही, हा येडियुरप्पांचा नूर बघून त्यांच्या मर्जीतील व पक्षाला उपयुक्त असा लिंगायत चेहरा म्हणून बसवराव बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

लिंगायत समाज हा कर्नाटकच्या राजकारणात प्रभावशाली मानला जातो. सुमारे १६ टक्के प्रमाण आणि विधानसभेच्या २२४ पैकी जवळपास १०० जागांवर निर्णायक ठरू शकेल अशी त्यांची राजकीय ताकद आहे. शिवाय केवळ कर्नाटक नाही, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या उत्तर कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही लिंगायत समाज मोठ्या संख्येने असून २०१४ पासून प्रामुख्याने भाजपच्या बाजूनेच आहे. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरून जाणार या चर्चेनंतर ज्या पद्धतीने या समाजाने त्यांच्यामागे राजकीय ताकद उभी केली ते पाहता, येडियुरप्पा व लिंगायत समाज या दोघांना नाराज करणे भाजपला परवडणारे नव्हते. त्यातूनच येडियुरप्पांची पसंती, लिंगायत व उत्तर कर्नाटक अशी समीकरणे असलेले बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

भाजपला दक्षिणेत सत्तेचे दरवाजे पहिल्यांदा खुले करणारे राज्य म्हणजे कर्नाटक व ती कामगिरी यशस्वी करणारे भाजप नेते बी. एस. येडियुरप्प्पा यांच्या राजकीय भवितव्याची फेरमांडणी करण्याच्या दृष्टीने पक्षाने त्यांना नुकतेच वयाच्या कारणावरून दूर केले. येडियुरप्पांनी पहिल्यांदा सत्ताग्रहण केले तेव्हा भाजप हा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे ओळखला जाणारा पक्ष होता. आताच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे भाजपमधील नेत्यांचे भाग्यविधाते म्हटले जातात. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, हरियाणात मनोहरलाल खट्टर, गुजरातमध्ये विजय रुपानी अशा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली नसलेल्या जातींमधील, पण आपल्या मर्जीतील नेत्यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात त्यांना कोणी रोखू शकले नाही. मात्र, त्यांना पहिल्यांदा मनातील आवड-निवड डावलून आपल्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडले व राज्यात आपला शब्द महत्त्वाचा असेल याची जाणीव करून दिली ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणि आता कर्नाटकचे पायउतार झालेले मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी.

बसवराज बोम्मई यांच्या रूपात आपल्याच गटात मुख्यमंत्रिपद राहावे याची काळजी येडियुरप्पांनी घेतली असली, तरी भाजपनेही हिरवा कंदील दाखवताना काही समीकरणे डोक्यात ठेवली आहेत. बोम्मई हे सध्या ६१ वर्षांचे असून राजकारणात हे वय वरिष्ठ पदांसाठी पुरेसा अनुभव असलेले व जोम असलेले नेतृत्व मानले जाते. भाजपच्या निकषांनुसार किमान १४ वर्षे ते कर्नाटकात भाजपच्या उपयोगी येऊ शकतात. ते अभियंता, म्हणजेच उच्चविद्याविभूषित आहेत. शेती व उद्योग या दोन्ही गोष्टींशी ते संबंधित असल्याने राजकारणात लागणारे मतपेढी व धनपेढी दोन्ही सांभाळण्याची त्यांची कुवत आहे. जलसंपदा, संसदीय कामकाज, विधि, सहकार व गृह ही अत्यंत महत्त्वाची अशी विविध खाती यशस्वीपणे सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. केवळ भाजपची सत्ता आल्यावर नव्हे, तर त्याआधीपासून राज्याच्या राजकारणाचा त्यांचा अनुभव आहे. वडील एस. आर. बोम्मई हे राज्याचे मुख्यमंत्री राहिल्याने व ते स्वत: युवक असल्यापासून जनता दलाच्या राजकारणात असल्याने त्यांना केवळ उत्तर कर्नाटकच्या नव्हे, तर संपूर्ण कर्नाटकच्या राजकारणातील खाचाखोचा चांगल्याच माहिती आहेत. पुढील दोन वर्षांत सत्तेवर मांड बसली की इतर पक्षांतील लोकही गरजेनुसार भाजपकडे वळवण्यासाठी बोम्मई यांचा उपयोग होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, २००८ मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर ते पक्षाशी निष्ठावान राहिले. इतके की, येडियुरप्पांनी भाजपमधून बाहेर पडून कर्नाटक जनता पार्टी नावाचा पक्ष काढल्यानंतरही बोम्मई यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले. विशेष म्हणजे, तसे करूनही येडियुरप्पांचे विश्वासूच राहिले. पक्षाच्या चौकटीत राहून हे राजकीय मेतकूट जमवण्याचा बोम्मई यांचा धोरणीपणा ही येडियुरप्पांना पर्याय शोधणाऱ्या भाजपच्या लेखी मोठी गोष्ट ठरली. शिवाय पक्षाबाहेरचे असले तरी निष्ठेने व कार्यक्षमतेने काम करणाऱ्या बाहेरच्यांनाही भाजप संधी देतो, हा अप्रत्यक्ष संदेशही यातून भाजपने दिला आहे.

येडियुरप्पा यांच्या गच्छन्तीस त्यांच्या कुटुंबात, म्हणजेच धाकटे चिरंजीव विजयेंद्र यांच्या हाती जाणारी सत्ता, त्यातून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, करोना हाताळणीतील अपयश, पुराच्या प्रश्नात निर्माण झालेला असंतोष अशी अनेक तात्कालिककारणे होती. येडियुरप्पा यांची गच्छन्ती अचानक झालेली नाही. त्याची एक पार्श्वभूमी आधीपासूनच तयार होत होती. पुढच्या निवडणुकीत येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली भाजपला लढता येणार नाही. पक्षाला राज्यात जिवंत ठेवायचे असेल तर मुख्यमंत्री बदलावा लागेल, असे विधान भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी उघडपणे केले. भाजपची शिस्तसंस्कृती लक्षात घेता हे विधान वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याखेरीज कोणीही आमदार करणार नाही. वय वाढत चाललेल्या आणि प्रदेश भाजपवर वर्चस्व असलेल्या येडियुरप्पांच्या सावलीतून बाहेर पडलेला व आपल्याला हवा तसा कर्नाटक भाजप पुढील निवडणुकीसाठी तयार करण्याच्या योजनेतून असंतोषाला बळ पुरवण्यात आले.

‘येडियुरप्पांची सावली’ अशी ओळख असलेले बसवराज बोम्मई यांच्या रूपात आपल्याला हवा असलेला लिंगायत नेताच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी निवडला जाईल याची व्यवस्था येडियुरप्पा यांनी केली. त्यासाठी लिंगायत समाजाच्या आपल्या मागे असलेल्या राजकीय ताकदीच्या प्रदर्शनाचा खेळही त्यांनी मोदी-शहांच्या रागलोभाची पर्वा न करता हवा तसा खेळला. तसेच आपण कुठल्याही राज्याचे राज्यपाल होणार नाही आणि पुढील निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे जाहीर करत, सिंहासन सोडले तरी सूत्रे हातात ठेवणार असे संकेत देत आक्रमक पवित्रा येडियुरप्पांनी घेतला आहे. त्यामुळे येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरून गेले असले, तरी कर्नाटक भाजप अजूनही त्यांच्याच छत्रछायेत आहे हाच संदेश या सत्तांतरानंतर गेला आहे. त्यामुळे आता बोम्मई यांच्यासमोर या सावलीतून बाहेर पडून स्वत:ची वाट तयार करण्याचे बिकट आव्हान आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ असोत की येडियुरप्पा, अशा राजकीयदृष्ट्या स्वयंभू किंवा भाजपच्या आवडत्या भाषेत बोलायचे तर ‘आत्मनिर्भर’ नेत्यांसमोर आणि त्यांच्या बळकट समाजशक्तीसमोर सर्वोच्च नेतृत्वही जरा वचकूनच असते, हा संदेशही सुज्ञांपर्यंत पोहोचला आहे.

swapnasaurabh.kulshreshtha@expressindia.com