अंजली चिपलकट्टी

हवामान बदलाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे, हे समजूनही माणूस आपल्या वर्तनात बदल करताना दिसत नाही. यामागची महत्त्वाची कारणे मानसशास्त्रीय आहेत. ती समजून घेणे हा या लेखाचा मुख्य हेतू आहे. हवामान बदल ही समस्या पृथ्वीची नाही तर, माणसाची आहे. संपूर्ण मानव जातीने स्वत:ची ‘वाढ’ थांबवून, अभूतपूर्व विश्वास दाखवला, सहकार्य केले तरच आपण वाचू शकू! आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त..

climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

‘‘ताप आहे अंगात – १००.. बाकी काही लक्षणं नाहीत डॉक्टर, पण कसंसं होतंय. उद्या दिल्लीला जायचंय; काही तरी स्ट्राँग औषध देऊन तातडीनं बरं करा डॉक्टर. बाकी आल्यावर पाहू.’’

‘‘आता हा ताप कमी होणार नाही.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे आता या तापाची सवय करून घ्या. कदाचित पुढच्या २-३ वर्षांत ताप १०० वरून १०२ ला जाऊ शकतो. त्याचीही सवय करून घ्यावी लागेल.’’

‘‘काय बोलताय डॉक्टर! मी सेकंड ओपिनियन घेतो.’’

‘‘कोणाकडेही गेलात तरी तुमचा ताप कमी होणार नाही. त्याची सवय करून घेणं हाच उपाय राहील.’’

‘‘अहो, कसं शक्य आहे हे? आत्ताच भयंकर वाटतंय!’’ असं किंचाळतच झोपेतून श्रीधर धडपडत उठला. घामानं डबडबून गार पडलेलं आपलं शरीर चाचपून पाहिल्यावर तो जरा शांत झाला. फ्रिजमधल्या गार पाण्याच्या बाटलीतलं पाणी गटागट पिताना त्याच्या लक्षात आलं की, काल रात्री झोपताना ‘क्लायमेट-चेंज’वरची फिल्म बघता-बघता डुलकी लागली त्याचा हा परिणाम असावा. गेल्या दोन-तीन वर्षांत जगभरात होत असलेले उत्पात ‘हवामान बदल’ या क्रायसिसची साक्ष देत आहेत हे पटल्यामुळंच भीतीचा काटा खोलवर रुतला होता आणि मेंदूनं भयस्वप्न रंगवलं. शेजारी झोपलेल्या आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीकडे तो हतबलतेनं बघत राहिला.  

हवामान बदल खरंच होतंय हे ज्या क्षणी/ ज्या काळात कळतं तेव्हा भीतीची लहर आणि पुढच्या पिढीविषयीची काळजी दाटून येते. असं तुमच्या बाबतीत झालं नसेल तर हवामान बदलाबाबत तुम्हाला पुरेशी माहिती आहे का किंवा तुम्ही अजूनही ‘डिनायल-मोड’मध्ये आहात का, हे तपासून पाहायला हरकत नाही.

हा ‘क्रायसिस’ आहे हे गंभीरपणे मान्य असणाऱ्या लोकांतही संकटसमयी होतात तसे निकराचे प्रयत्न, कृती होताना दिसत नाही. ते का?  आपल्याला उपलब्ध असलेल्या रचना लगेच मोडीत काढण्याइतके बदल आपण इच्छा असूनही लगेच करू शकत नाही. उदा. कोळसा जाळणारी औष्णिक वीजच आपण वापरत असतो, पेट्रोलची गाडी चालवतो वगैरे; जे वापरल्याशिवाय आपला निभाव लागणे शक्य नाही. परंतु अशा रचनांपेक्षा वर्तनात बदल न होण्याची जास्त महत्त्वाची कारणं मानसशास्त्रीय आहेत. ती समजून घेणं हा या लेखाचा मुख्य हेतू आहे.

त्याआधी जगभरातले बहुतांश वैज्ञानिक या समस्येच्या सत्यतेविषयी वारंवार कळवळून सांगत आहेत हे लक्षात घेऊ. त्याचं स्वरूप आणि अजस्र आवाका थोडक्यात असा –

पृथ्वीच्या तापमानवाढीत मानवी हस्तक्षेपाचा नि:संशय हातभार आहे. १८५० पासून औद्योगिक उत्क्रांतीच्या काळापासून ते आत्तापर्यंत कोळसा व क्रूड तेल जाळण्यामुळं जो कार्बन डाय ऑक्साइड ( उड२) वायू मुक्त होतो आहे आणि त्याची पातळी आता निसर्गाच्या हा वायू शोषून घेण्याच्या मर्यादेपलीकडे गेली आहे. (मागच्या दशकात जगानं ५८ गेगाटन इतका  कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडला!) मांस व दुग्धजन्य पदार्थाच्या गरजा भागवण्यासाठी तयार केलेले जनावरांचे अजस्र कारखाने मिथेन वायू हवेत सोडतात. शिवाय जनावरांच्या खाण्यासाठी लागणाऱ्या सोयाबीनच्या पिकासाठी हजारो हेक्टर जंगलं उद्ध्वस्त केली जात आहेत. अ‍ॅमेझॉन, ज्याला आपण कधीकाळी पृथ्वीची फुप्फुसं म्हणत होतो, त्या जंगलाला जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमुळं ते आता कार्बन डाय ऑक्साइड शोषण्याऐवजी तोच बाहेर ओकत आहे.

पृथ्वीचं सरासरी तापमान आत्ताच एक सेल्सियस वाढलेलं आहे. तापमानवाढीमुळं दरवर्षी उष्णतेच्या लाटांना तोंड द्यावं लागणं यापेक्षा ही समस्या खूपच अजस्र आहे. ध्रुवांवरचा आणि ग्रीनलंडवरचा बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणं चालू आहे, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरची हजारो गावं पाण्यात बुडून लाखो लोक बेघर (क्लायमेट रेफ्युजी)होत आहेत. महासागरांतील शीत व उष्ण अंतप्र्रवाहाच्या व वाऱ्यांच्या दिशा बदलल्यामुळे उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटा, वादळांचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. पावसाचं बदललेलं प्रमाण आणि अनिश्चितता, ढगफुटी यामुळं मोठय़ा प्रमाणावर येणारे पूर ही बदललेल्या हवामानाची झलक आहे. साधन-संपत्तीचा ऱ्हास, पिकांचं नुकसान आणि अन्नधान्याची उपलब्धता कमी होत जाणं अशी लांबलचक समस्यांची जंत्री म्हणजे हवामान बदल समस्या. न्यूयॉर्कच्या युनियन स्क्वेअरमध्ये जे डिजिटल घडय़ाळ बसवलं आहे, ते असं सांगतं की माणसाकडे आता सात वर्ष

४९ दिवस एवढा काळ शिल्लक आहे. आपण आत्ता करतो तेवढा कर्ब-उत्सर्ग असाच चालू राहिला तर या काळानंतर पर्यावरणात जे बदल होतील ते इतके घातक आणि अपरिवर्तनीय असतील की ते दुरुस्त करणं माणसाच्या आवाक्यात राहणार नाही आणि आपण (बहुतांश जीवसृष्टीच्या) विनाशाकडे जात राहू.

तर मूळ मुद्दय़ाकडे येऊ. इतका मोठा क्रायसिस येऊ घातलाय तरी आपण असे थंड कसे? मानवी वर्तनाबाबत जे थोडंफार समजू लागलं आहे त्याचा आणि या क्रायसिसबाबत घेतलेल्या काही सव्‍‌र्हे/ संशोधनातील निष्कर्षांचा आधार घेतला तर खालील मुद्दे हाती लागतात.

१. हवामान बदल मानवी हस्तक्षेपामुळे कसा होत आहे हे समजून घेणे काहीसं किचकट वाटल्यानं अगदी शिक्षित माणसंही त्याच्या नादी लागत नाहीत (कॉग्निटिव्ह लोड). त्यामुळे आपल्या स्वत:च्या कृतीमध्ये बदल करण्याची ऊर्मी तयार होत नाही, झालीच तर नेमका काय बदल केलेला खरंच फायदेशीर ठरेल हे नीट समजत नाही.

माणसाचं वर्तन हे तार्किक विचारांपेक्षा भावनिक विचारानुसार निर्णय घेतं, त्यामुळे एखादी गोष्ट तर्कानुसार कितीही पटली तरी त्याबाबत वर्तनात काही बदल घडण्यासाठी तशी ऊर्मी जागृत व्हावी लागते.

२. दूरस्थ धोक्यांना कमी लेखणं – मालदीव बेटं बुडत चालली आहेत हे ऐकणं, हिमालयाच्या दरडी कोसळणं, ब्रह्मपुत्रेला येणारा अमाप पूर, अख्खा डोंगर कोसळून माळीणगाव गाडलं जाणं.. या घटना आपण ऐकतो, आपल्यापासून कुठे तरी दूर ‘जागां’वर त्या घडतात तेव्हा आपण चुकचुकतो, पण त्या आपल्या अनुभवविश्वाचा भाग नसतात. तसंच दूर असलेल्या ‘वेळे’बाबत, म्हणजे भविष्याबाबतही होतं. आत्तापासून २५ वर्ष, १० वर्षांनंतर होऊ घातलेल्या पर्यावरण संकटाबाबत मेंदूत पुरेशी भीतीची जाणीव होत नाही. वर्तमानकाळातली समोर उभी ठाकलेली संकटं समजून त्याला प्रतिसाद देण्याइतकाच सर्वसामान्य मेंदू सक्षम असतो. त्यामुळे दूरस्थ धोक्यांची जाणीव आणि कृती करण्यासाठी आवश्यक त्या भावना जागृत होत नाहीत.

३. सकारात्मकतेचा चष्मा – बरेच लोक असा भाबडा आशावाद बाळगून असतात की अनेक धोके/अपघात स्वत:बाबत कधी घडणारच नाहीत. ‘तो हृदयविकारांमुळे वारला’, ‘त्यांच्या कारला अपघात झाला’,  ‘पलीकडे सिलेंडरचा स्फोट झाला’ या घटना ऐकूनही त्या स्वत:बाबत होऊ शकतात असं त्यांना वाटत नाही म्हणून काही काळजी घ्यायचीही त्यांची तयारी नसते. उदा. सीटबेल्ट न लावणं. जगण्यातली चिंता वाढून आनंद कमी होऊ नये म्हणून मेंदूनं केलेली ती जैविक सोय आहे, पण बदलत्या काळात तिचे तोटेही उद्भवतात.

४. एखाद्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या धोक्याशी लढणं मेंदूला सोपं जातं, पण ‘हवामान बदल’ हा धोका तसा ‘अबस्ट्रॅक्ट’ स्वभावाचा आहे. दिसत नसलेल्या शत्रूशी लढता येणं अवघड असतं. (तसंच कोणत्या कृतींचे काय परिणाम होणार हे दाखवता येणारे नसतील (इन्टँजिबल)( ्रल्ल३ंल्लॠ्रु’ी) तर कृती करण्याची ऊर्मी कमी होते.) अशा दूरच्या आणि न दिसणाऱ्या धोक्याला बोधनात्मक अर्थात कॉग्निटिव्ह प्रतिसाद कसा द्यायचा यासाठी मेंदूला सक्षम करावं लागतं, थोडं क्रिटिकल थिंकिंग शिकावं लागतं. त्यासाठी आपला मेंदू लवचीक आहे.

५. फ्री-रायडिंग- हवामान बदल ही जगाची समस्या आहे. सर्व राष्ट्रांच्या सामुदायिक सहभागातूनच त्यावर मात करता येईल. आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये मान्य करूनही प्रत्यक्षात देशांनी आपापला कर्ब-उद्योग चालू ठेवला तर? अशी भीती अनेक देशांना वाटते. तसंच व्यक्तिगत पातळीवरही मी कर्ब-पाऊल कमी केलं तरी इतर लोक मजा मारत आहेत अशी अन्यायाची भावना मनात असते. हवामान बदलाचा खूप मोठा फटका बसणाऱ्या देशांत भारत मोडतो, त्यामुळं असा विचार करणं आता आपल्याला परवडणार आहे का?

६. ‘ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स’ ही एक मुक्त व्यापार भांडवली अर्थव्यवस्थेत उद्भवणारी समस्या. उदा. गावातल्या सर्वासाठी सामाईक असलेल्या गवताच्या कुरणाचा वापर कसा करावा याबाबत नियम अथवा काही देखरेख नसेल तर अशा सामुदायिक गोष्टी लोक जबाबदारीनं वापरतात का? तर बऱ्याच अंशी असं दिसतं की लोक बेजबाबदारपणे वागून कुरणाचा अतिवापर करतात आणि शेवटी ते नष्ट होत जातं. एक प्रकारे ‘फुकट’ मिळालेल्या पर्यावरणाचा सांभाळ माणसाला करता आलेला नाही हीच हवामान बदल समस्येतून दिसलेली गोष्ट आहे. म्हणूनच विकसित राष्ट्रांनी सामुदायिक वापराच्या साधनसंपत्तीच्या वापराबाबत नियमबद्ध सिस्टीम्स बसवल्या आहेत त्या शिकण्यासारख्या आहेत. आयपीसीसीने कर्ब-उत्सर्गाबाबत घातलेले नियम अशा स्वरूपाचे आहेत. त्याचं पालन करण्याचा आग्रह प्रत्येक राष्ट्रानं/ त्याच्या नागरिकांनी धरला पाहिजे. असा आग्रह धरण्याची, सिस्टीम्स पाळण्याची भारतीयांची मानसिकता आहे का?

७. राजकीय विचारसरणी/ पक्ष- कोणी एखाद्या राजकीय विचारधारेशी/ पक्षाशी खूप घट्ट बांधलेली असतील तर ती समस्यांचा स्वतंत्रपणे विचार न करता पक्षाच्या धारणांच्या सोयीनुसार सत्य वाकवतात. त्यात नेताच लघुदृष्टीचा असेल तर लोकांनी आंधळेपणाने केलेला त्याचा अनुनय खूप महागात पडतो. २०१७ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदल ही समस्याच नाकारली आणि पॅरिस करारातून माघार घेतली. रिपब्लिकन मतदारांनी या निर्णयाला विरोध केला नाही. समस्या अधिकच गंभीर बनण्यात असा संकुचित राजकीय दृष्टिकोन कारणीभूत ठरला.

८. तंत्रज्ञान-मोक्ष! – हवामान बदलाची समस्या आधुनिक तंत्रज्ञानाने सोडवता येईल असा अवाजवी विश्वास आज अनेक अभिजन आणि तंत्रज्ञानस्नेही लोकांना आहे. या विश्वासामागे विज्ञानामुळे झालेली आजवरची भौतिक प्रगती उभी आहे. हा एक मोठा विरोधाभास आहे. गेली ३०-४० वर्ष हॉकिंग्जपासून अनेक दिग्गज वैज्ञानिक तापमानवाढीविषयी गंभीर इशारे देत आले आहेत. पण ते गांभीर्याने न घेता हा वर्ग न जाणो कोणत्या तंत्रज्ञानाला रेलून बसला आहे. मूळ मुद्दा असा असावा की, आपल्या सुखासीन सवयींमध्ये बदल न करता ‘वाढ’ तशीच राखता यावी हा हव्यास सोडता येत नाहीए. हाच अभिजन वर्ग फुटकळ कृतींमधून हवामान बदलाबाबत जागरूक असल्याच्या आभास तयार करतो.

नवीकरणीय ऊर्जा स्रोत, कार्बन- कॅप्चर हे तंत्रज्ञान ठीकच आहे. पण सोलर जिओ-इंजिनीयिरग, कृत्रिम पाऊस पाडणं/ थोपवणं अशा तंत्रज्ञानावर मोठय़ा प्रमाणात भरवसा ठेवता येईल अशी परिस्थिती नाही. अशा तंत्रज्ञानामुळे ‘आगीतून फुफाटय़ात’ अशी परिस्थिती होण्याचे इशारे वैज्ञानिक देत असतात. (त्यापेक्षा विकासाच्या वाढीला थोडा ब्रेक लावण्याची, थोडं थांबण्याची, मंद होण्याची ‘आयडीया’ कशी वाटते?)

९. व्यवस्थेचे समर्थन – ज्या व्यवस्थेमुळे विकास झाला, ‘चांगले’ दिवस आले त्या व्यवस्थेतल्या त्रुटी स्वीकारणं कोणत्याही समूहाला जड जातं. तेल-वायू आधारित व्यवस्थेतील दोष मान्य करायचे, पण व्यवस्था बदलायला नकार द्यायचा असं केलं तर ‘कॉग्निटिव्ह डिझोनन्स’ तयार होतो. ते सहन करण्यापेक्षा व्यवस्था चालू राहील अशी भूमिका घेत स्वत:च्या वर्तनाचं समर्थन करणं मेंदूला परवडतं. टॉयलेट-पेपरपासून घरातलं फर्निचर आणि सततचा विमान प्रवास करण्याच्या सवयी सोडण्याची तयारी हा अभिजन वर्ग हवामान बदल रोखण्यासाठी दाखवतील का?

१०. सामाजिक संकेत व प्रतिष्ठा- ज्या वर्तनामुळे समाजात पत वाढते ते वर्तन पुन:पुन्हा केलं जातं. माणसाच्या बहुतांश भावना सामाजिक आहेत. म्हणूनच समूहातील सामाजिक यशाच्या कल्पनांशी जुळवून घेण्याचा, प्रतिष्ठित व्यक्तींचे अनुकरण करण्याकडे त्याचा कल असतो. हवामान बदलासाठी काही ‘अभिजनी प्रसिद्ध’ लोकांनी ‘नको-त्या’ सवयींचा त्याग करण्याची, कर्ब-पाऊल छोटं करण्याची ‘फॅशन’ बनवता आली ती फार उपयोगी ठरू शकेल! पण ‘फॅशन’ म्हणून प्रतीकात्मक कृतीत समाधान मानण्याचा प्रकारही आपण पाहातो- उदा. रोपं लावणं, पण त्याची निगा न राखणं.

११. अजून एक मन‘स्थिती’ म्हणजे हवामान बदलामागची क्लिष्ट अशी लांबडी कार्यकारण साखळी (कॅज्युअल चेन). इकडे फुलपाखराने पंख फडफडवले म्हणून तिकडे भिंत पडली (बटरफ्लाय इफेक्ट) हे जितकं अतक्र्य वाटू शकतं तसंच कोणी मांसाहार केला किंवा वीज जास्त वापरली म्हणून तिकडे ध्रुवीय बर्फ वितळला यातला सांधा कळणं अवघड वाटू शकतं. अशा अवघड गोष्टी समजून घेण्यापेक्षा ‘जैसे थे स्थिती’ मेंदूला परवडते. मुद्दा हा की सामान्य माणसांत, वर्तमानकाळातल्या समोर दिसणाऱ्या धोक्यांबाबत भावना उद्दीपित होत असल्यानं तशीच आव्हानं मेंदूला हाताळता येतात.

१२. जगभरात साधारणपणे असं दिसून येतं की उदार अर्थात लिबरल वृत्तीचे लोक पुराणमतवादी अर्थात काँझव्‍‌र्हेटिव्ह वृत्तीच्या लोकांपेक्षा हवामान बदलाची समस्या लवकर स्वीकारतात. एकंदरच बदल आणि अनिश्चितता स्वीकारण्याची मानसिक तयारी भिन्न असणं हे यामागचं कारण असू शकतं. हवामान बदल नाकारण्यात काही प्रमाणात भविष्याच्या अनिश्चितता आणि भीतीचा प्रभाव असू शकतो.

स्वत:च्या व्यक्तिगत वर्तनात बदल घडवण्याबरोबरच सरकारी पातळीवर व्यवस्था बदलासाठी दबाव आणणं, आपण घोषित केलेली टार्गेट्स पाळली जात आहेत याकडं लक्ष ठेवणं, त्याला अनुकूल नेतृत्व निवडून आणणं हे करायला हवं. त्यासाठी पारंपरिक, जुन्या मेंदूच्या मर्यादांवर मात करून सवयी बदलणं शक्य आहे. 

जर्मनीतील ग्रीन पार्टीला मतदारांनी दिलेला कौल आणि अलीकडे झालेल्या ऑस्ट्रेलियातील निवडणुकीत थेटपणे हवामान बदलाविषयी कृतिशून्य सरकारच्या विरोधी केलेलं मतदान हे प्रगत देशांमध्ये याबाबत चांगलं काही घडतंय याचं सूतोवाच आहे. कॅनडात मागच्या वर्षी ४९ इतकं तापमान वाढलेलं पाहून तिथल्या सरकारला जो मोठा धक्का बसलाय, त्यातून कार्बन टॅक्स वाढवण्याचा प्रभावी उपाय त्यांनी योजला आहे. दक्षिण आफ्रिकेतही काही महत्त्वाचे बदल होताहेत. प्रगत देशातील माणसांच्या सवयी, व्यवस्था बदलत आहेत. भारताचं काय?

आंतरराष्ट्रीय सीओपी २६ व्यासपीठावरून भारतानं २०३० पर्यंत ५०० मेगावॉट नवीकरण ऊर्जा तयार करण्याचं आणि २०७० पर्यंत शून्य कर्ब-उत्सर्ग अशी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टं ठरवली आहेत हे चांगलंच आहे; परंतु हे गाठणं केवळ पर्यावरण खात्यावर ढकलता येणार नाही. आयपीसीसीने दिलेल्या आराखडय़ानुसार, खास अशा हवामान बदलाविषयी काम करणाऱ्या संस्थांची/ मंत्रालयाची निर्मिती करून, तज्ज्ञांच्या मदतीनं लक्ष्यकेंद्री काम करावे लागेल. त्यासाठी देशातली ऊर्जा क्षेत्र, शेती, शहर विकास, प्रदूषण विभाग इ. यांच्यात समन्वय साधत, ‘जमिनी’वरील खऱ्या माहितीचा उपयोग करून निर्णयाचे अधिकार असणाऱ्या तज्ज्ञ संस्थांची नितांत गरज आहे. आयपीसीसीच्या नवीन अहवालानुसार जगातल्या देशांनी स्वत:च्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या दोन टक्के रक्कम हवामान बदल समस्येच्या निराकरणासाठी राखून ठेवली तर हे संकट रोखून धरता येईल याकडं लक्ष देऊ या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसनशील देशांचा कर्ब-उत्सर्जनातला वाटा कमी आहे, म्हणून विकसित देशांकडून भरीव मदत मिळावी व सवलती मिळाव्या अशी भारताची अपेक्षा रास्त खरीच; पण हवामान बदलाचा फटका श्रीमंतांपेक्षा गरिबांना, शेतकरी, मजूर – ज्यांचा देशाच्या विकासात मोलाचा हातभार आहे त्यांना जास्त बसतो आहे आणि बसणार आहे. मिळणाऱ्या सवलतींचा योग्य वाटा गरिबांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी खर्च करून विषमतेबाबत दुटप्पी भूमिका आपण घेत नाही ना याकडं लक्ष द्यावं लागेल.

हवामान बदल ही समस्या पृथ्वीची नाही, माणसाची आहे. माणसानं- म्हणजे – आपण सर्वानी बुद्धी आणि भावना संयतपणे वापरून ‘वाढ’ (ग्रोथ) थांबवून, अभूतपूर्व विश्वास व सहकार्य दाखवू शकलो तर नक्की वाचू.

anjalichip@gmail.com