दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

शेतीमध्ये जमिनीबरोबर पाणी हा घटक महत्त्वाचा ठरतो. कमी पाणी जसे पिकाला मारक तसेच जास्त पाणीही पिकासोबत जमिनीला नष्ट करणारे. या समस्येचा वेध घेतच वाळवा तालुक्यात ऊस आणि द्राक्ष पिकांच्या क्षेत्रावर आता सामूहिक पद्धतीने अत्याधुनिक स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली योजना अमलात आणली आहे. ही योजना आणि तिच्या फायद्यांविषयी..

पाणी म्हणजे जीवन याची ओळख नव्याने करून देण्याची गरज नाही. मात्र, पाण्याचा वापर मर्यादित असेल तरच तो आरोग्याला जसा मानतो, तीच स्थिती पिकांची आहे. मात्र, बऱ्याचवेळा वारेमाप पाणी पिकासाठी दिले जाते. यामुळे पिकांचे आरोग्य तर अडचणीत येतेच, पण याचा फटका उत्पादनालाही बसतो. मोजून मापून पाणी जर दिले तर पाण्याची बचत तर होतेच, पण याचबरोबर पिकांचे उत्पन्नही वाढते. हे ओळखून वाळवा तालुक्यातील अहिरवाडीच्या भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेने अत्याधुनिक यंत्रणा बसवली आहे. यातून पाण्याची बचत तर झालीच पण अति पाण्याच्या वापराने जमीन नापिक होण्याचा धोकाही टाळणे शक्य झाले आहे.

अहिरवाडी (ता. वाळवा) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्री भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. स्थापन केली आहे. या माध्यमातून प्रामुख्याने ऊस पिकाला संपूर्ण ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा केला जातो. यातून वीज देयकाची ४० टक्के तर पाण्याची पन्नास टक्के बचत होत आहे. यामुळे ऊस लागवड पध्दतीतही बदल झाला असून उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर द्राक्ष क्षेत्रही या स्वयंचलित ठिबक प्रणालीचा वापर करणे शक्य झाले आहे.  

सागंली जिल्ह्यातील इस्लामपूरपासून अवघ्या १० किलोमीटरवर वसलेलं अहिरवाडी गाव. तसा वाळवा पट्टा ऊस पिक घेण्यात अग्रेसर आहे. याच तालुक्यातील अहिरवाडी गाव. काही भागात अतिपाण्याऱ्या वापरामुळे क्षारपड झालेली शेती. जवळच कृष्णा नदी. दोन साखर कारखाने. यामुळे शिवारात ऊस पिकाशिवाय दुसरे पीक फारसे नाही. पण द्राक्ष ही काही प्रमाणात शेतकरी घेतात. पाण्याचा वापर कमी करून पुन्हा शेती पिकाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसते आहे.

या योजनेबाबत संस्थेचे अध्यक्ष अरुण यादव म्हणाले, की आमच्या गावाजवळ हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना आहे. कारखान्याने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य केले. या कारखान्याची २००५ साली पाटपाणी देण्यासाठी आम्ही योजना सुरू केली. सांडव्याच्या पाण्यावर ही योजना सुरू झाली. त्यावेळी एकरी ५६ हजार रुपये खर्च करून योजना सुरू करण्यात आली. शेतकरी संख्या वाढल्याने ओलिताखालील क्षेत्रही वाढले. त्यामुळे पाणी कमी पडू लागले. पाटपाणी देत असल्याने विजेचा अपुरा पुरवठा, यासह अन्य अडचणी येत होत्या. त्यामुळे याच योजनेला नवे रूप देण्याची गरज भासू लागली. त्यामुळे सन २०११ मध्ये ही योजना स्वयंचलित ठिबक प्रणालीखाली आणण्याचा विचार सुरू झाला. अनेक कंपन्यांशी संपर्क केला. ज्या ज्या कंपन्यांनी अशा पध्दतीने ठिबक प्रणाली संस्थेला जोडल्या आहेत. त्या त्या संस्थेकडे जाऊन प्रत्यक्षात पहाणी केली. त्यातील तांत्रिक गोष्टी समजावून घेतल्या. जुन्या योजनेचे नवीन योजनेत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत योजना करण्याचे ठरले. त्यावेळी या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत बदल करणार अशी चर्चा केली. मुळात आमच्या भागात अति पाण्याच्या वापराने शेती क्षारपड झाली आहे. आता कमी पाण्याचा वापर करणे गरजेचे असल्याने गावातील अजून शेतकरी संस्थेत सहभागी होऊ लागले. त्यामुळे एका युनिटवर क्षेत्र आणि शेतकरी संख्या याचा ताळमेळ लागणार नव्हता. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत आणि समान पाणी देता येईल. त्यामुळे म्हणजे दुसरे युनिट उभा करण्याचा निर्णय केला.

यादव यांनी सांगितल्यानुसार पहिली असणारी पाटपाण्याची योजना ठिबकमध्ये रुपांतर केली, तर दुसरी योजना नव्याने उभा केली. पहिल्या योजनेची पाणी साठवण टाकीवर ठिबकची यंत्रणा बसवली आहे. उसाला अति पाणी लागते अशी अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. परंतु पाण्याचा काटेकोर वापर आणि मोजून पाणी दिले की पाणी कमी लागते. सध्या इथे एकरी सुमारे एक कोटी लिटर पाणी ऊस पिकाला दिले जात आहे.  

या योजनेसाठी जवळच्या कृष्णा नदीवरुन मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. शेतकरी संख्या आणि क्षेत्र वाढल्याने युनिट एक व युनिट दोन

असे विभाजन केले आहे. यामुळे सर्व क्षेत्राला वेळेत पाणी देण्यास सोपे जाते. प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्रात पाणी चालू-बंद करण्यासाठी व्हॉल्व आहेत. व्हॉल्वच्या ठिकाणाहून पिकांना आंतरप्रवाही खत, औषधे देणे शक्य होत असल्याने यासाठी स्वतंत्र व्यवस्था, अथवा खर्च करावा लागत नाही. मनुष्यबळही कमी झाले. युनिट एकचे क्षेत्र १४० तर दोनचे १०० एकर असे एकूण २४० एकर क्षेत्र असून यापैकी उसाखालील क्षेत्र १७० आणि द्राक्षाखालील क्षेत्र १०० एकर आहे. 

आधुनिक जलव्यवस्थापनामुळे पिकांना द्यायच्या खतामध्ये २० टक्के बचत झाली तर पाण्याची ५० टक्के बचत झाली. मजुरीचा खर्चही कमी झाला असून उसाच्या लागवड पध्दतीमध्ये बदल झाला आहे. एक डोळा पध्दतीने लागवड केल्याने बियाणाच्या खर्चामध्ये ४० टक्के बचत झाली. भांगलणीचा खर्च वाचला, पाण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागत नाही. उत्पादनामध्ये एकरी १५  टनापर्यंत वृध्दी झाली.

नदीवर मोटर सुरू केली की युनिटपर्यंत एका सेकंदाला १०० लिटर पाणी येते. चार पंप असून ४० अश्वशक्तीचे दोन व २५ अश्वशक्तीचे २० असे पंप आहेत. युनिट एक मधील फिल्टर हाऊसवर २५ अश्वसक्तीचे दोन पंप युनिट दोनमधील फिल्टर हाऊसवर २० अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले आहेत. पाण्याचा दाब योग्य प्रमाणात राहावा, विसर्ग समप्रमाणात व्हावा यासाठी दाबमीटर बसविण्यात आले असून एका मिनिटात किती पाणी जाते याची माहिती मिळावी यासाठी ‘वॉटर मीटर’चा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रति एकर किती लिटर पाणी वापरले जाते याची नोंद संगणकावर शक्य होते. पाण्याचा दाब वाढला तर प्रेशर रिलिफ व्हॉल्वमुळे पुढील नुकसान टाळता येते. संगणकाशी संलग्न मुख्य व्हॉल्व बसविण्यात आल्याने संपूर्ण क्षेत्राला पाणी चालू बंद करण्यासाठी उपयोग होत आहे.

अशी आहे योजना

* योजना उभारणीचा मूळ खर्च – एकरी ५६ हजार

* नवीन योजनेचा ठिबक सिंचन संचासह खर्च – १ लाख ७० हजार प्रति एकर

* युनिट १ ची पाणीसाठवण क्षमता – दीड लाख लिटर

* युनिट २ ची पाणीसाठवण क्षमता – सव्वा लाख लिटर

* पाटबंधारे विभागाकडून पाणी परवाना – २४० एकरसाठी

* १० गुंठय़ापासून ३ एकरापर्यंतचे क्षेत्रधारक शेतकरी समाविष्ट

आमची योजना पहिल्यांदा पाटपाणी अशी होती. परंतु संपूर्ण क्षेत्राला पाणी देणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली योजना करण्याचा निर्धार केला. स्वयंचलित ठिबक यंत्रणा फायदेशीर ठरते. संस्था पातळीवर पाणी पुरवठा करताना सोपे जाते आणि समान पाणी पुरवठा करणे शक्य होते.  – अरुण यादव, अध्यक्ष, भैरवनाथ सह. पाणी पुरवठा संस्था, अहिरवाडी.

आमच्या जमिनीतील ‘सामू’चे प्रमाण (पीएच) ८ पेक्षा अधिक आहे. अति पाण्याचा वापर टाळण्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून स्वयंचलित ठिबक यंत्रणा बसवली आहे. यामध्ये ऊस पिकासह द्राक्ष लागवड केली आहे. त्यामुळे खर्चात ५० टक्के बचत झाली आहे. तर उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अनिकेत पाटील