ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासनाने रचनावादी शिक्षण पद्धती काही जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर  सुरू केली  आहे. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांना प्रामुख्याने दिली आहे. नव्या स्वयंअध्ययन पद्धतीमुळे ही योजना यशस्वी होऊ शकेल , हे सुचवणारा लेख.

२२ जून २०१५चा शासननिर्णय हा शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यावर मुलांच्या शिकण्याची जबाबदारी टाकत आहे. परिणाम असा होत आहे की, आज शाळांच्या वर्गातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि कित्येक शिक्षकांच्या मनातून उत्साहाचे वातावरण दिसत आहे. हा उत्साह, हा आनंद काही तरी सतत करण्याचा आहे, आपापल्या करण्यामधून काही तरी चांगले होत जाण्याचा आहे. महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांमधून दिसणारे हे वातावरण पाहिले की, जीवनाचा एक मूलमंत्र हाती लागतो, तो म्हणजे माणसाचा आनंद सतत काही तरी नवेनवे करण्यात आहे, न करण्यात नाही आणि याला मेंदू संशोधनाचा बळकट आधार आहे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

या निर्णयाने आजवर राहून गेलेली अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे, ती म्हणजे आजवर शिक्षकांवर केवळ शिकविण्याची जबाबदारी दिलेली होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी शिक्षकांवर नव्हती तर ती मुलांवरच होती आणि शिकविण्यात शिक्षकांचे यश सामावलेले नव्हते. मुले शिकणे यातच शिक्षकांचे यश आहे आणि हे यश आपण थोडय़ाफार प्रमाणात घेऊ लागलो आहोत, कारण २२ जूनच्या शासननिर्णयाने, मुलांच्या शिकण्याची जबाबदारी शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांना प्रामुख्याने दिली आहे.

याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांच्या स्तरावर काय घडते आहे ते पाहू. निदान चार गोष्टी तरी माझ्या अवलोकनात आल्या आहेत. एक- मुलांना आपणहून शिकायला संधी देणारी अशी रचनावादी शिक्षणपद्धती बऱ्याच जणांना एकूण आणि काही लोकांना थोडय़ाफार प्रमाणात माहीत झाली आहे. दोन- काही शिक्षक व अधिकाऱ्यांनी कुमठे बीट, वाई किंवा ग्राममंगलच्या पालघर जिल्ह्य़ातील शाळा प्रत्यक्ष पाहून तेथील काही ठळक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. तीन- कित्येक शिक्षकांनी स्वत: प्रेरित होऊन आपापल्या शाळांत रचनावादी शिक्षण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चार- आज हजारो शाळांमधून रंगविलेल्या जमिनी, रंगवलेल्या भिंती, वर्गातून हलविलेली बाके आणि भरपूर शैक्षणिक साधनांची मांडणी या सहज करता येण्याजोग्या गोष्टी मोठय़ा हिरिरीने केल्या आहेत. शिक्षण परिवर्तनाची नांदी झाल्याच्या या खुणा आहेत.

रचनावादाच्या मार्गावरील ही केवळ पहिली पायरी आहे. दुसऱ्यांचे पाहून तसे आपण करण्याला खूपच मर्यादा असतात. ती कॉपी होते. त्यातून वर्गाचे बाह्य़ रूप बदलते, आपली बदल करायला तयारी आहे, हेही इतरांना जाणवते आणि शाळेत काही चांगल्या दिशेने बदल होतोय, हे पालकांनाही कळते. गावकऱ्यांनाही कळते.

पहिल्या पायरीच्या कामाचा हा उपयोग जो होतोय तो दुसऱ्या पायरीवर चढण्यासाठी आपली मानसिक तयारी करून देणारा आहे म्हणून तो स्वागतार्ह आहे; पण या पहिल्या पायरीवरून वरच्या दुसऱ्या पायरीवर चढायचे आहे, याचे भान सर्व शिक्षकांनी ठेवणे आवश्यक आहे.

दुसरी पायरी आहे ती प्रत्यक्ष वर्गामधील शिक्षणप्रक्रिया समजावून घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करण्याची. रचनावादी शिक्षणाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. एक विद्यार्थी स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत: करीत असतो, म्हणजे स्वत:चे स्वत: शिकत असतो आणि दुसरे तत्त्व असे की, मुले कृतीतून म्हणजे करून अधिक चांगले शिकतात. याच्या आधारे मी रचनावादाची एक सगळ्यात छोटी व्याख्या केली आहे. ‘कृतिशील स्वयंशिक्षण म्हणजे रचनावादी शिक्षण होय.’ याच्या आधारे आपण एक व्यावहारिक नियम करू या. आपण असे म्हणू या की, शालेय वर्गात कृतिशील स्वयंशिक्षण होत राहिले पाहिजे.

वर्गात विद्यार्थिनी शिकत असेल तर तिला चार प्रकारचे संबंध सांभाळावे लागतात. एक- शिक्षिकेशी असलेला संबंध, दोन- इतर सहाध्यायी मित्र-मैत्रिणींशी जोडलेला संबंध, तीन- अभ्यासक्रमाशी, त्यातील विषयांशी, विषयातील आशयाशी असलेला संबंध आणि चार- वर्गातील व शाळेतील वातावरणाशी असलेला संबंध. यापैकी पहिले दोन मानवी संबंध असून दुसरे दोन भौतिक व पर्यावरणीय संबंध आहेत. या चारही संबंधांकडे ती शिकणारी विद्यार्थिनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, यावर तिच्या शिकण्याच्या प्रक्रियेची प्रत किंवा दर्जा आणि शिकण्याचे प्रमाण अवलंबून असते.

१. विद्यार्थी-शिक्षक संबंध

शिक्षकाच्या वर्गातील आवाजात मार्दवता आहे की कठोरता, शिक्षक प्रेमाने वागतो की धाक दाखवतो, शिक्षा करतो; शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मदत करतो की फक्त काही थोडय़ांनाच, शिक्षक सातत्यपूर्ण (व विद्यार्थ्यांच्या नकळत) मूल्यमापन करतो की परीक्षा (मुख्यत: लेखी) घेतो; शिक्षक विद्यार्थ्यांना हालचाल करण्याचे- बोलण्याचे स्वातंत्र्य देतो, की शिस्तीत जखडून किंवा ओळीत व बाकांत बांधून ठेवतो. शिक्षक मुलांना शिकण्यास पुरेसा अवकाश देतो, की आपल्याच वेगाने शिकवीत राहतो, अशा एक ना अनेक शिक्षकांच्या वागण्याशी संबंधित असलेल्या बाबींवर विद्यार्थिनीचा शिकण्याचा दृष्टिकोन वर्गात शिकण्याबाबत अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे ठरत असते.

२. विद्यार्थी-विद्यार्थी संबंध

रचनावादी शिक्षण व्यवहारात, विद्यार्थी-विद्यार्थी संबंधाला अनिवार्य स्थान प्राप्त झाले आहे. विद्यार्थी परस्परांच्या संपर्कातून, संवादांतून, विश्वासातून, मैत्रीतून आणि परस्परांच्या साहाय्यांतून उत्तम रीतीने शिकतात हे आता अनेकांना प्रत्यक्ष अनुभवातूनच दिसून आले आहे; परंतु अशा परस्परसंबंधातून केवळ शिकणेच चांगले होते असे नाही. ते तर होतेच, पण यातूनच विद्यार्थ्यांची सामाजिकता विकास पावते. त्यांच्यात हळूहळू सहकाराचे मूल्य विकसित होते.

रचनावादी शिक्षणातील, वर्गामधला विद्यार्थी-विद्यार्थी संबंध कसा निर्माण करायचा, कसा जोपासायचा, कसा टिकवायचा आणि कसा वृद्धिंगत करायचा याचे शास्त्रशुद्ध शिक्षण प्रत्येक शिक्षक-शिक्षिकेचे होणे गरजेचे आहे. हे शिक्षण अर्थातच शिक्षक-शिक्षक असे परस्परसंबंध बांधून, परस्परांच्या संवादांतून, शिक्षक आपले आपणच घेऊही शकतील.

३. विद्यार्थी-अभ्यासक्रम संबंध

आपण पाहिलेली आजवरची क्रमिक पुस्तके ही प्रामुख्याने वर्तनवादी विचारसरणीची सैद्धांतिक पाश्र्वभूमी राखून तयार झालेली होती; परंतु रचनावादी शिक्षण पद्धतीच्या सार्वत्रिक स्वीकारानंतर या क्रमिक पुस्तकांचे स्वरूप अधिकाधिक या दिशेने करण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत आहे. नुकतेच आलेले सहावीचे क्रमिक पुस्तक हे याच प्रयत्नांचे द्योतक आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना समजावून घेणे, अभ्यासक्रमातील अधिक वरचे घटक शिकण्याचे आव्हान घेणे, विविध घटक करून, अनुभवून शिकणे आणि त्याचबरोबर शिकले त्याची लिहून, बोलून, नाटय़ीकरण करून, उपयोगात आणून अभिव्यक्ती करण्याची संधी घेणे अशा प्रकारे अभ्यासक्रम व विद्यार्थी यांचे नाते घट्ट बांधलेले असते. शिक्षकांना, हे नाते समजावून घेणे, प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला शिकण्याच्या विविध प्रकारच्या संधी देऊन, अभ्यासक्रमाचे शिकणे विद्यार्थ्यांच्या स्वयं-शिक्षणाशी जोडणे अशा गोष्टी नव्याने करायला हव्यात. यासंबंधीचे नवे शास्त्र विकसित करायला हवे आहे.

४. विद्यार्थी-वातावरण संबंध

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणारा भोवतालचे वातावरण हा एक प्रभावी घटक आहे. शाळेचे वातावरण बंदिस्त, लादलेल्या कमालीच्या शिस्तीचे, घोकंपट्टीचे, गृहपाठाचे, लेखी परीक्षांचे, शिक्षेचे, स्पर्धा- बक्षिसाचे आणि धाकाचे, भीतीचे, कंटाळ्याचे, उदासीनतेचे अशा प्रकारचे असेल तर मुलांचे शिक्षण नीट होत नाही; परंतु आपल्या पिढय़ान्पिढय़ांचा याच प्रकारच्या शिक्षणाचा अनुभव आहे. रचनावादी शिक्षणाचे आगमन झाले आहे तेच मुळी हे वातावरण बदलण्यासाठी.

नवे शिक्षण विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्यांना नवनवे अनुभव मिळण्यासाठी व काही करायला मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरच्या जगात न्यायला हवे. आजूबाजूच्या समाजजीवनाशी त्यांचा संपर्क व संवाद व्हायला हवा. शिक्षणात अशा वर्गबाह्य़ अनुभवांचे वयोमानानुसार भिडणे, हा रचनावादी स्वरूपाच्या शालेय शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे.

शिक्षणात अशा वर्गबाह्य़ अनुभवांचे तीन अगदी ठळक असे फायदे आहेत. पहिला फायदा असा की, त्याने पूर्वज्ञानाची विस्तारित बैठक तयार होते आणि ती नवे काही शिकायला उपयुक्त ठरते. दुसरा फायदा असा की, त्याने अनुभवांधारित अशा भावी जीवनाची तयारी करून दिली जाते आणि तिसरा दैनंदिन वर्गजीवनाशी संबंधित असा फायदा कोणता असेल तर तो म्हणजे विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत रमतात, रमतात म्हणून एकाग्र होतात, एकाग्र होतात म्हणून कायमस्वरूपी शिकतात. शिवाय मुले अधिक चांगला विचार करायला शिकतात, त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि भाषाशक्ती विकसित होत जाते. शिक्षणाचे हेच तर उद्दिष्ट असते. रचनावादाच्या या तीन अवघड पायऱ्या चढून गेले तर शिक्षकांनी आपल्या कर्तव्याचा आणि कर्तृत्वाचा गड जिंकला असे म्हणता येईल!

 

रमेश पानसे 
लेखक गेली अनेक वर्षे शिक्षण चळवळीत कार्यरत आहेत.
panseramesh@gmail.com