या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| भारूकाका

‘१०० कोटी लस-मात्रा’ वापरल्या गेल्याचा उत्सव साजरा केल्यानंतर  त्याच गांभीर्याने पुढल्या आव्हानांकडे पाहायला काय हरकत आहे?

अमेरिकेसारख्या प्रगत, पुढारलेल्या देशातही सुरुवातीस मास्क आणि आता लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये विरोधाचे वातावरण असताना; भारतात मर्यादित संसाधने असूनसुद्धा बहुतेक लोकसंख्येने करोना सुसंगत आचारविचारांचे पालन केल्यामुळे करोना प्रतिबंधक लशींच्या १०० कोटी मात्रा विक्रमी कालावधीत दिल्याची अभूतपूर्व कामगिरी साध्य झाली आहे. यासाठी कार्यरत सर्व यंत्रणा अभिनंदन व कौतुकास पात्र आहेत. संपूर्ण करोनाकाळात शासन-प्रशासन पातळीवरचा अधूनमधून झालेला गोंधळ वगळता उशिराने का होईना परंतु अचानक जाहीर झालेला कडकडीत लॉकडाऊन ते आताची १०० कोटी लस-मात्रा देण्याची विक्रमी कामगिरी हा प्रवास करोना महामारीशी निकराची झुंज देताना काहीसा दिलासा देणारा आहे. एकूणच लोकसंख्येचा आवाका बघता इतर अनेक प्रगत देशांमध्ये जितकी जीवितहानी झाली तितकी भारतात झाली नाही हीदेखील एक जमेची बाजू आहे.

अमेरिका, इंग्लंड व रशियामध्ये आजच्या घडीला (२२ ऑक्टोबर) सर्वात जास्त उपचाराधीन रुग्णसंख्या अनुक्रमे ९५, १४ व आठ लाखांच्या वर असताना आपला देश १.७५ लाख उपचाराधीन रुग्णसंख्येसह १२ व्या क्रमांकावर आहे. याशिवाय अमेरिकेत दैनंदिन मृत्युसंख्या गेले काही दिवस २००० च्या आत-बाहेर आहे तर रशियात १००० च्या आसपास आहे. इंग्लंडमध्ये दैनंदिन मृत्युसंख्या २०० च्या आत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या ४० हजारांच्या वर असल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण पडून मृत्युसंख्या वाढण्याचा धोका तिकडेही आहेच. या पार्श्वभूमीवर भारत आज तरी सुस्थितीत आहे असेच म्हणावे लागेल.

पण म्हणून तिसऱ्या लाटेचा धोका किंवा एकूणच करोना संपला असे म्हणणे दुसऱ्या लाटेसारख्या आणीबाणीला आमंत्रण दिल्यासारखे होईल. कारण एक तर लसीकरणाचा ‘१०० कोटी मात्रांचा’ आकडा म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यात अनेक जण गफलत करीत आहेत. ‘१०० कोटी मात्रा’ की ‘१०० कोटी लोकांचे लसीकरण’ ही आकड्यांची संदिग्धता टाळता आली असती. शासन पातळीवर म्हणाल तर ही गफलत व्हावी अशीच बहुधा मनीषा असावी अशी शंका येते. कारण मग बहुधा ‘१०० कोटींचा अर्धा ग्लास भरल्याचा’ उत्सव कसा साजरा करता आला असता?

हा खेळ आकड्यांचा…

करोना हा सुरुवातीपासूनच आकड्यांचा खेळ नसला तरी विषय राहिलेला आहे. करोनासंबंधी काहीही सांगताना, लिहिताना रुग्णसंख्या, मृत्युसंख्या, मृत्यू-दर, ‘आर’ व्हॅल्यू, पॉझिटिव्हिटी रेट आणि एकंदरच संख्या, दर, टक्केवारी या स्वरूपातील माहिती दिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. यात करोना प्रतिबंधक लशीच्या एकूण मात्रा आणि एकूण व्यक्तींचे लसीकरण यात घोळ झाला नसता तरच नवल! शासकीय पातळीवर सतत मात्रांचा हिशेब मांडला जात असला तरी इतर अनेक ठिकाणी ‘१०० कोटींचे लसीकरण’ असा सरसकट उल्लेख बघायला मिळतो. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांनीसुद्धा १०० कोटी लोकांचे लसीकरण झाल्याचा उल्लेख पत्रकार परिषदेत केला. खऱ्या अर्थाने करोना नियंत्रणात आणायचा असल्याने नेमके किती लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले यात कोणताही गोंधळ, दिशाभूल असता कामा नये म्हणून ही आकड्यांची चिकित्सा आवश्यक ठरते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या दि. २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या कोविन या संकेस्थळावरील प्रसारित आकडेवारीनुसार, १०० कोटी मात्रांच्या (पूर्ण) संख्येत पहिली मात्रा घेणाऱ्याची संख्या ७१ कोटी आहे तर दोन मात्रा घेणाऱ्याची संख्या २९ कोटी आहे, आणि १०० कोटी मात्रांचा विक्रमी आकडा या बेरजेतून आला आहे. आपले उद्दिष्ट अंदाजे १३० कोटी लोकसंख्येला (१८ वर्षांवरील प्रौढ + १८ वर्षांखालील मुले) लसीकरण करण्याचे आहे, आणि या १०० कोटी मात्रांमधून किती लोकसंख्येचे कसे लसीकरण झाले हे जास्त महत्त्वाचे आहे.

यात गंमत पहिली मात्रा घेणाऱ्या ७१ कोटी या संख्येत आहे; कारण या एकूण ७१ कोटींत २ मात्रा घेणाऱ्याची २९ कोटी ही संख्याही समाविष्ट आहे! म्हणजे मग १३० कोटींपैकी २ मात्रा घेऊन संपूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या २९ कोटी आहे तर केवळ १ मात्रा घेणाऱ्याची संख्या ४२ कोटी आहे.

लशीच्या १०० कोटी मात्रांचा पल्ला आपण जरी गाठला असला तरी देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण व्हायचे असेल तर १३० ७ २ = २६० कोटी मात्रा द्याव्या लागतील व त्या हिशेबाने अजून आपण अर्धा टप्पाही गाठलेला नाही याची नोंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

उर्वरित ५९ कोटी लोकसंख्येला ११८ कोटी मात्रा + फक्त १ मात्रा घेतलेल्या लोकसंख्येला अजून ४२ कोटी अशा एकूण १६० कोटी मात्रा द्याव्या लागतील. सध्या सरासरी दिवसाला ६० लाख मात्रा दिल्या जात आहेत. हाच वेग गृहीत धरला तरी यासाठी जवळपास आठ ते नऊ महिने जावे लागतील.

(या  ५९ कोटी लोकसंख्येत बहुतांशी १८ वर्षांखालील संपूर्ण लोकसंख्या व १८ वर्षांवरील उर्वरित प्रौढ आहेत. लहान मुलांनाही करोनाचा धोका संभवू शकतो हे गृहीत धरल्यास अंतिमत: आपले उद्दिष्ट संपूर्ण ५९ कोटी लोकसंख्येच्या लसीकरणाचेच असेल.)

लसीकरणानंतर करोनाची तीव्रता अनेक पटींनी कमी होते ही दिलासादायक बाब आहे व म्हणूनच संपूर्ण लसीकरण होण्यासाठी लागणारे आठ-नऊ महिने अतिशय महत्त्वाचे व निर्णायक ठरणार आहेत. हा कालावधी मोठा असून तोवर सगळ्यांनाच तारेवरची कसरत करावी लागणार; या गोष्टीची नोंद व्यक्तींपासून ते शासन यंत्रणेपर्यंत सर्वांनीच घ्यावी यासाठी हा ‘आकडे प्रपंच’ समजून घेणे अगत्याचे आहे, नाही तर यंदाच्याच फेब्रुवारी महिन्यासारखी ‘नजर हटी की दुर्घटना घटी’ अशी गत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जगभरातील अनेक देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या व मर्यादित नव्हे तर तुटपुंज्याच आरोग्य सुविधांच्या मानाने करोनाचा प्रभाव बऱ्यापैकी आटोक्यात राहिला, ही बाब आपल्या पथ्यावरच पडली आहे यात शंकाच नाही. करोना येऊन आता बराच काळ उलटला आणि आपण का वाचलो याची अभ्यासपूर्ण कारणे शोधण्याची फारशी कोणी तसदी घेतली नसली तरी लॉकडाऊन आणि आजवरच्या लसीकरणाने कमावलेले, पुन्हा येरे माझ्या मागल्या व गाफीलपणात राहून गमावणे कोणालाच परवडणारे नाही.

तपशिलांकडेही लक्ष हवे!

लशींच्या मात्रा व लोकसंख्येच्या लसीकरणाचे आकडे यात मोठा घोळ नसला तरी स्पष्टता येणे गरजेचे आहे. जशी मात्रांची संख्या प्रसारित केली जाते त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या लोकसंख्येची आकडेवारी त्यासोबतच प्रसारित केल्यास लसीकरणासंबंधी दिलेल्या माहितीत अधिक स्पष्टता येऊ शकेल. करोना आल्यानंतरच्या २० महिन्यांतअशा प्रकारच्या सविस्तर तपशिलांकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे. मुळात या आणि अशा गोष्टींचे गांभीर्यच आपल्या यंत्रणांना नसल्याचे अनेकदा अनुभवास येते. परंतु या दुर्लक्षित बाबींमुळेच अनेकांचे जे जीव कदाचित वाचले असते ते गेलेत. निदान यापुढे तरी यंत्रणा जागरूक राहून प्रत्येक जीव वाचावा यासाठी प्रयत्न करतील, अशी आशाच फक्त आपण ठेवू शकतो. आजही  ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठा’त अनेक दिशाभूल करणारे अवैज्ञानिक तर्क-वितर्क प्रसारित केले जात आहेत. तर काही आरोग्यकर्मींमध्येच लशीविषयी संशयाचे वातावरण असल्याचे प्रत्यक्ष बघायला मिळाले.

एकीकडे देशच नव्हे तर अख्खे जग करोनाच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी  प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना काही स्वयंघोषित ‘शहाणी’ मंडळी या सर्वांवर पाणी फिरवण्याचे काम करीत आहेत; याविषयीची तक्रार खुद्द प्रधानमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत करूनसुद्धा कारवाई काय? तर शून्य! लसीकरणासारख्या मुद्द्यावर कोणी काही चुकीच्या व आक्षेपार्ह गोष्टी संबंधितांच्या लक्षात आणून देत असेल तर त्याचे गांभीर्य कोणालाच नसावे? विशेष म्हणजे लस घेणे न घेणे याचा सरळ संबंध एखाद्याच्या जीविताशी असताना कोणालाच त्याची काही पडलेली नाही, ही बाब अक्षम्यच म्हणावी लागेल… मानवी जीवनावर आलेले करोनाचे संकट संपूर्णपणे नियंत्रणात यावे यासाठी ‘१०० कोटी लस-मात्रांचा टप्पा ओलांडताना’ निदान येणाऱ्या काळात तरी अशा बाबींची गंभीर दखल घेतली जावी अशी अपेक्षा करणे वाजवी ठरेल.

१०० कोटी की १३० कोटी?

भारताची लोकसंख्या-१३० कोटी(अंदाजे*)

  दि. २१/१०/२०२१ रोजीची आकडेवारी(पूर्ण कोटींच्या संख्येत)

फक्त १ मात्रा घेतलेली लोकसंख्या  ४२ कोटी (३२ टक्के)

२ मात्रा घेऊन संपूर्ण लसीकरण झालेली लोकसंख्या २९ कोटी ( २३ %)

फक्त १ मात्रा + संपूर्ण लसीकरण (२ मात्रा) झालेली लोकसंख्या ७१ कोटी (५५ %)

लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेली लोकसंख्या ५९ कोटी (४५  %)

* (संपूर्ण लसीकरण झाले तर कदाचित जनगणना न करताच देशाची अचूक लोकसंख्या कळू शकेल !)

लेखक ‘भारूकाका’ याच नावाने सामाजिक विषयांवर लेखन करतात. ईमेल : info@bharukaka.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection 100 crore vaccination in india congratulations and appreciation akp
First published on: 24-10-2021 at 00:18 IST