राज्यघटनेची सांस्कृतिक जाणीव!

भारतीय राज्यघटनेची रचना अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध झाली आहे.

|| मधु देवळेकर

भारतीय संविधान दिन २६ रोजी साजरा होत असताना राज्यघटनेच्या  वैशिष्ट्यांचे स्मरण केले जाईल. परंतु घटना समितीचे सदस्य वा तत्कालीन नेत्यांची सांस्कृतिक जाणीव घटनेच्या अधिकृत- हस्तलिखित प्रतीमधून व्यक्त झाली, हा पैलू बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो…

२६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला म्हणून तो ‘प्रजासत्ताक दिन’ हे साऱ्यांनाच माहीत असते. परंतु या प्रजासत्ताकाची रूपरेषा ज्या संविधानाने किंवा राज्यघटनेने ठरवली, ते संविधान आपण- भारतीय लोकांनी- ‘अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण’ करण्याचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९! त्यामुळे येत्या शुक्रवारी, भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. 

 भारतीय राज्यघटनेची रचना अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध झाली आहे. भारतीय राज्यघटनेचा खर्डा किंवा मसुदा, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीकडून स्वीकारला गेला. या घटना समितीने १६६ दिवस काम केले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस एवढा कालावधी लागला. ‘‘घटना समितीने सुचविलेली भारतीय राज्यघटना संमत करावी.’’ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला एका ओळीचा प्रस्ताव, विस्तृत चर्चेअंती टाळ्यांच्या गजरात संमत केला गेला. त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीत डॉ. आंबेडकरांनी केलेले भाषण आजही मननीय ठरते. ‘‘२६ जानेवारी १९५० रोजी भारत एक प्रजासत्ताक देश बनू पाहत आहे. या दिवसापासून देशातील नागरिकांना स्वत:चे, स्वत:ने चालवलेले, स्वत:साठीचे सरकार मिळणार आहे. माझ्या मनामध्ये एक शंका जरूर उद्भवत आहे – या देशाच्या सार्वभौम राज्यघटनेचे पुढे काय होईल? दुसरी शंका- हा देश सार्वभौम राज्यघटना जपू शकेल की परत हरवून बसेल? या दोन्ही शंका माझ्या मनात काहूर उठवत आहेत.’’

आपला असा समज असतो की, भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ नियम व कायदेशीर भाषेचा दस्तऐवज असेल. प्रत्यक्षात भारतीय राज्यघटना हा भारताच्या सांस्कृतिक- सामाजिक वाटचालीचाही मूलाधार ठरणार आहे, हे ओळखूनच भारतीय संस्कृतीची प्रतीके ठरणाऱ्या अनेक चित्रांचा समावेश या राज्यघटनेच्या अधिकृत प्रतीमध्ये केलेला आहे याची अनेकांना कल्पना नसते. कलाचार्य नंदलाल बोस व शांतिनिकेतनमधील अन्य कलाकारांनी सुशोभित केलेली राज्यघटनेची ही कलात्मक प्रत छापलीही गेली आहे. दिल्लीचे रायजादा ब्रिजबिहारी नारायण यांचे सुपुत्र प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी इंग्रजी कर्सिव्ह लिपीमध्ये एकहाती तयार केलेली, त्या काळच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या मूळ स्वाक्षऱ्या असलेली ही अत्यंत मौल्यवान प्रत डेहराडूनच्या ‘सव्र्हे ऑफ इंडिया’च्या सरकारी छापखान्यात विशेष प्रकारे छापून घेतली गेली. या प्रतीचे प्रत्येक पृष्ठ भारतीय ढंगाच्या सुंदर वेलबुट्टी बॉर्डरने, अनेकरंगी छपाईने सुशोभित आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला भारताचा सांस्कृतिक इतिहास दर्शविणारी, नंदलाल बोस व त्यांच्या शिष्यांनी रेखाटलेली रेखाचित्रे आहेत.

प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी राज्यघटनेच्या इंग्रजी आवृत्तीच्या सुंदर हस्तलिखिताचे काम २८ नोव्हेंबर १९४९ ते एप्रिल १९५० या पाच महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले. सुंदर हस्ताक्षरांत लिहून तयार झालेली पाने सुशोभित व चमकदार करण्याचे काम शांतिनिकेतनमधील सुप्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांनी चार वर्षांत पूर्ण केले. नंदलाल बोस यांनी मोहेंजोदारो कालखंडापासून सुरू होणाऱ्या भारतीय इतिहासातील, वैदिक व पौराणिक कालखंडांतील आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रसंगांची रेखाचित्रे काढली. सदर सचित्र आवृत्तीच्या पानांवर चारही बाजूंच्या मोकळ्या जागांमध्ये खऱ्या सोन्याच्या वर्खाचा मुलामा देण्यात आला. २११ पानांमध्ये कला आणि इतिहास यांचे एकत्रित सादरीकरण करण्याच्या कौशल्यपूर्ण कामगिरीसाठी त्या काळात नंदलाल बोस व सहकाऱ्यांना २१००० रुपये एवढ्या रकमेचा मोबदला देण्यात आला.

तत्कालीन ‘पार्लमेंट सचिवालया’ने घटना समितीकडून या प्रकल्पाचा ताबा २६ जानेवारी १९५० रोजी घेतला. तेव्हापासून सदर अद्भुत दस्तऐवज पुढील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा म्हणून जतन करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेची सुंदर हस्ताक्षरांत लिहिलेली, सुशोभित केलेली सचित्र मूळ प्रत नवी दिल्ली येथील संसद भवनात ग्रंथालय कक्षामध्ये पहिल्या मजल्यावर एका पेटीत सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

सदर आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली काही रेखाचित्रे अशी :

 मोहेंजोदारो कालखंड – मोहेंजोदारो शिक्क्यांवरील सजावट; वैदिक कालखंड – वैदिक गुरुकुलाचे दृश्य; पौराणिक कालखंड – रामायणामधील प्रसंग (लंकेवर विजय व सीतेची प्राप्ती) तसेच महाभारतामधील प्रसंग (अर्जुनाला गीतोपदेश करताना श्रीकृष्ण); महाजनपद व नंद कालखंड – गौतम बुद्धाच्या जीवनामधील प्रसंगाचे चित्र, तसेच जैन धर्मसंस्थापक महावीराच्या जीवनातील प्रसंगाचे चित्र; मौर्य कालखंड – सम्राट अशोकाद्वारे भारत व इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार दर्शविणारा प्रसंग; गुप्त कालखंड – गुप्तकलेमध्ये रेखाटलेला प्रसंग, त्याचा विविध काळांमध्ये झालेला विकास, प्राचीन नालंदा विद्यापीठ, तसेच विक्रमादित्याच्या राजदरबारामधील प्रसंगाचे चित्र; मध्ययुगीन कालखंड – ओडिशा येथील शिल्पकलेत दर्शविलेला प्रसंग, चोल शैलीतील नटराजाची प्रतिमा, महाबलीपुरम येथील गंगावतरण शिल्प, मुघल कालखंड – अकबराचा गुणग्राहक दरबार व मुघल स्थापत्यशास्त्र; शिवाजी व गुरू गोविंद सिंग; ब्रिटिश कालखंड – टिपू सुलतान व राणी लक्ष्मीबाई, गांधीजींची दांडीयात्रा, गांधीजींची दंगलपीडित नोआखालीमधील पदयात्रा तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद फौज.

ही रेखाचित्रे पाहिल्यावर या हस्तलिखित आवृत्तीमागील पाश्र्वभूमी समजून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही रेखाचित्रे भारतीय राज्यघटनेच्या सचित्र आवृत्तीमध्ये का समाविष्ट करण्यात आली? यामागील उद्देश काय होता? कारण भारतीय राज्यघटनेमध्ये कोठेही आपल्या दिव्य परंपरेविषयी व नागरी संस्कृतीविषयी उल्लेख नव्हता. कदाचित घटनानिर्मात्यांची सांस्कृतिक जाणीव अधोरेखित करण्यासाठी या रेखाचित्रांचा समावेश सदर आवृत्तीमध्ये केला असावा!

 लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. mydeolekar@yahoo.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cultural awareness of the constitution indian constitution republic of india akp

Next Story
भिंद्रनवाले स्मृतिभवन : ४ महिन्यांपूर्वी!
ताज्या बातम्या