scorecardresearch

नकाराला भिडताना

नकाराला होकारात बदलत केलेला भूपाली निसळ यांचा हा प्रवास भारावून टाकणारा आहे, म्हणूनच त्या आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’. 

नकाराला भिडताना
भूपाली निसळ

मोहनीराज लहाडे

मोठय़ा बहिणीच्या मृत्यूस न्याय देण्यासाठी लढलेला दीर्घकालीन न्यायालयीन लढा. त्यासाठी स्वत: अभियंता असतानाही ‘मेडिको-लीगल’चा अभ्यास करून खटल्याला मदत करणे, या स्वानुभवावर पीडितांना उमेद देण्यासाठी ‘नकाराला भिडताना’चे राज्यभर प्रयोग करणे, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या ७०० कामगारांसाठी चालू ठेवलेला उद्योग, त्यातून त्यांचे उद्योजक म्हणून उभे राहाणे, मोफत अभ्यासिका उभारणे, मुलगी दत्तक घेऊन एकल-पालकत्व निभावणे.. नकाराला होकारात बदलत केलेला भूपाली निसळ यांचा हा प्रवास भारावून टाकणारा आहे, म्हणूनच त्या आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’. 

मनाला एखादी गोष्ट प्रामाणिकपणे पटली, की ती मन:पूर्वक, पूर्ण ताकदीनिशी करायची. त्यातून गुणवत्ताच दिसली पाहिजे. मागे वळून पाहताना पुन्हा त्याबद्दल कधी अपराधीपणाची भावना निर्माण होता कामा नये, भूपाली सुधाकर निसळ यांचा हाच स्वभाव त्यांना पुढील सर्व संघर्षांच्या वाटचालीत उपयोगी ठरला. शालेय जीवनात राज्यस्तरीय क्रिकेट खेळाडू, तबला विशारद अशी त्यांची ओळख तयार झाली होती. ‘एरॉनॉटिक्स इंजिनीअर’ होण्यासाठीचा अभ्यासही सुरू झाला होता, पण त्याचवेळी आयुष्यात अचानक वादळे निर्माण झाली. त्यांनी ती फक्त यशस्वीपणे पेललीच नाही, तर त्यावर मात करत आपला प्रवास इतरांसाठीही प्रेरणादायी ठरवला.

वडील सुधाकर निसळ बांधकाम व्यावसायिक, तर आई औषध विक्रीचे दुकान चालवायची. बहीण दीपालीचे लग्न झाले तरी ती आणि भूपाली यांच्या नात्यातील वीण अगदी घट्ट होती. दरम्यान, दीपालीला तिचा पती त्रास देतोय, याची कल्पना कुटुंबाला आली होतीच, मात्र १९९५ मध्ये अचानक एका रात्री, दीपालीने आत्महत्या केल्याची बातमीच येऊन धडकली. दीपाली आत्महत्या करेल, यावर कोणाचा विश्वासच बसेना. शवविच्छेदन अहवालाने तर सुधाकर निसळ यांचा संशय बळावला. बाप-लेकीने न्याय मिळवण्याचा निर्धार केला. खटला चालू झाला. डोक्यातील अंतर्गत भागात जखमा कशामुळे होऊ शकतात, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या आघाताने, कशा होतात, याचा अभ्यास भूपाली यांनी सुरू केला. वैद्यकीय न्यायनिवाडे, पुस्तके वाचली, तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती मिळवली. ती सरकारी वकिलांनाही पुरवली. अखेर त्यांच्या दीर्घ प्रयत्नांना यश आले. ‘त्याला’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. परंतु हा लढा एवढय़ात संपणारा नव्हता. काही काळाने शिक्षा भोगणारा ‘तो’ पॅरोलवर बाहेर आला होता. भूपाली यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यातच तो फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू झाले. या सगळ्यांचा प्रचंड ताण येऊन त्यातच सुधाकर निसळ यांचे निधन झाले. आणि महिन्याभराने आणखी एक धक्कादायक बातमी कळली, ती म्हणजे उच्च न्यायालयातील अपिलात ‘त्याची’ मुक्तता झाल्याची. त्यावेळी भूपाली यांचे वय फक्त २६ वर्षे होते.

या खटल्यादरम्यान पुण्यातील न्यायालयात चालू असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या इतर खटल्यांतील पीडित स्त्रियांवरील अन्याय, वेदना भूपाली यांच्या संवेदनशील मनाला जाणवू लागली. त्यातूनच त्यांनी ‘नकाराला भिडताना..’ हा स्वत:च्या अनुभवांच्या सादरीकरणाचा प्रयोग सुरू केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याचे सादरीकरण झाले, अजूनही होत आहेत. आपल्या लढय़ातून पीडितांना अन्यायाविरुध्द उभे राहण्याचा मार्ग दिसावा, एवढीच भूपाली यांची अपेक्षा आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

दरम्यान आणखी एक आव्हान त्यांची वाट पाहात होते,  वडिलांच्या अंत्यविधीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या बांधकाम व्यवसायातील त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे ७०० कामगार निसळ यांच्या घरापुढे जमले. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. भूपाली यांनी त्याच दिवशी बाबांचे ऑफिस उघडले आणि कामाला सुरुवात केली  २००५ ते २००७ दरम्यान त्यांनी बाबांची सर्व कामे पूर्ण केली.  कामगारांना पर्यायी कामे मिळवून दिली आणि  बाबांनी ज्या स्वाभिमानाने व्यवसाय उभा केला होता, त्याच मानाने त्यांनी तो बंद केला. 

आता स्वत:च्या अभ्यासाचा उपयोग करून काही करायला हवे, याची गरज निर्माण झाली. हाताशी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी होतीच. परंतु मध्ये बराच काळ गेल्याने, नव्याने सुरुवात करावी लागणार होती. त्यांनी बंगळूरुस्थित संस्थेसाठी सव्‍‌र्हेअरचे काम सुरू केले. काम फिरतीचे होते. परंतु त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या यंत्रांची माहिती मिळणार होती. काही दिवसातच नगरच्या ‘एमआयडीसी’मध्ये एक छोटेसे युनिट विकण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. परंतु ते घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, म्हणून ते भाडय़ाने घेतले. काम मिळवण्यासाठी फिरल्या, परंतु एक मुलगी यंत्रावर काम करते, हेच अनेकांना अविश्वसनीय वाटत होते, काम मिळण्यात अडचणी जाणवत होत्या. बाबांची ओळख तर वापरायची नव्हती. ‘माझी गुणवत्ता पाहा, मग काम द्या,’ असा भूपाली यांचा आग्रह होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर लोखंडी रिंग्स तयार करण्याचे काम मिळाले. ते ऑर्डर देणाऱ्याच्या पसंतीस उतरले. सुरुवातीला कामगार ठेवणे परवडत नव्हते. त्यामुळे त्या स्वत:च यंत्रावर काम करीत. अनेकदा त्या छोटय़ाशा युनिटमध्येच रात्र काढावी लागे. कष्टाच्या आधारावर त्यांना कामे मिळू लागली, मशीन शाफ्ट बनवण्याचे ‘डीएसएन इंटिग्रेट’ हे छोटे युनिट २०० चौरस फुटांचे होते. आता ते ९ हजार चौरस फूट जागेत स्थलांतरित झाले असून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

दरम्यान, आणखी एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. विवाह न करता एका लहान मुलीला दत्तक घेऊन एकल पालकाची भूमिकाही भूपाली सक्षमतेने निभावत आहेत. मुलगी सृजन आता अकरा वर्षांची आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या ‘अनादिसिध्दा’ आणि ‘कल्लोळतीर्थ’ या दोन कादंबऱ्यांमुळे त्या लेखिका म्हणूनही प्रस्थापित होत आहेत. त्यांचे पुढचे पाऊल म्हणजे बहीण दीपालीच्या स्मृती जतन करण्यासाठी ‘दीपाली निसळ स्मृती प्रतिष्ठान’ची स्थापना. प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. त्यात १६ हजार पुस्तके माफक शुल्कासह वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तर शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थीसाठी मोफत अभ्यासिकाही प्रतिष्ठान चालवते. तसेच सामाजिक, कला व नाटय़ क्षेत्रातील तरुणांच्या प्रोत्साहनासाठी पुरस्कारही सुरू केले आहेत. लढल्याशिवाय काही मिळत नाही, ही बाबांची शिकवण त्यांनी लक्षात ठेवली. चाकोरीबाहेरचे निर्णय घेताना त्याचे परिणाम पेलण्याचीही तयारी ठेव, ही आईची शिकवण त्यांना आजही प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतानाच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुभेच्छा.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या