scorecardresearch

द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध!

तासगाव तालुक्यातील वडगावच्या विजय देसाई या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची १३ एकर द्राक्ष बाग आहे.

द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध!
(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

द्राक्षभूमी असलेल्या तासगावमधील कष्टाळू शेतकरी केवळ पारंपरिक शेतीमध्ये रममाण न होता, सतत नवीन प्रयोग करण्यात मग्न असतो. याच भूमीतील विजय देसाई यांनी द्राक्षाची नवीन जात विकसित केली आहे. ‘व्हीएसडी सिडलेस’ अशी ओळख मिळालेल्या या जातीमध्ये अधिक रोगप्रतिकार शक्ती, गोडी बरोबरच अव्वल टिकाऊपणा आणि तब्बल साडेसहा सेंटिमीटरहून लांब मणी ही वैशिष्टय़े आहेत. या जातीला भारत सरकारचे स्वामित्व प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

द्राक्षभूमी असलेल्या तासगावमधील कष्टाळू शेतकरी केवळ पारंपरिक शेतीमध्ये रममाण न होता, सतत नवीन प्रयोग करण्यात मग्न असतो. अगदी द्राक्षवेलीच्या झाडाला सलाइनच्या बाटलीने ठिबक सिंचन करीत असतानाच द्राक्षाची नवीन जात विकसित करण्यापर्यंत शेतकरी प्रयत्नशील असतो. अशाच प्रयत्नात वडगावच्या विजय देसाई यांनी द्राक्षाची नवीन जात विकसित केली असून रोगप्रतिकार शक्ती अधिक, गोडी बरोबरच टिकाऊपणामध्ये अव्वल असलेली अडीच इंचाहूनही म्हणजे साडेसहा सेंटिमीटर अधिक लांब मणी असलेली व्हीएसडी सिडलेस ही जात संशोधित केली असून या जातीला भारत सरकारचे स्वामित्व प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

तासगावच्या बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळाले. आता केवळ बेदाणा उत्पादनावरच विसंबून न राहता बाजारपेठ नजरेसमोर ठेवून येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. बदलत्या हवामानाचा द्राक्ष शेतीवर प्रतिकूल परिणाम झाला असला, तरी यातूनही जिद्दीने बाजारात चांगला माल पाठवला तर निश्चितच ग्राहकांकडून चांगले स्वागत तर होतेच पण त्याच खर्चात अधिक उत्पादन मिळण्याची हमीही मिळू शकते. हा येथील शेतकऱ्यांचा स्वानुभव. याच अनुभवाच्या जोरावर सतत नवीन काही मिळते का याचा शोध चालू असतो.

तासगाव तालुक्यातील वडगावच्या विजय देसाई या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची १३ एकर द्राक्ष बाग आहे. सुपर सोनाका जातीच्या बागेमध्ये आठ वर्षांपूर्वी एका वेलीला प्रमाणापेक्षा अधिक लांबीचे मणी आढळून आले. प्रारंभीच्या काळात त्याचे वेगळेपण जोपासत नवीन ठिकाणी काडीतून लागवड केली असता ही जात वेगळीच असल्याचे लक्षात आले. त्यातून या नवीन वाणाची उत्पत्ती समोर आली. या वेलीला केवळ लांब मणीच असतात असे नाही तर अन्नद्रव्य तयार करणारी पानेही लांबट, तजेलदार आणि गडद हिरव्या रंगाची असतात. आता या जातीची चार एकर बाग तयार करण्यात आली आहे. 

साडेसहा सेमी मण्याची लांबी असलेल्या द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला होता. आता द्राक्षाच्या या नव्या जातीला भारत सरकार कडून ‘व्हीएसडी सिडलेस’ या जातीचे स्वामित्व प्रमाणपत्र (पेटंट) मिळाले आहे. १४ जुलै २०२० रोजी विजय देसाई यांनी पेटंट साठी अर्ज दाखल केला होता. जास्त रोगप्रतिकारक क्षमता, जास्त गोडी, कमी खर्चात जास्त उत्पादन ,  मोठी पाने आणि मण्यांची विक्रमी साडेसहा सेमी लांबी ही या द्राक्षाच्या जातीची वैशिष्टय़े आहेत. एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानेच स्वत:च्या अनुभवातून शोधून काढलेल्या या द्राक्षाच्या नवीन वाणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आणखी एक द्राक्षाचा वाण उपलब्ध झाला आहे.

बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जेवढा मणी लांबट असतो, त्या मालाला दरही चांगला मिळतो, उठावही जलद होतो. या नवीन जातीचा माल लांबट तर आहेच हे वेगळे वैशिष्टय़ तर आहेच, पण याचबरोबर टिकाऊपणातही  हा माल अव्वल ठरला आहे. बांगला देशात गेल्या हंगामात या मालाची पाठवणी केली असता, प्रवासातील पाच दिवस आणि बाजारातील दोन दिवस असा सात दिवसांच्या वेळेनंतरही मालाची गुणवत्ता कायम राहत असल्याचे दिसून आले. जसा माल पाठवला त्याच गुणवत्तेवर बाजारात सात दिवसांच्या विलंबानेही दिसत होता. माल मऊ पडण्याची प्रक्रियाच विलंबाने होत असल्याने ताजा माल मिळाल्याचे समाधान ग्राहकांना मिळत असल्याचे दरही चांगला मिळतो. देसाई यांच्या या वाणाची द्राक्षे मुंबई, चेन्नई, राजकोट, दिल्ली बाजारात विकली गेली. सर्वसाधारणपणे सुपर सोनाका, सोनाका, तास ए गणेश या जातीना मिळणारा चार किलोचा दर ४०० रुपयांपर्यंत असला, तरी नवीन जातीला ४५० पासून ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. द्राक्षामध्ये शर्करेचे प्रमाण २० ब्रिकस् पर्यंत असल्याने गोडीही चांगली मिळत आहे.

कोणतीही द्राक्षबाग लागवडीसाठी एकरी आठ ते नऊ लाख रुपये भांडवली गुंतवणुकीसह खर्च येतो. त्याच पद्धतीने या बागेची लागवड करण्यासाठी खर्च येत असला तरी या जातीवर अन्य जातीपेक्षा करपा, दावण्या, भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण कमी आहे. ही जात बुरशीजन्य रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. यामुळे औषधावरील खर्च कमी होतो. याचबरोबर अन्य जातीच्या द्राक्ष मण्यांची लांबी वाढविण्यासाठी करावा लागणारा जीएवरील खर्च, पीजीआर वरील खर्चही कमी आहे. पहिल्या वर्षी भांडवली गुंतवणूक  केल्यानंतर दर वर्षी येणारा खर्च सरासरी एकरी दोन ते अडीच लाख रुपये  असून यातून मिळणारे उत्पन्न एकरी १५ ते २० टन आहे. प्रत्येक वेलीला चार पेटी उतारा मिळत असून दर चांगला मिळत असल्याने उत्पन्नही चांगले मिळते. घरातील शीतकपाटात या जातीची द्राक्षे ठेवून प्रयोग केला असता त्याचा टिकाऊपणा दीड महिन्यापर्यंत कायम राहत असल्याचे दिसून आल्याचे देसाई यांनी सांगितले.

या जातीच्या द्राक्षापासून बेदाणा निर्मिती अद्याप केली नाही. कारण बाजारातच दर चांगला मिळत असल्याने बेदाणा निर्मितीची गरज भासलेली नाही. तरीसुद्धा खारीकप्रमाणे या जातीचा बेदाणा तयार होऊ शकेल असा विश्वास आहे. त्या दृष्टीने भविष्यात प्रयोग करण्याचा मानस असल्याचे देसाई यांनी सांगितले.

एक वेगळा प्रयोग म्हणून या द्राक्षाला बाजारात मागणीही चांगली आहे. खाऊ ग्राहकांना ताजा आणि गुणवत्तापूर्ण व गोडीला सरस असलेला माल देण्याची गरज या मालाच्या रूपाने पूर्ण होणार आहे. नवीन जात असल्याने अगोदर स्वत:च्या बागेत प्रयोग केला. तो यशस्वी झाल्यानंतर स्वामित्व प्रमाणपत्र मिळवले. आता व्हीएसडी सिडलेस या जातीच्या लागवडीसाठी अन्य शेतकऱ्यांना द्राक्षकाडय़ा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

विजय देसाई.

digambar.shinde@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.