दिवाळी हा झगमगता, प्रकाशाने उजळून जाणारा उत्सव. हा लखलखाट प्रत्येकाच्याच आयुष्यात नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा निर्माण करतो. मग सिनेमा, नाटके, मालिका यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले कलाकार यापासून दूर कसे राहतील? आपल्या कलाविष्कार, अभिनयाच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात ताऱ्यासारखे चमकत राहणाऱ्या मराठी कलाकारांचे यंदाच्या दिवाळीत काय बेत आहेत, याविषयी कलाकारांनीच दिलेल्या प्रतिक्रिया..

दिवाळीविषयी सांगायचं झालं तर लहानपणीची दिवाळी जास्त आठवते, कारण तेव्हा किल्ला करायचो, फराळ खायचो, फटाके वाजवण्याची मजा वाटायची. लहानपणी दिवाळीची आठवण म्हणजे किल्ला करणे, भाऊबीज, फराळ या गोष्टींची जास्त आहे. गेल्या काही वर्षांतली दिवाळी कामात जास्त गेली, कारण मी नाटकांचे प्रयोग जास्त करत होते. सुट्टीच्या दिवशी प्रयोग जास्त असतात त्यामुळे मी दिवाळीत नाटकांचे प्रयोग केल्याचे मला आठवतंय. मागच्या वर्षीची दिवाळी लॉकडाऊनच्या सावटाखाली असल्याने सगळेच तणावात होते. एकं दरीत सगळीकडेच शांतता होती. पण यंदा नाटय़गृह आणि चित्रपटगृहे सुरू झाली आहेत त्यामुळे यंदाच्या कलाकारांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल असं वाटतंय.

Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
famous personalities who win tarun tejankit award
तरुण तेजांकित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

मुक्ता बर्वे, अभिनेत्री

धमाल करणार

मला दिवाळी हा सण चुकवायलाही आवडत नाही. मी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन घरी साजरे करते आणि दरवर्षीप्रमाणे पाडव्याच्या दिवशी मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जेवायला जाते. हा एक दिवस असा असतो जेव्हा आम्ही न विसरता सगळे एकमेकांना वेळ काढून भेटतोच भेटतो. आमच्या घरी बाराही महिने सेलिब्रेशनचा माहौल असतो. आम्ही फक्त निमित्त शोधत असतो. सेलिब्रेशन म्हणाल तर अगदी साधंच असतं. घरचे सगळे एकत्र मिळून फराळ करणे, पत्ते खेळणे, नाचगाणी आणि फक्त मज्जा करतो. या दिवाळीतही आम्ही अशीच मजा करणार आहोत.

अक्षया नाईक, अभिनेत्री

लहानपणीची दिवाळीची मजाच वेगळी होती. एकतर परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी सुरू व्हायची त्यामुळे आतुरतेने दिवाळी कधी सुरू होते आहे याची वाट पाहायचो. फटाके  वाजवणं हा दिवाळीतला तेव्हाचा आवडता उद्योग होता. आम्ही सोसायटीतली मुलं एकत्र फटाके  फोडायचो. आमच्यातच दोन गँग तयार करायचो. सगळे आपापले फटाके  घेऊन एकत्र यायचे आणि ते फोडायचे. माझे वडील खूप फटाके  आणायचे आमच्यासाठी.. गाडीची डिकी भरून फटाके  आणलेले असायचे. विशेष काय होतं की प्रत्येकजण आपापले सगळे फटाके  घेऊन खाली आले की एकत्र मिळून फटाके  फोडले जायचे. तिथे माझ्याकडे फटाके  जास्त आहेत, तुझ्याकडे कमी आहेत, असा कु ठलाच भेदभाव नसायचा. कोणीही कोणाचेही फटाके  घेऊन फोडायचे. एक वेगळाच आनंद भरून राहिलेला असायचा. छान कपडे घालून पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करायचो, मात्र भाऊ बीज असो वा अन्य काही.. कु ठल्याही निमित्ताने घराबाहेर गेलो तरी संध्याकाळी घरी लवकर परतायचो, कारण फटाके  फोडायचे असायचे. मी माझ्या आईला दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करण्यापासून ते फराळ करण्यापर्यंत सगळ्यात मदत करायचो आणि आजही करतो. दिवाळीसाठी सफाई करताना आई साबणाचं पाणी ओतून आई लाद्या धुऊन काढायची, त्यातही मी मदत करायचो. फराळ बनवताना लाडू वळ, चकली – शंकरपाळी तळून दे, हे सगळं आवडीने करायचो. गेल्या सहा वर्षांत मला दिवाळीत फारसं घरी जाता आलं नाही. या वेळी मात्र दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या आमच्या मालिके चं चित्रीकरण नाशिकमध्ये सुरू आहे आणि याच वर्षी माझ्या भावाने नाशिकमध्येच घर घेतलं आहे. त्यामुळे या वर्षी दिवाळी त्याच्या नवीन घरी साजरी करायचा निर्णय घरच्यांनी घेतला आहे. नाहीतर गेली काही वर्ष मी दिवाळीच्या आदल्या रात्री कोल्हापूरहून निघायचो ते सकाळी अभ्यंगस्नानालाच घरी पोहोचायचो. या वेळी मात्र मी घरीच असेन आणि पहाटे उठून अभ्यंगस्नानापासून दिवाळीचा सण घरातच साजरा करेन.
हार्दिक जोशी, अभिनेता

परभणीत असताना नातेवाईकांकडे, घरी जाणं दिवाळीत होत होतं. पण सध्या आईवडील मुंबईतच असतात त्यामुळे दिवाळी एकत्र साजरी होते. दिवाळी पहाट कार्यक्रमांमुळे पहाटेच प्रेक्षकांची भेट होते. त्यांच्या टाळ्या, वाहवा अनुभवता येतात. दिवाळीनिमित्त संकल्प म्हणजे मला माझ्या कामात सातत्य राखायला व त्यात सुधारणा करायला आवडते अर्थात गुणवत्तापूर्ण कामात! कारण लॉकडाऊनसारख्या काळात माझ्या कवितांमधून प्रेक्षकांनी प्रेम व्यक्त करत मला जिवंत ठेवलं. माझ्या कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या त्यामुळे त्यानिमित्ताने त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला. येणाऱ्या काळात, येणाऱ्या अनेक वर्षांत आपल्या कामात गुणवत्ता सातत्याने कायम राखून ठेवायची हाच माझा आयुष्यभराचा संकल्प आहे.

संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता

लहानपणीची दिवाळी आणि हळूहळू मोठे झाल्यावर जाणतेपणीची दिवाळी ही दोन्ही ‘दिवाळी’ वेगवेगळी असते असं मला वाटतं. लहानपणी आम्हीही फटाके फोडत होतो. पण जसेजसे मोठे होत गेलो तेव्हा प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करायला हवी, असे आवर्जून लक्षात आले. त्यामुळे आता मी कधीच फटाके न फोडता प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करतो. यंदाही दिवाळी साजरी करणं म्हणजे सकाळी उठून छान उटणं लावून आंघोळ करणं, फराळ करणं, खासकरून मित्र – मैत्रिणींसोबत एकत्र फराळ करणं, खाणं. त्याचबरोबर संध्याकाळची रोषणाई, पणत्या, दिवे लावणं. रांगोळी काढणं, कंदील लावणं. प्रिया हे सगळं अगदी मनापासून करते त्यामुळे एकत्रितपणे जिवलग मित्रांसोबत जे मनापासून छान एन्जॉय करता येईल ते करतो. या वर्षीची दिवाळी कामात जाणार आहे. ‘अजूनही बरसात आहे’चे चित्रीकरण भाऊबीजेच्या दिवशी असणार आहे. त्याचबरोबर आता नाटय़गृहही सुरू झाले आहेत त्यामुळे नाटकाचा पहिला प्रयोग पाडव्याला आहे. एकंदरीत कामाची नवी सुरुवात आणि त्यामुळे थोडीशी व्यग्र वेळापत्रक सांभाळूनच ही दिवाळी साजरी होणार आहे.
उमेश कामत, अभिनेता

या वर्षीची माझी दिवाळी खूप खास आहे, कारण माझ्या लहान मुलीची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे आमची आधीच जय्यत तयारी सुरू झाली आहे. तिच्यासाठी हा पहिलाच दिवाळीचा अनुभव असल्याने आम्ही सगळेच उत्सुक आहोत आणि काही ना काही नियोजन सुरू आहे. वेळ मिळेल तसा आम्ही थोडी थोडी खरेदी करून ठेवली आहे. गेल्या वर्षी करोना आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिके च्या चित्रीकरणामुळे दिवाळीसाठी घरी जाता आलं नव्हतं. या वर्षी मात्र दिवाळी घरच्यांबरोबर एकत्र साजरी करायची आहे आणि तेही माझ्या मुलीबरोबर पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही सगळेचजण खूप उत्सुक आहोत.   

– समीर परांजपे, अभिनेता

यंदाची दिवाळी आमची घरगुतीच असेल त्याचबरोबर प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यावर आम्ही भर देणार आहोत. खरंतर आता गोष्टी अनलॉक होतायत. हळूहळू मनाप्रमाणे बाहेर फिरता येतंय. नाटय़गृह आणि चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. परंतु आपल्याला अजूनही फार काळजीपूर्वक पावलं उचलायची आहेत. हळूहळू सगळं सुरू होतंय ते अर्थातच आपल्या भल्यासाठी सरकार करतं आहे, हे लक्षात घ्यायला हवं. करोनासारख्या महासंकटाला सामोरं जाण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने सांभाळून, भान राखून काम करायला हवं. स्वत:ची आणि इतरांची काळजी घेतली पाहिजे कारण या महामारीने आपल्याला खूप मोठा धडा दिला आहे. ज्याअर्थी नैसर्गिक आपत्ती कशीही आणि कधीही येऊ शकते आणि त्यामुळे आपण थोडे निर्बंध स्वत:वरच ठेवायला हवेत. दिवाळीच्या निमित्ताने माझे तसे काही विशेष संकल्प नाही आहेत. ज्या दिवशी मला वाटेल की एक बदल माझ्यात करायला हवा तेव्हा तोच दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असतो, त्या दिवसापासूनच त्याची सुरुवात होते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, सगळीकडे रोषणाईने आसमंत उजळून जावा अशी असते त्यामुळे यंदा या करोनाच्या अंधकारातून आपण लवकरच बाहेर पडू अशी अपेक्षा मी यानिमित्ताने करेन.

अभिजीत खांडकेकर, अभिनेता