Diwali 2021 : सण आणि ऋण

सार्वजनिक, खासगी किंवा गृह वित्त संस्थांकडून विविध कालावधीसाठी वेगवेगळ्या दराने गृह कर्ज दिले जाते.

गौरव मुठे

अर्थव्यवस्थेतील विविध घटकांसाठी सणोत्सवाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ग्राहक राजापासून ते सरकार, विविध बँका आणि गृह वित्त संस्था, वाहन निर्मात्या कंपन्या, गृह निर्माण कंपन्यांपर्यंत सगळे सणोत्सवाच्या हंगामासाठी तयार आहेत. सध्या प्रत्येक जण दिवाळीसाठी नवीन घर, गाडी, गॅझेट्स किंवा गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे नियोजन करण्यात गुंग झाले आहेत. करोनामुळे गेल्या वर्षांत पूर्ण न करता आलेल्या योजना चालू वर्षांत नक्की पूर्ण करता येणार आहेत, कारण अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटक आता एकमेकांच्या मदतीने नवीन उभारी घेऊ  पाहत आहेत.

देशातील महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी, करोनाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत देशाचे पतधोरण सर्वसमावेशकच ठेवण्याची भूमिका रिझव्‍‌र्ह बँकेने घेतली आहे. यामुळे चालू महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमाही पतधोरण आढाव्यात रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकाकडून सध्या विविध कारणांसाठी दिले जाणारे कर्जाचे दर आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. शिवाय बँकांकडून पगारदार आणि क्रेडिट स्कोअर चांगला असणाऱ्या ग्राहकांवर विविध सवलतींचा वर्षांव केला जातोय. याचमुळे नवीन घरखरेदी, वाहन खरेदी किंवा इतर वैयक्तिक कारणांसाठी आवश्यक असलेल्या पैशाची गरज भागविण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याची सुवर्ण संधी आहे. याचबरोबर गृहनिर्माण विकासकांकडूनदेखील घरखरेदीसाठी आकर्षक दर, विविध सवलती आणि भेटवस्तूंचा नजराणा दिला जातो आहे. सर्वच अनुकूल परिस्थितीमुळे गृह निर्माण क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दिलासादायक भूमिकेमुळे सणोत्सवाच्या काळात अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले असून बहुतांश बँकांनी त्यांचे प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले. गृहकर्जावरील व्याजदर वार्षिक ६.५ टक्कय़ांपर्यंत खाली आले आहेत. याचाच सुपरिणाम म्हणून सरलेल्या तिमाहीत गृह निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीतदेखील सुधारणा झाली असून काही कंपन्यांचे समभाग उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

सार्वजनिक, खासगी किंवा गृह वित्त संस्थांकडून विविध कालावधीसाठी वेगवेगळ्या दराने गृह कर्ज दिले जाते. आपण कोणत्या बँकेकडून सध्या किती आकर्षक दराने कर्ज दिले जात आहे हे बघणार आहोतच. तत्पूर्वी घेतलेल्या कर्जासाठी ईएमआयचे गणित समजून घेऊ या. उदाहरणार्थ, एखाद्या बँकेचा व्याजदर ६.८५ टक्के प्रतिवर्ष आहे. तर आपल्याला एक लाख रुपयांच्या गृहकर्जामागे ७६६ रुपये महिन्याकाठी गृहकर्जाचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच आपण २० वर्षे कालावधीसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज काढल्यास ६.८५ टक्के कर्जाचा दर गृहीत धरल्यास एका लाखासाठी ७६६ रुपये म्हणजेच तीन लाख रुपयांवर आपल्याला ७६६ ७ ३० = २२,९८० रुपये दरमहा (अंदाजे) गृहकर्जाचा हप्ता भरावा लागेल. २० वर्षांच्या गृहकर्जाच्या कालावधीसाठी हा ईएमआय असेल.

कर्जाविषयी महत्त्वाचे

* बँक कर्ज देताना कर्ज घेण्याऱ्याचे वय, उत्पन्न, चालू कर्जे आणि ‘क्रेडिट स्कोअर’ इत्यादी गोष्टी तपासतात.

* कर्ज नेहमी मान्यताप्राप्त बँक, एनबीएफसी किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घ्यावे.

* कर्जाचे हप्ते चुकवू नये, अन्यथा काही बँका मोठा दंड आकारतात, शिवाय सिबिल स्कोअरवरही परिणाम होतो.

* कर्ज घेण्यासाठी साधारणपणे सिबिल गुणांकन ७५० पेक्षा जास्त लागते. तुमच्याकडून एक जरी हप्ता चुकला तर साधारण ५० ते ७० आधार अंशांनी सिबिल गुणांकन कमी होण्याची शक्यता असते.

* कर्जावरील दर हा कमीत कमी असावा आणि जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ  नये.

उदा. २० वर्षांसाठी, २५ लाखांचे गृहकर्ज ८ टक्के दराने घेतल्यास २० वर्षांनंतर तुम्ही बँकेला साधारण ५० लाख देता.

* १५ वर्षांसाठी २५ लाखांचे गृहकर्ज ८ टक्के दराने घेतल्यास १५ वर्षांनंतर तुम्ही बँकेला साधारण ४३ लाख देता (पाच वर्षे कमी केल्याने तुमची जवळपास ७ लाख रुपयांची बचत होते.)

* मोठय़ा रकमेचे कर्ज असल्यास तेवढय़ा रकमेचा तरी विमा घ्यावा (जर कर्ज घेणाऱ्यास काही झाल्यास त्याचा ताण कुटुंबावर पडत नाही. विम्याच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेचा कुटुंबाला कर्ज फेडण्यासाठी उपयोग होतो.) उदा. जर तुम्ही ५० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल तर तुमच्याकडे तेवढय़ा रकमेचा टर्म इन्शुरन्स अथवा होम लोन इन्शुरन्स तरी हवा.

* कर्जाचे हप्ते तुमच्या मासिक उत्पन्नाच्या कमीत कमी प्रमाणात असावेत (जितके जास्त हप्ते तितकी भविष्यासाठीची बचत कमी).

उदा. – जर तुमचे मासिक उत्पन्न १०० रुपये असेल तर कर्जाचे हप्ते साधारण ३० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावेत (म्हणजे बचतीसाठी, गुंतवणुकीसाठी आणि इतर खर्चासाठी रक्कम शिल्लक राहते.)

कर्ज घेण्याआधी आवश्यक काळजी

* कर्जाची मुदतपूर्व परतफेड करायची झाल्यास किती शुल्क द्यावे लागेल.

* कर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित केल्यास त्यासाठी किती शुल्क अदा करावे लागेल.

वेगवेगळ्या बँकांच्या उत्सवी कर्ज योजना बँकबाजार डॉट कॉम संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार विविध बँकांनी ६.५० टक्के इतक्या आकर्षक दराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आता विविध बँकांचा आकर्षक गृह कर्जदर काय आहे? 

स्टेट बँक 

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सणोत्सवाची भेट म्हणून गृह कर्जावरील व्याजदरात कपात करत ते आता ६.७० टक्कय़ांपर्यंत खाली आणला आहे. शिवाय कर्जासाठी कोणतेही प्रRिया शुल्क न आकारण्याचे बँकेने जाहीर केले आहे. मात्र स्टेट बँकेचे सवलतीतील गृहकर्ज सणोत्सव काळापुरतेच मर्यादित आहे. गृह कर्जाचा पहिला टप्पा १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चालवला जाईल, तर दुसरा टप्पा १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँकेने ६.८५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मात्र ज्यांचे सिबिल गुणांकन ७५० किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना या आकर्षक दराने कर्ज मिळू शकेल. बँकेचा कर्जदर ग्राहकांच्या सिबिल गुणांकाशी जोडण्यात आला आहे. यामुळे सिबिल गुणांकन जेवढे चांगले असेल तेवढय़ा कमी दराने कर्ज मिळणार आहे. तसेच बँकेने ७.३० टक्के इतक्या कमी दराने वाहन कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

पंजाब नॅशनल बँक

बँकेने ६.६० टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध करून दिले असून प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.

बँक ऑफ बडोदा

सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने ६.७५ टक्के दराने गृहकर्ज देऊ  केले आहे. तर वाहन कर्जासाठी अवघे ७ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

एचडीएफसी

खासगी क्षेत्रातील गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी ज्यांचे सिबिल गुणांकन ८०० पेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना ६.७० टक्के दराने कर्ज देऊ  करणार आहे. शिवाय महिलांना ६.७५ ते ७.२५ टक्के दराने कर्ज मिळणार आहे. महिलांना कर्जाच्या दरावर ०.०५ टक्कय़ाची सवलत देण्यात आली आहे. 

कोटक महिंद्र बँक

कोटक महिंद्र बँकेने सर्वात कमी म्हणजे अवघ्या ६.५० टक्के या आकर्षक दराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. २५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतल्यास महिन्याकाठी एक लाख रुपयांचा

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेने एक लाख रुपयांना फक्त महिन्याकाठी ६४५ रुपयांचा ईएमआय बसेल इतक्या स्वस्त दरात कर्ज उपलब्ध केले आहे. बँकेने ६.७० टक्के किमान दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अगदी १५ लाख रुपयांपासून गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे. शिवाय प्रक्रिया शुल्कावरदेखील विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स

एलआयसीची उपकंपनी असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्सने  ६.६६ टक्के दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दर सवलत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. बँका गृहकर्ज देण्याबरोबरच इतर कामांमध्ये व्यस्त असतात. मात्र एलआयसी हाऊसिंग फायनान्ससारख्या कंपन्या पूर्णपणे गृहकर्ज देण्याच्या कार्यात व्यस्त असतात.

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक

सहकारी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने वास्तू सिद्धी होम लोनअंर्तगत ६.५० टक्के दराने कर्ज उपलब्ध केले आहे. शिवाय प्रक्रिया शुल्कावर २५ टक्के सवलत जाहीर केली आहे. सुपर फास्ट कार लोन योजनेअंतर्गत ७.५० टक्के इतक्या आकर्षक दराने वाहन कर्ज उपलब्ध केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2021 festivals and loans zws

Next Story
मनोरी, गोराई आणि उत्तनला ‘निवासी विकासा’ची आस!
ताज्या बातम्या