गायत्री हसबनीस 

येत्या दिवाळीत अस्सल पारंपरिक पद्धतीच्या रूपशृंगाराला प्राधान्य असेल, ज्यात भरजरी साडय़ांसोबत डिझायनर अनारकली, लेहेंगा-चोली, एथनिक कुर्त्यांना मागणी जास्त आहे. मुलांसाठीही ट्रॅडिशनल ब्लेझर, पठाणी लुक ट्रेण्डमध्ये आहेत. अनेक ब्रँड्सनी आपल्या उत्पादनांवर ५० टक्क्यांहून अधिक सूट जाहीर के ली आहे. काही कपडय़ांवर, दागिन्यांवर विविध ऑफर्सही आहेत. दिवाळीला काही दिवसच उरले आहेत, त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने अनलॉक करण्यासाठी ‘कलरफुल’ कपडे, ज्वेलरी आणि फुटवेअर, बॅग्जची खरेदी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे.

डिझायनर फूटवेअर आणि बॅग्ज 

कोल्हापुरी चपलेपासून ते हिल्स आणि अगदी जयपुरी मोजडींपर्यंत सर्व तऱ्हेच्या चपला ट्रेण्डमध्ये आहेत. काही प्रमाणात डिझायनर सॅण्डल्स, एम्ब्रॉयडरी आणि हॅण्डक्राफ्टेड जुतीही बाजारात उपलब्ध आहेत. मोजडींमध्ये तुम्हाला फुलांचे नक्षीकाम, कोरीवकाम पाहायला मिळेल. अन्यथा प्लेन रंगांच्या मोजडीही तुम्ही विकत घेऊ शकता. हजार ते सहा हजारांवर यांची किंमत आहे. मुलांसाठीही असेच डिझायनर जुते आणि मोजडी ट्रेण्डमध्ये आहेत त्याशिवाय लेदर बूटही आहेत. मुलींना हल्ली सणासुदीला ट्रेडिशनल वेअरवर क्लचेस, पोटली आणि छोटेखानी बॅग्जही आवडतात. या बॅग्ज सुंदर वेल्व्हेटच्या, जरदारी, रेशमी कापडाच्या आहेत. यंदा डिझायनर मोती, मणी, हिरे असलेल्या छोटेखानी बॅग्ज पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहेत.

पारंपरिक साडीचा साजशृंगार

दिवाळी हा एकमेव सण आहे ज्या सणात सर्व पद्धतीच्या साडय़ांना जोरदार मागणी असते. खास करून लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्यासाठी साडय़ांची खरेदी ही एक पर्वणी असते. पैठणी, शालू, कांजीवरम, सिल्क, बांधणी, बनारसी, लेनिन, टस्सर सिल्क, सॅटिन, जॉर्जेट सिल्क, हॅण्डलूम, जामदनी, जरदोसी, कॉटन सिल्क, शिफॉन, कांचीपुरम, रेशमी आणि सिक्विन्स या सर्व प्रकारच्या साडय़ांची मनसोक्त खरेदी तुम्ही यंदा करू शकता. गेल्या आठवडय़ापासून बऱ्यापैकी साडीखरेदीला उधाण आले आहे, त्यामुळे सर्वसामान्यपणे करोनापासून आपला व इतरांचा बचाव करत मास्क आदी सर्व कवचकुंडलासह स्त्रीवर्ग साडीखरेदीसाठी बाजारात फिरू लागला आहे. बऱ्याच जणींनी ऑनलाइन संकेतस्थळावरही खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. तेव्हा एव्हाना काहींची खरेदी करून झाली असेलच तर काहींची खरेदी होण्याच्या मार्गावर असेल. त्यामुळे आठवडय़ाभराचा आढावा घेतला तर सध्या सिल्क साडय़ांना खूप जास्त पसंती मिळते आहे. खास करून साडय़ांच्या काठावरील डिझाईननुसार स्त्रियांनी आपल्या पसंतीप्रमाणे कॉन्ट्रास्ट साडय़ा घेतल्या आहेत. म्हणजे मूळ साडीच्या विरुद्ध, पण साजेसा काठाचा रंग असणाऱ्या सिल्क साडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. गच्च भरलेल्या नक्षीदार पदराच्या साडय़ांनाही सर्वाधिक पसंती मिळते आहे. केवळ प्लेन रंगांच्या साडय़ा विकत घेण्यापेक्षा फ्लोरल आणि कोयरीप्रमाणे डिझाईन असणाऱ्या कलरफुल साडय़ांना अधिक प्राधान्य दिले गेले. यापैकी बनारसी, पैठणी, कांजीवरम, झारी सिल्क, म्हैसूर सिल्क, मोठय़ा काठपदराच्या साडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यांची खरेदी अजून बाकी असेल त्यांनी हमखास या ट्रेण्डमध्ये असलेल्या साडय़ांची खरेदी करा. चंदेरी साडय़ांचाही ट्रेण्ड यंदा सुरू आहे, त्याचबरोबर मराठमोळ्या नऊवारी तसेच सहावारी साडय़ांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या साडय़ांची खरेदी बारा-तेरा हजारांपासून अगदी लाखांपर्यंत जाते. या दिवाळीत साडय़ांमध्ये जांभळा, लाल, पांढरा, केशरी, अबोली, काळा, आकाशी निळा, हिरवा, गडद निळा, पिवळा, चॉकलेटी असे रंग ट्रेण्डमध्ये पाहायला मिळतील. ऑफलाइन स्टोअर्समधून तसेच ऑनलाइन संकेतस्थळावरूनही तुम्ही साडय़ांची खरेदी करू शकता.

सोनेरी दागिन्यांना साज

यंदा २२ कॅरेट सोन्याचे दागिने तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या जवळच्या दागिन्यांच्या दुकानातून चाळीस हजार ते एकावन्न हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दागिने तुम्ही सहज खरेदी करू शकता. जड सोन्याचे दागिने नको असल्यास सोन्याची चेन आणि पेन्डण्टसुद्धा विकत घ्यायला हरकत नाही. ‘कॅरेटलेन’सारख्या ऑनलाइन साइटवरून सोन्याच्या चेन विकत घेऊ शकता. या दागिन्यांतला स्त्रियांना आवडणारा प्रकार म्हणजे थ्री लेयर किंवा फोर लेयर नेकपीस. ज्यांच्या साडय़ांच्या काठावर भरलेली नक्षी आहे आणि साडीचा रंग वेल्व्हेटप्रमाणे गडद आहे अशा साडय़ांवरती हे नाजूक नेकपिसेस खुलून दिसतात. हल्ली सणासुदीला अगदी गडद रंगांच्या साडय़ा परिधान करून स्त्रियांचा वावर असतो, त्यामुळे खास करून थ्री लेयर सोन्याच्या दागिन्यांचा साज चढवण्यावर त्यांचा अधिक भर आहे. यात तुम्हाला अजून प्रकार हवे असतील तर ‘झालर’ नक्षीकाम असलेले सोन्याचे दागिने तुम्ही घेऊ शकता, ज्यात गळ्यातले आणि कानातलेदेखील आहेत. त्याशिवाय गोल्ड चेन नेकलेसदेखील आहेत. सोनं आणि कुंदन संमिश्र असलेले मल्टिलेयर दागिनेही तुम्ही विकत घेऊ शकता. या दागिन्यांच्या एका बाजूला मोठं सोनेरी पेन्डण्ट असतं, त्यामुळे खरं तर कुठल्याही साडीवर हे दागिने खुलून दिसतात. मराठी पारंपरिक दागिन्यांमध्ये ठुशीचा ट्रेण्ड अजूनही कायम आहे. ‘वामन हरी पेठे सन्स’कडे तुम्हाला गोल्ड ठुशी कलेक्शन पाहायला मिळते. लग्नसराईसाठी तसेच दिवाळी कलेक्शन म्हणून सोन्यावर हिरे आणि मोतीही पाहायला मिळतील. या अशा डिझाईन्सच्या सोन्याच्या अंगठय़ाही ट्रेण्डमध्ये आहेत. कंगन, कडा आणि ब्रेसलेटमध्ये नेहमीप्रमाणे पारंपरिक नक्षी पाहायला मिळते आहे. यांच्या किमतीही पंचवीस हजारांच्या पुढे आहेत. मराठमोळ्या वजट्रिकाही तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने विकत घेऊ शकता तसेच पारंपरिक नथही ट्रेण्डमध्ये आहे. मोहनमाळ, कोल्हापुरी साजही तुम्ही परिधान करू शकता. गणपती, लक्ष्मी यांचे डिझाईन असलेले गळ्यावरचे दागिनेही ट्रेण्डमध्ये आहेत. दाक्षिणात्य पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांचे कलेक्शनही खास आहे. त्यामुळे त्याचाही विचार के ला जाऊ शकतो. त्याशिवाय सोन्याचे पारंपरिक झुमके, लटकन आणि बाजूबंदही ट्रेण्डमध्ये आहेत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे तुम्ही सोन्याची नाणीही विकत घेऊ शकता.

मुलांसाठीचा मर्दानीलुक

मुलांना जसं कानात भिकबाळी घालायला आणि नाक टोचूनही घ्यायला आवडतंय त्याप्रमाणे हल्ली सर्व प्रकारच्या पेहेरावाला मुलांची ना नसते. केवळ सिम्पल कुर्ता आणि पायजमाचे ट्रेण्ड जाऊन आता डिझायनर ब्लेझरवर मुलांचा भर आहे. यातही ब्लेझरच्या आत घालायला डिझायनर सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल कुर्तेही आहेत. याशिवाय मुलं पठाणी सूट आणि जयपुरी कुर्ते चुडीदारही पसंत करत आहेत. सध्या कॉटन एथनिक कुर्ते यांचीही मागणी आहे. शेरवानी, ट्रेडिशनल एथनिक वेअरही सर्व मुलांसाठी खुले आहेत. मुलं खास करून ऑनलाइन शॉपिंग अधिक करतात, त्यामुळे मिन्त्रा आणि फॅब इंडियावरही मुलांना खरेदी करायला वाव आहे. त्यामुळे आतापर्यंतही मुलांची बाजारहाट सुरू झाली असेल हे नक्की. सध्या सर्व प्रकारचे रंग मुलांसाठी ट्रेण्डमध्ये आहेत, पण प्रामुख्याने हिरवा, करडा, लाल, पिवळा, गुलाबी, फिकट गुलाबी, पांढरा असे रंग अधिक पाहायला मिळतील. ट्रेडिशनल कुर्त्यांवर मुलं दुपट्टाही परिधान करू शकता.? मुलांसाठी आता फेटय़ांचा ट्रेण्डही आहे. फक्त लग्नसराईपुरते फेटे मर्यादित न ठेवता सणासुदीच्या निमित्ताने फ्लोरल डिझाईनचे फेटे ट्रेण्डमध्ये आहेत. जॅकेटमध्येही सध्या नेहरू जॅकेट, खादी, कॉटन, सिल्क एम्ब्रॉयडरी जॅकेट्स आहेत.

एथनिक वेअर

चन्याचोळीसारखे पेहराव आजही तेवढेच आवडीने घातले जातात, त्यात केवळ थोडा बदल आता पाहायला मिळतो. यंदाही लेहेंगा-चोळीसारखे प्रकार अधिक ट्रेण्डमध्ये आहेत; किंबहुना सध्या लेहेंगा हे एथनिक वेअरचे केंद्रबिंदू ठरले आहे, कारण लेहेंगा-चोळीप्रमाणे लेहेंगा-कुर्ता, लेहेंगा-ड्रेस, लेहेंगा-क्रॉपटॉपसारखे अनेक विविध प्रकारचे आऊटफिट्सही ट्रेण्डमध्ये आहेत. डिझायनर ड्रेसेसमध्ये तुम्हाला थोडा पाश्चात्त्य पेहेराव हवा असेल तर तुम्ही नक्कीच वेस्टर्न ट्रेडिशनल गाऊन्स घेऊ शकता. त्याशिवाय, पारंपरिक एथनिक वेअरमध्ये अनारकली, शराराही ट्रेण्डमध्ये आहेत. तरुण मुलींची अनारकलीला सर्वात जास्त पसंती आहे, कारण यात त्यांना दुपट्टय़ात भरपूर डिझाईन्स आणि रंग पाहायला मिळतील. आजही तुम्ही बाजारहाट करण्यासाठी गेलात तर दिवाळीसाठी खास चुडीदार, अनारकली, पंजाबी ड्रेसेस, लेहेंगा-कुर्ता हमखास मिळतील. एक तर पायजमा किंवा लेहेंग्यातही सारखे रंग आणि सिम्पल डिझाईन्स मुलींना सहज आवडतायेत, तर एम्ब्रॉयडरी असलेले डिझायनर कुर्ते, अनारकली पसंत पडतात; परंतु अधिक जास्त मोहात पाडतायेत त्या ओढण्या किंवा दुपट्टे. यंदा सणासुदीच्या निमित्तानेही तुम्ही पटोला डिझाईन्सच्या ओढण्या, डिझायनर क्रेपच्या ओढण्या विकत घेऊ शकता. कुर्त्यांमध्ये ब्लॉक प्रिंटेड, कलर प्रिंटेड असे एथनिक कुर्ते आहेत, तर लेहेंग्यांमध्ये विविध रंग आणि त्याप्रमाणे हटके डिझाईन्स आहेत. दिवाळी आता हळूहळू अनलॉक होते आहे त्याप्रमाणे खरेदी अनलॉक झाली आहे. कपडे, दागिने, चपला इत्यादींची खरेदी मनमुराद सुरू आहे. आधी फराळ, घरसजावट उरकून घेऊ आणि मग खरेदी  करू असा प्लॅन ज्यांचा ज्यांचा असेल त्यांनी हमखास आणि लवकरात लवकर खरेदीला लागलं पाहिजे, कारण बघता बघता दिवाळी तोंडावर आली आहे.