कृषी कीटकशास्त्रात उच्च शिक्षण घेतल्यानंतर संशोधनातून जैविक शेतीचे पर्याय सुरू करणार्या डॉ. संगीता. मित्र कीटक, सूक्ष्मजीव पिकांचे संरक्षण करू शकतात, यावर विश्वास न बसणार्या शेतकर्यांसाठी त्यांनी त्यांची निर्मिती करणारी, स्त्रियांना रोजगार देणारी ‘विदर्भ बायोटेक लॅब’ सुरू केली. ज्याची वार्षिक उत्पादनक्षमता ५०० टन आहे. विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती पर्यावरणसंवर्धन आणि स्त्रियांचे सक्षमीकरण यांचा ध्यास घेणार्या यवतमाळ येथील सामाजिक कृषी उद्योजिका डॉ. संगीता सवालाखे आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.
शेतकर्यांचा शेतीवरील खर्च कमी करून माती, पर्यावरण आणि मानवी आरोग्य जपणार्या विषमुक्त शेतीचा पर्याय प्रत्यक्ष शेतात रुजविणे, जैविक निविष्ठांची निर्मिती करून त्यातून ग्रामीण स्त्रियांना रोजगार मिळवून देणे, शेतकर्यांना विनामूल्य मार्गदर्शन करणे, अशा बहुआयामी कार्यातून यवतमाळच्या डॉ. संगीता दीपक सवालाखे यांनी गेल्या तीन दशकांत सामाजिक कृषी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. संशोधनातून जैविक शेतीचे पर्याय विकसित करत त्यांनी उभारलेली ‘विदर्भ बायोटेक लॅब’ ही कृषी उद्योजकतेसोबतच सामाजिक बांधिलकीचेही उदाहरण ठरली आहे.
या प्रवासाची सुरुवात कृषी पदवीच्या शिक्षणानंतरच्या ‘रावे’(RAWE) कार्यक्रमात झाली. ग्रामीण भागात काम करताना रासायनिक कीटकनाशके आणि कच्च्या मालाच्या खर्चामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकर्याची परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली. त्यातून रासायनिक शेतीला पर्याय शोधण्याची प्रेरणा मिळाली. कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी जैविक आणि विषमुक्त शेतीचा प्रसार सुरू केला. शेतकरी मेळावे, प्रशिक्षण शिबिरे आणि गावोगावी व्याख्याने देत जैविक कीडनियंत्रणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्यांनी हाती घेतले.
त्या काळात मित्र कीटक किंवा सूक्ष्मजीव पिकांचे संरक्षण करू शकतात, यावर शेतकर्यांचा सहज विश्वास बसत नव्हता. केवळ माहिती देऊन हा विश्वास निर्माण होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी शेताच्या बांधावर प्रयोग केले आणि प्रत्यक्ष परिणाम दाखविले. शेतकर्यांच्या मागणीतून ‘ट्रायकोग्रामा’, ‘क्रायसोपा’, ‘मॅलाडा’ यांसारख्या मित्र कीटकांची निर्मिती सुरू केली. त्यानंतर जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशके, डिकंपोस्टिंग कल्चर आणि खतांचेही काम विस्तारले. यातूनच ‘विदर्भ बायोटेक लॅब’ची उभारणी झाली आणि एक उद्योजिका नव्या प्रयोगांना सिद्ध झाली.
सुरुवातीची एक-दोन वर्षे नफा-तोट्याची पर्वा न करता त्यांना काम करावे लागले. पुरुषप्रधान कृषी उद्योगात स्त्री म्हणून काम करताना अडचणी आल्या; शासकीय विभागांचे काम मिळविण्यापासून उत्पादनांची विश्वासार्हता निर्माण करण्यापर्यंत संघर्ष करावा लागला. मात्र, शेतकर्यांचा अनुभव आणि विश्वास हीच त्यांची ताकद ठरली. २००९ पासून यवतमाळच्या ‘एमआयडीसी’ परिसरात ‘विदर्भ बायोटेक लॅब’ला स्वतंत्र स्वरूप मिळाले. या जैविक उत्पादनांची निर्मिती उपक्रमातून सुमारे ४० ते ४५ स्त्रियांना रोजगार मिळाला असून कृषी संशाोधन, उत्पादन, पॅकेजिंग, मार्केटिंग, सेल्स अँड स्व्हिहस अशा सर्व प्रक्रियेत त्यांनी स्त्रियांचा सहभाग वाढवला.
आज या ‘विदर्भ बायोटेक लॅब’प्रयोगशाळेची उत्पादनक्षमता ५०० टनांवर पोहोचली आहे. ग्रामीण स्त्रियांना कृषी क्षेत्रातही कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे त्यांनी प्रत्यक्ष कामातून दाखवून दिले. याशिवाय शेतकर्यांसाठी पिकावरच्या किडीचे किंवा रोगाचे छायाचित्र पाहून त्यावर उपाय सुचविण्याची त्यांची विनामूल्य सल्ला सेवा सुरुवातीपासून आजही चालूच आहे. वृक्षारोपण करून न थांबता ती झाडे जगावीत, यासाठी सामाजिक वनीकरण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांना जैविक निविष्ठा (Biological Inputs) विनामूल्य पुरविण्याचे कामही त्या करतात.
त्यांच्या कार्याची दखल घेत २००२ मध्ये जिनेव्हा इथे ‘वुमेन्स क्रिएटिव्हिटी इन रूरल लाइफ’ सन्मान, २००४ मध्ये जिल्हा उद्योग पुरस्कार, २००८ मध्ये ‘महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार’ आणि २०१८ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाचा ‘ऑनर ऑफ एक्सलन्स’ त्यांना मिळाला. २०१९ मध्ये ‘सार्क’ परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या गौरवाबरोबरच २०२३ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी पदवीधर आयडॉल’ उपक्रमातही त्यांच्या कार्याची निवड झाली.
विषमुक्त सेंद्रिय शेती, पर्यावरणसंवर्धन आणि स्त्रियांचे सक्षमीकरण अशा तिहेरी आघाड्यांवर काम करत शेतीमध्ये प्रयोग करणार्या डॉ. संगीता सवालाखे यांना ‘लोकसत्ता’ चा सलाम!
डॉ. संगीता दीपक सवालाखे, विदर्भ बायोटेक लॅब, बँक ऑफ इंडियाजवळ, दत्त चौक, यवतमाळ ४४५००१.
मोबाईल क्रमांक ९४२२८६९४२३
ई-मेल : vidbio@rediffmail.com
