सुमारे तीन दशकांपूर्वी ‘हायपोटोनिक सेरेब्रल पाल्सी’ असलेल्या आपल्या लेकीला स्वत:च्या पायावर उभे करायचा निर्धार केलेल्या डॉ. सरिता यांनी प्रचंड परिश्रम घेत तो प्रत्यक्षात आणलाही, मात्र या वेदनेतून निर्माण झालेल्या करुणेलाच साक्षी मानत ‘उमेद चाइल्ड केअर सेंटर’ आणि ‘प्रयास विशेष शाळे’च्या माध्यमातून त्यांनी ३२ हजारपेक्षा जास्त मुलांना समाजाचा स्वाभिमानी आधारस्तंभ बनवले. त्या डॉ. सरिता कडू आहेत यंदाच्या लोकसत्ता दुर्गा.

डॉ. सरिता कडू यांनी एमबीबीएस होऊन स्वत:ची वैद्यकीय सेवा सुरू केली खरी, पण मुलीच्या जन्माने एक अनपेक्षित वळण समोर ठाकले. डॉक्टरांनी मतिमंदत्वाची शक्यता वर्तवली आणि सुरू झाला एक चिवट प्रवास, मुलीबरोबर स्वत:चाही. प्रचंड परिश्रम करत त्यांनी मुलीला आपल्या पायावर उभे केले, मात्र मुलीच्या शारीरिक आरोग्याच्या संघर्षातून जात असताना डॉ. सरिता यांना समाजातील हजारो दिव्यांग, असहाय मुलांची आर्त हाक ऐकू आली. स्वत:चं पदव्युत्तर शिक्षण बाजूला सारून त्यांनी बाल पुनर्वसन क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले. १९९६ मध्ये अमरावतीत त्यांनी सुरू केलेल्या ‘उमेद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’मध्ये आज असंख्य मुले आयुष्याला दिशा देत आहेत.

मुलांची विकासात्मक वाढ सदोष असणे (डेव्हलपमेंटल डिसऑर्डर) म्हणजे मुलांची शारीरिक, मानसिक, भाषिक किंवा सामाजिक वाढ त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत हळू किंवा चुकीच्या पद्धतीने होणे. या समस्येचे निदान वेळेत होणे गरजेचे असते. मूळच्या मुंबईच्या असलेल्या डॉ. सरिता कडू लग्नानंतर अमरावतीत स्थायिक झाल्या. त्यांच्या आयुष्यात मातृत्वाची पहिली पहाट अनपेक्षित वादळ घेऊन आली. त्यांची मुलगी ऐश्वर्या जगात तर आली, पण वर्ष सरले तरी तिची प्रत्येक हालचाल संथ होती. मुंबईत तपासण्या झाल्या.

‘हायपोटोनिक सेरेब्रल पाल्सी’ आणि मतिमंदत्वाची शक्यता. डॉक्टरांच्या शब्दांनी सरिता खचल्याच. त्यांनी बालरोगशास्त्राची पुस्तके उराशी कवटाळली. शब्दाशब्दांतून मार्ग शोधत मुलीची घरातच फिजिओथेरपी सुरू केली. कुशीवर वळणे, रांगणे, तोल सांभाळत उभे राहणे या शिकवण्यातून साडेतीन वर्षांच्या अथक तपानंतर ऐश्वर्या चालू लागली!

मुलीला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, पण शाळेतून तक्रारी सुरू झाल्या. ‘मुलगी ऐकत नाही, तिला समजत नाही.’ पुन्हा डॉक्टरांचे उंबरठे झिजवले आणि कानांवर जणू वीजच कोसळली. ऐश्वर्याला दोन्ही कानांनी ऐकूच येत नव्हते. तिला श्रवणयंत्रे लावली गेली. डॉक्टरांनी तिला कर्णबधिरांच्या मराठी शाळेत शिकवण्याचा सल्ला दिला, पण त्यांच्यातल्या आईने हार मानली नाही. घरच वर्गखोली बनले.

भिंतींवर अक्षरांची चित्रे लागली. प्रत्येक स्वर, व्यंजन आणि ओठांच्या हालचालींमधून शब्द समजून घेण्याची मूक, पण अथांग साधना सुरू झाली. ऐश्वर्याने दहावीत ६४ टक्के गुण मिळवले. अकरावी-बारावीत विज्ञानाचे कठीण विषय शिकवताना खरी कसोटी लागली. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वत:च्या दवाखान्यात रुग्णांची सेवा करायची, उरलेल्या वेळात विज्ञान शिकवणी वर्गात शिकायचे, घरी येऊन ओठांच्या हालचालींतून ते ऐश्वर्याच्या मेंदूत उतरवायचे. या कष्टाचे मोल काय? तर ऐश्वर्याने बारावीत ७४ टक्के गुण मिळवत अवघ्या महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला!

श्रवणयंत्र निकामी झाल्यावर डॉक्टरांनी ॲनेस्थेशियाचा जीवघेणा धोका वर्तवूनही ऐश्वर्याची ‘कॉकलियर इम्प्लांट’ची शस्त्रक्रिया केली. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत ऐकणे आणि बोलण्याचे अखंड प्रशिक्षण चालले. आज ऐश्वर्याने दंतचिकित्सेत एमडीएस (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) पूर्ण केली आहे. समाजातल्या अशाच इतर मुलांसाठी डॉ. सरिता यांनी अमरावतीत ‘उमेद चाइल्ड केअर सेंटर’ आणि ‘प्रयास विशेष शाळे’च्या माध्यमातून शेकडो घरांमध्ये आशेचे दीप प्रज्वलित केले आहेत. प्रयास शाळा शासकीय अनुदानावर चालवल्या जात आहेत.

केवळ उपचारच नव्हे तर मुलांचे समुपदेशन, पालकांना मार्गदर्शन, सहली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही मुले कुटुंबावर भार न होता समाजाचा स्वाभिमानी आधारस्तंभ बनावीत, यासाठी डॉ. सरिता कडू यांचे आपल्या पतीच्या सहकार्याने अविरत कार्य सुरू आहे. एका आईच्या अंत:करणातील वेदनेचे रूपांतर जेव्हा करुणेच्या रूपात शेकडो बालकांच्या उद्धारात होते, तेव्हा त्या संघर्षाला यश मिळते. डॉ. सरिता कडू यांचा हा प्रवास केवळ मुलांच्या उपचारापुरता मर्यादित नाही; तो एका मातेने संपूर्ण समाजाला दिलेल्या ‘उमेदी’चा जिवंत इतिहास आहे. डॉ. सरिता विनायक कडू यांना ‘लोकसत्ता’चा सलाम.

डॉ. सरिता विनायक कडू
संस्थापक, ‘उमेद’ चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, अमरावती.
संपर्क क्रमांक- ९८२३२७४८४८
ईमेल – drsarita1964 @gmail. com