अर्थशास्त्रातील विश्वासार्हता-क्रांती

अर्थशास्त्रात असा पुरावा शोधायचा, तर मग निरनिराळ्या घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध किंवा त्यांमागील कार्यकारणभाव शोधून काढणे/ सिद्ध करणे क्रमप्राप्तच ठरेल.

|| प्रणव पाटील

अर्थशास्त्राच्या नोबेलचे मानकरी ठरलेल्या तिघांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य सांगणारा हा लेख, अनुभवाधिष्ठित संशोधनातून आर्थिक धोरणे कशी अधिक उचित होतील आणि धोरणांच्या परिणामांचा अभ्यासही कसा अधिकाधिक नेमका होईल, हेदेखील दाखवून देणारा…

अर्थशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे स्वेरिजेस रिक्सबान्क पारितोषिक यंदा ज्या तिघांना जाहीर झाले; त्यांपैकी डेव्हिड कार्ड यांना ते श्रम-अर्थशास्त्राला अनुभवाधिष्ठित अभ्यासाचे अधिष्ठान दिल्याबद्दल, तर जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना कार्यकारणभाव शोधण्याच्या नव्या अभ्यासपद्धतींबद्दल देण्यात येणार आहे. या तिघांचे सामायिक वैशिष्ट्य म्हणजे, अर्थशास्त्रातील ‘विश्वासार्हतेची क्रांती’ असे ज्याला म्हटले जाते, त्या नव्या अभ्यासपद्धतीमध्ये या तिघांनीही भर घातली आहे. वास्तवाधारित किंवा अनुभवाधिष्ठित अभ्यासावर हे तिघेही भर देतातच. परंतु ‘हे केल्याने असा परिणाम होतो’ या प्रकारचा, म्हणजेच कार्यकारणभाव शोधून काढणारा अभ्यास करण्याची दिशा तिघांचीही आहे, त्यामुळे प्रत्यक्ष धोरणे, निर्णय यांसाठी अर्थशास्त्राची विश्वासार्हता वाढण्यास मोठीच मदत होऊ शकते आहे.

अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती सातत्याने वाढत आहेच, पण विशेषत: गेल्या तीन दशकांमध्ये निव्वळ वैचारिक तत्त्वचर्चा किंवा निव्वळ सांख्यिकीजंजाळ यांच्या पलीकडच्या प्रश्नांवरील उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केला. आधीच्या काळातील नवअभिजाततावादी आर्थिक सिद्धान्त उत्तमच होते, पण घडत्या वास्तवाशी त्याचा संबंध पुराव्यांनिशी सिद्ध का होत नाही असा प्रश्न गेल्या काही दशकांत विचारला जाऊ लागला. अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे लोकांनी आणि धोरणकर्त्यांनी गांभीर्यानेच ऐकावे, त्यानुसार कृती करावी, इतपत विश्वासार्ह अनुभवाधिष्ठित अभ्यास असतो का? किंबहुना अर्थशास्त्रज्ञांच्या सिद्धान्त आणि सूचनांचा पुरावा देणारा पडताळा नसतो, म्हणूनही अर्थशास्त्रज्ञांना आजकाल गांभीर्याने घेतले जात नाही, असे अर्थशास्त्राच्याच नोबेलचे मानकरी अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो मांडतात, ते वस्तुस्थितीला धरूनच ठरते.

अर्थशास्त्रात असा पुरावा शोधायचा, तर मग निरनिराळ्या घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध किंवा त्यांमागील कार्यकारणभाव शोधून काढणे/ सिद्ध करणे क्रमप्राप्तच ठरेल. हा कार्यकारणभाव शोधायचा म्हणजे काय करायचे, पुरावे असणारी सिद्धता असे ज्याला आपण अर्थशास्त्रात म्हणू शकू ती कशी असायला हवी, निरनिराळ्या घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण आहे  शिक्षण आणि आयुष्यभरातील कमाई यांच्या कार्यकारणभावाचे. समजा एखाद्या व्यक्तीने शिक्षणासाठी एक वर्ष जास्त दिले, तर या व्यक्तीची आयुष्यभरातील कमाई किंवा कमाईची शक्यता, किती वाढेल, या प्रकारचे प्रश्न हे कार्यकारणभावाचे प्रश्न ठरतात. ते सोडवण्याचा प्रयत्न म्हणून आकडेवारीचा वापर करून किंवा प्रत्यक्ष प्रयोग करून अनुभवाधिष्ठित विश्लेषण करणे हे आपले काम, असे अर्थशास्त्रज्ञ मानू लागले आहेत. वैद्यकशास्त्रात माणसांवरही काही प्रयोग मुद्दाम केले जातात (अमुक औषध दिलेले रुग्ण आणि न दिलेले रुग्ण, यांचा प्रतिसाद मोजून-मापून मग औषधाच्या परिणामकारकतेबद्दल निष्कर्ष काढले जातात); तसे वैकासिक अर्थशास्त्राच्याही बाबतीत का होऊ नये, अशा विचारातून अर्थशास्त्रज्ञांनी या चाचणीवजा प्रयोगांच्या काही पद्धती वापरून कार्यकारणभाव निश्चितीची ठोस पावले टाकली आहेत. हे प्रयोग अर्थशास्त्रात करताना धोरणांचा किंवा निर्णयांचा परिणाम मोजावा लागतो. एस्थर डफ्लो आणि इतर यांनी केलेल्या अशा एका चाचणी-अभ्यासात, ग्रामीण शाळा शिक्षकांबाबत वेतनवाढीचे प्रोत्साहन आणि नियंत्रणाचा बडगा वापरून या शिक्षकांची शाळेला दांड्या मारण्याचे किंवा लवकर घरी पळण्याचे प्रमाण कमी होते का, हे शिक्षक शाळेत अधिक चांगले शिकवतात का, हे अर्थशास्त्रज्ञांनी अभ्यासले. धोरणकर्त्यांच्या पाठिंब्याने असे चाचणी प्रयोग लहान प्रमाणावर निवडक क्षेत्रांत/ व्यक्तींवर करण्याची मुभा मिळाली, तर पुढे चाचणी प्रयोगांचे निष्कर्ष पाहून मोठ्या प्रमाणावरील धोरणे ठरवण्यास मदतच होईल.

अर्थात, असे चाचणी प्रयोग करण्यात अडथळेही आहेतच. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असे चाचणीप्रयोग करायचे तर पैसा , वेळ लागतो आणि महत्त्वाचे म्हणजे नैतिक प्रश्नही येऊ शकतात. त्यामुळेच, ‘नैसर्गिक प्रयोग’ हा पर्याय स्वीकारार्ह ठरतो. अभ्यासक स्वत: कोणताही हस्तक्षेप न करता परिस्थितीची पडताळणी योग्य नमुन्यांच्या निवडीतून करतो आणि विश्लेषणाअंती निष्कर्ष काढतो, ते  ‘नैसर्गिक प्रयोग’. डेव्हिड कार्ड आणि अ‍ॅलन क्रूगर यांनी अमेरिकेतील न्यूजर्सी व पेनसिल्व्हानिया या दोन राज्यांतील फास्टफूड उपाहारगृहांमधील नोकरांच्या वेतनांबद्दल काढलेले निष्कर्ष हा अशा ‘नैसर्गिक प्रयोगा’चा वस्तुपाठ ठरावा. या दोघा राज्यांपैकी न्यूजर्सीतील उपाहारगृह नोकरांना किमान वेतनात वाढ मिळाली होती, पेनसिल्व्हानियात किमान वेतनदर स्थिरच होते. अशा स्थितीमध्ये एरवी मानले जाते की, न्यूजर्सीतील उपाहारगृहांत नोकऱ्यांच्या संधी कमी होत जाणार आणि पेनसिल्व्हानियात वाढणार किंवा स्थिर राहणार. मात्र प्रयोगातून दिसले ते याउलट. न्यूजर्सीत नोकऱ्यांच्या संधी कमी न होता वाढल्याच होत्या, म्हणजे वेतनवाढीनंतरही ती नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी झाले नव्हते. हा निष्कर्ष, मागणी आणि पुरवठा यांच्या पारंपरिक अर्थशास्त्रीय ठोकताळ्यांपेक्षा अगदी निराळा ठरतो. जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांनीही असे ‘नैसर्गिक प्रयोग’ किंवा मानीव प्रयोग अनेकदा केले आहेत आणि त्यांमधून या द्वयीने, धोरणांच्या परिणामांचे कार्यकारणभाव नेमकेपणाने मापण्याचे नवनवे आडाखेही तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

कार्यकारणभावाचे मापन, ही संकल्पना संशोधकांसाठी अजिबातच नवीन नाही. मात्र सामाजिक शास्त्रांमध्ये कार्यकारणभाव इतक्या वास्तवाधारित, अनुभवनिष्ठपणे आणि नेमकेपणाने मोजण्याची तंत्रे याआधी वापरली गेली नव्हती.  न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम ‘जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू, तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करीत राहाते ’ असे सांगतो, यातील  ‘गतीमधील बदल हा बाह्य बलाखेरीज होऊ  शकत नाही’ हा भाग अर्थशास्त्रीय स्थितीगतीलाही लागू ठरतो हे ओळखून त्याप्रमाणे संशोधन करणे, हा अर्थशास्त्रातील ‘विश्वासार्हतेच्या क्रांती’चा महत्त्वाचा भाग ठरला. मात्र, ‘कार्यकारणभाव म्हणजे कालक्रमित संबंध नव्हे’  (सोप्या शब्दांत, तमुक हे अमुकमागील कारण असते, हे जितके खरे तितके तमुक केले तर फक्त अमुकच होणार, हे खरे नसते) हे विश्वासार्हतेच्या या क्रांतीतील सहभागी अर्थशास्त्रज्ञही मान्यच करतात. त्यामुळे, कार्यकारणभावी संबंध उलगडतानाच या प्रक्रियेमधील अनिष्पन्नक्रिया कोणत्या किंवा क्रियातिपत्ति (काउंटरफॅक्च्युअल) कोणत्या, हेही असे अर्थशास्त्रज्ञ नमूद करतात. उदाहरणार्थ कार्ड व क्रूगर यांच्या अभ्यासामध्ये, किमान वेतनात वाढ होण्यापूर्वी न्यूजर्सी व पेनसिल्व्हानिया या राज्यांतील फास्ट फूड उपाहारगृहांमध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण होण्याचे प्रमाण एकसमानच होते, या तथ्याच्या आधारे हे अभ्यासक अशी अनिष्पन्नक्रिया नमूद करतात की, वेतनात कोणताही बदल यांपैकी कुठल्याच राज्यात झाला नसता तर दोन्ही राज्यांतील नोकरीसंधींमध्येही बदल झालाच नसता. ही जी अनिष्पन्नक्रिया आहे, ती वेतनवाढ या बाह्यघटकाच्या रेट्यामुळे न्यूजर्सीत घडली नाही, पण पेनसिल्व्हानियात घडली नाही.

अर्थशास्त्र धोरणांचा अभ्यास करते, तसेच बाजारांचाही अभ्यास करते आणि त्यामुळेच, अर्थशास्त्रीय धोरणे वा निर्णय उचित किंवा योग्य दिशेचेच असावेत आणि अर्थशास्त्रातील प्रयोगसुद्धा किफायतशीर असावेत, या अपेक्षा रास्तच ठरतात. या संदर्भात येथे, भारत सरकारच्या दोन महत्त्वाच्या योजनांचे त्या त्या वेळी जे अर्थशास्त्रीय अभ्यास झालेले आहेत त्यांचा उल्लेख वाजवी ठरावा.  यापैकी अलीकडची आहे ती प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि जरा आधीची  राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. या दोन्ही योजना गावखेड्यांना पायाभूत सुविधा प्रदान करणार, मग रस्ते झाले, वीज आली की खेड्यांमधील शेती अथवा बिगरशेती क्षेत्रांतील आर्थिक क्रियाकलापही सुकर होणार आणि परिणामी आर्थिक वाढ होणार म्हणजेच, तेथील गरिबी कमी होणार असे सर्वसाधारण गृहीतक. प्रत्यक्षात सॅम आशर, पॉल नोवोसाद, फिओना बर्लिग आणि लुई प्रिओनास यांनी केलेल्या अभ्यासांतून असा निर्देश होतो की, दळणवळण सुकर झाले आणि वीजजोडणी आली, तरीही योजना पूर्ण झाल्यानंतरच्या पुढल्या चार ते पाच वर्षांत तरी याचे लक्षणीय प्रतिबिंब आर्थिक विकासात पडल्याचे दिसत नाही. याअर्थाने, योजनांची भलामण विकासकामे अशी करण्यात आणि त्या आल्या की विकास झालाच असे समजण्यात कितपत तथ्य आहे, हा प्रश्न तर उचित ठरतोच पण धोरणांचा परिणाम कधी मोजावा याचेही दिग्दर्शन होते.

लेखक जर्मनीतील स्टुटगार्ट येथील होहेनहाइम विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. संशोधन करीत आहेत.

ईमेल : pranav.patil@uni-hohenheim.de

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Economics nobel laureate this article highlights research akp

Next Story
देणाऱ्यांचे हात हजारो..
ताज्या बातम्या