शेती करणेच दिवसेंदिवस अडचणीचे झालेले असताना आदिवासी भागात तर याची आव्हाने अधिक तीव्र होत आहेत. यामुळे या भागात रोजगारासाठी स्थलांतराचे मोठे प्रमाण दिसून येते. याचाच विचार करत त्र्यंबकेश्वर भागात बचत गटांच्या माध्यमातून शाश्वत शेतीची चळवळ उभी राहात आहे. अंतर्गत शेतकऱ्यांचे बचतगट बांधत त्याद्वारे रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू झाला आहे.

पावसावर अवलंबून पारंपरिक शेतीतून कसाबसा उदरनिर्वाह होत असल्याने दैनंदिन खर्च, मुलांचे भवितव्य, कौटुंबिक गरजा पाहता वेगळे काही करण्याचे धाडस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावातील शेतकऱ्यांनी दाखवले. अभिव्यक्ती संस्था व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने रेशीम शेती करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचा बचत गट तयार केला. प्रारंभीच्या अडचणींवर मात करीत या शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करीत शाश्वत उत्पन्नाकडे वाटचाल सुरू केली आहे. या माध्यमातून आदिवासी भागातील स्थलांतर थांबण्यासाठी मदत होणार असून, महिन्याकाठी बचत गटास एक ते दीड लाख उत्पन्न मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> लोक शिवार : अतिवृष्टीचे आव्हान

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावातील शांताराम चौधरी यांच्या प्रयत्नातून ही वाट तयार झाली. संपूर्ण गावाला परिचित असणारे हे प्रयोगशील शेतकरी. आपल्या अडीच एकर जागेत जेमतेम उत्पन्न होऊन उपजीविका भागवावी लागत होती. मुलाबाळांनी शिक्षण घ्यावे, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांनी चांगले जीवन जगावे, अशी आशा बाळगत चौधरी हे शेतीत काय प्रयोग करता येईल, याचा विचार करायचे. असंख्य कल्पना असल्या तरी त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आदिवासी शेतकऱ्यांकडे त्याचीच वानवा असल्या कारणाने शेतात हवे तसे प्रयोग करता येत नव्हते. यामुळे पावसाचा हंगाम वगळल्यावर अनेकांना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करावी लागते. ही सल शांताराम यांना नेहमी बोचत होती.

हेही वाचा >>> आरोग्यदायी नाचणीची लागवड

हे चक्रव्यूह भेदण्यासाठी त्यांनी स्थानिक १० शेतकऱ्यांचा नोंदणीकृत बचत गट स्थापन केला. त्याला नाशिकमधील अभिव्यक्ती संस्था आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची साथ मिळाली. रोजगारासाठी दर वर्षी आदिवासींचे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर शेतीपूरक शाश्वत उद्याोगाची संकल्पना मांडली गेली. त्यातून गावात रेशीम उद्याोगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. रेशीम शेती हा शाश्वत रोजगार देणारा उद्याोग आहे. हे लक्षात घेऊन साप्ते गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. सात हजार तुतीची रोपे लावली. या रोपांना पाणी मिळावे व त्याचे चांगले संवर्धन व्हावे यासाठी शेजारील कश्यपी नदीवरील बंधाऱ्याचा गाळ उपसून त्याची दुरुस्ती करण्यात आली. या बंधाऱ्यात ६० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली. ज्या नदीतून पावसाचे पाणी सहज वाहून जात होते, त्याचा नदीवरील बंधाऱ्याचे काम केल्याने ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होऊ लागला आहे. पाणी हे विकासाकडे नेणारे आश्वासक माध्यम असल्याचे बंधाऱ्याच्या माध्यमातून लक्षात आले. यामुळे शांताराम यांच्या सारखे शेतकरी कोरड जमिनीची मालक आता बागायतदार झाले आहे.

एकीचे फळ !

शांताराम व त्यांचे सहकारी आठ महिने रिकामी पडणारी जमीन कसत आहे. काळ्या मातीचे रुपांतर हिरवाईत झाले आहे. बंधाऱ्याच्या कामामुळे हे शक्य झाले. या वाटचालीत अभिव्यक्ती संस्थेचे भिला ठाकरे यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. परिस्थितीला आपण बदलू शकतो, हा विश्वास रेशीम शेती प्रयोगातून आला. शेतकऱ्यांनी सात हजार तुतीच्या झाडांची लागवड केलेली आहे.

एक झाड दीड फुटाच्या अंतरावर लावण्यात आले. दोन्ही झाडांमध्ये साडेतीन ते चार फूट अंतर राखले गेले. या झाडांवर वातावरणाचा फारसा परिणाम होत नाही. परंतु, तुतीची लागवड जिथे केलेली आहे, त्याच्या सभोवताली किमान ७० ते ८० फूट परिसरात कुणी रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी करणार नाही याची काळजी घ्यावी लागते. याचा सर्वाधिक झाडांना धोका असतो. या झाडांमधून ४५ दिवसांतून निघणाऱ्या एका बॅचमधून १५० ते २०० किलो कोश निघतात. यातून सव्वालाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. एक बॅचसाठी साधारणत १४ हजार रुपये खर्च येतो.

साधारणत: २८ ते ३२ दिवसांत एक बॅच निघते. नंतर १० ते १५ दिवसांच्या खंडाने वर्षातून पाच ते सहा बॅच घेता येतात. कोशची दर्जानुसार प्रतवारी केली जाते. चांगल्या दर्जाच्या कोशला ५०० ते ९०० रुपये किलो दराने विकले जातात. द्वितीय दर्जाच्या कोशला साधारणत: ३०० रुपये किलोचा दर मिळतो. कुठलाही कोश वाया जात नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. लिलाव झाला. थेट शासन खरेदी करते. दलाल वा तत्सम कुणी मध्यस्थ नाही. कोश खरेदी केल्यावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लगेच पैसे जमा होतात. शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. बचत गटातील शेतकऱ्यांना प्रत्येक बॅचमधून प्रत्येकी १५ हजार रुपये भेटतात.

प्रारंभी अभ्यास थोडा कमी पडला होता. परंतु, शेतकऱ्यांनी हिंमत सोडली नाही. कष्ट करण्याची तयारी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मार्ग सापडतो. शेतकऱ्यांना जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा भिला ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचा रेशीम शेतीवरील विश्वास कमी होऊ दिला नाही. सकारात्मक वातावरण कायम ठेवले. जिल्हा रेशीम उद्याोग केंद्रात शेतकऱ्यांची नाव नोंदणी झाली. अंडे पुंज खरेदी केली आणि रेशीम कोष बनविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अशोक भोये यांच्याकडून प्रात्यक्षिकासह शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेडमध्ये ५० किलो रेशीम कोष तयार झालेले आहे. जालना येथील शासनमान्य रेशीम उद्याोग केंद्रात किमान सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रति किलो भाव मिळाला, तरी खर्च वजा जाता चांगले उत्पन्न हाती पडते, असा शेतकऱ्यांना विश्वास आहे.

पुढील काळात तुतीची बाग मोठी होऊन आम्ही दर दोन महिन्यांनी किमान दीड लाख रुपये कमवू शकतो. भविष्यात माझ्या गटातील प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे रेशीम शेती करून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होईल. कारण, आता आमच्याकडे शाश्वत पाणी आहे, शेड आहे, तुतीची बाग आहे, व्यवसायाला लागणारी साधनसामग्री आहे. आणि सोबत सर्वांचा उद्याोगाविषयी वाढलेला आत्मविश्वास आहे. या आत्मविश्वासामुळे आपल्या कुटुंबाचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावे, हा त्यांचा विश्वास दृढ झाला आहे.

भाजीपाल्याचीही जोड

पावसाळ्यात जमिनीत भात, नागली, थोडीफार उडीद ही पिके घेता येत होती. त्यातून कोणत्याही व्यक्तीची, कुटुंबाची उपजीविका भागवली जाऊ शकत नाही. त्यामुळे कोणते पीक घेतले तर, हाती पैसे राहतील, यावर बचत गटातील शेतकऱ्यांचे बरेचदा मंथन झाले आणि त्यांनी टोमॅटो, वाल, वांगे आणि मिरची लागवड करून शेतातून उत्पन्न वाढवायचे प्रयत्न सुरू केले. ज्या शेतात भाताशिवाय दुसरे कोणतेच पीक घेतले नव्हते, तिथे रेशीम शेतीच्या प्रयोगानंतर अर्धा एकर वांगे लावले. बंधाऱ्याचे सहा वेळेस पाणी देऊन ८० जाळी (कॅरेट) वांगे झाली. त्याला साधारणत: कधी ३५० ते कधी ४०० रुपये भाव मिळाला. यातून ३० हजार रुपयांचा नफा झाला. २२ हजारांचा वाल झाला आणि १४ हजार रुपयांचे टोमॅटो झाले. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात ३५ हजार रुपये निव्वळ नफा पडला. हे पैसे तीन महिन्यांत मिळाले असले, तरी त्याच्या मागे महिंद्रा अँड महिंद्रा आणि अभिव्यक्ती या संस्थेने केलेले सहकार्य मोलाचे असल्याचे शेतकरी सांगतात. आज सर्व रान हिरवेगार झाले आहे. दीड एकरात अर्जुन जातीचा गहू पेरला आहे. एप्रिलमध्ये तो कापणीला येईल. आज गव्हाचा दर्जा पाहता किमान १३ ते १५ पोते गहू हमखास होईल, असा अंदाज शांताराम चौधरी यांनी व्यक्त केला.